दरवळ कस्तुरीचा भाग २

अधुरी प्रेमकथा
"मधू..हे एवढं सगळं घडून गेलं आणि तू आत्ता संगतोहेस! एवढी परकी झाले का रे मी तुला?" डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली.

"परकी असं नाही गं.. तु तुझ्या संसारात असताना तुला माझी काळजी नको म्हणून नाही सांगितल." त्याने उत्तर दिलं

"माझा संसार? हं माझा संसार झालाच नाही अरे कधी." तिने निर्विकारपणे उत्तर दिलं.

"म्हणजे?" आश्चर्यचकित होत त्याने विचारलं.

"तुला मुलगी झाल्याचं आईने सांगितल. आई ओरडली होती मला. 'तो तुला विसरून संसाराला सुद्धा लागला आणि तू ही अजून अशीच आहेस त्याची वाट बघत. तो आता तुझ्याकडे माघारी फिरून येणार नाहीये.' आईचं ते निर्वाणीचं बोलणं ऐकून त्या रात्री मी खूप रडले. दुसऱ्या दिवशी आईला सांगितलं..मुक संमती दर्शवली आणि मी लग्नाला तयार झाले. आईने तिच्या ओळखीत मुलगा पाहिला होता. मी फक्त लग्नाला संमती दर्शवली होती बाकी मुलगा काय करतो काय नाही मला काहीच माहीत नव्हत. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस सरले आणि नवऱ्याचे खरे रंग दिसले. रोज रात्री दारू पिऊन धिंगाणा, तमाशे मला मारझोड करून शारीरिक संबंध ठेवणे इतकंच होत होतं आमच्यात. प्रेम असं मला मिळालंच नाही. एकदिवस ठरवलं आणि खूप हिम्मत करून घरातून पळून गेले. एका मंदिरात आसरा घेतला. एक रात्र काढली मंदिरात आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन थेट मुलींचं होस्टेल गाठलं. घरातून निघताना माझी सगळी कागदपत्रं घेऊन निघाले होते त्यामुळे एका चांगल्या कंपनीत कमी पगाराची नोकरी मिळाली. एकटीच चांगलं भागत होतं. अचानक एके दिवशी कंपनी मधे चक्कर आली आणि तेंव्हा मला दिवस गेल्याच समजल. एकटीने एक मुलं सांभाळायचं म्हणजे फार टेन्शन आल होतं मला. गर्भपात करून घेणार होते मी पण मग विचार आला मनात..
'या सगळ्यात त्या निष्पाप जीवाचा काय दोष?' दिवस भरभर सरत होते. माझ्या पोटी एका निरागस मुलीने जन्म घेतला. स्वानंदी नाव ठेवलं मी तिचं. तुला आठवत आपण जेंव्हा बाप्पाच्या मंदिरात भेटायचो..तू नेहमी बोलायचास 'आपल्याला मुलगीच होणार आणि जसं मी तुझ्या सोबत आनंदी असतो तशीच आपली लेक सुद्धा आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येणार म्हणून आपल्या लेकीच नाव स्वानंदी ठेवायचं आपण.' म्हणून मी तिचं नाव स्वानंदी ठेवलं. स्वानंदी हळू हळू मोठी होतं गेली. काम आणि स्वानंदी या दोन्ही गोष्टी मॅनेज करताना फार तारांबळ उडायची. पाच वर्ष तिला सांभाळलं आणि मग तिला बोर्डिंग मधे पाठवलं. माझी मनस्थिती आणि तिच्या डोळ्यातले अश्रू..
तो पहिला दिवस आठवला तरी आजही डोळ्यात पाणी जमा होतं बघ. शेवटी लेकीसाठी झटायच ठरवलं. दुसरं लग्न करून संसार थाटू शकले असते पण मनातून तुझा विचार आणि आधीच्या नवऱ्याने केलेलं कृत्य डोळ्यांसमोरून जात नव्हत."ती म्हणाली.

"एवढा संघर्ष करत राहिलीस आणि ते ही एकटीने. आईकडे का नाही गेलीस?" त्याने विचारलं

"कशी जाणार? मी घरातून पळून गेले आणि त्याच रात्री आईने फाशी लावून घेतली. माझा सांभाळ तिने एकटीने केला होता ना..म्हणून तिच्या संस्कारांना दोष देत आत्महत्या केली अरे तिने. सगळं स्थिर स्थावर झाल्यावर मी तिला भेटायला गेले होते तेंव्हा समजल तिने असं केलं ते. आईच्या घराजवळून निघत असताना मी तुला आणि तुझ्या बायकोला पाहिलं होतं. एक क्षण असं वाटलं की तुला येऊन घट्ट मिठी मारावी पण एवढ्या वर्षांनी तुला असं तुझ्या कुटुंबासोबत आनंदी बघून मी खुश होते. मी तिथून निघाले आणि पुन्हा हॉस्टेल वर आले. आई गेलेल्याच दुःख पचवायला दोन महिने लागले होते.
माझी स्वानंदी पण खूप हुशार होती. तिने तिच्या स्कॉलरशिपच्या जोरावर स्वतःच शिक्षण पूर्ण केलं. कंपनीत जॉब करता करता मी माझ्या गाण्याचा छंद जोपासला आणि त्यातच पुढे करिअर करायच ठरवलं. मुलांना संगीत शिकवता शिकवता त्यात आणखी पारंगत झाले. खूपदा विचार केला होता कोणत्या तरी मोठ्या मंचावर गाण्याचा पण कधी हिंमत झाली नाही.
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे..
27.07.24

🎭 Series Post

View all