दरवळ कस्तुरीचा भाग ३ (अंतिम)

अधुरी प्रेमकथा
आता पुढच्या सहा महिन्यांनी लेक लग्न करून सासरी जाईल. आपल्याला आपली निवड करता आली नव्हती. घरातल्या मोठ्या माणसांनी नकार दिला आणि आपण तो पचवला. माझं संपूर्ण आयुष्य चुकलं पण माझ्या लेकीचा संसार चांगला फळू दे इतकीच देवा चरणी प्रार्थना आहे बघ." ती म्हणाली

"इतकं सगळं एकटीने सहन केलंस?" त्याने विचारलं.

"एकटी कुठे होते अरे.. माझ्यासोबत माझी लेक होती. माझ्या समोर माझ्या लेकीच उज्वल भविष्य होतं. आई म्हणून खूप कमी वेळा मी तिच्या वाट्याला आले पण एकदा सुद्धा तिने ती खंत बोलून दाखवली नाही. खूप चांगल्या वाईट आठवणी गाठीशी होत्या माझ्या. चांगल्या आठवणींनी जगण्याची उम्मेद दिली आणि वाईट आठवणींनी ध्येय...पाय खेचणारा माणूस असल्याशिवाय आपली प्रगती होत नसते तसचं काहीस माझ्या आयुष्यात झालं."ती म्हणाली.


"पुढे काय विचार केला आहेस?"त्याने विचारलं.

"खरं सांगू का? सध्या काहीच विचार करत नाही मी. थकले अरे विचार करून. अर्ध आयुष्य गेलं लोकांच्या वखवखलेल्या नजरा बघण्यात. एकटी स्त्री म्हणून जगताना खूप घाबरायचे. भीती वाटायची खूप. लेडीज हॉस्टेल मधे राहून काम करता करता जेंव्हा गाणी शिकवून  जास्तीचे पैसे कमवू लागले तेंव्हा ठरवलं.. आधी स्वतःच घर घ्यायचं. स्वानंदी बोर्डिंग मधे असल्यामुळे तिचा जास्त खर्च नव्हता. दोन वर्षांपूर्वीच या घराचा ताबा मिळाला. लेक पण कामानिमित्त बडोदाला असते. लग्न झालं की ती तिकडेच शिफ्ट होईल. दोघांनी पण ठरवलं आहे लग्न कोर्ट मॅरेज करायचं उगाच पैशांची उधळपट्टी करायची नाही. चार माणसांना जेवण खायला घालून आशीर्वाद हवे असतील तर आम्ही वृध्दाश्रम आणि लहान मुलांच्या आश्रममध्ये जाऊन एकेक दिवस त्यांच्यासोबत घालवून त्यांना गरजेच्या वस्तू देऊन आशिर्वाद मिळवू. मुलांच्या एवढ्या चांगल्या निर्णयात आड काठी का बरं करावी..म्हणून आम्ही सुद्धा ते मान्य केलं. मग राहिले ती मी एकटी..पण आता कसली चिंता नसेल अरे. लेकीने आणि जावयाने सांगितल आहे 'आता फक्त आराम करायचा.. आता तू काळजी करायची नाही कारण आम्ही तुझी काळजी घेणार आहोत' म्हटलं हो रे बाबांनो.. तुम्ही सांगाल तसं.." ती म्हणाली.

"आजही किती भरभरून बोलतेस. इतकं दुःख.. इतका त्रास सहन केलास पण एकदा सुध्दा नशिबाला दोष दिला नाहीस!" तो म्हणाला.

"नशिबाला दोष का द्यायचा. अरे आपल्या आयुष्यात काय होणार आहे हे आधीच ठरलेलं असतं..आपण फक्त वाट बघायची असते ती योग्य वेळेची. आपल्या वाट्याच आपल्याला कधी मिळेल याची. आणि मी भरभरून बोलते कारण तु आजही आधीसारखाच फक्त ऐकतोस ना म्हणून" दोघेही यावर खळखळून हसतात.

"चल ठेवते फोन.. वाटलं बोलावं तर कर पुन्हा फोन.." ती म्हणाली.

"हो नक्की..चल बाय..काळजी घे." तो म्हणाला आणि फोन ठेवून दिला.
फोन ठेवून दिला आणि तिच्या मनात शब्दांनी फेर धरला.

आजही तो आठवतो..
अगदी तसाच माझ्यावर प्रेम करणारा.
माझी अखंड बडबड  ऐकणारा.
पहिल्या पावसाची हलकीशी  बरसात तापलेल्या धरतीवर झाली की मातीच्या येणाऱ्या सुगंधापरी तन मन फुलवणारा..मला जपणारा..
आजही तो आठवतो..
समाप्त.
©®श्रावणी लोखंडे..
25.07.24


🎭 Series Post

View all