Login

डार्क डेथ भाग २

मॉडेल रेश्मा बेपत्ता


डार्क डेथ

भाग २

पूर्वार्ध :
किरणला कोणीतरी त्याचा पाठलाग करतोय, याचा सतत भास होत असतो. काही दिवस ऑफिसला सुट्ट्या मारल्या नंतर तो बऱ्याच दिवसांनी ऑफिसला जातो. गप्पा करता करता टीव्हीवर एक न्युज फ्लॅश होत असते.

आता पुढे….


"किरण, तू घर बदलले म्हणे?" मित्रांपैकी एकाने विचारले.

"हो, परवाच शिफ्ट केले." किरण उत्तरला.

"अरे काय, कसला मस्त फ्लॅट होता. आणि व्ह्यू पण कसला भारी होता." एक मित्र म्हणाला.

"एक्झॅक्टली कुठल्या व्ह्यू बद्दल बोलतोय? नाही म्हणजे तलाव दिसत होता ते की तो समोरचा फ्लॅट?" दुसऱ्याने मस्करी केली.

"हा हा हा, दोन्ही." परत त्यांचे हसणे सुरू झाले.

"थोडा घरमालकाचा आणि पाण्याचा पण प्रोब्लेम होता." किरण म्हणाला.

"तरी फारच तडकाफडकी बदलले. महिना पण संपायचा होता."

"हम्म, बदलायचा होताच. मग शिफ्ट करून घेतले." किरण.

"३० वर्षीय सुप्रसिद्ध मॉडेल रेश्मा बेपत्ता."

टीव्हीवर न्यूज फ्लॅश होत होती.

ते बघून किरणला जोरदार ठसका लागला.

"अरे हळू. हे घे पाणी." राहुल त्याचा हातात ग्लास देत म्हणाला. पण किरणचे सगळं लक्ष टीव्हीवर होते.

"काय ही मोठी हाय प्रोफाईल लोकं? नक्कीच काही घोटाळा करून गायब झाली असेल." त्यांच्यातील एक जण म्हणाला.

"ही तीच आहे ना, पावडरच्या एडव्हर्टाइज मधील? आठ दहा वर्षापूर्वी नॅशनल क्रश होती. मुलं तर मुलं, मुली सुद्धा हिच्या दिवाण्या होत्या."

"ती ऍडच खूप भारी होती. त्यात कसली हॉट दिसत होती."

"हॉट नाही रे, गोड म्हण. तेव्हा किती लहान होती. क्यूट दिसत होती."

"हा पण फॅन दिसतो, भारीतला वाला.."

सगळे हसू लागले.

"पण अलिकडल्या दिवसांमध्ये फारच काँट्रॉवर्सिजमध्ये फसली होती. तिच्या बद्दल किती किती, काय काय ऐकू येत होते."

"या हाय प्रोफाइल लोकांचं असेच असते. फेमस व्हायला लागले की काम कमी करतात आणि न्युजच जास्त बनवतात."

"ते पण आहेच. पण एव्हाना तिला कमी कामं मिळत होती म्हणे."

"आता तर ज्याला डेट करतेय, तो तर तिच्यापेक्षा ३-४ वर्षांनी लहान आहे, ऐकले."

"हो कुणी बिजनेसमन आहे."

किरणच्या बाजूला बसले सगळे रेश्मा बद्दल बोलत होते. तर टीव्हीवर तिच्याबद्दल माहिती पुरवत होते. अगदी तिच्या जन्मापासून ते तिचे शिक्षण, करिअर असे सगळे तिच्या फोटोसहित सांगत होते. किरणचे सगळे लक्ष टीव्ही वर होते.

किरणच्या हातातील पाण्याचा ग्लास हलत होता. ग्लास मधुन पानी टेबलवर खाली उड्या घेत होते. त्याच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा होऊ लागले होते.

"तुला पण आवडत होती की काय? प्रेमाच्या नादात किडनॅप वगैरे तर नाही केले?" सगळे त्याची मस्करी करत होते.

"नाही नाही. त्याचा चेहऱ्यावरचा रंगच उडाला आहे. असे वाटते किरणनेच काही केलंय." दुसरा हसू लागला.

"तू तर असा घाबरला आहे जसे काय तुझं कोणी जवळचंच बेपत्ता झालेय." एक मित्र मस्करी करू लागला.

" जवळचे असो व नसो, जे घडले आहे ते वाईटच घडले आहे ना?" किरण थोडे रागानेच म्हणाला. तसे सगळे शांत झाले. पण सगळ्यांनाच त्याचे वागणे थोडे विचित्र वाटले. एका गमतीच्या वाक्यावर तो एवढा गंभीर होईल, असे कोणालाच वाटले नव्हते. थोड्यावेळ टिव्ही बघून सगळे आपापल्या कामाला निघून आले.

किरणचे मात्र कामात काहीच लक्ष लागत नव्हते. तब्बेत बरी नसल्याचे कारण सांगून तो घरी निघून आला.

घरी पण त्याला स्वस्थ बसवल्या जात नव्हते. टीव्हीवर न्युज चॅनल सतत सुरू होते. वारंवार त्याचा हात मोबाईलवर जात होता, पण परत हात मागे करून घेत होता. लॅपटॉपमध्ये रेश्माची माहिती शोधावी, तिच्या केसची माहिती मिळवावी असे त्याला वाटत होते. पण त्याने मनावर नियंत्रण ठेवत टीव्हीवरील न्यूजवर लक्ष केंद्रित केले.

न्यूजमध्ये कुठल्याही घटनांचे संबंध कुठेही लावत होते. कितीतरी जुन्या न्यूज उकरून बाहेर काढल्या जात होत्या. कितीतरी व्यक्तींसोबत रेश्माचे संबंध जोडल्या जात होते. नवनवीन शंका कुशंका निर्माण होत होत्या, नव्हे केल्या जात होत्या. प्रत्येक चॅनलवाले आपापले तर्कवितर्क लावत होते. इकडे किरणची बेचैनी मात्र वाढत चालली होती.


*******

काय झाले असेल रेश्मा सोबत?

रेश्मा अशा कुठल्या गोष्टीत फसली असेल?

एक साधारण व्यक्ती किरण, हाय प्रोफाइल असलेल्या एका मॉडेलसाठी इतका चिंतित का आहे?