Login

डार्क डेथ भाग ३

हत्या की आत्महत्या?


डार्क डेथ

भाग ३


न्यूजमध्ये कुठल्याही घटनांचे संबंध कुठेही लावत होते. कितीतरी जुन्या न्यूज उकरून बाहेर काढल्या जात होत्या. कितीतरी व्यक्तींसोबत रेश्माचे संबंध जोडल्या जात होते. नवनवीन शंका कुशंका निर्माण होत होत्या, नव्हे केल्या जात होत्या. प्रत्येक चॅनलवाले आपापले तर्कवितर्क लावत होते. इकडे किरणची बेचैनी मात्र वाढत चालली होती.

"देवा, मी जे बघितले आहे, तसे काही नसावे. जस्ट मजाक मस्ती असू दे. ते काही रिअल नसावे." किरण मनोमन देवाची प्रार्थना करत होता.

रात्री पण त्याला नीट झोप आली नव्हती. बऱ्याच वेळ तो काहीतरी विचार करत होता. पोलिस स्टेशनला जावे काय, बरेचदा त्याचा मनात येत होते. परत जे बघितले ते खोटे असू शकते, असेही वाटत होते. तो द्विधा मनस्थितीत अडकला होता. आणि असेच कधीतरी उशिराने त्याचा डोळा लागला. आजकाल त्याची रात्र असेच काहीसे विचार करण्यात जात होती.

दोन दिवसांनंतर….

किरणला सकाळी उशिरानेच जाग आली. ऑफिसला जायला उशीर होतोय बघून तो भराभर आवरायला लागला. तेवढयात फोन वाजला. उचलू की नको विचार करत त्याने त्यावर नंबर बघितला. "आई कॉलिंग.." दिसले आणि ऑफिसची बॅग भरता भरता फोन उचलला.

"हा आई बोल.."

"अरे कुठे गायब होतास? किती फोन केले, उचलत पण नव्हता. ठीक आहेस ना?"

"हो ही अगदी ठीक आहे. फोन खराब झाला होता."

"बरं बरं. नाश्ता झाला काय?"

"नाही. आता ऑफिसला गेलो की करेल."

"का रे? स्वयंपाकवाली मावशी आली नाही काय?"

"अगं ते मी घर बदलले. तर आता इकडे नवीन शोधतोय. भेटेलच."

"का? अचानक? काही बोलला नाहीस आधी."

"अगं असच थोडा प्रोब्लेम होता. घरमालक पण खूप किराया वाढवत होता. म्हणून मग बदलले."

"हो रे. तसे पण तुला एवढया मोठ्या घराची गरज नव्हती. तेवढेच पैसे वाचतील."

"हो. आणि आता फ्लॅट शेअर करायला रूममेट पण शोधतोय."

"बरंय. बरं ऐक.."

"हा बोल.."

"अरे तो तुझा काका पैशांवरून तुझ्या बाबांना खूप त्रास देतोय. जीवावरच उठतो. नाकीनऊ आणून सोडतोय. त्याला पैसे देऊन कायमचेच प्रश्न मिटवून टाकावे म्हणतेय. पैसे जमले असतील तर पाठवतो काय?"

"हो हो. आहेत साठले. संध्याकाळ पर्यंत ट्रान्स्फर करतो."

"तुला त्रास देतेय. पण काय करणार ताईच्या लग्नात लोन घेतले. त्यातच बाबांची पेन्शन जातेय बघ. वरती फार पैसे शिल्लकच राहत नाही."

"अग त्यात त्रास काय? माझी सेविंग आहे. आणि आपल्यासाठीच कमावतो ना. पाठवतो मी."

"हो रे माझ्या सोन्या." आईला आपल्या मुलाचे खूप कौतुक वाटत होते आणि ते तिच्या आवाजातून जाणवत सुद्धा होते.

सोन्या शब्द ऐकून त्याला हसू आले. त्याला काहीतरी आठवले.

"आई, यावेळी गावी आलो की थोडं महत्वाचं पण बोलायचं आहे." त्याचा आवाजात आनंद जाणवत होता.

"सूनबाई वगैरे शोधली की काय?"

"तुला लगेच सगळं कसं काय कळते ग?" तो हसत, थोडा लाजत म्हणाला.

"विसरलास काय? तुझी आई आहे मी." ती पण हसू लागली.

"हे हे हे.."

"तुझी आजी मानेल की नाही, माहिती नाही. तुला आपल्या घरचे आणि गावाचे वातावरण तर माहितीच आहे. बरं आधी माझी भेट घालून दे."

"हो हो. लवकरच भेटीला घेऊन येतो. बरं आता ऑफिसला जायला उशीर होतोय. संध्याकाळी घरी आलो की सविस्तर बोलू. काकाचा पण काहीतरी बंदोबस्त करू. फारच त्रास देत असेल तर पोलिसात जाऊ."

"हो हो. ठीक आहे. काळजी घे आणि बाईक हळू चालव."

"हो ग. बाय." फोन ठेवत त्याने बाईकची चाबी आणि बॅग घेतली. आणि पळतच बाहेर आला.

"ओहह शीट. बाईकला पण आताच पंक्चर व्हायचे होते." स्वतःशीच कुरकुर करत त्याने ऑटोरिक्षा पकडली आणि ऑफिसला गेला.

संध्याकाळी सगळे मित्र कॅन्टीनमध्ये चहा कॉफी घेत गप्पा मारत होते. येणाऱ्या सोमवारी कशाची तरी सुट्टी होती. सगळेजण तीन दिवस बाहेर कुठे फिरायला जायचे म्हणून योजना आखत होते. तेवढयात टीव्हीवर बातमी येऊ लागली.

" ब्रेकिंग न्युज: बेपत्ता असलेल्या ३० वर्षीय प्रसिद्ध मॉडेल रेश्मा यांचा मृतदेह सापडला आहे. "

"हॉटेल स्टारशक्तीच्या मागच्या आवारात रेशमाचा निर्वस्त्र मृतदेह सापडला."

"रेश्मा यांची आत्महत्या. एकविसाव्या मजल्या वरून उडी घेतली."

"पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली आहे. रिपोर्ट्स आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल."

"मर्डर की सुसाईड? असे प्रश्न निर्माण होत आहेत."

"रेश्माच्या परिवारतील सदस्य हॉस्पिटलमध्ये पोहचत आहेत."

"सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेश्मा काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती."

"रेश्माच्या बॉयफ्रेंड सोबत काही संपर्क होत नाहीये."

टीव्हीवर बातम्यांवर बातम्या येत होत्या. कोणतेही चॅनल लावले तरी तीच माहिती पुढे येत होती.

"रेश्मा यांच्या शरीरावर काही जखमा , छोट्या छोट्या चटक्यांचे निशाण दिसत होते. एक स्तन सुद्धा कापल्यासारखे दिसत होते: प्रत्यक्षदर्शी."

ही शेवटची बातमी ऐकू आली आणि किरण जागीच खाली पडला. तो बेशुद्ध झाला होता.

********

दोन दिवसांनी…

"हॉटेल हेवनमध्ये एका तरुणाची गळफास घेऊन आत्महात्या."

********
क्रमशः


रेश्माच्या मृत्यू मागचे हे नवीन वळण काय अनर्थ घेऊन येईल?

रेश्माचा मृत्यू आणि किरण यांच्यात काय संबंध आहे?

किरणच्या प्रेम प्रकरण वरून त्याच्या घरी काही वादळ येईल काय?

गळफास घेतलेला हा तरुण कोण आहे?