भाग ४ 
पूर्वार्ध: 
रेश्मा हीचा मृत्यू झाला होता. पण अजून त्याचे कारण स्पष्ट व्हायचे होते. त्यातच दोन दिवसात एका हॉटेलमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याचे कळले होते. 
आता पुढे… 
पोलिस स्टेशनमध्ये….
"रेश्मा केसमध्ये काही अपडेट्स?" इन्स्पेक्टर अभिजित म्हणाला. 
"पोस्टमार्टम रिपोर्ट्स आल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही." सहपोलीस माने म्हणाले. 
"हॉटेलचे सीसीटीव्ही चेक केले?" 
"हो सर. अजूनही संशयास्पद असे काही सापडले नाही. पण मागच्या एंट्रन्स आणि २१व्या मजल्याचे सीसीटीव्ही बंद असल्याचे कळले आहे." 
"इथेच पाणी मुरतंय. चेक करा." इन्स्पेक्टर अभिजित. 
"हो. आणि हॉटेलची रूम रेश्माच्या नावावर बुक होती. रूममध्ये मात्र काही सापडले नाही." माने.
"ओके. तिथे उपस्थितीत असलेल्या प्रत्येकाची इन्फॉर्मेशन काढा. तिथे आजूबाजूला असलेले सगळे सीसीटीव्ही चेक करा. आणि कॉल्स डिटेल सुद्धा मागवा. ही केस इन्स्पेक्टर विक्रमकडे गेली आहे, लक्षात ठेवा." अभिजित. 
"हो सर." माने. 
तेवढयात फोन वाजला. अभिजितने बोलून फोन खाली ठेवला. 
"माने गाडी काढा. हॉटेल हेवन." अभिजित बोलतच उठला.
थोड्या वेळातच त्यांची पूर्ण चमू हॉटेल हेवनला पोहचली.
थोड्या वेळातच त्यांची पूर्ण चमू हॉटेल हेवनला पोहचली.
"कुठे?" अभिजीतने हॉटेलमध्ये येत विचारले. 
"बारावा, शेवटचा मजला." हॉटेल मॅनेजरने  माहिती पुरवली. 
पोलिसांची चमू भरभर वरती गेली. 
फोटोग्राफर आपले काम करू लागला. भराभर खोलीचे फोटो घेऊ लागला. बाकीच्या चमूने सुद्धा हातात हॅण्ड ग्लोव्हज चढवलेत आणि आपापल्या कामाला लागली.  
"सर, मर्डर आहे." माने समोर बघत म्हणाले. 
"तुम्ही पोलीस आहात, राईट?" अभिजीत. 
"हो सर, कोई डाऊट?" माने.
"मग असे स्टेटमेंट द्यायच्या आधी आजूबाजूला कोण आहेत, बघितले काय? आपलं काम माहिती, पुरावे गोळा करणे आहे. निष्कर्ष काढणे नाही." अभिजीत. 
"१७-१८ वर्ष झालेत सर या कामात, प्रेत बघूनच काय झाले असेल कळते." माने. 
"परत तेच?" अभिजीत. 
"अंतर्वस्त्रावर कोण सुसाईड करतात?" समोर फॅनला लटकलेले शरीर बघून माने म्हणाले. 
"तुमच्या या स्टेटमेंटचा व्हिडिओ क्षणात सोशल मीडियावर फिरू शकतो. कामाला लागा." अभिजीत डोळे फिरवत म्हणाला. 
पोलिसांची चमू आपापले काम करू लागली. 
"आत्महत्या करण्याआधी एक सुसाईड नोट लिहून ठेवणे, ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे, एवढे तरी कळायला हवे." माने त्या खोलीचा तपास करत बडबड करत होते. त्याचा सहकर्माचाऱ्यांना त्याच्याकडे बघून हसू येत होते, इतका तो वैतागला दिसत होता. 
"सर, याचं नाव हेमंत आहे." दुसरा पोलीस म्हणाला. 
"तुम्हाला कसे माहिती?" अभिजीत.
"त्या नावानेच रूम बुक आहे." पोलिस. 
"पूर्ण माहिती घ्या आणि त्यांचा घरी इन्फॉर्म करा." अभिजीत. 
"ओके सर." 
"सर, याच्या आणि रेश्माच्या केसमध्ये बरेच साधर्म्य आहे. दोघांचा मर्डर सारख्याच व्यक्तीने केला आहे." मानेने परत आपलं डोकं लावणं सुरू केले. 
"अच्छा! ते कसे?" अभिजीत आपल्या हातातील पेपर बाजूला ठेवत, हात गुंडाळत माने पुढे उभा होत म्हणाला. 
"दोघांच्याही शरीरावर फक्त अंतर्वस्त्र, दोन्ही शरीरावर सारख्याच पद्धतीचे घाव आहेत. दोघांच्याही मृत्यूला सुसाईड भासवण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही खोल्या हॉटेलच्या शेवटच्या मजल्यावर आहेत. खोलीमध्ये सुसाड नोट नाही. बाकी काहीच त्यांचे पर्सनल सामान नाही. फोन आहे पण त्यात सिम कार्ड नाही. आणि दोन्ही हॉटेल बऱ्यापैकी जवळ आहेत." माने आपलं डोकं खाजवत खाजवत बोलत होते. 
"शट अप माने." अभिजीत रागावला. 
"सर, या लोकांनी वैताग आणून ठेवला आहे. आपली सगळी कामे, पर्सनल गोष्टी बाजूला ठेवून याच्या मागे फिरावे लागते." माने.
"तुम्हाला याच कामाचा पगार मिळतो." अभिजीत.
"हो सर. पण म्हणून यांनी एवढे सुसाईड , एवढे मर्डर करायचेत? कुठं चालली माणुसकी? कुठं चालला आपला देश?" माने काळजीच्या सुरात म्हणाले. 
"यांच्यातली सामाजिक भक्ती जागी झाली आहे." दुसरा कर्मचारी हळूच म्हणाला. 
अभिजीतला ते ऐकून हसू आले. पण त्याने आपले हसू आवरते घेतले. आणि परत काही कामाचे आदेश दिले. 
"सर, हा हेमंत नाही." एक पोलिस येत म्हणाला. 
"व्हॉट? मग कोण आहे?" अभिजीत.
"दिलेल्या पत्त्यावर तपास केला तर कळले हेमंतचा आठ महिन्यापूर्वीच मृत्यू झाला आहे." पोलिस कर्मचारी.
"काय? मग आता ही खोली त्याचा नावाने कशी काय बुक आहे? मॅनेजरला बोलवा." अभिजीत. 
तेवढयात मॅनेजर तिथे आला. 
"रूम बुक करतांना डॉक्युमेंट्स चेक करता की नाही?" अभिजीत.
"सर आयडी कार्ड चेक करतो. नंतरच चाबी देतो." मॅनेजर घाबरत म्हणाला. 
"मग हे कसं शक्य आहे? ज्या व्यक्तीने ही खोली बुक केली आहे त्याचा आधीच मृत्यू झाला आहे." अभिजीत. 
"पण सर, हेमंतची इथे भरलेली सगळी माहिती खरी आहे." पोलिस कर्मचारी. 
"सीसीटीव्ही फुटेज, हॉटेल मधील सर्वांची माहिती चेक करा. इथले सगळे फूटप्रिंट्स घ्या." अभिजीतने आदेश दिले. 
"सर, हेमंतने सुद्धा सुसाईड केले होते. असे त्यांच्या घरच्यांनी सांगितले." पोलिस कर्मचारी.
"मी म्हणालो होतो. काहीतरी गडबड आहे. कोणाचा तरी आत्मा सुड घेतोय." माने गूढ आवाजात म्हणाले. 
त्याला बघून परत सर्वांना हसू येत होते. पण अभिजीतला बघून सर्वांनी आवरते घेतले. आणि आपापले काम करू लागले. 
******
"राहुल अरे ते ते किरण.." किरणच्या आईचा राहुलला फोन आला. 
*******
ही व्यक्ती कोण आहे? खरंच हेमंत आहे काय? 
या तिन्ही व्यक्तींचा एकमेकांसोबत काय संबंध होता? 
माने म्हणतोय तसे कोणाचीतरी आत्मा सूड घेत आहे काय? 
रेश्माच्या मृत्यूचा उलगडा होणार काय? 
******
क्रमशः
