Login

डार्क डेथ भाग ७ अंतिम

डिजिटल मीडिया चा गैर वापर


डार्क डेथ

भाग ७ (अंतिम)

पूर्वार्ध:
पॉर्न व्हिडिओ बघता बघता तेजस किरणला डार्क वेबची लिंक देतो. किरण त्याच्या सगळ्या लेव्हल एन्क्रिप्ट करतो. एक खूप भयानक विंडो त्याच्या स्क्रीनवर येते.

आता पुढे.


"वुई आर वॉचिंग यू!"

"व्हिडिओ उजर्स लिस्टमध्ये तुमचे स्टेटस ॲक्टिव आहे. पण तुमचा प्रतिसाद येत नसल्याने आम्हाला जाणवले की तुम्ही विथाऊट इन्विटेशन इथे आला आहात. जे आम्हाला मान्य नाही."

"तुम्ही चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी, चुकीच्या चुकीच्या पध्दतीने या कार्यक्रमात भाग घेतला आहे. आम्ही त्याची परवानगी देत नाही."

"तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही इथून जाऊ शकत नाही."

"आम्ही तुम्हाला बघत आहोत. वुई आर वॉचिंग यू!"

एका पाठोपाठ असे पाच सहा मेसेज लॅपटॉपच्या स्क्रीनवर येऊन धडकले. ते बघून मला खूप भीती वाटली. माझं लक्ष लॅपटॉपच्या कॅमेराकडे गेले, तर त्याचा रेड लाईट लागला होता आणि तो ब्लिंक करत होता. ते खरंच मला बघत होते. त्यांनी माझा लॅपटॉप, माझी पूर्ण सिस्टीम हॅक केली आहे, हे माझ्या लक्षात आले. मला खूप भीती वाटू लागली. काय करावे काहीच सुचत नव्हते. शरीर पूर्ण घामाघुम झाले होते. लॅपटॉपच्या सगळ्या कीज, बटन दाबून झाल्या होत्या, पण लॅपटॉप बंद होत नव्हता. डोकं काम करत नव्हते. आणि शेवटी मी बॅटरीच काढून घेतली. आणि मग लॅपटॉप बंद झाला." किरण राहुलला सांगत होता तेव्हा सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण भीतीदायक भाव उमटले होते. कपाळावर घाम जमा झाला होता.

"तुझा लॅपटॉप हॅक झाला, म्हणजे तुझ्या लॅपटॉप मधील सगळी माहिती त्यांना मिळाली होती." राहुल.

"हो बहुतेक. त्यात माझे बँक डिटेल्स, ऍड्रेस, फोन नंबर सगळेच होते." किरण.

"तुझा फोन खराब झाला नव्हता तर? तू मुद्दाम बंद करून ठेवला होता?" राहुल.

"हो. माझा फोन रेकॉर्ड करत असेल तर? म्हणून बंद ठेवला होता."

"हम्म. म्हणून तू टेन्शनमध्ये आहेस तर? पण मला नाही वाटत ते एवढे सिरीयस असावे. बरेचदा असे व्हिडिओ फेक पण असतात. काही गोष्टी उगाच पसरविण्यासाठी वगैरे पण असतात." राहुल त्याची भीती कमी व्हावी म्हणून त्याला समजवत होता.

"मला पण तसेच वाटले होते. पण.."

"पण काय?"

"त्या घटने नंतर दोन दिवसांनी माझ्या घरी एक एनवोलोप आले. मी ते उघडून बघितले तर त्यात एक फोटो होता. माझ्या फ्लॅट मधुन मी बाहेर पडतानाचा तो फोटो होता. आणि त्यावर लिहिले होते, "वुई आर वॉचिंग यू! आमच्या बद्दल कोणाला कळवण्याचा प्रयत्न केला किंवा परत तुम्ही ही ट्रिक वापरली तर आमच्या व्हिडिओ मधील पुढील विक्टीम तुम्ही असाल. सावधान! वुई आर वॉचिंग यू!"
किरण घाबरत सांगत होता.

"ओह! म्हणून तू एवढया तडकाफडकी घर बदलले?" राहुल.

"हो."

"मग त्या नंतर असे काही मेसेज, लेटर आले काय?" राहुल उत्सुकतेने विचारत होता.

"नाही." किरण उत्तरला.

"मग जस्ट चील यार. काही होणार नाही." राहुल.

"हम्म! चल निघुया." किरण कसल्यातरी विचारत दिसत होता.

"हो." म्हणत दोघेही बाहेर जायला निघाले.

"किरण, वेट.." किरण दरवाजा उघडणार तेवढयात राहुलला काहीतरी आठवले आणि त्याने आवाज दिला.

"काय?"

"या सगळ्याचा आणि रेश्माचा संबंध काय? तू रेश्मा बद्दल काहीतरी सांगणार होता."

"याचा संबंध आहे. त्या मास्कधाऱ्याने त्या माणसाला मारले, ते बघून मी खूप घाबरलो होतो. मी जेव्हा ते बंद करण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्या व्हिडिओ सोबतच स्क्रीनवर एक ऍड आली होती. त्यावर रेश्माचा फोटो होता. आणि त्याखाली लिहिले होते "Coming soon…. Stay tuned…. Special treat…" आणि त्यावर खूप मोठी किंमत सुद्धा लिहिलेली होती." किरण बोलत होता तेव्हा त्याचे शरीर थरथरत होते.


"ओह शीट! मला आतापर्यंत हे सगळं फेक वाटत होते. असेच घाबरावण्यासाठी बनवलेले व्हिडिओ वाटत होते. कारण हे सगळं इतके इलिगल आहे, तर सरकारने या अशा साईटवर बैन आणला असता, असे वाटत होते. " राहुल.

"हो. पण तिच्या मृत शरीराचे ज्या पध्दतीने डीस्क्रीप्शन केले आहे, ते असेच आहे."

"हो."

"ती बेपत्ता झाली तेव्हापासूनच मला पोलिसात जाऊन हे सगळं सांगावे वाटत होते. पण भीती सुद्धा वाटत होती." किरण.

"नाही रे. तू सांगायला हवे होते. कदाचित ती वाचली असती. आपण या देशाचे जबाबदार नागरिक आहोत. काही चुकीचे घडतांना आपल्या दिसत आहे, कळत आहे तर आपण लगेच ते कळवायला हवे. त्यावर काही अँक्शन तरी घेतल्या जाईल." राहुल.

"आता जाऊ का पोलीस स्टेशनला?" किरण.

"हो, अजूनही बरीच मदत होऊ शकते. नाहीतर रेश्माच्या केसमध्ये उगाच निर्दोष व्यक्तीला शिक्षा मिळेल. बघितले ना न्युजमध्ये तिच्या बॉयफ्रेंड बद्दल काहीही बोलल्या जात होते, जसे काही त्याच्यामुळेच ती मेलीये. चल आपण दोघेही जाऊया." राहुल म्हणाला.

"हो. ठीक आहे." किरण.

दोघेही बोलतच वॉशरुम बाहेर पडले.

"राहुल, मॅनेजर बोलवत आहे. मीटिंग आहे." एकाने निरोप दिला.

"तू जा. मी पोलीस स्टेशनला जातो. रात्री फोन करतो, सवित्सर कळवतो." किरण म्हणाला.

"ठीक आहे. बोलू रात्री. जमले तर येतोच." राहुल.

"हो."

एवढे बोलून किरण निघून गेला होता. त्यानंतर तो आलाच नाही. आणि दोन दिवसांनी किरणने आत्महत्या केली, असा पोलीसस्टेशन मधुन त्याचा घरी फोन गेला होता.

ते सगळं आठवून राहुलचा गळा दाटून येत होता. तेवढयात त्याचा फोन वाजला.

"किरणचा नवीन पत्ता.." पलीकडून ऋता रडत रडत, हुंदके देत बोलत होती.

"मी कोणी किरणला ओळखत नाही. परत या नंबरवर फोन करू नका. रॉन्ग नंबर." एवढे बोलून राहुलने फोन बंद केला.

"सॉरी ऋता." राहुल आवंढा गिळत, आपले डोळे पुसत म्हणाला.

आजच सकाळी राहुलच्या घरी त्याच्यासाठी एक लिफाफा आला होता. त्यात ऑफिसमध्ये वॉशरूम समोर किरण आणि तो बोलतांनाचा फोटो होता. आणि त्यात लिहिले होते.


"वुई आर वॉचिंग यू!"

"आमच्या बद्दल कोणाला कळवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या रेड रूमच्या व्हिडिओ मधील पुढील विक्टीम तुम्ही असाल."

" सावधान!"

" वुई आर वॉचिंग यू!"

*********

समाप्त


सदर कथा पुर्णतः काल्पनिक आहे. चुकीची माहिती पसरवणे, हा कथेचा उद्देश नाही. डार्क वेब, डीप वेब अशा साईट बद्दल गूगल वरून माहिती मिळवून ही कथा लिहिली आहे. सोशल, डिजिटल मीडियावर असे काळे सावट पसरले आहे. फेसबुक, आणि इतर बऱ्याच वेबसाईट आहेत ज्यात अशा हिडन लिंक्स असतात, ज्यातून त्यांना आपली पर्सनल माहिती मिळत असते. डिजिटल मीडिया वापरतांना काळजी घ्या, सतर्क रहा, एवढेच कथेतून सांगण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद.