Login

डार्लिंग डॉट कॉम : भाग ९

Its A Mysterious Story Of Brahmin Man

डार्लिंग डॉट कॉम : भाग ९

वाचक मंडळी तुम्हाला काय वाटतं एकदा वासनेच्या आहारी गेलेला व्यक्ती सहजपणे बाहेर पडू शकतो ?..पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तो..

पार्वती सुदर्शनला माफ केल्यापासून सगळं सुरळीत चाललं होतं. सुदर्शन नेहमीप्रमाणे पूजा, आरत्या करण्यात व्यस्त असे, आणि पार्वती तिच्या घरकामात गुंग होती. एके दिवशी, पार्वती तिच्या मुलांना घेऊन बाजारात खरेदीसाठी गेली होती. बाजाराच्या गजबजलेल्या वातावरणात पार्वती आनंदाने खरेदी करत होती, पण अचानक तिची नजर एका चमचमत्या कारवर गेली. त्या कारमध्ये तिला सुदर्शन बसलेला दिसला. ती त्याच्याकडे आनंदाने जाणार होती, पण त्याचवेळी तिने पाहिलं की, गाडीत बसलेल्या एका सुंदर महिलेनं सुदर्शनला मिठी मारली आणि त्याला किस केलं. सुदर्शनही त्या क्षणी हसत-हसत तिला किस करत होता.

हा प्रसंग पाहून पार्वतीच्या काळजात मोठी धडक बसली. तिचं मन पुन्हा चिरडून गेलं. ती अजूनही सुदर्शनच्या प्रेमात होती, परंतु या विश्वासघातामुळे तिच्या मनात राग आणि निराशा निर्माण झाली होती. तिने काहीही न बोलता मुलांना सोबत घेतलं आणि घरी परतली.

घरी पोहोचल्यावर पार्वतीने मुलांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या मनातला संताप आणि दुःख थांबायला तयार नव्हतं. तिने पटकन घरातली कामं उरकली आणि रडत-रडत आपल्या वडिलांना फोन लावला. तिच्या वडिलांनी फोन उचलला आणि तिच्या आवाजातली घाबरलेली, कोसळलेली स्त्री ऐकून ते लगेचच गंभीर झाले.

"बोल पार्वती," तिचे वडील म्हणाले. "काय झालं? का रडतीयेस?"

"बाबा... मला तुमची मदत हवी आहे," पार्वतीने दुःखी स्वरात सांगितलं.

"माझी मदत?" तिच्या वडिलांचा आवाज थोडा कठोर झाला. "तू तर मला कधीही मदत मागितली नाहीस, आज अचानक का?"

"सुदर्शनने मला फसवलंय, बाबा," पार्वती रडत-रडत म्हणाली. "आज मी त्याला दुसऱ्या बाईसोबत पाहिलं... ते दोघं... त्यांनी एकमेकांना किस केलं."

हे ऐकताच तिच्या वडिलांचा चेहरा गंभीर झाला. त्यांची नजर कठोर झाली, आणि त्यांच्या मनात एका सूडाची भावना निर्माण झाली.

"तू माझ्याकडे आल्यानंतरच मी काही करू शकतो," तिच्या वडिलांनी थंड स्वरात उत्तर दिलं. "पण लक्षात ठेव, पार्वती. एकदा सुरू केलं की, परत मागे येणं कठीण होईल. तो तुझा नवरा आहे, तरीही सूड घ्यायचा विचार करते आहेस का?"

"हो बाबा. मी यासाठी तयार आहे," पार्वतीने निश्चयाने उत्तर दिलं.

तिच्या वडिलांनी तिच्या निर्णयाची गंभीरता पाहिली आणि तिला आपल्या घरी बोलावलं. पार्वतीने लगेचच मुलांना शेजारच्या आजींकडे सोपवलं आणि तडक आपल्या वडिलांच्या घराकडे निघाली. गावाच्या बाहेर, एका दूरवरच्या भागात तिचे वडील राहायचे. त्या भागात जायचं कोणी धाडस करत नसे कारण पार्वतीचे वडील एक काळी जादू करणारा माणूस म्हणून ओळखले जायचे. गावकऱ्यांनी त्यांना आणि पार्वतीच्या आईला गावातून तडीपार केलं होतं. आता ते दोघं वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते, एकमेकांपासून लांब.

रात्रीचा काळोख चढला होता. पार्वतीने तिच्या वडिलांच्या घराच्या परिसरात पाऊल ठेवताच, एका भीतीदायक वातावरणाने तिला वेढून टाकलं. वडिलांचं घर जणू काही अंधाराचा गड वाटत होता. घराभोवती जंगली झाडं उभी होती, आणि त्यांच्या पानांमधून येणारी कुजबुज तिच्या कानांवर पडत होती. त्याचा आवाज ऐकून तिच्या अंगावर शहारे आले.

पार्वतीने दारावर हलकेच ठोठावलं, आणि दार आपोआपच उघडलं. तिने घरात पाऊल टाकलं. आतमध्ये, तिचे वडील एका काळ्या वस्त्रात बसले होते. त्यांच्या अंगावर काही धुनींनी भरलेली कापडं होती, आणि ते एका झाडाच्या खोडावर बसले होते. त्यांच्या हातात एक काळा धागा होता, ज्यावर ते मंत्रोच्चार करत होते. त्यांचा चेहरा अंधारात दबलेला होता, परंतु त्यांच्या डोळ्यात एक भयानक चमक दिसत होती.

"आलिस," त्यांनी ओळखून घेतलं. "आता सांग, काय करायचंय?"

"मला सुदर्शनला अद्दल घडवायची आहे, बाबा," पार्वतीने निर्धाराने उत्तर दिलं. "तो माझ्यावरचं प्रेम विसरून दुसऱ्या बाईशी संबंध ठेवतोय. मला त्याला शिक्षा करायची आहे."

"शिक्षा..." वडिलांचा आवाज अधिक गडद झाला. "तुझं प्रेम परत येईल का असं केल्यावर? की तुला फक्त सूड घ्यायचा आहे?"

"सूड... फक्त सूड," पार्वतीने कापऱ्या स्वरात उत्तर दिलं.

तिच्या वडिलांनी एक दीर्घ श्वास घेतला मग ते हळूहळू उठले, त्यांच्या काळ्या कपड्यातून एक भयानक आकृती बाहेर पडल्यासारखी वाटत होती. त्यांनी हातातला काळा धागा पार्वतीच्या दिशेने वाढवला.

"हे घे," त्यांनी सांगितलं. "हा धागा तू सुदर्शनच्या अंगावर बांधायचा आहे. जेव्हा तो हा धागा बांधेल, तेव्हा तो माझ्या शक्तीच्या विळख्यात येईल.. पण हे फक्त सूड घेण्यापुरतं आहे. लक्षात ठेव, पार्वती, या मार्गावर पाऊल ठेवल्यानंतर परतफेडीची संधी मिळणार नाही."

पार्वतीने तो धागा घेतला आणि आपला निर्धार पुन्हा एकदा दृढ केला. "माझा सुदर्शनच्या प्रेमावर आता विश्वास राहिलेला नाही. मला फक्त त्याला विश्वासघाताची शिक्षा देयची आहे," ती म्हणाली.

तिच्या वडिलांनी तिच्या निर्धाराचं कौतुक केलं आणि तिला जपून पुढचं पाऊल टाकण्याचं सुचवलं. त्यांनी तिला काळ्या जादूच्या काही खास गोष्टी शिकवल्या, ज्यामुळे ती सुदर्शनवर आपलं वर्चस्व ठेवू शकते. त्या रात्री, पार्वतीने आपल्या वडिलांकडून शिकलेल्या गोष्टी ध्यानात ठेवल्या आणि सुदर्शनला कसा धडा शिकवायचा, याची आखणी केली.

दुसऱ्या दिवशी, पार्वती घरी परतली. सुदर्शन घरी नव्हता, त्याचं काहीतरी बाहेर काम होतं. पार्वतीने त्याच्या कपाटात जाऊन त्याच्या कपड्यांमध्ये तो काळा धागा बांधला. तिने ती वस्त्रं नीटपणे फोल्ड करून कपाटात ठेवली. आता तिला फक्त सुदर्शनच्या कपड्यांवर तो धागा बांधून तो घालण्याची वाट पाहायची होती.

सुदर्शन घरी परतल्यावर त्याने आपल्या कपाटातले कपडे उघडले. त्याला त्याच्या कपड्यांमध्ये काही बदल जाणवला नाही, कारण पार्वतीने तो काळा धागा अगदी सफाईदारपणे बांधला होता. सुदर्शनने तो पोशाख घालायला सुरुवात केली आणि तो ते कपडे घालून बाहेर एका पूजेनिमित्त गेला.

क्रमशः

🎭 Series Post

View all