Login

डॅशिंग दांडेकर - भाग ५

कथा एका दबंग मुलीची

त्या मुलीही घाबरून खाली मान घालून बसल्या. ओवी त्या माणसांची नजर चुकवून बोगीच्या थोडे बाहेर आली. तिने त्वरित पोलिसांचा इमर्जन्सी नंबर १०० डायल केला.

तेवढ्यात पुढील स्टेशनवर पोलिस त्याच बोगीत आले आणि त्या दमदाटी करणाऱ्या एका माणसाला कॉन्स्टेबल काळे म्हणाले,
"काय रे कुठे घेऊन चालला मुलींना?"

तेवढयात त्यांचा म्होरक्या पुढे आला आणि म्हणाला,
"अहो साहेब या सगळ्या 'आनंद अनाथाश्रम' मधील पोरी आहेत. त्यांना आम्ही चौघे जण जरा सहलीला घेवून चाललो होतो."

"ठीक आहे मग, अनाथाश्रमाचे याविषयीचे लेटर दाखवा."

"अ.. ब.. लेटर, ते नां मी घरीच विसरलो बघा. पण काळजी नका करू, तुम्हाला 'माल'(लाच) काय हवा आहे ते सांगा."

"अरे भामट्या तुला काय मी लाचखोर वाटलो की काय? खोटं बोलू नको. खरं खरं सांग कुठे घेऊन चाललेत तुम्ही या मुलींना ? बोल लवकर चल."
काळे त्या म्होरक्याला पोलिसी खाक्या दाखवत बोलले.

मग तो सुतासारखा सरळ झाला आणि म्हणाला,
"साहेब या पोरींना आम्ही असेच मागील आठ दिवस वेगवेगळ्या ठिकाणांहून उचलले आणि आता त्यांना एका बाहेरील व्यापाऱ्याला विकणार होतो."

कॉन्स्टेबल काळेंनी त्या म्होरक्याच्या जोरदार कानशिलात मारली आणि म्हणाले,
"ए तुम्ही सगळे इकडे या. का रे मुर्खांनो, तुम्हाला आया बहिणी आहेत की नाही?" त्यांनी पुन्हा दोन चार लाथा त्यांना मारल्या.

"साहेब माफ करा आम्हाला. चूक झाली. आम्ही पुन्हा असे कधीच करणार नाही."

"बरं झालं या मॅडमने आम्हाला तात्काळ फोन करून सारे सांगितले, माहिती दिली. नाहीतर या मुलींचं काय झालं असतं?"

ओवी तिथे उभी होती. तिने सर्व मुलींना मायेने जवळ घेतले. मुली तिला अगदी प्रेमाने बिलगल्या. त्यांना खूप हायसे वाटले.ओवीसुद्धा खूप आनंदी झाली.

कॉन्स्टेबल काळे म्हणाले,
"वेल डन मॅडम. तुमच्यामुळे आज या मुली वाचल्या."

थोड्याच वेळात स्टेशन आले. पोलिसांनी त्या चारही जणांना तुरुंगात डांबले. मुलीसुद्धा त्यांच्या त्यांच्या आईवडिलांकडे सुपूर्त करण्यात आल्या.

अल्पावधीतच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. वर्तमानपत्रे, टीव्ही सगळीकडे या घटनेची चर्चा झाली. ओवीने अजून हे प्रकरण घरात सांगितले नव्हते पण प्रसारमाध्यमांतून या बातमीचा घरच्यांना उलगडा झाला. तिचे कुटुंबीय खास करून आजी तिच्यावर खूप खुश झाली.
"आहेच माझी ओवी डॅशिंग."आजी म्हणाली.

ओवीचा जिल्ह्याच्या ठिकाणी सत्कार झाला. तिला लवकरच राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कारासाठी सर्व कुटुंबीय दिल्लीला दाखल झाले पण ओवीचे बाबा मात्र आले नाही. या गोष्टीचे ओवीला जरा वाईट वाटत होते.

इकडे घरी, बाबा मात्र आपल्या आजपर्यंतच्या वागण्याला अनुसरून घरीच बसले होते. तेवढ्यात सानू घरी आली आणि म्हणाली,

"बाबा, अहो आपल्या ओवीने काय भन्नाट कामगिरी केली आहे.हो ना?"

बाबांना सुरुवातीला आनंद झाला. पण तो त्यांनी वेळीच आवरला आणि म्हणाले,

"हो, पण एवढे काही विशेष नाही त्यात."

"बाबा, जेवढे मी तुम्हाला ओळखते नां त्याप्रमाणे तुम्हाला तर या गोष्टीचा खूप आनंद झालाय. तुम्हाला तो व्यक्त देखील करायचा आहे पण तुमचा ओवीविषयी असलेला द्वेष त्याच्या आड येतोय. बाबा सोडा आता हे सगळं. एवढी वर्षे तुम्ही मला आणि यशला खूप प्रेम दिले पण ओवीला त्यापासून सोईस्करपणे वंचित ठेवले. काय म्हणत असेल तिचे बालमन? अहो ती अवघी १५ वर्षांची आहे. तरीही माझ्या सासरी एकदा आली असताना तिने मला सासुरवास करणाऱ्या माझ्या घरच्यांना चांगलेच खडे बोल सुनावले."

"काय?"

"हो, ती तुम्हाला याविषयी सांगणार देखील होती पण नेमकी आजी त्यावेळी ठीक नव्हती, तुम्ही आणि आई आजीच्या टेन्शन मध्ये होते. त्यामुळे समजदारी दाखवत तिने यातलं काहीही तुम्हाला सांगितले नाही. शिवाय यशला सुद्धा त्या ईशाच्या तावडीतून कोणी वाचवले? आपल्या ओवीनेच नां? अहो बाबा तिने तुमचे नाव आज उज्ज्वल केले आहे. हीच खरी वेळ आहे तिला तुमचे, तिच्या विषयी असणारे प्रेम दाखवण्याची! चला बाबा." तरीही बाबा मात्र शांत होते.

इकडे ओवी मात्र अस्वस्थ होती. पुरस्कार तर तिला मिळणार होता पण बाबांचे प्रेम कधीच आपल्या नशिबात नाही का? हा एकच विचार तिच्या मनाला बोचत होता.

तो सोनियाचा दिवस उजाडला. ओवीचे राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी नाव पुकारले गेले. तिनेही स्टेजवर जाऊन तो स्वीकारला. ती सभागृहाबाहेर आली.

तेवढ्यात तिथे तिला बाबा दिसले. ती पुरस्कार घेऊन तशीच बाबांकडे गेली आणि क्षणभर तिथेच थबकली.
बाबांनी तिला दोन्ही हात पुढे करून लाडाने मिठीत येण्यासाठी आश्वस्थ केले.

तेव्हा तिच्यात आणि तिच्या बाबांमध्ये असणारी बोचरी द्वेषाची भिंत उन्मळून पडली आणि ती बाबांना प्रेमाने बिलगून रडू लागली. बाबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

तेवढ्यात आजी म्हणाली,
"बघ शंकर तुला म्हणाले नव्हते, ओवी तुझे नाव उज्ज्वल करील. दांडेकरांची शान होईल. बघ माझी ओवी आज पूर्ण भारतामध्ये डॅशिंग दांडेकर ठरली की नाही?"
बाबा मान डोलवत हो म्हणाले.

तेवढ्यात सर्वांनी
"डॅशिंग दांडेकर, डॅशिंग दांडेकर, डॅशिंग दांडेकर, डॅशिंग दांडेकर..."
असा गजर करत ओवीला अनोखी मानवंदना दिली आणि ओवी संपूर्ण भारतात डॅशिंग दांडेकर म्हणून प्रसिद्ध झाली.

काही दिवसांनी अभिर ओवीच्या घरी आला आणि सर्वांसमोर त्याने ओवीला प्रपोज केले. तेव्हा ओवी म्हणाली,
"माझी सर्वत्र प्रसिद्धी झालेली पाहून आज तू मला प्रपोज करण्यासाठी आलास पण माझ्या मनातून मी तुला तेव्हाच पुसून टाकलंय. कारण जेव्हा माझ्याकडे प्रसिद्धी नव्हती, तेव्हा तू मला नाकारले होते. त्यामुळे दुसरी एखादी शोध तुझ्यासाठी. ही डॅशिंग दांडेकर सद्ध्या तरी या भानगडीत पडणार नाही. अजून मला खूप मोठे व्हायचे आहे. पोलिस अधिकारी बनायचे आहे. हो नां बाबा?"

आज शंकरची मान ओवीच्या या वागण्यामुळे अधिकच उंचावली.


समाप्त
0

🎭 Series Post

View all