दसऱ्याच्या हसऱ्या शुभेच्छा !!!

हसरा दसरा
विजया दशमीच्या साडेतीन मुहूर्ताच्या शुभ प्रसंगी, सर्व सरस्वतीच्या दरबारातल्या प्रत्येक मानकऱ्यांना मानाचा मुजरा, मोठ्यांना आशीर्वादाच्या अपेक्षेत नमस्कार आणि लहानांना आशीर्वाद.

आमच्या काळात दसरा असो ,दिवाळी असो किंवा संक्रात असो प्रत्येक सण हा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची संधी असे.आजकाल फक्त व्हॅलेंटाईन डे ,फ्रेंडशिप डे किंवा धुळवड असे काही निवडक उत्सव एकत्र येऊन साजरे करण्याची परंपरा सुरु झाली आहे .

बाकी आजकाल व्हाट्सअप ,फेसबुक आणि इतर सोशल मीडिया मुळे सण साजरे करणं  फारच सोपं झालं आहे . दणादण शुभेच्छा कॉपी पेस्ट केल्या की आपण सामाजिक कर्तव्यातून मुक्त होतो.

आपण लग्नात रंगीबेरंगी अक्षता आशीर्वाद किंवा शुभेच्छा म्हणून वधूवरांवर टाकतो पण काहीवेळा त्यांचा मारा एव्हढा प्रचंड असतो की ते दोघं नुसते गुदमरून जातात .एकदा तर एक नवरी लग्न लागल्या नंतर  नवरदेवाच्या तोंडात  पेढा खावू  घालणार होती. तेव्हढयात कोणीतरी उशिरा फेकलेल्या मूठभर  अक्षता बिचाऱ्याच्या उघड्या तोंडात येऊन पडल्या .

आजकाल तर प्रत्येक दिवस कोणता ना कोणता जागतिक दिवस असतोच असतो .त्या दिवशी तर शुभेच्छाचा नुसता पाऊस पडतो .जागतिक नवरा पालन संगोपन दिन ,आंतराष्ट्रीय सासू निर्मूलन दिन ,अखंड ऊवा मारक दिन ,जागतिक प्रेमभंग दिवस असे दिवस कुठून कुठून शोधून काढतात कुणास ठाऊक आणि सगळे जण शुभेच्छाचा  मारा माझ्या सारख्या साध्या भोळ्या माणसांवर करून माझं जगणं सळो की पळो करून टाकतात .मध्यंतरी एकदा तर एकाने मला जागतिक दिवंगत पूर्वज दिनाच्या , जागतिक वळू दिनाच्या आणि एकदा जागतिक मनोरुग्ण दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या . असले अवघड जागेचे दुखणे .सहन ही होतं नाही आणि सांगताही येत नाही .

तशी आमचीही पिढी काही धुतल्या तांदळासारखी नव्हती म्हणा .सोनं वाटायच्या नावाखाली आम्ही लोकं वर्गातल्या आम्हाला सख्त मनाई असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना राजरोस भेटी देऊन यायचो .मेसेज किंवा व्हाट्सअप नव्हतं त्या मुळे नुसती एक चिट्ठी सगळ्यांना चुकवून बरोबर पोहोचवणं तर माशाचा डोळा फोडण्या इतकं कठीण काम असायचं. त्यात जर नशीब खराब असलं की होणारे दुष्परिणाम तर विचारूच नका. प्रेम शब्दाचा इतका तिरस्कार करणारी आमच्या इतकी मागासलेल्या विचारांची पिढी खरच अजून झालेलीच नसेल. त्या मुळे आमच्या काळात निरुपद्रवी एकतर्फी प्रेमवीरांचं पीक अमाप येत असे.पाठोपाठ उसासे आणि कविता प्रसूती ओघाने व्हायच्याच.  अशा वेळी असे सण म्हणजे खरोखर पर्वणी असायची, दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा असं म्हणतं आम्ही एकमेकांना आपट्याची पानं द्यायचो, संक्रातीला तिळगुळ द्यायचो आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणायचो, तर गुडीपाडव्याला इतरांच्या वर्गभगिनी आम्हाला, गुढी  पाडवा, नीट बोल गाढवा असे संदेश देतं असतं.

दसरा हा सीमा उल्लंघनाचा दिवस. नवे कपडे घालून, देवीचं दर्शन घेऊन गावाबाहेर रावण दहन पाहायला जायचं. रावण मारल्याच्या आवेशात घरी यायचं. कपाळावर वर्ख लावण्याची एक आगळी वेगळी प्रथा आमच्या जळगावला होती. मग घरोघरी जावून आपट्याची पाने वाटतं वाटतं पाया पडत दसरा साजरा होई.

चला आता थोडे विचारांचं सोनं उधळू या.

दसऱ्याच्या दिवशी पाटीवर सरस्वतीच प्रतीकात्मक चित्रं काढून. वह्या पुस्तकं यांचं विधिवत पूजन केलं जाई. कुठं अवजारांची पूजा केली जाई. आता गाड्या धुण्याची प्रथा जास्त प्रचलित आहे.

वाचनाचा छंदा मुळे माझ्या कडे प्रचंड प्रमाणात पुस्तकं जमा व्हायची. म्हणजे काय व्हायचं की कोणाकडेही चांगलं पुस्तकं दिसलं की मी वाचायला आणायचो. पण माझी एक कमजोरी आहे, म्हणजे चांगली गोष्ट नाही ती पण जे आहे ते आहे. मला मी पुस्तकात एव्हढा रमून जातो की ते पुस्तकं कोणाकडून आणली आहेत हेच माझ्या लक्षात राहातं नसे. म्हणून मी ते पुस्तकं अजून कुठे हरवून जावू नये म्हणून स्वतःच नाव टाकून ठेवत असे. लोकांना हा खोटारडे पणा वाटतो.

जावू दया. वाचनामुळे माणसाचं व्यक्तीमत्व भारदस्त दिसतं.हे मात्र नक्की. दिवसातून कमीत कमी चोवीस तास तरी डोळ्यासमोर पुस्तकं असल्यामुळे फारच लहान वयात मला चष्मा लागून गेला. त्या मुळे डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा आणि हातात माझ्या कपड्या सकट वजना पेक्षा जाडजूड असलेलं पुस्तकं, त्या मुळे मी फारच विद्वान दिसतं असे. अर्थात निकालाच्या दिवशी माझी विद्वत्वता जाहीर झाली की लोकांना माझ्या ज्ञानाची पातळी समजून येतं असे.

पण अशा विचित्र दिसण्या मुळेच शुभांगीने मला पार्ल्याला ओळखलं होतं.

तसा मी स्वभावाने फारच भोळा होतो. म्हणजे छापील अक्षरांवर प्रमाणाच्या बाहेर विश्वास ठेवायचो.पण तिथेही वाईट अनुभव आले. बायबल मध्ये लिहलं होतं शेजाऱ्यावर प्रेम करा. या वाक्याने तर माझं आयुष्यच उध्वस्त करून टाकलं.असंच एक 'ब्रह्मचर्य हेच जीवन' नावाच्या पुस्तकाने माझ्या आयुष्यातल्या अनेक आनंदाच्या दिवसांची माती करून टाकली. या पुस्तकाचा माझ्या मनावर तर एव्हढा प्रभाव पडला होता की मी खूप लहानांपासूनच ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली होती आणि ती दहावी अकरावी पर्यंत कठोर पणे पाळली होती. त्या काळात मी इतका कट्टर होतो की आमच्या वर्गात ती कुरळे कुरळे केसं असणारी सुमी, चालतांना उगाचच मानेवरच्या केसांना झटके देणारी अनघा, लालभडक लिपस्टिक लावून येणारी कावळ्यांची कमला, घडाळ्यातल्या लंबका प्रमाणे कम्बडलं हलवत चालणारी लिली अशा झोप उडवणाऱ्या, माझ्या कडे ढुंकूनही न पाहणाऱ्या मुलींकडे मी तर चुकूनही पाहात नसे आणि त्यांना ओळखही दाखवत नसे. अगदी आत्ता आत्ता एक वाक्य वाचलं होतं 'वाचाल तर वाचाल ',माझ्या मित्राचे आजोबा व्हेंटिलेटरवर होते त्यांना मी उगाच ज्ञान पाजळायचे म्हणून जोरात ओरडून सांगितलं ,आजोबा वाचाल तर वाचाल .मित्र तेंव्हा पासून माझ्याशी बोलत नाही .

गमतीचा भाग सोडा पण काहीतरी पुण्याई होती म्हणून अनेक सारस्वत आयुष्यात भेटले आणि जगण्याचं सोनं झालं हो अक्षरशः . शाळेत असतांना आम्हाला पुस्तकात एक धडा होता ' एकमेका करु सहाय्य 'तो धडा लिहिणारे ल. नि. छापेकर, हा मी आयष्यात पाहिलेली पहिला लेखक. त्यांच्या कडे पुस्तकांचा प्रचंड मोठा खजिना होता. त्यांच्या कडे आगावू पणे येणं जाण करत राहिल्याने कवी यशवंत, बहिणाबाईचा मुलगा कविवर्य सोपानदेव चोधरी, दादा धर्माधिकारी प्रत्यक्ष पाहायला, ऐकायला, भेटायला मिळाले.पुढील आयुष्यात कुसुमाग्रज, पू. ल. देशपांडे, वि. आ. बुवा, शं. ना. नवरे, नामदेव ढसाळ, भारत सासणे, बाळ कोल्हटकर, भालचंद्र नेमाडे, लक्ष्मणराव देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे, कवी ना. घ. देशपांडे, वामनराव ओव्हाळ, मंगेश पाडगावकर, अनिल अवचट, महेश केळुस्कर, अशोक नायगावकर किती किती नावं घ्यावी असे एक एक सरस्वती पुत्र भेटली .आणि जीवन सुगंधी होवून गेलं. एकेक आठवण म्हणजे अलीबाबाची रत्नांनी भरलेली गुफा आहे.

सगळ्यांना ओलांडून एक महान साहित्यिक मला अचानक हाका मारायला लागला. जरी त्याच्यात आणि माझ्यात शेकडो योजनांचं अंतर होतं असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या हाका मला इतक्या ठळक पणे ऐकू यायला लागल्या की बंगाली साहित्य मुळापासून वाचण्या शिवाय मी स्वतःला रोखू शकलो नाही. मग पाटी पेन्सिल घेऊन बंगाली बाराखडी शिकायला सुरुवात केली. रात्रंदिवस फक्त बंगाली आणि बंगालीच. आणि एक दिवस हळू हळू या भाषेने माझ्याशी मन मोकळं करून बोलायला सुरुवात केली. मग पुस्तकात बंगाली पुस्तकं जमा झाली. तिकडच्या साहित्यिकांची ओळख झाली. टागोरांच शांतिनिकेतन पाहण्याची संधी मिळाली, तिथं कवी सुकांतो भट्टाचार्य, कवी नझरुल, मायकेल मधुसूदन दत्त, गुरुदेवांचं घर, कॉफी हाऊस (जिथं टागोर, सत्यजीत रे सारखी दिग्गज मंडळी येतं असतं )अशा ठिकाणी जायची संधी मिळाली आणि मी धन्य धन्य होवून गेलो. एप्रिल मध्ये तर बांगला देशात एक जागतिक बांगला साहित्य संमेलन होणार होते. त्या साठी भारतातून दहा साहित्यिक जाणार होते. (फुकट होतं म्हणून मी पण जाणार होतो ) पण कोरोनानाने मुसक्या बांधल्या.

अजूनही आम्ही आमच्या घरी टागोर जयंती वेगवेगळे उपक्रम करून साजरी करतो. त्या वेळी बायको नशिबाचे भोग म्हणून सगळं सहन करते. ?

अरे बापरे, विसरलो होतो. आज दसरा, आज दुपारी हिची लग्नात गुलाबी साडी नेसलेली मामेबहीण जेवायला येणार आहे.तिचा नवरा टूरवर गेला आहे एकटीच आहे बिचारी. ( दसरा सण मोठा, आनन्दाला नाही तोटा. पटलं ना ).
:
:
:
:
(अहो, लेखक... उठा.. आजतरी आंघोळ करा जरा.. आणि हो, चहा झाला की बाजारातून आपट्याची पाने नीट बघून आणा. मागच्या वेळेस तीस चाळीस पानं खराब निघाली होती....उठा हो, सणासुदीला मला ओरडायला नका लावू.... च ssss हा ठेवा च sss हा ).