Login

सून: घराची सेटिंग (भाग १)

घरातील सुनेची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
“वीरेन,उठ ना..सकाळचे सात वाजले आहेत."

" ते तर रोजच वाजतात. जरा इकडे ये ना."

" इश्यss काहीही काय तुझं.."

" काय गं आरती, सारखे काम, काम आणि काम. एवढंच डोक्यात असतं का तुझ्या? जरा नवरा जवळ बोलावतो तर जवळ जावं, काय हवं नको ते विचारावं.."

" अच्छा म्हणजे मी तुला काय हवं, काय नाही हे विचारतच नाही?"

" नाही म्हणजे तसे नाही.(आरतीला आपल्या बाहुपाशात घेत) तू तर माझ्या घराची लक्ष्मी आहेस आरु. सगळ्यांचं सगळं छान पार पाडतेस म्हणून मला जरा तुझ्यावर प्रेम आलं.."

"(वीरेनला दूर लोटत) अहाहा, चला उठा आणि कामाला लागा. ऑफिसला जायचे आहे ना? डब्याला काय बनवू?"

" राणी सरकार तुम्ही जे पण बनवता ते छानच असतं त्यामुळे काहीही बनवा. तुला माहितीये आरती, अबोलीची लहानपणी रोज तिच्याच आवडीचं डब्यात हवं अशी फर्माईश असायची. मी मात्र जे असेल ते खायचो."

" हो का? अरे वाह. म्हणजे लहानपणी छान लाड पुरवून घेतलेत अबोलीताईंनी आईंकडून.."

" मग.. फार लाडाची होती ती आईबाबांची. त्यांचा माझ्यापेक्षा तिच्यावर जास्त जीव होता."

" हो का? बरं ऐक. आवर लवकर..तुझ्यासाठी ब्रेकफास्ट करून ठेवलाय."

" जी हुजुर..जैसा आपका हुकुम.."

वीरेन आवरून डायनिंग टेबलच्या खुर्चीत नाश्ता करण्यासाठी बसला. आरती नेहमीप्रमाणे सगळं अगदी नीट आवरत होती. एकीकडे चहा उकळत होता, दुसरीकडे वीरेनचा डबा पॅक झाला होता. तिने नवऱ्याचे मोजे त्याच्या बॅगवर ठेवले, आणि सासूबाईंचा सकाळचा बटाटा-पोहे कॉम्बो तयार केला.

सासूबाई म्हणाल्या, “अगं आरती, तू इतकं व्यवस्थित करतेस की मला काहीच काम राहत नाही बघ.."

आरती हसत म्हणाली,”आई, तुम्ही मोकळ्या मनाने सकाळच्या कीर्तनाचा आनंद घ्या, मी आहे ना!”

तेवढ्यात सासरेबुवा सकाळचा वॉक करून आले आणि म्हणाले,
"अरे वाह! माझा चहा माझ्या जागेवर नेहमी तयार असतो.धन्यवाद सुनबाई.."

" यू आर मोस्ट वेलकम.."

" खरंच तू आमची दुसरी मुलगी आहेस, आरती.."

" तुमचे खूप खूप धन्यवाद बाबा.."

आरतीची सासू, सासरे, नवरा आणि ती असे चौकोनी कुटुंब अगदी मजेत होते. सासरी आल्यावर आरतीने लवकरच सगळ्यांना आपलेसे केले. कामाची आवड आणि उरक उपजतच अंगी असल्याने ती कधीही कुठेही अडखळून पडली नव्हती. त्यामुळे तिच्या सासूबाई म्हणजेच रमाताई यांनी लवकरच घरातील कामाच्या जबाबदारीतून आपले अंग काढून घेतले.

सगळं काही आलबेल सुरू असताना नियतीला मात्र घरात जरा मजा आणायची होती.

क्रमशः