सासू -"आम्हाला हुंडा वगैरे काही नको. आम्ही अगदी सुशिक्षित लोक आहोत. असल्या जुना प्रथांना आम्ही अजिबात मानत नाही. पण असं बघा आमच्या घरचं हे पहिलंच मंगल कार्य आहे, त्यामुळे आमचा माधव- नवरा मुलगा घोड्यावर तर बसणारच ना! घोडा, बँड, कार्यालय, जेवणावळी, मुलाचे कपडे, शिवाय लग्नात नवर्या मुलाला गोफ, अंगठी एवढे तर तुम्ही नक्कीच देणार! माधव सरकारी कंत्राटदार आहे, त्यामुळे अनेक मोठे अधिकारी आणि इतर स्थानिक मान्यवर मंडळी लग्नाला येणार, त्यानुसारच तुम्ही लग्न करून देणार ना!! बाकी आम्हाला जास्त काही अपेक्षित नाही. पण आता नव्या जोडप्याला झोपायला दिवाण, रमाला ड्रेसिंग टेबल, कपाट आणि रमा इतकी शिकलेली आहे तर घरी थोडीच बसणार? म्हणून मग शाळेत येणं जाणं करण्यासाठी दोन चाकी गाडी तुम्ही देणारच ना यापेक्षा जास्त काही आम्हाला नको. चला तर मग हे लग्न ठरलं असं समजूया!!
खरंतर रमाच्या बाबांना ह्या सगळ्या मागण्या पूर्ण करणं शक्यच नव्हतं. म्हणून त्यांनी उभ राहुन हात जोडून अगदी विनम्र शब्दात मला हे लग्न करणं शक्य नाही असं स्पष्ट सांगितले.
बाबा "-मान्य आहे तुमच्या घरचं हे पहिलंच मंगल कार्य आहे. माधवरावांचे संपर्कही मोठ्या, मोठ्या लोकांसोबत आहेत, पण मी एका कारखान्यातल्या सुपरवायझर! मला माफ करा पण मी तुमच्या मागण्या पूर्ण करू शकणार नाही. हे लग्न होऊ शकत नाही!"
पण माधवला रमा अगदी पाहताच क्षणी फारच आवडली होती. म्हणूनच माधवच्या आग्रहा खातर माधवच्या वडिलांनी लग्नाचा खर्च अर्धा-अर्धा करायचे मान्य केले, आणि रमा माधव चा विवाह सोहळा पार पडला.
माधवच्या घरच्या उंबरठ्याचे माप ओलांडून रमाच्या नवा आयुष्याची सुरुवात झाली, पण आपल्याला आपल्या मुलाच्या लग्नात मनासारखी हौस-मौज करता आली नाही याची खदखद रमाच्या सासूबाईला सारखी लागून राहिली होती. येता जाता त्या रमाला टोमणे मारायची एकही संधी सोडत नव्हत्या. कधी कधी आडून, आडून तर कधी, कधी अगदी तोंडावर त्या रमाचा पाणउतारा करायच्या. भीशीच्या मैत्रिणींची नावे घेऊन, तर कधी नातेवाईकांची नाव पुढे करून त्या रमाला काही बाही बोलायच्या.
सासू -"जोशींचा मुलगा प्रायव्हेट कंपनी साधा कारकून, पण त्याच्या सासऱ्याने किती थाटामाटात लग्न करून दिलं त्याचं! आम्हाला तर आमच्या हौसेला बासनात गुंडाळून ठेवावे लागले. मीना वन्सनी नेहाला किती आंधण दिले ! अगदी ताट-वाटी पासून तर चांदीच्या भांड्यांपर्यंत सर्व!! मीरा मावशीने तिच्या मुलीला पाच लाखाची एफ.डी. करून दिली. तिच्या सासरी सगळंच होतं. पण म्हणून काय कोणी आपल्या मुलीला रिकाम्या हाताने पाठवते सासरी?"
आंधण, मानपान, आहेर कशावरून तरी विषय काढून रमाला टोमणे मारण्याची एकही संधी त्या सोडत नव्हत्या. रमा वरचा राग सासूबाईंनी एका वेगळ्या पद्धतीनेच काढला. जशी रमा लग्न होऊन सासरी आली, रमाच्या सासूने झाडू-पोछा, आणि भांडे घासणाऱ्या मोलकर्णीला कामावरुन काढले. झाडू-पोछा, धुणी-भांडी, नाश्ता, स्वयंपाक, घरातली साफसफाई यातच रमाचा दिवस संपून जाई.
©® राखी भावसार भांडेकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा