Login

अग्ग बाई सुन बाई अंतीम भाग

Feelings Of Newly Married Bride


मागच्या भागात आपण पाहिलं की, रमाच्या सासूने कामवाल्या बाईला कामावरून कमी केलं. रमाचा सगळा दिवस घरकाम करण्यातच जात होता. त्यातच सासूचे कुचकट बोलणे. रमाला मनातून खूप राग यायचा या सगळ्याचा पण माधवच्या प्रेमळ आणि समजूतदार स्वभावामुळे आणि त्याच्या इच्छे खातर रमा निमूटपणे सार सहन करत होती.

लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळी करिता रीत म्हणून रमा माहेरी आली होती. रात्रीच्या वेळी आईच्या कुशीत डोकं ठेवून ती तिच्या आईला प्रश्न विचारत होती…

रमा -"सासरी गेलेल्या मुलीला मनच नसतं का ग? तिच्या भावनांची कुणी कधीच कदर करत नाही का? सासूही कधीतरी त्या घरात सून म्हणूनच आलेली असते ना! तरीही त्या सासूला आपल्या सुनेच मन कळत नाही का? दिवसभर निमुटपणे घरचं काम करायचं आणि सासरच्या लोकांची मर्जी सांभाळूनही, वरून त्यांचे टोमणे आणि अपमान जनक शब्द गिळायचे! हेच असतं का ग सासरी गेलेल्या प्रत्येक मुलीच्या नशिबी?"

आई -"रमा नको करून घेऊस एवढा त्रास! अगं जसे ऋतू बदलतात ना तसंच आयुष्यही बदलतं. आयुष्यात फार काळ एकच गोष्ट टिकून राहत नाही. जरा धीर धर सहनशीलता हाच स्त्रीचा गुण! तुझ्या आयुष्याचेही चित्र बदलेल. झोप आता."


दिवाळ सणाला रमाच्या बाबांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे जावई-लेकीला अहेर केला. पण तेवढ्याने रमाच्या सासूच समाधान झालं नाही. तिने रमाला स्पष्टच सुनावले.


सासू -"हे काय ग पोतेरे आणलेस माहेराहून. निदान माझ्या माधवला तरी ब्रँडेड कपडे घ्यायचे ना! जाऊ दे तुझी तरी काय चूक? आम्हीच गरिबा घरची लेक केली, त्यात तुझा आणि तुझ्या बाबांचा तरी काय दोष? आता एक काम कर, तू चांगली शिकलेली आहेस ना! मग स्वतःसाठी नोकरी शोध. किती दिवस तुला पोसायचे आम्ही?"

माधव जरी पूर्ण घर खर्च करत होता, तरी रमाच्या सासूचे तेवढ्याने समाधान होत नव्हतं. रमाच्या माहेरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीशी तिला काहीही देणंघेणं नव्हतं. तिला केवळ आणि केवळ स्वतःची हौसमौज आणि रमाच्या माहेराहून उपहारा खातर मोठमोठ्याल्या वस्तू हव्या होत्या.

शेवटी सासूने भरीस पाडल्याने, रमाने माधवच्या संमतीने एका प्रायव्हेट शाळेत नोकरी मिळवली. घरचं सगळं काम आणि शाळेची नोकरी रमाची फारच दमछाक होत होती. पण नोकरीमुळे थोडा वेळ तरी रमाच्या डोक्याला शांती मिळे आणि थोडा का होईना पैसाही.

त्यातच मग संक्रांतीचा सण आला आणि रमाच्या सासूची परत भूण भूण सुरू झाली.


सासू -"माझ्या भावजयीने पूजाच्या पहिला संक्रांतीला, तिच्या सासूला पैठणी घेतली, चांदीच्या वाटीत तिळगुळ दिले. जावयाला चांदीचा पेला, पुजाला चांदीचा हळदी कुंकवाचा करंडा, सासर्‍याला कपडे! आम्ही तुझ्याकडून एवढी काही अपेक्षा ठेवत नाही. पण तुझ्या माहेराकडून आम्हाला साधं तिळगुळ जरी मिळालं तरी नशीब!"


रमाला तिच्या सासूच्या या वाक्याने फार राग आला होता, पण ती शांत होती. तिने मनाशी काहीतरी ठरवलं होतं.

रमाच्या आईने पण स्वतःच्या जवळच्या बचतीच्या पैशातून जावयाला कपडे, सासूला भारीची साडी घेतली. चांदीच्या वाटीत रमाच्या सासूला तिळगुळ दिले. रमाला चांदीची हळदी-कुंकवाची कुयरी आणि अत्तरदाणी दिली. रमाची पहिली संक्रांत म्हणून तिच्या सासरच्या मानाच्या बायका वहिन्या, मावश्या, चुलत्या, आत्या, आज्ज्या सगळ्यांसाठी सोळा शृंगाराच्या टोपल्या दिल्या. तरीही रमाच्या सासूने नाक मुरडलेच.

आता मात्र रमा उठली, तिने तिच्या आईला पाटावर बसवले. हळद-कुंकू लावून तिळगुळाची वडी तिच्या हातात ठेवली आणि आईला एक भारीतली पैठणी देऊन नमस्कार केला.


रमा -"सासुबाई तुम्हाला जशी तुमच्या मुलाच्या लग्नाची हौस होती, तशी हौस प्रत्येकच आई-वडिलांना त्यांच्या मुलीच्या लग्नाची असते. त्यासाठी ते जमेल तशी काटकसर करून, प्रसंगी कर्ज काढून मुलीचे लग्न थाटामाटात करून देण्याचा प्रयत्न करतात. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी, प्रत्येक सणाला मुलीच्या बाबांनी कर्ज काढून मुली-जावयाची हौस करायची. पोटाला चिमटा देऊन, आयुष्यभर ते कर्ज फेडत राहायचे, आणि सासरच्या लोकांनी मात्र प्रत्येक वेळी सुनेच्या माहेरच्यांना नाव ठेवायची आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला नाके मुरडायची."

रमाच्या या अनपेक्षित वागण्याने तिथे जमलेल्या सगळ्याच बायका चमकल्या आणि तिच्या सासूबाई कानकोंड्या झाली.

त्याचवेळी रमाच्या चुलत आज्जे सासूने रमाची बाजू उचलून धरली.


आजी -"रमा अगदी खरं बोलते आहेस तू! आजकालच्या सासवांना माहिती नाही काय झाल आहे? त्यांना मुलाची हौस-मौज करायची असते, पण मुलाच्या सासरच्यांच्या  पैैैश्याने! फारच विचित्र मानसिकता आहे ही. पोरी आज तु जे केलंस ते योग्यच केलस."

या प्रसंगाने रमाच्या सासूला चांगलाच धडा मिळाला होता. त्यानंतर तिने आपल्या अवाजवी इच्छा रमा आणि तिच्या माहेरच्या लोकांवर कधीच थोपवल्या नाहीत.


©® राखी भावसार भांडेकर.