बदललेली लेक

बदललेली लेक


आज रियाच्या लग्नानंतर ,पहिल्यांदाच माधवी, तिच्या घरी राहायला आलेली होती.
नागपूर सारख्या ठिकाणी वाढलेली रिया, मुंबईच्या वातावरणात कशी मिसळणार ?,याची काळजी माधवीला, तिच्या लग्नानंतर होतीच. गर्दीची, धावपळीची सवय नाही. घरचं निवांत आणि साधारण वातावरण. तिथून रिया, रितेशशी, लग्न करून मुंबईत आली.मायानगरीत.
सहा महिन्यात बऱ्यापैकी रुळलीही. एका शाळेमध्ये, कॉम्प्युटर टीचरची नोकरीही, तिने मिळवलेली होती. रियाचे सासू-सासरे गावी राहणारे. अधूनमधून, तिच्याकडे जाऊन येऊन येणारे.
रिया बऱ्याच दिवसाची मागे लागली होती ,म्हणून माधवी तिच्याकडे मुंबईला, चार दिवस राहायला गेली होती. पटापटा घरातली कामे आवरून ,नोकरीवर जाणारी ,
"आई तू बस ग! थांब मी करते तुझ्यासाठी",असं म्हणून नवीन पदार्थ बनवून ,तिला खिलवणारी रिया.
रियाच हे रूप माधवीसाठी नवीनच होतं, पण आपली ही 'बदललेली लेक' बघून ती मनोमन सुखावतही होती. पाण्यात पडलं की पोहता येतं ,किंवा अंगावर पडलं की आपोआपच काम जमतं ,हे खरं आहे हे माधवीला आपल्या बदललेल्या लेकीकडे बघून जाणवत होत.


भाग्यश्री मुधोळकर