Login

डायरी - माझिया मना जरा थांब ना.भाग १ विषय तिचे भावविश्व

एका मुलीची कथा
डायरी - माझ्या मना जरा थांब ना… भाग १

विषय तिचं भावविश्व.


२०/५/२००६

मी अनिता साळुंके. आता जवळपास पस्तीशी गाठली आहे.पण आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात फार काही घडलं नाही.मला सरकारी नोकरी लागली हीच एक चांगली गोष्ट माझ्या आयुष्यात घडली.

वयाच्या पंधराव्या वर्षी मी अभ्यासात बरी असूनही सावत्र आई नी शाळा सोडवण्याचा घाट घातला होता. कधी नव्हे ते माझे बाबा जरा कणखरपणे वागले.ते जर तेव्हा तसे वागले नसते तर आज मला ही सरकारी नोकरी मिळालीच नसती. त्यासाठी मी बाबांची खूप कृतज्ञ आहे.

वर्ष सरली शरीरावरचा मोहोर आता गळत आला. मला स्वतःला माझ्या शरीराचं कौतुक राहिलं नाही तर एखादा पुरुष का माझ्याकडे कौतुकानी बघेल?

शरीराचा हा मोहोर गळण्यामागे माझ्या वयाचं मोठेपण आडवं आलं. सावत्र भावंडांना शिकवण्यात आणि त्यांची लग्नं करण्यात माझ्या शरीराची होळी झाली.

याच भावंडांमुळे माझं लहानपण करपलं. तारुण्यही आता ओसरायला लागलं. सृष्टीत इतके सुंदर रंग उधळले आहेत विधात्याने पण त्या रंगांपर्यंत मला पोचताच आलं नाही.

***

३/३/२००६

प्रौढ कुमारिका म्हणजे समाजाला सार्वजनिक मालमत्ता वाटते. मी जेव्हा हे वाक्य मैत्रीणींमध्ये उच्चारलं तेव्हा सगळ्या धक्क्याने कोलमडल्या.

"हे तू काय विचीत्र बोलतेस?" असंही म्हणाल्या.

"यात काय विचीत्र आहे? खरय. माझ्यासारख्या कुठल्याही प्रौढ कुमारिकेला विचार ती हेच म्हणेल"

" अनिता तू इतकी निगेटिव्ह विचार का करतेस? एखाद्या प्रौढ कुमारिकेचा असा अनुभव असू शकतो. पण सरसकट तू असं कसं म्हणतेस?" वर्षा म्हणाली.


मला त्यांचं बोलणं टोचलं नाही कारण ही सत्य परीस्थिती त्यांना माहिती नाही. कुठतरी त्यांनी गळ्यात घातलेलं मंगळसूत्र त्यांच्यापर्यंत या विचारांना पोहचण्यात आडकाठी करतं.

पुरूषांच्या डोळ्यातून होणारे विचीत्र इशारे आता सवयीचे झाले. त्यांच्या नजरेला तशीच बेधडक नजर देऊन उत्तरं द्यायला आता मी शिकले आहे. हे मला शिकावी लागणारच होतं. त्या शिवाय पर्याय नव्हता.

वेळ पडली तर लाठी बनून माझ्या बाजूने उभं राहणारं मंगळसूत्र माझ्या गळ्यात नाही. माझं संरक्षण मलाच करायचं आहे.

कामात उत्तम असले तरी मला मिळणारं प्रमोशन हे साहेबांनी माझ्या शरीराकडे बघून दिलंय याचा ऑफीसमध्ये सहज उच्चार केल्या जातो.

एकदा आमचे साहेब म्हणाले,

"मिस.साळूंके तुमच्या प्रमोशन बद्दल जी काही चर्चा ऑफीसमध्ये चालू आहे तिच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही कामात खूप हुशार आहात.कंपनीला कामातली कौशल्य हवं असतं. इतर गोष्टी कंपनीसाठी महत्वाच्या नसतात. तुम्ही कामात पूर्वीप्रमाणेच लक्ष द्या."

साहेब तरी पुरूष असून आपल्यातली हुशारी बघतोय याचा मला आनंद झाला आणि कौतुक वाटलं.

****

४/४/२००६

दोन दिवस फार गडबडीत गेले. परदेशी पाहुणे आले होते. त्यांच्यासमोर मला प्रेझेंटेशन द्यायचं होतं. मी तयार केलेलं प्रेझेंटेशन बघून साहेब खुष झाले.

केबीनमध्ये बोलावून त्यांनी अभिनंदन केलं. ऑफीसमधील बाकीच्या लोकांना लगेच 'काहीतरी शिजतय' याचा शोध लागला. मी मात्र आता सगळ्यांचे शोध निबंध नजरेनीच वाचून नजरेनीच उत्तर द्यायला शिकले आहे.

मी निर्विकार मुद्रेनी साहेबांच्या केबीनबाहेर आले. सगळ्यांच्या नजरा एक्सरे मशीन सारख्या माझ्यावरून फिरल्या.

माझा चेहरा निर्विकार असला तरी आतून मला या मूर्ख लोकांची कीव येते आणि गंम्मत पण वाटते. कधी बाई बघीतली नाही अश्या नजरेने एखाद्या स्त्रीला वरपासून खालपर्यंत बघत आपल्या मनातील वाईट इच्छा त्या स्त्रीच्या शरीरातील प्रत्येक पेशी पर्यंत झिरपवत न्यायची किती वाईट सवय आहे. ही सवय अश्या लोकांचा छंद बनतो.

माझ्यासारख्या प्रौढ कुमारिका बघून तर या लोकांचा छंद आणखीन उफाळून येतो.


अनिता आपल्याच कामात होती तेवढ्यात तिच्या कानावर पेडणेकरांचा आवाज आला.

" मॅडम…"

" काय पेडणेकर. बोलानं?"

" मी…म्हणजे माझ्या मनात असं आलं की तुम्हाला खूप पटापट प्रमोशन मिळाले त्यासाठी तुम्ही काय केलं हे विचारायच़ं होतं."

एवढं बोलून पेडणेकर ख्यां…ख्यां हसले. अनिताला खूप राग आला पण आवाजाचा टोन शांत ठेवत ती पेडणेकरांना म्हणाली

" पेडणेकर तूमच्या हसण्यामागचा अर्थ कळला मला. त्यासाठी (आपल्या डोक्यावर बोट ठेवत अनीता म्हणाली) इथे क्रिएटीव्हिटी असावी लागते. मग प्रमोशन मिळायला अडचण येत नाही."

अनीताच्या या उत्तरावर गणू शिपाई मनसोक्त हसला त्याबरोबर पेडणेकरांनी त्याला झापलं.

अनीता मनातून आनंदली. एकतर पेडणेकरांची बुद्धी किती मंद आहे हे त्यांना दाखवता आलं शिवाय त्यांचा हे बोलण्यामागचा हेतू काय आहे हे तिला कळलय हे सांगता आलं.

अनीता या आनंदात आपलं काम करू लागली. गालावर अनीताकडून चपराक बसल्यामुळे पेडणेकर तोंड पाडून बसले. वरून गणू चपराशी हसला हा अपमान झाला तो वेगळाच.

ऑफीसमध्ये घडल्या प्रकारामुळे शांतता होती. अनीता झाल्या प्रकाराने मनात अस्वस्थ झाली पण असे भरकटलेले अनुभव तिला नेहमीच यायचे. ती प्रत्येक वेळी सणसणून समोरच्याचा प्रयत्न हाणून पाडायची पण शेवटी तीही माणूसच आहे.

कधीतरी सगळं असह्य झाले की डोक्यावरुन पांघरूण घेऊन तोंडात ओढणीचा बोळा कोंबून एखादा धबधबा कोसळावा तशी रडायची.