Login

प्रिय राधिका मॅडम

It's Letter For Teacher Radhika



प्रिय राधिका मॅडम ,

कळत नाही की ,कसा आजचा दिवस साजरा करू ? साधारण चार पाच वर्षांपासून मी शिक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय पण यावेळी माझ्या राधिका मॅडम माझ्यासोबत नाही.. मला अजूनही आठवतंय जेव्हा गणित विषयाला आम्ही पोरं घाबरायचो तेव्हा कॉलेजमध्ये नवीन शिक्षिका राधिका मॅडम आल्या आणि त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या सिक्रेट सूत्रांनी आमच्या मनातील गणिताची भीती चुटकीसरशी घालवली .. तेव्हा पहिल्यांदाच वाटलं की, आता शिक्षणाचा खरा अर्थ कळतोय तर शिक्षक दिन साजरा करूया म्हणून तुमच्यासाठी मी गुलाब आणलेलं मी तुम्हाला ते गुलाब सर्वांसमोर दिलं आणि तेवढ्यात काही टवाळखोर पोरांनी वेगळाच अर्थ काढून माझ्या आणि तुमच्या नावाचे पहिले अक्षर वापरून राधामय राधामय असं चिडवू लागले ..तुम्हाला वाटलं मी मुद्दाम केलं म्हणून तुम्हीही मला कानाखाली लगावली .. पण जेव्हा तुमच्या लक्षात आली तुमची चूक तेव्हा तुम्ही स्वतःहून माझ्याकडे येऊन मला सॉरी बोलल्या ... करीयरचा श्रीगणेशा माझ्या राधिका मॅडममुळे सुरळीत पार पडला मग कोणास ठाऊक कसं पण आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो ...तुम्हाला खूप विरोध झाला तुमच्या घरून कारण मी तुमच्यापेक्षा चार वर्षांनी लहान होतो .. परंतु तरीही आपलं प्रेमाचं गणित एकदम पक्क होतं त्यामुळे आपण त्यात पास झालोच.. आपल्या संसारात तुम्ही या बालिश अमेयला समुजतदार अमेय बनवलं ... बघता बघता आपली चिमणी सुद्धा आली .. आपलं घर गोकुळ बनून गेलेलं .. तुम्ही मध्येच सोडून गेल्यामुळे संसाराचा श्रीगणेशा मात्र पूर्ण नाही झाला ,दररोज तुमची खूप आठवण येते पण आजचा दिवस खूप खास आहे. माहीत नाही मी आपल्या चिमणीसाठी उत्तम गुरू बनेल की नाही पण तरीही वचन देतो की मी तिला दुनियादारी मध्ये नीट वागायला, बोलायला शिकवेल.. हे सगळं तुमच्या पर्यत कसं पोहचवावं ते कळेना त्यामुळे हे पत्र लिहलं ,आपल्या कॉलेजला पाठवलं आहे तुमच्या नावाने आणि सोबतीला गुलाब आहेच.

तुमचाच खोडकर विद्यार्थी,
अमेय कुलकर्णी