Login

डियर तुकोबा पुस्तक समीक्षण

डियर तुकोबा...
पुस्तकाचे नाव : डियर तुकोबा
लेखक : विनायक होगाडे

'फीलिंग अस्वस्थ', 'ओह माय गोडसे' अशी पुस्तके प्रकाशित झालेल्या पत्रकार, लेखक विनायक होगाडे यांची मधुश्री प्रकाशनाद्वारे प्रकाशित 'डियर तुकोबा' कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मराठी साहित्यात आजवर अनेक रूपात तुकाराम महाराजांवर लिहिले गेले आहे. मग 'डियर तुकोबा' याहून वेगळे आहे का? ही कादंबरी स्वतःला वेगळी कशी ठरवते? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या कादंबरीला वाचल्यावर मिळतात. कादंबरीचा विषय अर्थातच संत तुकाराम महाराज आहेत.

कोणतेही पुस्तक निवडताना सर्वात आधी जर कोणती गोष्ट लक्ष वेधून घेत असेल, तर ती म्हणजे पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि नाव! आताच्या पिढीतील सर्वच साहित्यप्रेमी जुन्या काळातील साहित्यात रमतातच असे नाही. इथे लेखक 'विनायक होगाडे' यांनी मात्र जुन्या, नव्या गोष्टींचा सुरेख मेळ साधलाय असे आपण म्हणू शकतो. आजच्या पिढीला आपलेसे वाटणारे 'डियर' वापरल्यावर कितीतरी पट जास्त लोक या पुस्तकाकडे वळलेले दिसून येतात. याउलट जर फक्त संत तुकाराम किंवा तसेच काही नाव वापरले असते तर किती लोक आकर्षित झाले असते, ही शंकाच होती. सांगण्याचे तात्पर्य हेच की कादंबरीच्या नावावरूनच लेखकाने अनेक वाचकांना आपलेसे केले. कादंबरीच्या मुखपृष्ठावर असलेले संत तुकारामांचे शांत, भक्तीत रममाण चित्र आपल्या मनालाही शांत करते. तर मलपृष्ठावरील रंगनाथ पठारेंचे शब्द पुस्तकाची थोडक्यात पण सुयोग्य ओळख करून देतात.

ही कादंबरी लेखकाने 'तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन भागांत विभागली आहे. लेखकाने मनोगत व्यक्त करतानाच बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. जसे की हे पुस्तक म्हणजे फिक्शन अर्थात कल्पनाविलासात्मक आहे. पुस्तकात काळाचे बंधन न पाळणे, ही बाब जाणीवपूर्वक केलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या गोष्टी लिहत असताना 'तुकाराम' नावाच्या पावित्र्याचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली आहे. मनोगत वाचताना वारकरी नसलेल्या, तशा कौटुंबिक पार्श्वभूमीतून नसलेल्या माणसाने लिहिलेल्या या पुस्तकाबद्दलची उत्सुकता वाढू लागते. कारण तुकोबांच्या आधीच्या काळातील आणि अगदी आताच्या काळातीलही थोडक्यात केलेले काही उल्लेख ती उत्सुकता ताणली जाण्यासाठी कारणीभूत ठरतात.

सुरुवात तुकारामायणापासून होते. सर्वात आधी जर कोणती गोष्ट लक्ष वेधून घेत असेल तर ती म्हणजे 'तुकारामायण' या भागासाठीचे चित्र. मधोमध उभे असलेले संत तुकाराम आणि दोन्ही बाजूला असलेली सावित्रीबाई, जोतिबा, आंबेडकर, गांधी, कबीर, इ. व्यक्तिमत्त्वे! संत तुकाराम नाव समोर येताच आपल्या नजरेसमोर अभंग येतात. या तुकारामायणातही लेखकाने अभंगांची सुरेख मेजवानी वाचकांना दिली आहे. मात्र यातले वेगळेपण मनाचा ठाव घेण्यासाठी उपयोगी ठरले, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. तुकारामांचे अभंग किंवा इतरही अनेक अभंग आपण वाचतो. इथे मात्र लेखकाने अशा व्यक्तींचा समावेश या अभंगांमध्ये केला आहे, ज्या व्यक्तींचा लोकजीवनावर किंवा जनमानसावर खूप प्रभाव आहे. इंद्रायणी काठी गांधीजी आणि तुकोबांची भेट, पुढे गाडगेबाबांच्या भेटीत झालेल्या गप्पा अन् तुकडोजींची विचारपूस आणि मग साने गुरुजींच्या भेटीत झालेले विचारमंथन, सारेच साधे; पण वैचारिक चालना मिळणारे. संत कबीरांच्या दोह्यांची आणि तुकोबांच्या अभंगांची मनस्वी भेट गोडवा मागे सोडून जाते. कधी सॉक्रेटिस तुकोबांना भेटेल असा विचारही मनाला शिवला नसेल; पण लेखकाने ही कल्पना लेखणीतून साकार केली आहे. तुकोबांनी म्हटलेले तत्त्वज्ञानाचा संत सॉकृबाबा असो किंवा मग मी तर एक साधासा माणूस म्हणणे असो, मनात घर करून जाते. सॉक्रेटिसने तुकोबांचे केलेले कौतुकही चपखल आहे. गॅलिलिओची भेटही काहीशी तशीच. भीमराव अर्थात डॉ. आंबेडकरांसोबतची इंद्रायणी काठची भेट तर काय वर्णावी! एकाने अभंगांची गाथा लिहिलेली तर एकाने संविधान नावाची गाथा. दोघांनीही एकमेकांवर उधळलेली स्तुतीसुमने अगदी सार्थ आहेत. जोतिबांची भेट अन् सावित्रीजोतींचा कौतुक सोहळा, तुकोबांची शाहू भेट, कर्मवीर भेट लोककल्याणाच्या आठवणी जाग्या करून जाते. दाभोळकरांच्या भेटीने या भेटीगाठींचा शेवट केला आहे. पुन्हा एकदा अभंगरूपातच एक थोडक्यात आढावा घेऊन भेटीगाठींचं हे तुकारामायण आपला निरोप घेते. मात्र वेगळेपण जपणारे हे अभंग मनात विचारांचे चक्र सुरूच ठेवतात.

पुढचे पान पलटताच एक प्रसिद्ध प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, कारण समोरच तुकोबा आपल्या अभंगांच्या पोथी घेऊन नदीत उभे राहिलेले चित्र दिलेले आहे. 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' या भागासाठी घेतलेल्या या चित्रात विशेष काय आहे? तर काठावर जमलेल्या गर्दीत मीडिया पण दाखवली आहे आणि तीही पारंपरिक वेशभूषेत! कादंबरीच्या या भागाच्या सुरुवातीलाच 'मीडिया' शब्द वापरण्याचे कारण कळते. कारण इथे तुकोबांच्या काळात व्हिडिओ अन् फेसबुकची चलती दाखवली आहे. वाचता वाचता लक्षात येते की या घटना तर ओळखीच्या आहेत; पण त्यांची मांडणी रंजक पद्धतीने केली आहे. आताच्या पिढीला तुकोबा आपलेसे वाटण्यासाठी उचललेले हे एक उत्तम पाऊल आहे, असे नक्कीच म्हणता येईल. समाजात चालत आलेल्या परंपरांना जपताना समाजामध्ये तुकोबांना कायकाय ऐकावे लागले, सहन करावे लागले याचा प्रत्यय प्रसंग वाचताना येतो. आधी जरी हे संदर्भ वाचण्यात आले असले, तरी नव्या पद्धतीने वाचताना नकळतच मन त्या घटनांना आताच्या काळाशी जोडू पाहते. अशा ईर्षेने भरलेल्या घटना आजही तर घडतात! कादंबरीत आजच्या काळातले हॅशटॅग पण दिसतात आणि जुन्या संदर्भांची योग्य अशी वीण पण दिसते.

जुन्या पुरान्या गोष्टी म्हणून टाळाटाळ करणाऱ्या पिढीने तुकोबा खरोखरच फेसबुकवर असते, तर लाईक्सच्या वर्षावाने त्यांना चिंब भिजवले असते, हेही खरंच. स्वतःची भूमिका मांडण्यासाठी दाखवलेला समाजमाध्यमांचा वापर लेखकाच्या कल्पनाशक्तीला दाद देण्यासारखा आहे. तुकोबांच्या कीर्तनातून जनप्रवृत्तीला दिलेली चपराक मनाला भावते. आजच्या पिढीला समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या गोष्टींबद्दल सुनावलेले खडे बोलसुद्धा प्रसंगानुरूप चपखलपणे बसवले आहेत. तुकोबांच्या साथीने शेख महंमद, अनगडशाह फकिर अन् समस्त वारकऱ्यांचा रंगलेला मेळा आणि पुढचे प्रसंग, वाचताना डोळ्यांसमोर उभे राहतात. 'तुका विरुद्ध वर्णाश्रम' हॅशटॅग तर एखाद्याची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा वाटतो, खासकरून ज्यांनी यापूर्वी तुकोबांसंदर्भातील साहित्य वाचले नसेल. 'माझे शब्द हेच माझे सामर्थ्य आहे.' असे ठामपणे बोलून शिक्षेलाही न घाबरणारे तुकोबा पाहून अभिमान वाटतो. जिथे आज एखादा फोटो डिलीट होण्याने अतीव दुःख वाटते, तुकोबांच्या मनाला या प्रसंगाच्या मांडणीमुळे आजची पिढी नक्कीच समजू शकते. लेखकाने तुकोबांच्या मनाची अवस्था आणि इंद्रायणीची अवस्था सुंदररीत्या मांडली आहे. गाथा पाण्यात बुडवतानाचे शब्द वाचताना आपसूकच या दुसऱ्या भागासाठी घेतलेले चित्र डोळ्यांसमोर येते. पुढचा प्रसंग, तो विलाप पाहून मन हेलावते. तुकोबा समजून घेता घेता बायको आवलीची मनःस्थिती, ते प्रसंग अन् आवलीचा आक्रोश त्या काळच्या वास्तवाची जाणीवही करून देतात. 'तुका म्हणे' हॅशटॅगच्या ट्रेंडने बदललेली दिशा, ट्विटर क्रॅश आणि जगभरात पोहोचलेल्या तुकोबांच्या कविता, हे सर्व वाचतानाच खूप भन्नाट काहीतरी वाटते. गुळ्याला इंद्रायणीत तरंगताना दिसणाऱ्या कवितांचा प्रसंग वाचकाच्याही ओठांवर हसू आणतो. धर्म, स्त्री-पुरुष, शतकानुशतकांच्या परंपरा, वर्णव्यवस्था, अंतरंग बहिरंगावरील भाष्य, ज्ञानाधिकार, इ. अनेक गोष्टी हाताळणे लेखकाला चांगले जमले आहे. मीडिया शब्दाचा संदर्भ इथे अगदी उत्तमरीत्या वापरलाय, असे मला वैयक्तिकरीत्या तरी वाटते. वेगळ्या पद्धतीने तुकोबांच्या जीवनाला अनुभवणे वाचकमनाला समाधान देते. अस्पृश्यांना पोटाशी धरून त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळावी म्हणून व्यवस्थेला अंगावर घेणारा, भांडणारा तुकोबा, रंजल्या गांजल्यांचा विचार करणारा तुकोबा, हसतमुख तुकोबा, अक्षरश्रम करणारा तुकोबा, गहाणखाती पाण्यात बुडवणारा तुकोबा, तुकोबा नावाचं गारूड असलेला तुकोबा,.. तुकोबांची अशी बरीच रूपे आपल्याला या कादंबरीत अनुभवायला मिळतात.

अशातच येतो कादंबरीचा अंतिम भाग, म्हणजेच डियर तुकोबा! इथेही तुकोबांचे ते भक्तीत लीन असलेले चित्र बरेच काही सांगून जाते. हे शेवटचे तुकोबासोबतचे बोलणे मनाला स्पर्शून जाते. बोलण्याच्या ओघात लेखकाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तुकोबा मांडण्यासाठी लेखकाला पाच मुख्य धागे समोर दिसत होते आणि ते म्हणजे कवित्व, संतत्व, बंडखोरी, भक्ती आणि नैतिकता. यातील एका धाग्याने तुकोबाची स्पष्टता समोर आणली आणि तो धागा होता कवित्वाचा. तुकोबांच्या जीवनातल्या चढउतारांवर बोलता बोलता डिप्रेशन नावाच्या किडीवर केलेले भाष्य मनात राहते. लेखकालाच त्याचे साहित्य नष्ट करायला सांगणे म्हणजे आत्महत्या करायला सांगण्यासारखे आहे, हे मनाला पटले. शेवटी, वसंत पंचमी अर्थात तुकोबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेला कादंबरीचा सुरेख अभंगमय शेवट, इतक्या लवकर हा तुकोबामय प्रवास संपलासुद्धा अशी जाणीव करून देणारा वाटतो.

लेखकाने कादंबरीत औपचारिक, अनौपचारिक अशा दोन्ही शैलींचा चांगला मेळ साधलेला दिसतो. सर्व मुद्दे किचकटपणा न ठेवता साधारण वाचकांनाही समजतील असे मांडल्याने विषय जिव्हाळ्याचा होण्याची शक्यता वाढते. विषयाचा आवाका तसा मोठाच आहे, त्यामुळे सरसकट सगळ्या गोष्टी लिहिणे या शैलीच्या दृष्टीने योग्य झाले नसते किंवा असे म्हणू शकतो की पुस्तकाचा आकार वाढला असता. मात्र लेखकाने ठरावीक; पण सुयोग्य मुद्द्यांवर आधारित एक उत्तम रचना केली आहे यात काही वाद नाही. संदर्भांविषयी उल्लेख मनोगतात केल्यामुळे वाचकाला खात्री करण्यासाठी उपयोग होतो. एकूणच, कादंबरीचा साहित्यिक दर्जा चांगला आहे.

आताच्या पिढीला आणि जुन्या पिढीलाही आपलेसे वाटेल, ही या पुस्तकाची सर्वात जमेची बाजू वाटली. तुकोबा हाच मुळात संवेदनशील विषय आहे, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला तुकोबांचे हे आधुनिक रूप आवडले नाही ही शक्यता नाकारता येत नाही. मला मात्र हे वेगळे रूप मनापासून आवडले. तुकोबांच्या जीवनाला जाणून घेण्यासाठी 'डियर तुकोबा' वाचणे नक्कीच उपयोगी ठरेल.
© कामिनी सुरेश खाने


सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.