Login

निर्णय - आधार

लेकीच्या सुखाला पैशात तोलू पाहणाऱ्या एका बापाची डोळे उघडणारी कहाणी

रधूनाथ रावांनी डोळ्यावर हात ठेवत वर आकाशात पाहिलं. सूर्याची दाहक किरण त्यांच्या थकलेल्या डोळ्यांना दिपवून गेली. तिन्हीसांजा व्हायला आल्या तरी दिवस मिटायला तयार नव्हता. उन्हात त्यांच्या अंगाची काहीली होत होती पण आता थांबण्यात अर्थ नव्हता आणि आडोश्याला जागाही नव्हती. घामाने चिंब झालेला त्यांचा पांढरा शुभ्र सदरा अंगाला जळू चिकटवा तसा चिकटला होता. धोतराच्या सोग्याने घाम पुसत ते झपाझप पावले टाकत परत चालू लागले. अजून गाव चार कोस दूर होता. अचानक लेकीच्या सासरकडून तातडीने का बोलावणं आल असावं या विचाराने परत त्यांच्या कपाळावर चिंतेची आठी उलटली. तरी बायको सांगत होती शेजारच्या श्रीरंगाला सोबतीला न्या म्हणून. पण असाल तसे निघा म्हटल्यावर श्रीरंग तालुक्याच्या गाववरून यायची वाट बघायची म्हणजे ...
रघुनाथ रावांची एकुलती एक लाडाची लेक सुलोचना तालेवार घरात दिली होती. त्यांची सुलु चार चौघात उठून दिसेल अशी देखणी स्वभावाने शांत आणि कामसू होती. चार बुक शिकली आणि हे स्थळ आल. मलापुढे शिकू द्या म्हणून ती आग्रह करत होती. पण एवढं श्रीमंत घर सोडायचं म्हणजे रघुनाथ रावांच्या जिवावर आल होत. पोरगा लेकीला शोभेसा होता. घरं तालेवार होत. नोकर चाकरांची रेलचेल होती. आपली लेक राणीसारखी राहील असा त्यांच्या विश्वास होता. पण लग्न होवून एका वर्षात ती पहिल्यांदा रडत घरी आली आणि रघुनाथ रावांच्या काळजाचं पाणी पाणी झाल.
लेकीच्या गावाला जाणारी एकमेव एसटी नेमकी चुकली, तरी बर इतपर्यंत एका भल्या माणसाने त्याच्या मोटारीतून सोडलं.अजून बराच पल्ला गाठायचा होता. लेकीच्या काळजीने त्यांची पावलं भराभर पडू लागली. ', हवं तर मला विहिरीत ढकलून द्या पण मला परत त्या घरात पाठवू नका नाना', म्हणून पदर डोळ्याला लावून गयावया करणारी त्यांची लाडकी सुलू त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेली. दिवाळसणाला सोन्याच्या गोफ दिला नाही म्हणून रागावले का सोयरे की तिच्या सासूबाईंना घेतलेली साडी आवडली नाही. दोन वर्षात प्रत्येक सणावाराला योग्य ते मानपान केले तरी या मंडळींना काहीतरी कमीच पडत. आता काय कारण असेल या विचाराने त्यांच्या पोटात खड्डा पडला. गावाची वेस समोर दिसू लागली, तसे त्यांच्या छातीचे ठोके वाढू लागले.
गावाच्या वेशी वरून डावीकडे वळल की समोरच त्यांच्या व्याह्यांचा भला मोठा वाडा, भोवती विटांच पक्क कुंपण. लोखंडी दार लोटून आत गेलं की उजव्या हाताला मोटारी रांगेत लावलेल्या. पुढे डाव्या हाताला रांगेत आंबे लावलेले.भोवताली मोठ वावर. त्यातून जाणारी वाट थेट अंगणात घेवून जायची. एरवी कोणी ना कोणी धावत येवून आल्या पै पाहुण्याच स्वागत करायच. हाता पायावर पाणी देवून अगत्यान बैठकीच्या खोलीत घेवुन जायच. समोर टांगलेल्या मोठ्या झुल्यावर पान जमवत बसलेले दादासाहेब तिथूनच वर्दी द्यायचे की आतून गार पाण्याचा तांब्या भांड ,चहा बाहेर यायचा. पण आज रघुनाथराव एकटेच धडधडत्या छातीने बैठकीत गेले. दादासाहेब झुल्यावर बसले होते. समोर खुर्चीत वामनराव म्हणजे रघुनाथरावांचे जावई बसले होते. दोघांचे चेहरे काहीसे त्रासलेले दिसत होते. रघुनाथ रावांनी आपला घसा खाकरून आपण आल्याची वर्दी दिली.
दादासाहेबांनी आणि वामन रावांनी मान वर करून पाहिलं.
' हमम, बसा नाना.'
रघुनाथ राव समोरच्या खुर्चीत सावरून बसले. एवढं चालून त्यांच्या पायाला रग लागली होती घश्याला कोरड पडली होती.
' तुम्ही अस अचानक बोलावणं धाडलत, सार ठीक आहे ना. सूलू?'
रघुनाथ रावांनी कशीबशी दोन वाक्य रेटली.
' नाना, तुमचे जावई नवा व्यवसाय चालू करायचा म्हणतात. '
' अरे वा! ही चांगली गोष्ट आहे की मग ' खर तर रघुनाथ रावांना पुढल्या गोष्टीची कल्पना आली होती. आता पैश्याची होणारी मागणी कितीची असेल आणि या खेपेला काय गहाण टाकावं लागणार या विचाराने त्यांना हताश व्हायला झालं.
' तर नाना, तुमचे जावई आता नवा व्यवसाय करणार म्हणजे गुंतवणूक आली. आम्ही देतो आहोच पण सासरे म्हणून तुमचं पण कर्तव्य आहे जावयाला मदत करणं.'
' हो तर, का नाही. मला जशी जमेल तशी मी करेन मदत. शेवटी एकुलते एक जावईबापू आहेत आमचे.' रघुनाथ रावांनी कशीबशी जीभ रेटली. पण त्यांची खिन्नता वामन रावांच्या नजरेतून सुटली नाही.
' नाना, तुम्ही फार खुश दिसत नाही आमच्या निर्णयावर? सगळ तुमच्या लेकीच्या सुखासाठी चाललाय. आता तुमची एकुलती एक लेक आहे. तुमच्या पश्च्यात सार तिचं तर आहे त्यातल थोड आधी घेतलं तर कुठे बिघडलं.'
रघुनाथ रावांच्या कपाळावर आठीच साम्राज्य पसरलं. लग्नात आणि लग्नानंतर सारी मानपान सांभाळायला त्यांनी आधीच पदरची जमीन गहाण टाकली होती. बायकोच्या पाटल्या गहाण पडल्या होत्या. आणि आता हे .. याला कुठे अंत आहे की नाही. जमीन मऊ लागली म्हणून कोपरान खणावी.
' दादासाहेब, लेकीच्या लग्नात आधीच जमीन गहाण आहे आणि आता तर बायकोच्या पाटल्या पण गहाण आहेत. आता मला माफ करा आणखीन कर्ज काढणं माझ्याच्याने झेपणार नाही.' दादा साहेबांच्या कपाळावर आठी उलटली.वामनराव तर ताडकन उठून चालू लागले.
दाराशी पाण्याच्या तांब्या घेवून आलेली सूलु तिथेच थिजली.
वामनराव घरात जाताना तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून गेले आणि तीच पाणी पाणी झालं.
' नाना, जावयाला दुखावलं तुम्ही. एवढी जमीन तुमची द्यायचा एखादा तुकडा मोडून मढ्यावर का घेवून जाणार आहात सोबत?एकच लेक तुमची आता तीच सुख तुमच्या हातात. एखादा असता तर काळीज काढून दिलं असतं लेकीसाठी. पण ती सासरी नीट नांदावी अस बहुदा वाटत नाही तुम्हाला.' अंगाला असंख्य मुंगळे डसावे तसे दादासाहेबांच्या शब्द रघुनाथरावांना डंख मारत गेले. त्यांनी हताशपणे दाराकडे पाहिलं. त्यांची लाडकी लेक नखशिखांत दागिन्यांनी मढली होती, अंगावर नवंकोर पातळ पण तिचा तो प्रेमळ चेहरा भकास वाटत होता, तिचे बोलके डोळे खोल गेले होते. निर्जीव बाहुली सारखी ती दारात उभी होती.
' सूनबाई आत व्हा. तुमचे नाना पैसे नाही म्हणतात आणि अश्या दरिद्री नातेवाईकांशी आपल्या सारखी घरंदाज माणसं संबंध ठेवत नसतात. आजपासून तुला माहेर नाही.' दादासाहेब गरजले तशी सूलू नखशिखांत दचकली आणि बापाकडे रडवेला कटाक्ष टाकून आत जायला वळली.
' अहो, दादासाहेब हे काय भलतंच बोलता तुम्ही. माझ्याकडे खरंच पैसा नाही. अहो सगळी सोंग घेता येतात, पैश्याच नाही घेता येत आणि या कारणाने तुम्ही लेकीला माझ्यापासून तोडता. काय कमी आहे सांगा तुम्हाला. माझ्याच्याने जेवढं झालं ते सार केलं. आता जमीन आणि सोंन सारच गहाण पडलय. तुमच्या पाया पडतो पण असा अन्याय नका करू.' रघुनाथराव दोन्ही हात जोडून मान तुकवून उभे राहिले.
दादासाहेब फणकाऱ्याने झुल्यावरून उठले.
' अजून तुमचं घर शिल्लक आहे नाना आणि लेकीची एवढीच आठवण येत असेल तर कायमची घेवून जा तिला.'
रघुनाथ रावांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी झुकवलेली मान वर केली दादासाहेबांच्या नजरेला नजर देत, अजूनही मधल्या दाराशी रेंगाळणाऱ्या आपल्या लेकीला खणखणीत आवाजात साद दिली,' सूलू, ताबडतोब बाहेर ये. आपण निघतोय.'
सुलू जणू या हाकेची वाटच पाहत होती. भरकटलेल्या वासरान ओढीनं गाईकडे यावं तस ती येवून रघुनाथ रावांना चिकटली.
रघुनाथ रावांनी प्रेमाने तिच्या मस्तकावर हात फिरवला आणि दादासाहेबांना नमस्कार करून वळले.
' नाना, खूप मोठी चूक करताय तुम्ही. जर सूनबाईने या उंबरठयाबाहेर पाऊल ठेवलं तर ती आम्हाला मेली.' दादासाहेब आता रागाने थरथरत होते.
' सूलू, मागे फिर. नाही तर तू मला मेलीस.' वामनराव बैठकीत येत म्हणाले.
सुलूने रघुनाथरावांकडे केविलवाणं पाहिलं. रघुनाथ रावांनी तिच्या हातावराची पकड आणखीन घट्ट केली.
' दादासाहेब, वामन राव चूक तर मी आधी केली. पैश्याने पोरीच सुख मोजू पाहिलं. आता बास. ती सुखी राहावी म्हणून तुमची मर्जी राखली पण तुमच्या मागण्या म्हणजे मारुतीच्या शेपटागत झाल्यात. त्यांना काही अंत नाही.मी माझ्या लेकीला घेवून चाललोय.' अस म्हणून ते सुलुचा हात धरून चालू लागले. आता त्यांना डोक्यावरचं ऊन जाणवत नव्हतं की शरीराचा थकवा. आग ओकणार्या ग्रीष्मात वळवाची एक सर येवून जावी आणि जीव कसा पिसागत हलका हलका व्हावा तस त्यांचं झालं होत. आता त्यांना लेकीला सुखी करण्यासाठी कोणाची मनधरणी करायची गरज नव्हती. ते तिला स्वतःला सक्षम बनवणार होते. तिला आधार देणार होते. तिच्या मनगटातल बळ बनणार होते.

हर्षदा सचिन गावंड