Login

देहमुक्ती (अंतिम भाग ४)

देहाला मुक्ती मिळते


देहमुक्ती (अंतिम भाग ४)

एकदिवस विनय अगदी जवळ होता, परी ही जवळच होती. परीला पहाण्यासाठी तिने जवळ बसवून घेतले होते. परीचा हात तिच्या हातात होता. ती परीला पहात होती. विनयचा हात तिच्या डोक्यावर फिरत होता. तिच्या आणि विनयच्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि तिचे प्राण पक्षी सारे काही तिथेच सोडून लांब उडून गेले.
विनयने सावकाशपणे तिचे डोळे मिटले. परीला घेऊन तो बाजूला जाऊन उभा राहिला. मालक आणि मालकीणबाई दोघे तिथेच होते. लग्नात ही सजली नव्हती इतकी सजवून, हिरव्या बांगड्या, हिरवी साडी भाळी मळवट भरून, सवाष्णीच्या मानाने शिल्पा निघाली अनंता च्या प्रवासाला. तिचे अंत्यदर्शनही तिच्या आईवडिलांच्या, भावा बहिणींच्या नशीबात नव्हते.

हळूहळू जो तो आपल्या कामात गुंतला. मालकीण काकू परीला स्वतःच्या पोटच्या लेकी प्रमाणे सांभाळत होत्या, तिचे हट्ट पुरवत होत्या. पण परीला आईची फार आठवण यायची. ती खूप रडायची सुरवातीला. हळूहळू रडण्याचे प्रमाण कमी झाले. तिची मावशी म्हणजे मालकीण बाई तिला खूप जपानच्या. तिचे सगळे बालपण त्या अनुभवत होत्या. तिला आईची उणीव जाणवू देत नव्हत्या. पण तिला मनातली आई आठवत राहिली. विनयही तिला छान बघत होता. तिची पूर्ण काळजी घेत होता. ती विनयच्या ही खूप सवयीची होती. पण सारखी आईविषयी प्रश्न विचारून ती भंडावून सोडी. शेवटी कितीही कोणी असले तरी आईची उणीव भरून काढू शकत नाही. आई ती आईच.

विनय स्वतःला कामात गुंतवून ठेवत होता. शिल्पासाठी घेणार असलेल्या घरी त्याने पाऊलही टाकले नाही. त्याचा व्यवहार करून त्याने कर्ज फेडले आणि तो शिल्पाच्या आठवणीसहीत त्याच जागेत राहिला, जिथे तो रहात होता. आता त्याच्या आयुष्य परी पुरते सिमीत झाले होते. तो कोणात मिसळत नव्हता. फार कुणाशीही बोलत नव्हता. शरीर सोडून सर्व गोष्टीतून मुक्त व्हायचा त्याने निर्णय घेतला होता. परीचे सर्व व्यवस्थित मार्गी लावणे त्याचे कर्तव्य होते. त्याप्रमाणे तो करत होता. तिच्या पालन पोषणात त्याने काहीही कमी होऊ दिले नाही. तिला तिच्या आवडत्या सर्व गोष्टी तो शिकवत होता. तिच्या आवडीच्या सर्व गोष्टी करण्याची तिला मुभा होती. तरीही तिला त्याने योग्य शिस्त लावली होती.

जशीजशी परी मोठी होईल तसे तसे पुस्तकी ज्ञाना बरोबर तो परीला इतरही गोष्टींची जाणीव करून देत राहिला. नातेसंबंध, नातेवाईक, जोरहाट सांगत राहिला. तिच्या मावश्या, मामा सर्वाबद्ल त्याने परीला सगळे काही सांगितले. तिला शिल्पा आणि स्वतःच्या बद्दलही परीला सर्व काही सांगितले होते. परी मोठी झाली स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली. विनयने ही तिला तशी मोकळीक दिली. आता ती आर्किटेक्चरची पदवी घेऊन नोकरीला लागली. स्वतःच्या पायावर उभी राहिली. पण स्वतःच्या हुशारीचा, तिने मिळवलेल्या डिगरीचा, तिनी मिळवलेल्या नोकरीचा, मिळणार्या पगाराची कशाचाही तिला गर्व नव्हता. इतर मुलींपेक्षा ती निराळी होती. अगदी तिच्या आई सारखी शिल्पासारखी. अतिशय मनमिळाऊ आणि सगळ्यांशी जमवून घेणारी. ह्याच सुमारास तिच्या आयुष्याचा राजकुमार तिच्या आयुष्यात आला. दोघांनी एकदमच जाॅब सुरू केला होता. नेहमीप्रमाणे जस आत्तापर्यंत तिचा बेस्ट फ्रेंड तिचा बाबाशी सगळं बोलायची, तसचे हे पण सांगितले. मग विनयने स्वतःहून त्याच्या घरच्यांशी ओळख वाढवली. जवळपास एक वर्ष तो त्यांना अनुभवत होता. तो अनय आणि त्याचे घरचे यांची तो व्यवस्थित पारख करत होता. मग दोन्ही कडून मान्यता मिळाल्यावर परीचे लग्न ठरले. त्याआधीच विनयने परीकडच्या लोकांना विनय आणि शिल्पाच्या लग्नाची सारी हकीकत सांगितली होती. परीला माझ्या शिवाय या जगात कोणीही नाही. चार जोडलेली माणसेच आमचे नातेवाईक हे त्याने स्पष्टपणे सांगितले होते. परी खुशीत होती. पण तिला आई हवी होती. आईची आठवण येत होती. बाबांनी आई बद्दल सांगितलेली प्रत्येक गोष्ट तिला आठवत होती. आपल्या लग्नानंतर आता बाबा एकटा पडणार ह्याचे तिला मनापासून वाईट वाटत होते.

विनय परी च्या लग्नाची सर्व तयारी केली. अगदी जशी शिल्पाने केली असती तशी. लग्नाच्या काही दिवस आधी तो शिल्पाच्या फोटो समोर जाऊन उभा राहिला. म्हणाला, " शिल्पा मी माझे वचन पूर्ण केलयं, आपल्या प्रेमाचा अंश जो तू माझ्याजवळ सोडून गेली होतीस, तीला मी पूर्ण जाणती केलयं. तिला तुझी कमी कधीही जाणवू दिली नाही. माझ्या परीने मी तिला या जगात रहायला, दोन हात करायला तयार केलयं. सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून तू निघून गेलीस. पण आता ती परीपूर्ण झालीय. आता लग्न झाले की तिला आधार मिळेल. आईवडीलांप्रमाणे प्रेम करणारे सासू सासरे मिळाले आहेत तिला. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. ते तिला नक्की जपतील. आता मी तुझ्याकडे यायला मोकळा झालो. मी येणार आता तुझ्याकडे. तू थांबले मी येईपर्यंत माझी वाट बघत. आता आपण दोघे पुढच्या प्रवासाला बरोबर जाऊ. आता थोडेच दिवस राहिलेत फक्त. "

परीच्या लग्नाचा दिवस उजाडला, परीच्या डोळ्यात सारखे पाणी होते. विनय, मालकीण बाई, जिला परीने मावशीचा दर्जा दिला होता, तीसुद्धा परीला समजावत होती. परीचे लग्न लागले. परी आणि अनय अगदी लक्ष्मीनारायण दिसता होते. येणारे दोघांना भरभरून आशिर्वाद देत होते. जेवणावळ आटपली. परी ची पाठवणीची वेळ झाली. इकडे विनयच्या जिवाची घालमेल सुरू झाली. त्याची छाती भरुन आली. त्याचा हात छातीवर घेतला आणि त्याने परीला हाक मारली. परीचे लक्ष नव्हते. तो तिच्याकडे जायला पुढे निघाला आणि धाडकन कोसळला. शिल्पाच्या बरोबर सगळ्यातून मुक्त होऊन परी साठी अडकलेला त्याचा जीव आज देहानेही मुक्त झाला. तो पुन्हा आपल्या शिल्पा जवळ जायला निघाला. जाता जाता त्याने फक्त डोळे भरून परीकडे पाहिले आणि कायमचे डोळे मिटले.
0

🎭 Series Post

View all