जलद लेखन
शीर्षक - देणाऱ्याने देत जावे...
भाग ३ (अंतिम )
भाग ३ (अंतिम )
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्नेहल पहाटेच उठली. स्नेहदत्तलाही उठवले. त्याला तिने उटणे लावून ओवाळले. सासुबाईंना सुद्धा उटणे लावून आंघोळ घालून दिली. त्यांनाही ओवाळले.
दुपारी तिने सर्व स्वयंपाक केला व देवीचे ताट तयार केले. स्नेहदत्तने आईला पूजेसाठी व्हीलचेअरवर बसवून आणले. ताटात अनारसे, करंज्या बघून शीलाताईंना मनातल्या मनात खूप आश्चर्य वाटले.
"अगं स्नेहल हे सर्व कधी केलंस?" त्यांनी हाताच्या इशाऱ्याने स्नेहलला विचारले. आई, तुम्ही नागपंचमीला करंज्या केल्या होत्या नां, तेव्हा मी हे सर्व लक्षात ठेवले. कारण मला यातले काहीच माहित नव्हते आणि त्या दिवशी तुमच्या तोंडातून मी रेसिपीही ऐकली. विशेष म्हणजे मला करंज्या छान करता आल्या आणि अनारसेही जमले. बघा बरं अनारश्याला किती छान जाळी आली आहे आणि आई सर्वात जास्त आनंद मला कशाचा झाला सांगू ? तुम्हाला आणि स्नेहदत्तला करंजी, अनारसे खूप आवडतात नां, आता मी तुम्हा दोघांनाही छान छान करून खाऊ घालत जाईल.स्नेहलला शीलाताईंनी जवळ बोलावले. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि मुक शब्दाने आपलं प्रेम व्यक्त केलं.
अगं स्नेहल, मला विंदा करंदीकरांची कविता आठवली. लहानपणी स्नेहदत्तचा अभ्यास घेताना ती कविता मला खूप आवडायची.
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे.
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे.
म्हणजे देणाऱ्याने निस्वार्थपणे दान करावे आणि घेणाऱ्याने कृतज्ञतेने ते स्वीकारावे. मात्र घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे दान घेण्याऐवजी देणाऱ्याचे हातच घ्यावेत म्हणजे घेणारा स्वतः दान करणारा बनावा. दानशूर व्यक्ती बनावा. इथे थोड्या वेगळ्या अर्थाने तुला सांगते. तू खरंच माझे हात घेतले म्हणजे माझ्या हाताची कला तू शिकलीस. अगदी मला कळू न देता. आता मला अजिबात काळजी राहिली नाही आणि प्रसन्नतेने हसत शीलाताईंनी देवाचे आभार मानले.
स्नेहदत्त व स्नेहलने लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीला नैवेद्य दाखवला. आईला करंजी व अनारसे खायला दिले. नंतर दोघांनी शीलाताईला नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी शीलाताईंच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हास्य सारे काही सांगून गेले.
खरंच काही गोष्टी कशा अकस्मात घडवून येतात. तब्येतीचे काहीही सांगता येत नाही. पण तरीसुद्धा घरच्या लोकांनी घाबरून न जाता अगदी हसत खेळत परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे. ज्याप्रमाणे सूर्यावर मळभ(ढग) येतं आणि सूर्य थोड्या वेळासाठी दिसेनासा होतो पण मळभ (ढग) निघून जाताच तेवढ्याच तेजाने तो पुन्हा तळपू लागतो. त्याप्रमाणे जीवनात सुखदुःख येणारच.
समाप्त .
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा