“किती छान साडी आहे गं! कुठून घेतलीस?” साडीच्या पदरावरून हात फिरवत पोत नीट निरखत पारखत अनुजाच्या मैत्रिणीने सोनलने तिला विचारले.
“माझ्या छोट्या नंदेने दिली आहे मला. त्या कधीच रिकाम्या हाताने येत नाहीत. काहीना काही आणतातच. दिवाळीत आल्या होत्या तेव्हा ह्यांना कपडे, मुलांना कपडे, खेळणी, मला साडी आणि पर्स दिली.” आपली ब्रँडेड पर्स सोनलला दाखवत अनुजा म्हणाली.
“छोटीकडून साडी, पर्स, मोठीने काय दिलं?” सोनलने कुतूहलापोटी विचारलं.
“मोठी फक्त फराळाचा डबा घेऊन आली.” अनुजा फणकऱ्याने म्हणाली.
अनुजाला दोन नंणदा मोठी रंजना आणि छोटी कल्पना. सावळी असणारी रंजना दिसायला अगदीच सुमार, बुटकी होती त्यात शिक्षणातही गती कमी, कशीबशी बारावीपर्यंत तिची गाडी पोहोचली होती. शिवणकाम, विणकाम, घरकामाची तिला विशेष आवड होती. तिची आवड बघता पुढील महाविद्यालयीन शिक्षण थांबवून शिवण क्लासला घालण्यात आले. पुढे दोन वर्षात स्थळ सांगून आल्यावर लग्न झाले.
छोटी कल्पना मोठ्या रंजनाच्या अगदी विरुद्ध होती. गोरीपान, दिसायला सुंदर, हुशार, आत्मविश्वासू, ठामपणे निर्णय घेणारी, उच्चशिक्षित, नामांकित कंपनीत जॉबला होती. नवऱ्याचा स्वतःचा बिझनेस होता. मुंबईला आलिशान फ्लॅट होता. तिच्या घरी गेल्यावर ती मल्टीप्लेक्स, मॉल, उंची हॉटेलात घेऊन जायची. खरेदीला गेल्यावर हात आखडता न घेता अनुजाला हव्या त्या वस्तू घेऊन द्यायची त्यामुळे अनुजाला आणि मुलांनासुद्धा कल्पनाच जास्त आवडायची. रंजनाच्या मानाने सगळ्याच बाबतीत सरस असल्याने कल्पनाला माहेरी जास्त मान मिळत होता.
रंजना गृहिणी होती. संसाराला हातभार लावण्यासाठी फॉल, पिको, शिवणटिपण करत होती. तिचा नवराही खाजगी कंपनीत नोकरीला होता. त्याला जेमतेम पगार होता. परिस्थिती बेताची असल्याने त्यांना हॉटेलिंग, वायफळ खरेदी परवडायची नाही. ती स्वतःच्या हाताने रुचकर पदार्थ बनवून सगळ्यांना आग्रहाने खाऊ घालायची. आपल्या परीने देणंघेणं करायची. कल्पनाप्रमाणे माहेरच्यांची सरबराई करावी असे रंजनालाही वाटायचे पण पैशाचं सोंग आणता येत नसल्याने गप्प बसावं लागायचे. कल्पनासारखी बडदास्त रंजनाला ठेवता येत नसल्याने अनुजा नेहमी तिचा रागराग करायची. माहेरी आल्यावर तिला दुय्यम वागणूक द्यायची.
खरं तर अनुजा आणि सुजय दोघं नवराबायको चांगल्या ठिकाणी नोकरीला होते. बक्कळ कमवत होते. कोणाच्या देण्यावर त्यांचे काही अवलंबून नव्हते तरी आशा असते ना! असेच काहीसे अनुजाचे होते. कोणी काय दिलंय, पैसा, श्रीमंती यावरून ती समोरच्याची पारख करायची.
“काय गरज होती तुझ्या मैत्रिणीला हे सगळं सांगायची?” सोनल निघून गेल्यावर सुजय अनुजाला रागावला.
“माझी साडी तिला आवडली, तिने चौकशी केली म्हणून सांगितले. मी स्वतःहून विषय काढला नव्हता.” अनुजाने तोऱ्यात उत्तर दिले.
“मोठ्या नंदेने काहीच दिले नाही हे सांगायची काय गरज होती याबद्दल बोलतोय मी. घरातल्या गोष्टी घरात ठेवाव्यात एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला.” सुजय चांगलाच चिडला होता.
“जे खरं आहे ते मी सांगितले. मोठ्या नणंदबाईंना फक्त घेणं माहित आहे द्यायची वेळ आली की घाम फुटतो.” तोंड वाकडं करत अनुजाने साडीची घडी करून कपाटात ठेऊन दिली.
“ती मुद्दामून करत नाही, तिची परिस्थिती तुला माहित आहे ना! मग कशाला उगाच दुस्वास करतेस? सुजय बहिणीची बाजू घेत म्हंटला.
“म्हणून फक्त फराळ घेऊन यायचं. मुलांच्या हातावर खाऊसाठी शंभर, शंभर रुपये टेकवायचे. जेवढ्यास तेवढं नाही पण साजेस तरी द्यावं म्हणते मी.”
“तुला काय कमी पडतंय का? काय पाहिजे ते मी घेऊन देतो.” सुजय निर्वाणीचे बोलला.
“तुमच्याशी काही बोलण्यात अर्थच नाही. तुम्ही समजूनच घेणार नाही” अनुजा वैतागून कामाला लागली.
“स्वभावाला औषध नाही” म्हणत सुजयनेही रिमोट हातात घेतला.
दरवेळेला देणेघेणे, आहेर द्यायची वेळ आली की, अनुजा आणि सुजयची वादावादी व्हायची, तो तिचं ऐकत नसल्याने नाईलाजाने ती गप्प बसायची.
काही महिन्यांनी एक विपरीत घटना घडली. अनुजाच्या वडिलांना हृदय विकाराचा झटका आला. ती ताबडतोब माहेरी पोहोचली. उपचारांती बायपास सर्जरी करायचे ठरवले. अनुजाची बहीण परदेशात असल्याने तातडीने येणे तिला शक्य नव्हते. दमेकरी आई आधीच गांगरून गेली होती त्यामुळे सगळी धावपळ अनुजा आणि सुजयलाच करावी लागणार होती. नेमक्या मुलांच्या वार्षिक परीक्षा तोंडावर होत्या. त्या बुडवून चालणार नव्हत्या. मुलांना आपल्या बरोबर नेलं तर त्यांच्याकडे बघू की हॉस्पिटल वाऱ्या करू? अनुजा पेचात पडली. तिने हक्काने कल्पनाला फोन लावला, आपली अडचण सांगितली.
“खरंच यायला नाही जमणार वहिनी. पैसे हवे असतील तर निःसंकोचपणे सांग.” सुट्ट्या, इयरएंड, वर्कलोडचे कारण पुढे करत कल्पनाने नकार दर्शवला.
अनुजाने साशंक मनाने रंजनाला फोन लावला.
क्रमशः
मोठी नणंद रंजना देईल का साथ अनुजाला ….?
©®मृणाल महेश शिंपी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा