अनुजाने साशंक मनाने मोठ्या नणंदबाईंना रंजनाताईंना फोन लावला. वडिलांच्या तब्बेतीबद्दल सांगत आपली अडचण बोलून दाखवली.
“काही काळजी करू नकोस वाहिनी, मी आज रात्रीच्या एसटीला बसते उद्या सकाळ पर्यंत तिकडे पोहोचते तू निश्चिंत मनाने माहेरी जा. बाबांची काळजी घे.” रंजनाने दिलासा देत म्हणाली.
फोन ठेवताच तिने घरच्यांना सगळा प्रकार सांगितला “मी जाऊ ना?” विचारले.
“विचारतेस काय? अशावेळी जायलाच हवे. मी पण रजेचा अर्ज करतो. सुट्टी मिळाली की तिकडे चक्कर टाकतो.” रंजनाचा नवरा समजूतदारपणे म्हणाला.
“तुम्हाला जमेल ना?” रंजना काहीसे घाबरत सासूबाईंकडे बघत म्हणाली.
“न जमायला काय झालं? मुली तश्या मोठ्या, समजूतदार आहेत, त्यांच्या शाळा, अभ्यासाचं त्या स्वतः बघितलं. मला थोडीफार मदत करतील. पिठलं भात खाऊ, वेळ पडली तर पोळीभाजी विकत आणू. तू घरची काळजी करू नकोस.” तब्येतीच्या तक्रारी चालू असतानाही सासूबाईंनी तिच्या जाण्याला पाठिंबा दर्शवला.
ज्यांना गावंठळ, अडाणी म्हणत अनुजा नेहमी नावं ठेवायची तीच सगळी कठीण प्रसंगी तिच्या मदतीला धावून आली होती.
ठरल्याप्रमाणे रंजना दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या माहेरी पोहोचली. ती घरी पोहोचल्यावर मुलांना तिच्या स्वाधीन करून सुजय लगेचच हॉस्पिटलमध्ये जायला निघाला. अनुजा आधीच गेली होती. रंजनाने घर, मुलांच्या शाळा, परीक्षांचे वेळापत्रक सगळंकाही व्यवस्थित सांभाळ्यामुळे अनुजाची काळजी मिटली होती. ती वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष देऊ शकत होती. सुजय येऊन जाऊन असायचा. अनुजा मात्र ऑपरेशन होऊन, डिस्चार्ज मिळेपर्यंत तिकडेच राहिली होती. साधारण पंधरा वीस दिवसांनी सगळं स्थिरस्थावर झाल्यावर अनुजा घरी आली.
“कशी आहे आता बाबांची तब्येत?” रंजनाने विचारपूस केली. अनुजा घरी आल्यावर तिला निघण्याची घाई झाली होती. आपल्या घरातल्यांची होणारी आबाळ दिसू लागली होती.
“आता ठीक आहेत. पुढच्या आठवड्यात मुलांना सुट्ट्या लागल्या की मी त्यांना घेऊन तिकडे जाईन किंवा डॉक्टरांनी परवानगी दिली तर आईबाबांनाच इकडे घेऊन येईन.” अनुजाने सांगितले.
“तू देवासारखी धावून आलीस ताई.” सुजय बहिणीचे आभार मानत म्हणाला.
“उचलून काही देऊ शकत नाही. माझ्याने जेवढं शक्य आहे ते मी केलं.” कल्पनाने हॉस्पिटलमध्ये बिल भरताना केलेली मदत रंजनाला कळली होती. पैशाच्या स्वरूपात आपण काहीच देऊ शकत नाही म्हणून ती ओशाळली होती. बोलताना तिची नजर खाली झुकली होती.
“खरंच तुम्ही होतात म्हणून मी निर्धास्त होते. मी तुमच्याशी जशी वागले ते मनात न ठेवता आलात, इथे राहिलात..…” आधार, मनुष्यबळ, वेळेला धावून येणे पैश्या इतकेच महत्वाचे असते हे कळून चुकलेल्या अनुजाच्या गालावरुन पश्चात्तापाचे अश्रू ओघळत होते.
“आभार मानून परकं करू नका, परत काही गरज लागली तर हक्काने बोलवा. आता मात्र निघावे लागेल.” रंजना सुजय, अनुजाकडे पहात म्हणाली. तीलाही गहिवरून आहे होते.
सुजयने बहिणीच्या प्रवासाची ताबडतोब व्यवस्था केली. ह्यापुढे कुठल्याच नात्याला पैशात न तोलण्याची, पैसा, ऐपत, देणंघेणं यावरून कोणातही भेदभाव न करण्याची, नात्यातला जिव्हाळा जपण्याची शपथ घेत अनुजाने मानाने रंजनाची पाठवणी केली.
समाप्त.
©® मृणाल महेश शिंपी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा