Login

ललाटलेख भाग १६ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे
ललाटलेख

ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.

भाग १६

चौथ्या मांडवी ग्रहमुख झाले. सर्व नातेवाईक जमले होते. चिडवाचिडवी, हसणे हसवणे चालू होते. इतक्या वर्षांनी बाळा गुणाच्या घरी मंगलकार्य होणार म्हणून सगळे नातेवाईक आले होते. घर लहान म्हणून बसण्या उडण्यासाठी शेजारचे दोन फ्लॅट घेतले होते. लग्नाच्या आदल्या दिवशी निशा पार्लरमध्ये गेली. तिने जाताना आईला सांगितले होते. “आई लग्नाच्या आधी मला पार्लरमध्ये जावे लागणार आहे. खूप वेळ लागतो. माझी अकरा वाजता अपाॅंईटमेंट आहे. चार तरी सहज वाजतील.” आई “बरं, पण कुणाला तरी बरोबर घेऊन जा” म्हणाली. बरोबर अकरा वाजता निशा मैत्रिणीला घेऊन पार्लरमध्ये गेली. इकडे आई, ईशा आणि मावशी निशाची बॅग भरत होत्या. सगळ्या गोष्टी नीट आहेत का बघताना लक्षात आले, “निशाचे साडीवरचे मॅचिंग ब्लाऊज अजून मिळाले नाहियेत.” त्याची रिसीट निशाजवळ होती. ईशा पार्लरमध्ये जाऊन रिसीट आणि ब्लाऊज घेऊन आली. तोपर्यंत दीड वाजला होता.. बाबा जेवायला आले. निशा नाही म्हंटल्यावर त्यांचा आपसूक प्रश्न आला. “आत्ता कुठे गेली?”
“लग्नाच्या आधी मुलींना पार्लरमध्ये काही बाही करायचे असते. ती त्यासाठी गेली आहे.” आईने भित भित उत्तर दिले. बाबांना खरतरं राग आला होता, पण आता लग्नच आहे म्हणून ते गप्प बसले. सगळ्यांची जेवण झाली. बाबा आणि काका काही कामासाठी बाहेर गेले. सहा वाजून गेले तरी निशा घरी आली नव्हती. आईच्या छातीत धडधडायला लागले. तिने परत ईशाला निशाला पहायला पिटाळले. “तिचे अजून व्हायचे आहे.” एवढाच निरोप घेऊन ईशा परत आली. उद्या सकाळी लवकर कार्यालयात जायचे आहे. सगळी सामानाची बांधाबांध झाली. डाग मोजून त्यावर नंबर घालून झाले. साडेआठ वाजले. बरीच माणसे जमलेली लवकर जेवणे उरकून घ्यावी म्हणून सवयीने आईने निशाला हाक मारली आणि तिच्या लक्षात आले “निशा अजून घरी आली नाहीये.” बाबांच्या पण लक्षात आले. पायात चप्पल अडकवून ईशाचा हात धरून बाहेर पडणार इतक्यात निशा आली. तिच्या बरोबर मैत्रिणी पण होत्या. निशाच्या दोन्ही हातांवर पुढे मागे दोन्ही बाजूला मेंदी काढली होती. निशा आत आल्यावर बाबांनी हात बघून विचारले, “ह्याची काही गरज होती का?”
“ममींनी सांगितले होते, दोन्ही हातावर मेंदी काढून घे. कोपरा पर्यंत, आणि पायावर पण, मी नाही तेवढी काढली. पण त्यांनी सांगितले तर काढायला हवी ना.” निशा ने सांगितले.
आई निशासाठी जेवणाचे ताट घेऊन आली. आई तिच्या जवळ बसून घास भरवणार तोच बाबा पुढे झाले, “ थांब, आज मी भरवणार तिला, भरवता भरवता डोळ्यात पाणी आणून म्हणाले, “परत कधी माझ्या चिऊला भरवायला मिळेल काय माहिती? लहानपणी चिऊ भरवून घ्यायची, आता तिला आठवत ही नसेल. मी चिऊ म्हणायचो हे सुद्धा आठवत नसेल.” आणि डाव्या हाताने डोळ्यातील पाणी पुसले. जमलेल्या सगळ्यांचे डोळे पाणावले.
“बाबा, म्हणजे तुम्ही हिला एकटीलाच भरवत होतात. मग मला का नाही भरवलेत?” ईशाने निशाला डोळा मारून मुद्दामहून भाबडा प्रश्न विचारला आणि सगळे हसले. बाबांनी तिलाही घास भरवला. “ जन्मापासून जीव लावलेली एवढीशी चिमणी पंख फुटल्यावर दुसऱ्या कुणाच्या स्वाधीन करताना आई वडीलांना किती क्लेश होत असतील हे ते आईवडील जाणोत.”

“जेवण होत नाहीत तोपर्यंत दाराची बेल वाजली. बाबांनी दार उघडले. दारात नचिकेत आणि त्याचा धाकटा भाऊ निरंजन दोघे होते. “ अरे या ना, एवढ्या उशीरा कसे आलात?” बाबांनी विचारले.
“आईने निरोप दिला आहे. उद्या कार्यालयात तिची आई, काका, काकू असणार आहेत, तर कार्यालयात येताना साडी नेसून ये. त्यांना नाही आवडणार पंजाबी ड्रेस घालून आलेली.” बाबांनी निशाला बोलावले.
“ हो मी ऐकले. मी साडी नेसूनच येणार आहे.” निशा म्हणाली.
निशाचे मेंदी भरले हात पाहून नचिकेत इतका मोहीत झाला, समोर बाबा आहेत हे विसरून तो गुणगुणला,
“मेंदी भरले हात तुझे” आणि बाबांकडे बघून जीभ चावली आणि तिथून काढता पाय घेतला.
“उद्या मेकअप करायचा नाहीये ना, नाहीतर… . .. तुला माहीत आहे मला मेकअप नाही आवडत.” बाबा नचिकेत बाहेर पडल्यावर म्हणाले.
“हो बाबा, मला माहिती आहे, पण मी ममीना नाही पण म्हणू शकत नाही ना? त्यांना आपल्या सुनेला सजवायची खूप हौस आहे. अजून एक सोन्याचा सेट त्यांना घ्यायचा होता. मीच स्पष्ट नाही म्हणाले. तरी त्यांनी मोत्याचा सेट घेतलाच. नाक ही टोचून घे म्हणून मागे लागल्या होत्या. पण नचिकेतने स्पष्ट “अजिबात नाही. मला नाही आवडणार तिने नाकात काही घातलेले.” म्हणून मी वाचले.” निशा म्हणाली. बाबा कपाळावर हात मारून घेऊन म्हणाले, “काय करायचे ते स्वतः करा म्हणावे.” एवढे लग्नाचे घर पण घरात कुणाच्याही हातावर मेंदी काढलेली नव्हती, ना ईशाच्या, ना आईच्या, नाही इतर कुणाच्या. सगळेच निशाच्या वडीलांच्या धाकात होते.


क्रमशः

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे.
मिरज


🎭 Series Post

View all