Login

ललाटलेख भाग १७ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे
ललाटलेख

ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.

भाग १७


लग्नाचा हाॅलमधे सनई चौघडा वाजत होता. वधू निशा पारंपरिक वेशभूषा लेवून नटली सजली होती. वराचा वेस्टर्न सूट त्याला अगदी शोभून दिसत होता. निशा आणि नचिकेत दोघांच्या बाजूला करवल्यांचा, मित्रमैत्रिणींचा चिवचिवाट सुरू होता. “तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि।।” सुरू झाले. आणि इकडे बाबांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. आईही आतल्या खोलीत मुसमुसत होती. “शुभमंगल सावधान” झाल्यानंतर निशा आणि नचिकेत दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. विवाह सोहळा सुंदर पार पडला. जेवणाच्या पंगती झाल्या. नचिकेतच्या ममी घरी जायची गडबड करू लागल्या. त्यांच्या गुरूजींनी दिलेल्या मुहूर्तावर त्यांना लक्ष्मीपूजन करायचे होते. निशा आईच्या गळ्यात पडून रडत होती. ईशा ही निशाला मिठी मारून रडत होती. बाबा हळूहळू डोळे पूसत होते. आईनी निशाला सांगितले, “बाळा, तू सूज्ञ आहेस, शहाणी, शिकलेली आहेस. तरीही आई म्हणून सांगते “ तडजोड हे यशस्वी संसाराचे गुपित आहे. मोठ्यांचा कधी अनादर करू नकोस आणि आपल्या आईवडिलांना अपमान होईल असे ही वागू नकोस.” निशाने मान डोलावली. निशाला दारापर्यंत सोडायला सगळे आले होते. ईशाचा दुसऱ्या दिवशी पेपर होता, म्हणून ती पाठराखीण म्हणून गेली नाही.

नचिकेतच्या दारात निशा आणि नचिकेतचे गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालून स्वागत झाले. ममी आणि चार सवाष्णींनी त्यांना ओवाळले. आणि निशाने माप ओलांडून गृहप्रवेश केला. जरा आराम झाल्यावर लगेचच लक्ष्मीपूजन झाले. नचिकेतने तांदुळांनी भरलेल्या ताटात “निशा” असे नाव लिहिले. सगळ्यांनी नाव घेण्यासाठी जल्लोष केला.
“ रवि राजाच्या किरणांनी
प्रफुल्लित होते उषा
माझ्या कणाकणांना
उत्साहित करते निशा”
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, ममी मात्र नाराज झाल्या. “मी तुला नलिनी नाव ठेवायला सांगितले होते ना!” म्हणाल्या.
“शी, मला नाही आवडले, जुनाट आहे. त्यापेक्षा निशाच चांगले आहे.” नचिकेत म्हणाला.
ममींनी निशाची ओटी भरली. लक्ष्मीपूजनाचा म्हणून बकूळहार दिला. सगळ्यांनी आग्रह करून निशाला ही नाव घ्यायला लावले.
“मंगलवेळा, मंगल चौघडा वाजंत्री दारी
सासूबाईंनी केला वरातीत थाट भारी
लक्ष्मीच्या आगमनाने आनंदले सारे
नचिकेतने ओंजळीत घातले चंद्र तारे
ममींनी हार दिला लक्ष्मीपूजनच्या वेळी
पपा आमचे साधे भोळे जणू चंद्रमौळी
गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश केला घरात
नचिकेतचे स्थान कायम माझ्या मनात.” निशाने उखाणा घेतला आणि टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट झाला.

रात्रीची जेवणे झाली. निशाला नचिकेत चल म्हणाला. इतक्यात ममींनी आवाज दिला, “निशा, आज तू आमच्या खोलीत झोप. उद्या पूजा आहे. सकाळी लवकर उठायला हवं.” बरं ममी.” म्हणून निशा त्यांच्या मागे गेली. नचिकेतच्या खोलीत दहा माणसे झोपली होती. पण नचिकेत मात्र या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. काही केल्या त्याला झोप लागायला तयार नव्हती. तो रात्रभर झोपलाच नाही. सकाळी साडेपाच वाजता त्यानीच ममीला उठवले, चहा करायला लावला आणि म्हणाला “पूजा आहे ना, मग लवकर नाही का उठायचे, चला आवरा भराभरा.”
“तुला पुजेची फारच घाई झालेली दिसतात? का रात्री चैन पडले नाही वाटत? डोळे लाल झालेत म्हणजे झोपही झालेली नसणार!” पपांनी त्याच्यासमोर चहाचा कप धरत त्याची चेष्टा करायला सुरवात केली.
“तरीच, नाहीतर हा कशाला एवढ्या लवकर उठतोय. जा निशाला उठव जा, पण तिच्या शेजारी बेडवर मामी झोपलीय.” हसत हसत ममींनी पपांना टाळी दिली. नचिकेत निशाला उठवायला गेला. बेडवर कोणीच नव्हते. “ निशा, निशा” त्याने हाक मारली, पण काहीच उत्तर नाही. तो घाबरून परत ममीला विचारायला आला, “अग ममी, निशा कुठे आहे?” परत ममी आणि पपा दोघेही हसायला लागले. ममी म्हणाल्या, “ ती केंव्हाच उठलीय. चहा पिऊन आंघोळीला गेली आहे.” नचिकेत चहा घेत बसला होता. निशा केसांना गुंडाळलेला टाकवे तसाच ठेवून बाहेर आली होती. तिच्या कपाळावर अवखळ बटा झुलत होत्या. नुकतीच अंघोळ करून आलेली निशा नचिकेत ला जलाशयातून अवतरलेल्या एखाद्या परी सारखी दिसत होती. “ममी, केस सुके पर्यंत काहीतरी काम करते. मग वेणी घालते.” निशा म्हणाली. नचिकेत तिला एकटक न्याहाळत होता. ममींनी तिला दुर्वा आणि तुळस नीट करायला सांगितले आणि तिथेच नचिकेत समोर बसवले. आणि त्या तिथून खोलीत गेल्या. नचिकेतला आत्ता कुठे निशाशी बोलायला चान्स मिळाला पण तो मात्र फक्त तिचा चेहरा न्याहाळत बसला होता. तिनेच त्याला हलका चिमटा काढला आणि त्याची तंद्री भंग केली. “हं. मेनकेने या विश्वामित्र ाची समाधी भंग केली.” नचिकेत नाटकीपणाने म्हणाला.
“ओ विश्वामित्र अंघोळ करून घ्या. आत्ता गुरुजी येतील.” ममींचा आवाज ऐकून निशा मात्र लाजून चूरचूर झाली.


क्रमशः

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज


🎭 Series Post

View all