Login

ललाटलेख भाग १८ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे

ललाटलेख

ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.

भाग १८

पूजा झाली. सगळे पाहुणे आपापल्या घरी परतले. निशा आणि नचिकेत रात्रीच्या गाडीने बेंगलोर मैसूरला रवाना झाले. निरंजन हैदराबादला होस्टेलवर गेला. निशा आणि नचिकेतचे एसी स्लीपर कोचचे रिझर्व्हेशन होते. दोघे जागेवर बसले. दोघांची जागा वर खाली असल्याने आणि इतर लोक असल्याने त्यांना बोलता सुद्धा आले नाही. नचिकेतला आधल्या दिवशी झोप मिळाली नसल्यामुळे त्याला झोप लागली. पण निशा पहिल्यांदाच असा लांबचा आणि रात्रीचा प्रवास करत होती, त्यामुळे तिला नीट झोप लागली नाही. सकाळी उठली तेव्हा नचिकेत तिच्याकडे बघत बसला होता. “गुड मॉर्निंग स्वीट हार्ट” म्हणत त्याने तिला फ्लाईंग कीस दिला. निशाने “गुड मॉर्निंग“ म्हणून लाजेने मान खाली घातली. तिच्या गालावर फुललेल्या गुलाबी कळ्यांनी नचिकेत आणखीन घायाळ झाला. नचिकेतने दोघांसाठी चहा मागवला. निशाला खूप भूक लागली होती. तिला ऑफिसला जाताना रोज भरपूर खाऊन बाहेर पडायची सवय होती. पण ‘गाडीतले खाणे कसे असेल काय माहित’ म्हणून ती गप्प बसली. त्यांना बेंगलोरला पोहचे पर्यंत बारा वाजून गेले होते. बूक केलेल्या हाॅटेलवर जाण्याआधी नचिकेतने तिला एका रेस्टॉरंटमध्ये नेले. दोघांनी पोटभर जेवण केले. आणि मग ते हाॅटेलवर गेले. आंघोळ करून दोघेही फ्रेश झाले. निशाने छान साडी नेसली होती. केसाची छान वेणी घातली. दोघे बाहेर पडले. आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आले. मग एका माॅलमध्ये गेले. नचिकेतने तिथे निशासाठी गाऊन, जिन्स टाॅप असे वेस्टर्न कपडे घेतले. त्याला ते खूप आवडायचे. जेवण करून ते परत आले. निशानी कपडे बदलण्यासाठी नचीला बाहेर जायला सांगितले, पण तो हलेना.
“तू हा नाईट गाऊन घालणार असशील तरच मी बाहेर जाईन.” नची म्हणाला.
“बरं” म्हणत निशाने त्याला बाहेर उभे रहायला भाग पाडले. निशाने तिचा नेहमीचा साधाच गाऊन घातला आणि नचीला दार उघडले.
“आता तुला शिक्षा, आता मीच तुला हा गाऊन घालणार.” आत येत नची म्हणाला. नचीने तिच्या गाऊनची बटण काढण्यासाठी निशाला जवळ घेतले. तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकले. तिने त्याला घट्ट मिठी मारली. रातराणी मोहरली. प्रणय संगीत ताल धरू लागले. आणि दिवा मालवला गेला. अंधाराने आपली जादुई क्रिडा सुरू केली.

पाच दिवस खूप फिरून, भरपूर वेळ एकमेकांबरोबर घालवून निशा आणि नची घरी परत आले. मम्मींनी आल्या बरोबर दोघांची दृष्ट काढून टाकली. दोघांची ऑफिस सुरू झाली. रविवारी आईबाबांना भेटून यायचे आणि एरवी ऑफिस ह्यात दिवस आठवडा कसा निघून जाई कळतही नसे. सकाळी म्ममी सगळे बघत, दोघांचा डबा तयार असे, पण निशानेच भरून घ्यायचा. घरी आई डबा, पाण्याची बाटली सगळे बॅगमध्ये भरून ठेवत असे. घरी आल्यावर गरमागरम जेवण तयार असे. इकडे ममींनी आधीच सांगून टाकले होते. “मी सकाळी डबे करीन. संध्याकाळचे मात्र तू घरी येऊन बघायचे. आता मी माझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला जाणार.” निशाला कितीही प्रयत्न केला तरी घरी यायला साडेसात वाजायचे, मग आल्यावर फ्रेश होऊन ती स्वयंपाक घरात येईपर्यंत नची कूकर लावून भाजी चिरून ठेवायचा. निशाला तसा फार स्वयंपाक येत नव्हता, पण मम्मीपपा दोघेही घरी नसत, त्यामुळे आधी फारसे कुणाला कळले सुध्दा नाही. निशाला त्या दोन तीन महिन्यात नचीने रोजचा स्वयंपाक शिकवला. पण मम्मींना समजले तसा त्यांचा पारा चढला. ऑफिसातून निशाचा पाय दारात पडल्या पडल्या त्या “इतकी कशी ग तू आळशी! तू काम करून येते तसा नचीही काम करून दमतो. तरी तू त्यालाच कामाला लावते?” मम्मी फाडकन बोलल्या. निशा शांतपणे म्हणाली, “मम्मी इतके वर्ष मी कधीच स्वयंपाक केला नाही. मला वेळही नसायचा. मला येत नाही म्हणून नची मला शिकवतो. ह्यात आळशीपणा कुठे आला?” ते नचीने ऐकले आणि पटकन म्हणाला, “ ममी उद्यापासून संध्याकाळी स्वयंपाकासाठी बाई बघ. निशाला ऑफिसमध्ये जबाबदारीचे आणि खूप काम असते. ती स्वयंपाक करणार नाही. निशा चल आज आपण जेवायला बाहेर जायचे आहे.”
“अरे असू दे, मी करते पटकन काहीतरी.” मम्मी उगाच दिखाऊपणे म्हणाल्या, पण नची निशाला घेऊन बाहेर जेवायला गेला. संध्याकाळी स्वयंपाकासाठी बाई येऊ लागली. त्या महिन्यात निशाने पगार झाल्यावर काही पैसे ममींच्या हातात दिले व म्हणाली, “खरेतर मी आधीच द्यायला हवे होते, पण माझ्या लक्षात आले नाही.’
“ अग, नची देतो आणि तसही पपा आहेतच की तू नको देऊस.” ममी तोंडदेखल म्हणाल्या, पण पटकन निशाच्या हातातून पैसे घेतले. हे नचिकेतला समजले. त्या दिवशी नची आणि निशाचे पहिले भांडण झाले. नची खूप चिडला तरी निशाने त्याला समजावले, “अरे, असू देत. त्या सगळ्यांसाठी करतात. मनापासून करतात, त्यांना मी थोडे पैसे दिल्यावर आनंद मिळतोय ना, मग दिले तर कुठे बिघडले?” पण नचिकेतला मात्र ते अजिबात आवडले नाही. ख-याअर्थाने नची आणि निशाच्या संसाराला सुरवात झाली.

क्रमशः

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

🎭 Series Post

View all