ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग २०
निशाचे नवीन नोकरीचे रूटीन छान लागले. निरंजन घरी परत आल्यामुळे चार खोल्यांची जागाही कमी पडते आहे असे ममींना वाटू लागले होते. त्या वारंवार तसे बोलून दाखवत होत्या. निशा आणि नचिकेतने जवळच एक फ्लॅट बुक केला. सात आठ महिन्यांनी त्याचा ताबा मिळणार होता. बुक केल्यानंतर त्यांनी ममी पपा दोघांना एकदमच सांगितले. पपांना खूप आनंद झाला. “एवढ्या लवकर नची स्वतःचे घर घेतो आहे” हे पाहून त्यांना मनापासून त्याचे कौतुक वाटले. पण ममींना ते फार रुचले नाही. अर्थात त्यांना नची पेक्षा निरंजनचेच नेहमी कौतुक असे. त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
निरंजन ज्यासाठी तयारी करत होता, ती परीक्षा तो ऊत्तम पास झाला. त्याला व्हिसा ही मिळाला. आणि तो एम. एस. करायला अमेरिकेला गेला. तो जाणार म्हंटल्यावरच ममींनी हांथरूण धरले. सतत तोच विषय डोक्यात घेऊन त्या रडत रहायच्या. आणि निरंजनला इमोशनल ब्लॅक मेल करू पहायच्या. त्याने एक दिवस स्पष्ट सांगितले, “हे बघ ममी, मी काही झाले तरी अमेरिकेला जाणारच आहे. एम. एस. करण ही माझी महत्वाकांक्षा आहे. आता मला निरोप कसा द्यायचा हे तू ठरव.” त्यानंतर ममींचे रडणे बंद झाले. निरंजन अमेरिकेला गेल्यानंतर दोन महिन्यांनी निशा नचिकेतचा फ्लॅटचा ताबा मिळाला. त्याचवेळी निशाने “आई होणार” असल्याची गोड बातमी दिली. मग निरंजनने लवकरच घराची वास्तुशांत करून घेतली. पण ममी काही निशा निरंजनला नव्या घरी रहायला जाऊ द्यायला तयार नव्हत्या. रोज काहीतरी कारण काढून त्या निशा निरंजनला घरीच थांबवून घेत होत्या. निशाचे डोहाळजेवण व्हावे असे निशाच्या आईला वाटत होते, पण त्यांच्याकडे पद्धत नव्हती. ती सहावा संपताना नचिकेतच्या ममींना भेटून आली, पण त्यांच्याकडेही पद्धत नव्हती आणि त्यांना फार हौस ही नव्हती. निशाचे डोहाळजेवण करायची निशाच्या आईची ईच्छा तशीच राहून गेली. आठवा संपत आल्यावर निशा बाळंतपणासाठी माहेरी आली. आई तिला रोज ताजे गरम गरम जेवायला वाढत होती. ऑफिसला जाताना सुद्धा आणखीन एक जास्तीचा डबा असायचा आणि तो संपवायचाच असा हुकूम असे. बाबा रोज रात्री तिला कंपल्सरी दूध घ्यायला लावत होते. ते स्वतः दूध गरम करून त्यात केशर वेलची घालून तिला देत होते. माहेरी निशाचे खूप लाड होत होते. नववा संपल्यावर निशाने ऑफिसमधून रजा घेतली. आता ती दिवसभर घरी असे पण दोन दिवसात ती रिकामेपणाला कंटाळली. बाबा आणि ईशा दोघेही घरी नसत, आईशी बोलून किती बोलणार? तसेही आई खूप कमी बोलत असे. कसे बसे तिने आठदहा दिवस काढले. एक दिवस रात्रीच तिच्या पोटात बारीक कळा यायला सुरवात झाली. पण रात्री दहा वाजता आईबाबा एकदा खोलीत झोपले की त्यांना उठवायचा कोणाची हिंमत नव्हती. निशाने तीन साडेतीन पर्यंत सहन केले, पण नंतर तिला असह्य वेदना होऊ लागल्या. मग ईशाने आई बाबांना उठवले. बाबांनी एका रिक्षावाल्याला आधीच सांगून ठेवले होते. ते लगेच त्याला घेऊन आले आणि दहाव्या मिनीटाला ते दवाखान्यात पोचले होते. चार तास निशा प्रयत्न करत होती. डाॅक्टर आणि नर्स पण होते. पण शेवटी डाॅक्टरांना सिझेरियन करायचा निर्णय घ्यावा लागला. नचिकेत येईपर्यंत वाट पहायला डाॅक्टर तयार नव्हते. तासाभराने ऑपरेशन थिएटरमध्ये बाहेर बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. निशाच्या आई बाबांनी निश्वास सोडला. थोड्यावेळाने डाॅक्टरांनी बाहेर येऊन सांगितले, “अभिनंदन, निघाला मुलगा झाला आहे.” नचिकेतला कळून तो येईपर्यंत निशा आणि बाळाला खोलीत आणले होते. बाळाला पाहून नचिकेत खूप खूश झाला. निशाला अजून शुध्द आली नव्हती. मम्मी आणि पपा आले, येताना सर्वांसाठी जेवण घेऊनच मम्मी आल्या होत्या. मम्मी आणि पपाही बाळाला बघून खूश झाले. पण मम्मी पटकन बोलून गेल्या, “बरं झालं बाई मुलगा झाला. मला सतत चिंता लागून होती, तुलाही मुलगी होते की काय?” ते ऐकून बाबा, आई, निशा नचिकेत सगळ्यांचे चेहरे पडले. नचिकेत बोलणार होता त्याला डोळ्यांनी थांबवत पपा म्हणाले, “ मुलगी होणार का मुलगा हे आपल्या हातात नसते. छान निरोगी बाळ जन्माला आले हे महत्त्वाचे, बरोबर आहे ना निशा?’ निशा आणि नची दोघेही पपांकडे बघून हसले. आईबाबांच्या डोक्यावरचे ओझे उतरले.
क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा