Login

ललाटलेख भाग २१ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे
ललाटलेख

ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.

भाग २१


निशा अकराव्या दिवशी दवाखान्यातून घरी आली. बाराव्या दिवशी घरातल्या घरात पाळण्यात घालून नाव ठेवले. निशाला आणि बाळाला मालीश आणि अंघोळ घालायला येणारी बाई बरोबर सकाळी साडेसात वाजता यायची. त्याआधी निशा उठून तिचे सकाळचे आवरलेले असायचे. आंघोळ झाल्यावर बाळ खूप छान झोपायचा. निशाला कधी झोप लागायची कधी नाही. एक महिना होतोय न होतोय तोच बाळाचे रुटीन बदलले. तो रात्री जाणवू लागला. पण निशाच्या आईने सांगितले, “मला रात्री जागणे जमणार नाही. सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत मी सगळे करीन. पण दहा वाजता मी झोपणार.” निशाला सुद्धा विश्रांती आवश्यक होती. तिला पण रात्री झोप यायची. त्यावेळी ईशाची सी. एस. ची परीक्षा जवळ आली होती. ती रात्री जागून अभ्यास करायची. बाळ जागवायला लागल्यावर ती एका खांद्यावर बाळाला घेऊन दुसऱ्या हातात पुस्तक घ्यायची आणि फे-या घालत रहायची. तीन साडेतीन पर्यंत ती जागायची. तोपर्यंत निशाची एक झोप व्हायची. मग निशा बाळा कडे बघायची. असे अडीच महिने निघून गेले. निशाची सासरी जाण्याची वेळ जवळ आली. तशी निशाच्या आईने बारशाची तयारी केली.
आठ दिवसात बारसे झाले. खूप सुंदर झाले बारसे. कमी कमी म्हंटले तरी साडेतीनशे माणसे आली होती. बाळतपणाचा खर्च, बारशाचा खर्च निशाचे बाबा सगळे करत होते, पण निशाने स्वतःहून थोडी कॅश बाबांच्या हातात ठेवली. निशाच्या आईने केलेली सरबराई पाहून निशाच्या सासरची माणसे खूप खूश झाली. बाळाचे नाव अनिरुद्ध ठेवले. नचिकेतनेच हे नाव सुचवले, आणि निशाला पण आवडले.
बारशाच्या दिवशीच निशाला आणि बाळाला घेऊन नचिकेत घरी गेला. घरी गेल्यावर पहिले दोन तीन दिवस सगळे बाळाला घेत होते. मग सगळ्यांचाच उत्साह कमी झाला. अनिरुद्ध रात्री जागवत होता, पण आता निशालाच त्याला बघावे लागत होते. त्याला खाली ठेवले की तो रडायचा दिवसभराच्या कामाने थकून निशाला झोप येत होती. काम म्हणजे जरी स्वयंपाक फार नसला तरी नाष्टा किरकोळ तयारी करणे सुद्धा मम्मींनी बंद केले होते. ते निशालाच बघावे लागे. अनिरुद्धचे कपडे धुणे, त्याचे शी, शू बघणे सगळे निशा करत होती. आईकडे असताना संध्याकाळी थोडावेळ बाबा, रात्री थोडावेळ ईशा बघायचे. आईकडे त्याचे कपडे बाई धुवत होती. आई निशाला चहा, नाष्टा जेवण आयते देत होती. इकडे मात्र रात्री तीन साडेतीन पर्यंत अनिरुद्ध जागाच असायचा. नचिकेतला जागरण नको म्हणून निशा त्याला घेऊन हाॅलमधे बसायची. मांडी घालून, त्याला मांडीवर घेऊन घेऊन निशाचे गुडघे समजायचे, दुखायचे. पण तिलाही झोपेची आवश्यकता आहे हे कधी मम्मींच्या लक्षात आले नाही. नचिकेत मात्र सुट्टीच्या आधीच्या दिवशी त्याला घेऊन बसायचा. रोज कलेकलेने अनिरुद्ध मोठा होत होता. त्याला पाच महिने पूर्ण झाल्यावर निशाने ऑफिसला जायचे ठरवले. ती नचिकेत बरोबर तसे बोलली. “माझी काही हरकत नाही. पण आधीच सांगतो. त्याला पाळणाघर बघावे लागेल. मम्मी बघेल असे मला वाटत नाही.” नचिकेत म्हणाला. तरी एकदा बोलून बघू म्हणून निशा पप्पा समोर असतानाच मम्मीना म्हणाली, “अनिरुद्ध पाच महिन्याचा झाला. आता मला ऑफिसला जावे लागेल. मी एक तारखे पासून ऑफिस जाॅईन करायचा विचार करते आहे.”
“ऑफिस महत्त्वाचे आहे का? तू ऑफिसला गेली नाहीस म्हणून इथे काही कमी पडणार नाही. बाळ जरा वर्षाचा होऊ दे.” मम्मी फटकन म्हणाल्या.
“प्रश्न तो नाहीये. माझी नोकरी ही मी गरज म्हणून करत नाही. चांगले शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे हे माझ्यासाठी पहिल्यापासूनच महत्त्वाचे आहे. मी अनिरुद्धसाठी पाळणाघर बघणार आहे. फक्त तुमच्याशी बोलून घ्यावे म्हणून बोलले.” निशा म्हणाली.
“पाळणाघरात ठेवणार म्हणून त्याची आबाळ होणार आणि त्याची तब्येत खराब होणार. निदान एक वर्ष पूर्ण होईपर्यंत तरी बाळाला आईची हवीच जवळ.” मम्मी म्हणाल्या.
“अग, आजकाल सगळ्या मुली हेच करतात. पाळणाघरे ही चांगली असतातच की.” पप्पा पुढे काही बोलणार तोच मम्मी म्हणाल्या.
“तुम्हांला यातले काही कळत नाही. तुम्ही उगीच बोलू नका.” मम्मीनी पप्पांना गप्प केले. नचिकेत आल्यावर त्याने मम्मीशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण मम्मी ऐकायला तयारच नव्हती. निशा निराश झाली. पण अनिरुद्ध एक वर्षाचा होईपर्यंत थांबायचा निर्णय घेतला आणि तिने नोकरीचा राजिनामा दिला.

क्रमशः

©️®️सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all