Login

ललाटलेख भाग २८ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे
ललाटलेख

ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.

भाग २८

इकडे अमेरिकेत निरंजन त्याच्या ऑफिसमधल्या एका साउथ इंडियन मुलीच्या सुजाताच्या प्रेमात पडला. दोघेही एकाच कंपनीत एकाच प्रोजेक्टवर काम करत होते. त्यामुळे दोघांचे रोज बोलणे होत होते. सहवासामुळे स्वभाव ही समजला होता. तिच्या घरचे तिच्यासाठी स्थळ बघणार आहेत म्हंटल्यावर तिनेच पुढाकार घेऊन निरंजनला विचारले. निरंजन विचारात पडला. लग्न तर त्याला सुद्धा करायचे होते. “एकवेळ पप्पा “हो” म्हणतील पण मम्मी नकार देणार आहे” असे त्याचे मन त्याला सांगत होते. काय करावे काय नाही या विचारात आठवडा निघून गेला. त्या मुलीने म्हणजे सुजाताने निरंजनशी बोलणे बंद केले. त्यादिवशी धाडस करून त्याने तिला सांगितले, “मुझे भी तुम अच्छी लगती हो, लेकिन मै थोडा सोच रहा था। मेरी तरफ से “हा” है।”
“क्या तुम्हारे परिवारवाले मान जाएंगे?” तिने विचारले.
“यही तो मै सोच रहा था। लेकीन मै उन्हे मना लुंगा। क्या तुम्हारे घर में सब राजी है? निरंजनने विचारले.
“मैने अभी उन्हे बताया नहीं। उन्हे कोई दिक्कत नही होगी। वो “ हा” ही कहेंगे।” सुजाता म्हणाली.
“तो तुम कुछ दिन और रूक जाओ, मै दो महिने बाद घर जा रहा हूॅं, तब मै बात करूंगा।” निरंजन म्हणाला.

ठरल्याप्रमाणे निरंजन दोन महिन्यांनी घरी आला. तेव्हाच नचिकेत आणि निशाही घरी आलेले होते. सर्वात आधी त्याने नचिकेत आणि निशाला सांगितले. त्या दोघांना खूप आनंद झाला. पण त्यांना सुद्धा मम्मीबद्दल खात्री वाटत नव्हती.
“मम्मीशी कसं आणि काय बोलायचे तू विचार कर.” नचिकेत म्हणाला.
“का रे, तू नाही मला मदत करणार? माझ्या पाठीशी नाही उभा राहणार?” निरंजन म्हणाला.
“आम्ही दोघेही कायम तुझ्याबरोबर असू. तो प्रश्न नाहीये. पण…” नचिकेत बोलताना थांबला. निरंजनने “काय” विचारल्यावर नचिकेत म्हणाला, “संध्याकाळी आज जेवायला बाहेर जाऊ. तसही निशा आईकडे जाणार आहे.”
संध्याकाळी जेवायला गेल्यावर नचिकेतने मम्मी कशी बोलली, कशी वागली हे सगळे निरंजनला सांगितले व म्हणाला “तू इथे नव्हतास त्यामुळे तुला माहिती नाही. पण आपली आई अशी वागेल असे कधीच वाटले नव्हते. ती धड आम्हांला वेगळे ही राहू देईना आणि घरातही सुखाने राहू देत नव्हती. माझे घर सुद्धा तयार होते. ती स्वतः अनिरुद्धला साभांळायला तयार नव्हती आणि तिने त्याला पाळणाघरात सुद्धा ठेवू दिले नाही. निशाला मात्र तिच्या करिअरशी काॅंप्रोमाईज करावे लागले. तिने नोकरी सोडली, पण तिची महत्वाकांक्षा होती,”स्वतःच्या पायावर उभे रहायची” आणि “कुणावरही अवलंबून रहायचे नाही, कुणा पुढेही हात पसरायचा नाही.” असे ती कायम म्हणते. म्हणून मी बाहेर जाॅब बघितला. नाहीतर मला मम्मी पप्पांना सोडून जायची इच्छा नव्हती. मुलांच्या आया त्यांची लग्न झाली की बदलतात असे म्हणतात. ते अगदीच खरे करून दाखवले मम्मीने.”
“म्हणजे मला तर काहीच होप्स ठेवता येणार नाहीत. सुजाता खूप चांगली आहे, आणि तिचे आईवडील खूप साधे आणि कमी शिकले आहेत. तिच्या आप्पांनी थोडे तरी हिंदी इंग्रजी समजते बोलता येते, पण आम्मांना मात्र फक्त तेलगू येते. मम्मी काय करणार ते माहिती नाही, पण मला सुजाताशीच लग्न करायचे आहे. आणि मी करणार आहे.” निरंजन म्हणाला.
“ऑल द बेस्ट. तू असं का नाही करत. लग्न तिकडेच कर म्हणजे तिथले कार्ड मिळायला ही तुला सोपे जाईल.” नचिकेत म्हणाला.
दुसऱ्या दिवशी निरंजनने पप्पा आणि मम्मींना एकदमच सुजाता विषयी सांगितले.
“नो प्राॅब्लेम, तुला मुलगी आवडली आहे ना, मग…” पप्पांना बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच मम्मी ओरडल्या “अजिबात चालणार नाही. तुला महाराष्ट्रीयन मुलीशीच लग्न करावे लागेल. जर तुला नसेल करायचे तर तू तसाच रहा लग्न न करता.” मम्मी ठासून म्हणाल्या.
“तू काहीही म्हणालीस तरी मी तिच्याशीच लग्न करणार आहे. तू तिच्या विषयी काही विचारले नाही, काही जाणून घेतले नाही आणि उगीचच नाही म्हणते आहेस. हे मला पटत नाहीये. ” निरंजन म्हणाला.
“मग तुला आमच्याशी संबंध तोडायला लागतील.” मम्मी ताडकन म्हणाल्यावर पप्पा जरा जोरात बोलले, “काय उगीच नकारासाठी नकार देतेस, त्याला पसंत आहे ना मुलगी, मग झाले तर!”
“तुम्हांला काही समजत नाही. तुम्ही शांत रहा. नचीने केले त्याच्या म्हणण्यासारखे, आता हा पण. मग म्हातारपणी आपण कोणाच्या तोंडाकडे बघायचे. निशाच्या मुळे नची आपल्यापासून दूर गेला. हा आधी लांबच आहे, मनाने ही दूर जाईल. ” मम्मी तेवढ्याच मोठ्या आवाजात बोलल्या.
“मम्मी तू ना खरचं इंपाॅसिबल आहेस. “नची म्हणाला. तो आणि निरंजन दोघेही तिथून उठून निघून गेले. नशीब निशा अजून तिच्या आकडे होती.

क्रमशः

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज


🎭 Series Post

View all