Login

ललाटलेख भाग ३१ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे
ललाटलेख

ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.

भाग ३१


दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पप्पा निशा नायर हाॅस्पिटलला हर्षला घेऊन गेले. निशाचे बाबाही आले होते. तिथल्या स्पेशालिस्ट डॉ. द्विवेदी यांना भेटले. आणि त्याची ट्रिटमेंट सुरू झाली. आठवड्यातून एकदा त्याला नायर हाॅस्पिटलला घेऊन जावे लागत होते. दोन महिने अशी ट्रिटमेंट झाल्यानंतर “थोडे दिवस मधे ब्रेक घेऊया.” असे डाॅक्टरांनी सांगितले. त्यांनी औषधे लिहून दिली. त्याचवेळी नचिकेत आणि अनिरुद्ध आठ दिवसांसाठी भारतात आले. निशा अनिरुद्धला मिठी मारून खूप रडली. अनिरुद्ध मात्र हर्षला बघून खूप खूश झाला होता. नचिकेत जाऊन डॉ.मुतालिक आणि डॉ. द्विवेदी दोघांना भेटून आला. डॉ. द्विवेदीनी मात्र नचिकेतला अंधारात ठेवले नाही. निशा आणि इतरांना ते सांगू शकले नव्हते ते त्यांनी नचिकेतला सांगितले, “आपण उपचार करत राहू, पण… पण फक्त तेवढेच आपल्या हातात आहे.’ नचिकेत जे काही समजायचे ते समजला. एक दिवस बोलता बोलता नचिकेत निशाला म्हणाला. “हे बघ निश् तू काही काळजी करू नकोस. तू फक्त हर्षच्या ट्रिटमेंटकडे लक्ष दे. अनिरुद्ध आणि पैशांची काळजी करू नकोस. मी पैसे पाठवतो. तू त्याच्या ट्रिटमेंटचे व्यवस्थित बघ.” आठ दिवस हा हा म्हणता निघून गेले. नचिकेत आणि अनिरुद्ध परत गेले. कंहर्षला घेऊन निशाला सारखे दवाखान्यात जावे लागे. सकाळी लवकर गेले की ती काहीतरी खाऊन जाई, पण ते दिवसभर पुरत नसे. दुपारी जेवायच्या वेळी तिला भूक लागायची. एकदा ती मम्मीना म्हणाली, “ आपण स्वयंपाकाच्या मावशींना सकाळी लवकर बोलवू या का? म्हणजे मला जेवणाचा डबा घेऊन जाता येईल.”
“ते जमणार नाही. आम्ही काही रोज गार खाणार नाही. तुझे तू काय ते बघून घे.” मम्मी म्हणाल्या खरतरं तेव्हाच आपण सरळ आई बाबांकडे निघून जावे असे निशाच्या मनात आले. पण ती शांत राहिली. असेच दिवस जात होते. कधी आईबाबा, कधी संदेश ईशा त्यांच्या मुलीला घेऊन निशाला आणि हर्षला भेटायला येत होते.
एकदा संदेश ईशा आणि त्याची मुलगी संचिता हर्षला भेटायला आले होते. निशा जवळपास नाही असे बघून मम्मी ईशा संदेशला म्हणाल्या, “इतक्या लहान मुलीला घेऊन नको येत जाऊ इथे. तिला काही झाले तर.” ईशाला खूप राग आला ती फाडकन म्हणाली, “ हा काही संसर्गजन्य रोग नाही. आणि भिती आपल्या मनात जास्त असते. संचिता बघा हर्ष बरोबर किती छान खेळते आहे.” ती हे बोलत असतानाच निशा आली आणि म्हणाली, “हे आपल्याला समजते ईशा पण सगळ्यांनाच समजेल असे नाही. सोडून दे.”

हर्ष दिवस जातील तसा जास्त जास्त खराब होत होता. बाकीच्या शरीराच्या मानाने त्याचे पोट मात्र मोठे दिसत होते.. ती त्याला दवाखान्यात घेऊन निघाली होती तेवढ्यात मम्मी तिला म्हणाल्या, “ कशाला आता. त्याला काय झालयं आणि काय होणार आहे हे ही तुला माहिती आहे.” हे ऐकून निशाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. “नचिकेत मला जाताना सांगून गेला आहे, “तू त्याची ट्रिटमेंट बघ. पैशाची काळजी करू नको.” एवढेच बोलून ती घरातून बाहेर पडली. पण दवाखान्यात जाऊन खूप रडली. तिच्या सोबती साठी आलेल्या बाबांना म्हणाली, “आता मरणारच आहे म्हणून कुणी आपल्या माणसाची ट्रिटमेंट बंद करत का? त्यांचे तोंड ही परत बघावेसे वाटत नाहीये मला.” बाबांनी तिला शांत केले. म्हणाले ”चल येतेस का घरी, पण ते ही होणार नाही तुला. शिवाय हर्षची ट्रिटमेंट सुद्धा इथेच सुरू आहे.”

दहा बारा दिवस कसेबसे गेले असतील. हर्षची तब्येत जास्त बिघडली. त्याला दवाखान्यात एडमिट करावे लागले. निशाने आईबाबांना बोलावून घेतले. संध्याकाळी नचिकेत आणि अनिरुद्ध अचानक आले. जणू त्यांच्याच येण्याची वाट बघत हर्ष थांबला होता.. ते दोघे आले, दोघांनी त्यांना जवळ घेतले. हर्ष दोघांकडे बघून हसला. दोघांना खूप बरे वाटले. काही वेळातच हर्ष ने या जगाचा निरोप घेतला. दोन वर्षाच्या लहान बाळाचे सुतक असे किती असणार. आठ दिवसांनी नचिकेत आणि अनिरुद्ध बरोबर परत निशा गेली. “येताना हर्ष बरोबर होता, आता फक्त त्याच्या आठवणी.” परत जाताना कंटंनिशाच्या मनात आणि डोळ्यात सतत पाणी होते. तिकडे पोचल्यावर तिने नचिकेतला स्पष्ट सांगितले, “यापुढे मी त्या घरी कधीही येणार नाही. आणि जमले तर भारतात ही कायमचे येणार नाही.” तिच्याकडून मम्मी च्या सगळ्या वल्गना ऐकल्यानंतर नचिकेतच्या मनात ही मम्मी विषयी काहीच आदर उरला नाही. निशाची मानसिक अवस्था बिघडायला मम्मीचे वागणे हे ही एक कारण आहे हे सुद्धा नचिकेतच्या लक्षात आले. अनिरुद्ध आणि नचिकेत दोघांनी मिळून हळूहळू निशाला आनंदी ठेवायला सुरुवात केली. निशाच्या मागे लागून नचिकेतने तिला नोकरी शोधायला लावली. अनिरुद्धच्या शाळेच्या वेळेत निशा काम करु लागली. आणि हळूहळू कामात रमली. पण एकटी असली की तिला हर्षची आठवण येई आणि तिचे मन सैरभैर होई. “कुठलेही दुःख फक्त आपल्याच वाट्याला का?” हा माणसाला पडलेला प्रश्न, पण त्याचे उत्तर त्याला मिळते की नाही हे मात्र समजत नाही.”

क्रमशः
©️®️ सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज


🎭 Series Post

View all