Login

ललाटलेख भाग ३२ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे
ललाटलेख

ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.

भाग ३२

निशाच्या हर्षच्या आजारपणात सगळेजण इतके गुंतले होते, की कुणाचे ईशाकडे फारसे लक्ष नव्हते. अर्थात ती काही फार प्राॅब्लेममध्ये नव्हती, पण कुरबुरी चालू होत्या. संचिताच्या जन्मानंतर तिने तीन महिने पगारी रजा घेतली होती. पण तिला संचिता साठी चांगले पाळणाघर मिळाले नाही. तिने आणखी तीन महिने बिनपगारी रजा काढली. पण तरीही तिला हवे तसे पाळणाघर मिळाले नाही. शेवटी तिलाही नोकरी सोडावी लागली. पण तिने घरात स्वतःची फर्म सुरू करून कामे घ्यायला सुरुवात केली. त्यात तिचा चांगला जम बसला. तिने हाताखाली दोघी मुली कामाला ठेवल्या. शनिवारी रविवारी मात्र ती सुट्टी घेत होती. रविवारी संदेश संचिताला घेऊन आईकडे जाण्यासाठी हट्ट करत असे. मग दर रविवारी तिघे तिकडे जात. एखाद्या शनिवारी ईशा आणि संचिता आई बाबांकडे जात. संचिता हळूहळू मोठी होत होती. तिची शाळा सुरू झाली. मग ईशाला एकच दिवस घराकडे बघायला, घरातील कामे करायला मिळत असे. म्हणून तिचे संदेश बरोबर जाणे कमी झाले. एकदा संदेश संचिताला घेऊन एकटाच आईकडे गेला होता. संचिता पहिली दुसरीतच होती. रात्री घरी आल्यानंतर ईशा नेहमीप्रमाणे संचिताला जवळ घेऊन झोपवत होती. ईशाने प्रेमाने तिचा पापा घेतला. लहानच ती, पटकन म्हणाली, “ममा, अग अशा नाही घेत पापा, अशा घेतात” असे म्हणून संचिताने आईच्या ओठांवर ओठ ठेवले आणि तिला पापा अशा घेतात हे सांगितले. ईशा आतपासून हादरली. म्हणाली, “नाही पिलू. असा पापा कुणालाही द्यायचा नाही आणि घ्यायचा ही नाही. आणि छोट्या मुलांनी तर नाहीच नाही. आपल्या ओठांवर तोंडात जंतू असतात की नाही, ते एकमेकांच्या तोंडात जातात. पण तुला कुणी सांगितले असे?”
“अग आयाआजीच्या शेजारी तो बंड्या काका राहतो ना, त्याने माझी अशीच पापी घेतली आज.” संचिता म्हणाली. ईशाच्या अंगाची लाहीलाही झाली. पण तिने रागावर काबू ठेवून संचिताला समजावून सांगितले.
“पिलू, हे बघ आई बाबा नाना नानी, आयाआजी सोडून इतर कोणालाही पापी घेऊ द्यायची नाही. आणि आपल्या अंगाला ही कुणाला हात लावून द्यायचा नाही. समजलं ना?” संचिता झोपल्यावर तिने सगळे संदेशला सांगितले आणि त्याच्यावर ओरडत त्याला म्हणाली, “संदेश अरे तू लक्ष नको का द्यायला तिच्याकडे? असे कोणी लहान मुलीला शिकवू शकते.”
“अग मी आयासाठी किराणामाल आणायला गेलो होतो. नाहीतर ती माझ्या किंवा आया जवळच असते. पण थांब आता बघतोच त्या बंड्याकडे.” संदेश म्हणाला.
ईशा मात्र रात्री तोच विचार करत होती. “आपले बाबा आपल्याला कुठे सोडायचे नाहीत, आपल्यावर इतकी बंधने घालायचे, ते खरोखरच किती योग्य होत. मुलगी दिसली की तिचा वापर करायचा एवढेच फक्त ह्या नराधमांना दिसते.” विचार करता करता पहाटे कधीतरी तिला झोप लागली. पुढच्या रविवारपासून संचिताला संदेश बरोबर एकटीला पाठवणे तिने बंद केले. जेव्हा जमेल तेव्हा संदेश बरोबर ईशाही आयांकडे जाऊ लागली.
संचिता शाळेत जायला लागल्यापासून ईशा थोडी आणखीन जास्त कामे घेऊ लागली. ईशा कडे कामासाठी येणाऱ्या मुलींना बसायला ही जागा अडचणीची वाटू लागली. संदेश आणि तिला चार खोल्यांच्या घराची आवश्यकता भासू लागली. संदेश म्हणत होता. “ईशा मला वाटते भाडे भरत बसण्यापेक्षा फ्लॅट विकत घेऊ. बॅंकेकडून लोन घेऊन लोनचे हप्ते भरू.”
“हो, बरोबर आहे तुझे, पण लोनचे हप्ता आणि घराचे भाडे दोन्ही एकदम कसे जमेल?” ईशाला त्याची काळजी वाटत होती.
“हं. पण कमीतकमी पाच सहा महिने तरी आपल्याला असे करावे लागेल. आणि मला वाटतं हप्ता ही आपल्याला थोडा जास्त पडेल. पण हरकत नाही. मी करतो काहीतरी. तू फक्त फ्लॅट बघ.”संदेश म्हणाला.
“मला काय वाटते, आता फ्लॅट बघताना आपण आयाच्या घराला संचिताच्या शाळेला जवळ पडेल असा बघू. तुला आईकडे जायला जवळ पडेल आणि पिलूला शाळेत सोडणे मला सोपे होईल. म्हणजे दोन्ही दृष्टीने सोईचे होईल.” ईशा म्हणाली ते संदेशला पटले आणि दोघांनी त्याप्रमाणे फ्लॅट बघायला सुरुवात केली. संचिताची शाळा आणि आईचे घर याच्या मध्यावर फ्लॅट घेतला. सुदैवाने तो मिळाला. आणि दोघानाही खूप आनंद झाला. भाजी मार्केट आणि रेल्वे स्थानक ही या घरापासून बरेचसे जवळ होते. शिवाय संचिताचा बालरोगतज्ज्ञ कोठावळेंचा दवाखाना सुद्धा पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर होता. सहा ते आठ महिन्यात त्या घराचा ताबा ही मिळाला आणि तिघे तिकडे रहायला सुद्धा गेले. पण तेव्हा कुठे ईशाला माहिती होते की या फ्लॅटवर आपल्याला जास्तीतजास्त वेळ एकटीला रहावे लागणार आहे.

क्रमशः
©️®️सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज


🎭 Series Post

View all