Login

ललाटलेख भाग ३३ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे
ललाटलेख

ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.

भाग ३३

संचिता, ईशा आणि संदेश तिघेजण नवीन घरात रहायला गेले. नवीन घर लागेपर्यंत आणि तिथे रूळेपर्यंत दीड दोन महीने सहज निघून गेले. ईशा आणि संदेशचे रुटीन अगदी छान सुरू झाले. ईशाला थोडा जास्त वेळ मिळू लागला. संचिताची शाळा जवळ आल्यामुळे तिलाही दहा पंधरा मिनीटे जास्त मिळू लागली. नवीन घर आणि नव्याची नवलाई मात्र फार दिवस टिकली नाही. संदेशची आई म्हणजे आया घरातल्या घरातच पाय घसरून पडल्या. पण मार एवढ्या जोरात लागला होता, त्या पूर्णपणे हंथरूणाला खिळल्या. ऑपरेशन करून लवकर बरे वाटले असते, पण त्या ऑपरेशनसाठी त्या तयार नव्हत्या. “आविष्यात कधी सुई बी टोचून घेतली नाय, म्या नाही करून घेणार आपरेसन.” त्यांनी स्पष्ट सांगितले. संदेशनी त्या दिवसापासून आयासाठी दिवसरात्र एक बाई कामाला ठेवली. पहिला आठवडाभर दिवसभर ईशा आणि रात्री संदेश थांबत होता. औषध उपचार सगळे व्यवस्थित चालू होते. पंधरा दिवसातून एकदा संदेश डाॅक्टरांकडे स्वतः संदेश घेऊन जात होता. हळूहळू दुखणे कमी झाले. पाय हलवताना त्रास कमी होऊ लागला. पाय दुमडता ही येऊ लागला. आता ईशाला तिच्या कामाकडे आणि संचिताच्या अभ्यासाकडे लक्ष देणे ही आवश्यक होते. हळूहळू दिवसभरात चार तास, दोन तास असे करत ईशाचे जाणे कमी झाले. पण संदेशला मात्र तसे करता येत नव्हते. पाचसहा महिन्यांनी आयाला जागेवर उठून बसता येऊ लागले. पण पाय टाकणे जमत नव्हते. तोपर्यंत तिच्यासाठी दिवसरात्र ठेवलेल्या बाईने अचानक काम सोडले. मोठ्या मुश्किलीने सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत एक बाई मिळाली, पण रात्रीची बाई काही मिळाली नाही. त्यामुळे संदेशला आया बरोबर रहावे लागत होते. ईशाने आणि संदेशने आयाला नवीन घरी रहायला येण्यासाठी खूप आग्रह केला पण त्या काही केल्या तयार झाल्या नाहीत. आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारात जाऊन मधेमधे ढवळाढवळ करणे त्यांना पटत नव्हते. ईशाचे आईबा तीनचार वेळा येऊन त्यांना बघून गेले. त्यांनीही आयांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. असेच दिवस पुढे पुढे सरकत होते. ईशा दिवसभर तिचे काम आणि संचिता ह्यामध्ये बिझी असायची. पण रात्री तिला एकटेपणा खूप जाणवायचा. संचिता दमून गादीवर पडल्या पडल्या झोपायची. ईशाची मात्र अर्धी रात्र विचार करण्यात जायची. नंतर नंतर संदेश फक्त शनिवारी घरी यायचा, येताना बहुतेक वेळा ड्रिंक घेऊनच यायचा. आणि आल्या आल्या झोपून जायचा. खरतरं ड्रिंक घेऊन यायचा म्हणूनच घरी यायचा. सकाळी सकाळी नाष्टा करून परत आयाकडे जायचा. ह्या सगळ्याचा हळूहळू ईशाच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला.
जरी संदेश घरी येत नसला तरी तो त्याची कर्तव्य मात्र नीट पार पाडत होता. बॅंकेचे हप्ते वेळच्या वेळी भरत होता. संचिताच्या शाळेच्या फी, इतर काही खर्च पण करत होता. फक्त घरखर्च तेवढा ईशाला मॅनेज करावे लागत होता. ईशा सगळी घरची जबाबदारी पेलत होती. संचिता ला शाळेत सोडणे, आणणे, तिचा अभ्यास, तिच्या अदर एक्टीव्हिटीज सारे बघत होती. पण हे सगळे करताना संदेशची साथ तिला अपेक्षित होती. पण त्याचा ही नाईलाज होता. आयाची जबाबदारी घेणारे दुसरे कोणी नव्हते.

संचिता आठवीत गेली. तिचा अभ्यास वाढला. आणि इकडे ईशाच्या आईची तब्येत बिघडायला सुरूवात झाली. ईशाचे दोन तीन आठवडे आईच्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात गेले. बाबा बरोबर येत होते, तरी जास्त धावपळ त्यांनाही जमत नव्हती. आईला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर तिने निशाला फोन केला. ऑपरेशनची तारीख ठरली त्याच्याआधी दोन दिवस निशा हजर झाली. आणि आईचा पूर्ण चार्ज घेतला. ऑपरेशनच्या वेळी ईशा दवाखान्यात हजर होती. जवळ जवळ तीन तास ऑपरेशन चालू होते. तेवढा वेळ ईशा आणि निशाला बोलायला मिळाला. सगळी हकीकत सांगितल्यावर ईशा म्हणाली, “त्याची जबाबदारी तो टाळत नाही, पण त्याचे असणे, त्याच्या सहवास मिळावा अशी अपेक्षा मी आणि ईशाने करणे चुकीचे आहे का?”
“हं. बरोबर आहे तुझे. पण थोडासा त्याच्या बाजूने विचार कर. अतिशय कष्टाने त्यांना त्यांच्या आईने वाढवले आहे. त्यात संदेशला कायम आईपासून दूर रहावे लागले. मग त्याला आई बद्दल वाटणारच ना? आणि त्याचे कर्तव्य करतो आहे तो. जातील हे ही दिवस. रात्री नंतर दिवस येतो, तसे दुःखानंतर सुख येतेच. तुमच्या दोघांचेही बरोबर आहे. पण गैरसमजातून हे अंतर वाढू देऊ नकोस. काळजी नको करू, काळजी घे. ” निशाने ईशाला समजावले. निशा महिनाभर रहाणार होती. यावेळी ती पूर्णपणे आईजवळ राहिली. आईच्या बरोबर ट्रिटमेंटला जाणे, तिची काळजी घेणे सगळे करत होती. जाताना तिने बाबांना समजावून सांगितले आणि धीर ही दिला. म्हणाली, “बाबा, काळजी करू नका. आईला पूर्ण बरे वाटेल. तिची काळजी घ्या, पण तुमची काळजी तुमचे प्रेम तिचा जीव गुदमरवून टाकणार नाही हे पण बघा. मी शक्यतो दर महिन्याला येईन. पण एखादे वेळी नाही जमले तरी ईशा आहेच. मला खात्री आहे ईशा सगळे व्यवस्थित करेल. पण तिचीही अडचण समजून घ्या. ती बिचारी पण एकटी पडली आहे.” एवढे सांगितले तरी बाबांच्यात काही फरक होईल ही अपेक्षा मात्र निशाला नव्हतीच.

क्रमशः

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all