Login

ललाटलेख भाग ३५ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे
ललाटलेख

ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.

भाग ३५


निशा भारतात पोचली तेव्हा आईची तब्येत जास्तच बिघडली होती. तिला दवाखान्यात एडमिट केले होते. ती शुद्धीवर ही नव्हती. तीन दिवस निशा दिवसरात्र आईजवळ बसून होती. तिच्या अनेक गोष्टी निशाला आठवत होत्या. “लहानपणापासून तिने शिस्तीत वागवले, वाढवले म्हणूनच आज आपण इतक्या समस्या येऊनही खंबीरपणे उभ्या आहोत. आज आपण तिची सेवा करायची भाषा करतो आहोत, पण तिने तरीही कसलीही अपेक्षा न करता आपल्यासाठी किती आणि काय काय केले. आई करतच असते आपल्या बाळासाठी, आणि ते मनापासून प्रेमाने निरपेक्ष भावनेने. पण बाळांना ते समजत नाही. मुले करतात का अस? प्रेमाने किती जण करत असतील? आपण जे आहोत ते तिच्यामुळे आहोत. तिनेच तर घडवले आपल्याला.” बाबांनी तिला देखील कुठे तिच्या मनात वागू दिले नाही. पण तिने कधीच त्यांच्याविषयी तक्रार केली नाही. बाबांचे तिच्यावर कितीही प्रेम असले तरी त्यांनी तिला कायम स्वतःच्या आज्ञेत रहायला लावले.” अशा अनेक विचारांनी निशाचे मन विष्षण्ण झाले होते. चौथ्या दिवशीची सकाळ आईने पाहिली नाही. निशा आणि ईशा दोघी बहिणीच, मग दिवस, विधी कुणी करायचे हा प्रश्न होता. नचिकेत आला आणि त्यानी सगळी जबाबदारी घेतली. संदेशच्या आयाची तब्येत ईशाच्या आईची बातमी ऐकून बिघडली. त्यांना दवाखान्यात एडमिट करावे लागले. त्यामुळे संदेश दिवसकार्यालाही येऊ शकला नाही. ईशाला खूप वाईट वाटत होते. पण तिची अवस्था त्रिशंकू सारखी झाली होती. आईचे दिवस संपतात तोच संदेशची आया ही त्याला सोडून गेली. ईशाला आणखी एक धक्का बसला. संदेश तर पूर्ण खचून गेला. त्यात संचिताची दहावी. ईशाची अक्षरशः तारेवरची कसरत सुरू होती. नचिकेत परत गेला तरी निशा बाबांजवळ अजून आठ दिवस थांबली. खरतरं निशा बाबांना आपल्या बरोबर घेऊन जाणार होती. पण ऐकतील ते बाबा कुठले? त्यांनी जायला स्पष्ट नकार दिला. “मी कुठेही जाणार नाही. मी माझ्याच घरी रहाणार.” आणि म्हटल्याप्रमाणे बाबा त्यांच्या घरीच राहिले. निशा एकटीच परत गेली. तो पर्यंत नचिकेतने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेही त्याची खूप वर्ष नोकरी झाली होती. आणि पुरेसा पैसा त्याने मिळवला होता. भारतात त्याची दोन घरे ही झाली होती.
“हे सगळं खरे असले तरी, तू नोकरी सोडून शकतोस. मी नाही. मी नाही इतक्यात नोकरी सोडणार.” निशा म्हणाली. नचिकेतला तिची चेष्टा करायची इच्छा झाली. तो म्हणाला, “रहा मग एकटी. मी जाणार परत.” हे ऐकल्यावर निशा रडायला लागली.
“ जा, तू पण जा मला सोडून. राहीन मी एकटी.” नचिकेतने तिला मिठीत घेऊन तिचे डोळे पुसले. “वेडाबाई असा कसा जाईन मी तुला सोडून, मी इथेच रहाणार आहे तुला त्रास द्यायला.” असे म्हणत नचिकेत हसतो.
“मग असे का म्हणालास?” निशा.
“अग जरा गंमत केली तुझी. बरं ऐक, माझा भारतातला मित्र आहे ना, विराट तो आणि मी आम्ही दोघे मिळून एक हाॅटेल सुरू करणार आहे गोव्यात किंवा महाबळेश्वरला. सध्या तो जागा बघतो आहे. पण थोडे दिवसांनी मलाही सारखे तिकडे जावे लागेल. म्हणून हा निर्णय घेतला. तसे पण तुझी नोकरी चालू आहे आणि तुझी सख्खी मैत्रीण पण आहेच इथे. त्यामुळे मला काही काळजी नाही.” नचिकेतने निशाला सगळे नीट सांगितले.
निशा त्यांच्या रूममध्ये गेली, तिला भरपूर पुस्तक दिसली, त्यातली एक दोन पुस्तके तिनी पाहिली तर व. पु. काळेंची होती. तिला आश्चर्य वाटले, ती नचीला म्हणाली, “इतकी पुस्तके, त्यात जास्त वपुंची दिसतायेत.”
“व.पुं.चा फॅन आहे मी. मम्मी विकून टाकायला निघाली होती, म्हणून इकडेच आणली.”नचिकेत म्हणाला.
“म्हणजे ऑफिसमध्ये चिठ्ठ्या पण तूच ठेवत होतास ना!” निशाने त्याच्या पाठीत गंमतीने गुद्धा घातला, आणि दोघेही हास्य विनोदात रमले.

संदेश आयाच्या जाण्यानंतर खूप सावरला. एक दिवस तो ईशाला म्हणाला, “आता मला खूप हलके वाटतं आहे. मधल्या काही काळात अक्षरशः मन इकडे आणि शरीर तिकडे असे जगत होतो मी. मला तुम्हा दोघींना एकटे सोडून तिकडे रहाव लागत होते आणि मी आयाला अशा अवस्थेत सोडून मी इथेही राहू शकत नव्हतो. आता खरचं हलके वाटते आहे.”
अशाही त्याच्या केसातील हात फिरवत त्याला हुंकार भरत होती. ईशा आणि संदेश दोघांचेही लक्ष फक्त संचितावर होते. तिचा अभ्यास आणि तिच्या क्लासच्या वेळा, शाळेची वेळ आणि तिचे खाणे पिणे. संचिता दहावी बोर्डाच्या परीक्षेत बोर्डात पहिली आली. ईशा आणि संदेशचा जीव भांड्यात पडला. त्या दोघांना वाटतं तिने सायन्स घेऊन मेडीकलला जावे, पण संचिताचा अजिबात इच्छा नव्हती. तिने सी. ए. किंवा सी. एस. आणि एमबीए करायचे ठरवले होते. तशी तिने काॅमर्सला एडमिशन घेतली. ईशा आणि संदेशनेही तिच्यावर कोणती जबरदस्ती केली नाही.

नचिकेतचे भारतात येणे होत होते. तेव्हा तो मम्मीला भेटून त्याची खुशाली बघून येत होता. मम्मीच्या बारीकसारीक तक्रारी सुरू झाल्या होत्या. नचिकेत परत मम्मीला घेऊन तिकडे गेला. मम्मीला बघताच निशाच्या डोक्याची शीर तटतटू लागली. तिला मागचे सगळे आठवू लागले.


क्रमशः

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

0

🎭 Series Post

View all