Login

ललाटलेख भाग ३६ अंतिम भाग (सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे
ललाटलेख

ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.

भाग ३६

नचिकेत मम्मीला घेऊन गेला. पण निशाची डोकेदुखी वाढली. तिने कितीही नीट निगुतीने केले तरी मम्मीला ते पटत नव्हते. ती काहीतरी काढून निशाला बोलत होती. “वय झाले आहे” म्हणून निशा गप्प बसत होती. शेवटी निशाने त्यांचे काही करणे सोडून दिले. जे ती तिच्यासाठी आणि नचीसाठी बनवत होती, तेच ती त्यांना वाढू लागली. मग तर त्यांनी जास्तच दंगा सुरू केला. निशाने त्यांच्याशी बोलणे केव्हाच सोडले होते. नचिकेतने त्यांना सांगितले, “मम्मी तुला जे हव ते हवे तसे तुझी तू करून खात जा.”
“त्यापेक्षा मला माझ्या घरी नेऊन सोड. मी माझे मी सगळे बघेन.” मम्मी ताडकन म्हणाल्या.
‘सोडतो पण तिथे तुझ्याकडे कोण बघणार? शिवाय “दोन मुले असूनही एकही माझ्याकडे नीट बघत नाही.” असे लोकांना सांगायला पण तू कमी करणार नाहीस. म्हणून तुला इकडे घेऊन आलो. हे बघ, मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. निशाही नाही. पण तरीही तुला इथे रहायचे नसेल तर तुला घरी पोचवतो.” नचिकेत मम्मीला म्हणाला.
पंधरा दिवसांनी मम्मीचे तिकीट मिळाले आणि नचिकेत मम्मीला तिच्या घरी सोडून आला. नचिकेतने सगळे निरंजनला कळवले. निरंजन म्हणाला, “माझ्याकडे तर ती दोन दिवस सुद्धा रहाणार नाही. माझ्या मुलींना आणि सुजाताला तिने कायमच पाण्यात पाहिले. तरीही त्या ती इकडे आले तरी तिचे सगळे व्यवस्थित करतील. पण हिने त्यांच्याशी जमवून घ्यायला हवे ना.” म्हणजे आता मम्मी कुठे जाणार नाही. ती मुंबईत रहाणार आणि सारखी मला फोन करत रहाणार. नचिकेतच्या समोर मोठा प्रश्न होता. त्याचे महाबळेश्वरचे हाॅटेल सुरू झाले होते. त्यामुळे सारखे त्याला भारतात यावे लागत नव्हते. निशाचे ऑफिस व्यवस्थित सुरू होते. तिचा वेळ तिच्या कामात व्यवस्थित जात होता. निशा नचिकेतच्या मागे लागली होती की त्याने अनिरुद्ध बरोबर त्याच्या लग्नाविषयी बोलावे. पण नचिकेत बोलत नव्हता शेवटी निशा स्वतः अनिरुद्धशी बोलली, पण त्याने स्पष्ट सांगितले, “मी नाही बाबा लग्न करणार. एकतर इथे कुठल्याही राई एवढ्या छोट्या कारणावरून सुद्धा घटस्फोट होतात. आणि ते मुलींचे नखरे कोण सहन करणार? आई माझ्या तू अजिबात मागे लागू नकोस. मी लग्न करणार नाही हे फायनल आहे.” नचिकेत सुद्धा त्याची बाजू घेत म्हणाला, “हे बघ तो म्हणतो आहे त्याला लग्न करायचे नाही, मग मागे लागून काही उपयोग होणार नाही. तो मोठा आहे, त्याचा निर्णय त्याला घेऊ दे.”
ईशा आणि संदेशही आपला संसार सुखाने करत होते. संचिता आता सी. ए. ची शेवटची परीक्षा देणार होती. तिला एम. बी. ए. ही करायचे होते. तिचाही लगेच लग्न करायचा विचार नव्हता. ईशा आणि संदेशचे काम व्यवस्थित सुरू होते.
मम्मी ची तब्येत बिघडायला लागली. नचिकेत आणि निशाला कायमचे भारतात परत यावे लागले. पण येतानाच निशाने सांगितले, “मी त्यांच्या बरोबर त्या घरी रहाणार नाही. मी त्यांना सारखी भेटायला सुद्धा येणार नाही. त्यांचे काय ते तुझे तू बघायचे. मी फक्त माझे आणि तुझे बघणार.”
“हो बाई, नको बघू तू मम्मीकडे, येऊ पण नको. मम्मीकडे आणि तुझ्या बाबांकडे पण मी बघतो. मग तर झाले.” नची नाटकी स्वरात म्हणाला.
निशा हसली आणि म्हणाली, “हो बघच. मला अजून खूप काम करायचे आहे. मी तिकडे आले तरी काम घेणार आहे आणि करणार आहे.” निशा म्हणाली. आणि ती खरचं काम करत राहिली.
. … … …


दोन सख्ख्या बहिणी, पण दोघींची आयुष्य पूर्ण निराळी. दोघांची भाग्यरेषा ही निराळी. एकीच्या भाग्यात अखंड लक्ष्मीचा वास, पण अविरत संकटांची रास होती. नशिबावरचा, देवावरच्या सगळ्या वरचा विश्वास उडावा इतकी संकट होती. आणि सगळ्याशी जुळवून घेऊन ती कण खूप उभी होती.
दुसरीच्या भाग्यात लक्ष्मी सुद्धा मर्यादित आणि सुख सुद्धा मर्यादित. संकटे नेहमीचीच, पण तरीही ती पार करताना तिची दमछाक झाली. पण दरवेळी देवानेच वाचवले हा गाढ विश्वास होता.

कथा संपली, पण “ती” चे आयुष्य नाही. “ ती” अशीच संकटांचा सामना करत रहाणार आणि तरीही सुखाचा शोध घेतच रहाणार.

समाप्त

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

0

🎭 Series Post

View all