Login

देऊळ बंद

देऊळ बंद रहस्य कथा



देऊळ बंद
( रहस्य कथा )


भाग - १

" आजी ss
पुन्हा एकदा सांगशील ती गोष्ट? पण नेहमी सारखी नको...."

नातवाच्या हट्टापायी ऐशी वर्षाच्या आजी पुन्हा ती गोष्ट सांगायला तयार झाल्या. जी ऐकून तो लहानाचा मोठा झाला होता.

पण ,
दरवेळी आजी त्याला त्या गोष्टीचा काही अंशच सांगायच्या. पूर्ण गोष्ट त्याने कधी ऐकलीच नव्हती किंबहूना ते सांगायचं मुद्दाम आजीने टाळलं होतं.

आज पुन्हा त्याने हट्ट केला होता.

किमान आज तरी पूर्ण गोष्ट ऐकायला मिळेल या आशेने मंदार म्हणजे आजीचा नातू त्यांच्याकडे एकटक पाहू लागला.

अन्,
आजीच्या थर थरणाऱ्या ओठांची हालचाल हळू हळू वाढू लागली.

...

...

खूप वर्षां पूर्वीची ही गोष्ट.... 

एक गाव एका नदी किनारी वसलं होतं. त्या नदी पत्रातल्या पाण्याचा स्पर्श जणू त्या गावासाठी वरदानच होतं.

त्याच नदीपासून वीस एक पावला वर महादेवाचं भलं मोठं देऊळ होतं. त्या देऊळाच्या आवारात मुख्य भागी महादेवांचे अत्यंत प्रिय स्वारी म्हणजे नंदी विराजमान होते.

देऊळ पुरातन काळातलं असल्याने बांधकाम काळया खडकांनी केलं गेलं होतं. पाहताच क्षणी आश्चर्याने डोळे टिपतील अशी त्या देऊळाची रचना होती. 

देऊळ चारी बाजूने मजबूत काळ्या पाषाणांच्या घेऱ्यात होतं. मुख्य दारावर मधोमध बेल पत्राची आकृती आकारली होती. तर, आत पाऊल ठेवताच ओम् ध्वनी कानांना तृप्त करायची.

थोडं पुढे जाता देऊळाचा मुख्य गाभारा नजरेस पडायचा.

भाळी भस्म , एका हाती डमरू तर दुसऱ्या हाती त्रिशूळ, निळसर कंठ एकूण काय तर वैराग्य रूप अशी महादेवांची साधी पण तितकीच अलौकिक प्रतीकृती उभी होती.

असे असले तरी महादेवांच्या मुखावर असलेलं भोळं हसू पाहून तिथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं अंतर्मन सुखावून जायचं.  

जितकं देऊळ जुनं होतं तितक्याच दंत कथा त्या देउळाला घेऊन रचल्या गेल्या होत्या.

जो कुणी नदीच्या प्रवाहात स्नान करुन महादेवाचं दर्शन घेईल त्याचे दुःख दूर होतील अशी महती गावोगावी पसरली होती. 

शिवाय 
अनेक रहस्यांनी व्यापलेलं ते देऊळ साऱ्या पंचक्रोषित गाजलं होतं.

दिवसा मागे दिवस सरत होते , भक्तांची वर्दळ संपल्या संपत नव्हती. त्या गावातलेच नव्हे तर साऱ्या पंच कृषितले भक्त त्या देऊळासमोर भक्तीने नतमस्तक व्हायचे. 

त्या देऊळात ना कुणी राव होतं ना कुणी रंक सगळेच त्या महादेवाचे भक्त.... 

पण ,
एक दिवस का कुणास ठाऊक?

त्या देवळात सगळ्या गांवकरींचा प्रवेश निषेध करण्यात आला. इतकंच काय तर नदी पात्रात ही जाण्यास  सक्त मनाई करण्यात आली.

इतकंच काय तर त्या देऊळाला कुलूप लावण्यात आलं."

हे बोलताना आजीच्या आवाजाचा सुर खालच्या पट्टीत जाऊ लागला अन् त्या बोलता बोलता एकाएकी गप्प झाल्या.


...

...

" काय??"
पण का??? असं काय झालं??"

आजीचं शेवटचं वाक्य ऐकून मंदार त्या क्षणी डोक्यात मनात आहेत तेवढी सगळे प्रश्न एकाच श्वासात विचारुन मोकळा झाला.

अन् स्वतः ही विचार करु लागला.

एक क्षण त्या वाक्याच्या अवती भवती गुदमरुन शेवटी उत्तरासाठी त्याने आजीकडे पाहिले. तर आजी आधीच शून्यात हरवली होती.

आजीच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणक्षण बदलत होते,जणू ती शब्दांची उजळणी करीत होती.

असं अचानक गप्प झालेल्या आजी मंदारसाठी आश्चर्याचं कारण ठरल्या होत्या. कारण ही गोष्ट त्यांनी या आधी कधीच सांगितली नव्हती.

अन् आता सांगू पाहतायत तर त्यात ही त्यांच असं अचानक गप्प होणं कोड्यात टाकणारं होतं. म्हणूनच प्रशनार्थक नजरेने मंदार त्यांना बघू लागला.

अन् शेवटी न रहावता कुतूहलपोटी त्याने मनातली शंका बोलून दाखवली. 

" आजी sss 
सांग ना, देऊळ बंद का झालं??"

नातवाच्या प्रश्नावर आजीने एकाएकी त्याच्याकडे चमकून पाहिले. अन् पुन्हा त्या भूतकाळात जात बोलू लागल्या.  

..

..

भोग कर्म फळ ||  देऊळ अनुप ||
लाविले कुलुप|| महादेवा|| 

आजीच्या तोंडून निघालेले हे बोल काही न समजल्याने पुन्हा मंदार आजीच्या खांद्याना हलवून त्यांना भानावर आणत पुटपुटला.

" आजी ss
हे काय मध्येच?? देऊळ का बंद झालं? ते सांग ना..." 

दुरुन ऐकू येणाऱ्या मंदारच्या शब्दांचा संदर्भ लावीत आजीने पुन्हा एकदा शब्दांशी शब्द जुळवित गोष्ट सांगायला सुरुवात केली.

पण, अजूनही त्यांची नजर शून्यात होती.

..

..

" ते गाव अगदी सुखात नांदत होतं. एक नशिबाचा फेरा सोडला तर त्या गावातलं प्रत्येक घर महादेवाच्या आशीर्वादाने बहरत चाललं होतं.

अशा महादेवांची कीर्ती ऐकून त्यांच्या एका दर्शनासाठी पर गावातून ही भक्ताचं येणं जाणं त्या गावात वाढलं होतं. महादेवांच दर्शन घेऊन ही एखादी व्यक्ती रिकाम्या हाती माघारी गेलीय असं होणं शक्यच नव्हतं.

किंबहूना असे कधी झालेच नव्हते.

हळू हळू त्या गावातल्या देऊळाची महती आता एका गावातून दुसऱ्या गावात वाऱ्यागत पसरु लागली होती.

जो तो आपलं नशीब , आयुष्य पालटून टाकण्यासाठी महादेवांच्या समोर नतमस्तक व्हायचा. अन् भोळे महादेव त्यावर कृपा दृष्टी ठेवायचेच.

सगळं सुरळीत सुरु होतं.

की, 
अचानक एक दिवस  देऊळातल्या आवारात गावातले  गुरुजी मृत अवस्थेत आढळले.

( क्रमशः )

- रेखा खांडेकर स्वरा

( देऊळ बंद अन्  गुरुजी यांचं मरण यात काही साम्य असेल का??)

0

🎭 Series Post

View all