Login

देव आणि कर्म

Change In Thinking

चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५

लघुकथा

देव आणि कर्म

©® सौ.हेमा पाटील.

"मोहित कितीवेळा तुला सांगितले, की देवासमोर बसून थोडे तरी स्तोत्र पठण करत जा. कधीतरी देवपूजा करत जा. ते आपल्यासाठी गरजेचे असते." यावर मोहित म्हणाला,

"आई, मी देवापुढे उभा राहून नमस्कार करतो. या जगात देव आहे हे मी मानतो. मी नास्तिक नाही, परंतु देवपूजा करत बसायला माझ्याकडे वेळ नाही. कर्मावर माझा विश्वास आहे." आई म्हणाली,

" कर्म तर चांगले करावेच, पण सोबत भगवंताचा आशीर्वाद असणे आवश्यक असते." मोहित म्हणाला,

" हे बघ, मी देवाला नमस्कार करतो तुझ्यासमोर. देवाला समजते माझ्याकडे वेळ नाही. माझी कामे पेंडिंगला ठेवून मी देव देव करत बसलो तर ते देवाला तरी आवडेल का?" असे म्हणून मोहित बाहेर पडला.

कल्पनाताई मनाशी म्हणाल्या,
' या मुलाला कितीही सांगितले, तरी याच्यावर काहीच परिणाम होत नाही. हे भगवंता, माझ्या मुलाला माफ कर. त्याच्यावर तुझी अखंड कृपा असू देत.'

मोहित तेथून बाहेर पडला आणि त्याला एक फोन आला. फोनवर बोलत बोलतच तो गाडीकडे निघाला. त्याला संध्याकाळी घरी यायला उशीर झाला, म्हणून कल्पनाताईंनी त्याला फोन केला. त्यावर त्याने सांगितले,

" मला आज घरी यायला उशीर होईल. माझे खूप काम बाकी आहे. तुम्ही माझी वाट पाहत बसू नका, जेवून घ्या."

" ठीक आहे," असे कल्पनाताई म्हणाल्या. रात्री उशिरा साडेदहा वाजता मोहित घरी आला. आई म्हणाली,

" अरे, इतका उशीर का?"

" अगं जरा कामात अडकलो होतो, त्यामुळे उशीर झाला." असे म्हणून तो हात पाय धुवून जेवायला आला. कल्पनाताई म्हणाल्या,

" तुला नेहमी सांगत असते, पण तुला पटत नाही. थोडेतरी देवाचे करावे. आपल्या अडचणी कमी होतात." यावर मोहित म्हणाला,

" अगं आई, मला कुठलीही अडचण नव्हती. माझा तो मित्र आहे ना रोहित, त्याच्या बाबांना हार्ट अटॅक आला होता. त्यामुळे त्यांना दवाखान्यात ॲडमिट केले आहे. त्यांचे ऑपरेशन होईपर्यंत तिथे थांबणे गरजेचे होते. रोहित एकटाच होता. त्याची बहीण लग्न होऊन बेंगलोरला स्थायिक झाली आहे. तिला येईपर्यंत चार तास लागणार होते. मग रोहित आणि त्याची आई या दोघांना एकटेच सोडून कसे यायचे? म्हणून मी तिथेच थांबलो होतो. त्या दोघांना खाऊ पिऊ घातले. विनिता आणि तिचे मिस्टर बेंगलोरहून आले, तेव्हा मी घरी आलो." हे ऐकल्यावर आई म्हणाली,

" बरे केलेस बाळा. नाहीतर रोहित एकटा गांगरून गेला असता. अशा वेळी कोणीतरी सोबत असले तर आधार मिळतो." हे ऐकल्यावर मोहित हसत म्हणाला,

" तुझा मुलगा तुझ्या तालमीत तयार झाला आहे. तू आणि बाबांनी जे सुसंस्कार माझ्यावर केलेले आहेत, ते अजूनही शाबूत आहेत; आणि आयुष्यभर तसेच टिकून राहतील." हे ऐकल्यावर कल्पनाताईंना समाधान वाटले; तरीही त्यांच्या मनात कायम रुखरुख लागून राहत होती की, आपण इतके सांगूनही मोहित देवाचे काहीच करत नाही. वेळ आल्याशिवाय माणूस भक्तीमार्गाकडे वळत नाही असे मानून त्या आपले स्वतःचे समाधान करून घेत असत.

एक दिवस ऑफीसमधून आल्यानंतर मोहितने तिला सांगितले,

"आई, उद्या संध्याकाळी आपल्याला एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचे आहे. छान तयार हो, आणि बाबांना पण उद्या लवकर यायला सांग." यावर कल्पनाताईंनी विचारले,

" कुठे जायचे आहे?" मोहित म्हणाला,

" एका फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी जायचे आहे. बाकी सगळे तुला उद्या सांगतो. मला उद्याची तयारी करायची आहे. वेळ करू नका. बाबांना आठवणीने सांग. आपण संध्याकाळी सहा वाजता निघणार आहोत." हे ऐकल्यावर कल्पनाताईंनी मान डोलावली. त्यांना असे वाटले, लग्न समारंभ किंवा वाढदिवसाची पार्टी असेल. त्यांनी संतोषराव घरी आल्यावर त्यांना सांगितले,

"उद्या आपल्याला मोहितसोबत एका फंक्शनला जायचे आहे, तेव्हा उद्या लवकर घरी या." दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता कल्पनाताई आणि संतोषराव तयार होऊन बसले. मोहित घरी आला. तो सुद्धा तयार झाला, आणि सगळे मिळून बाहेर पडले.

"आता तरी सांग कुठे जायचे आहे?" यावर मोहित म्हणाला,

" थोडा वेळ थांब. आता पोहोचतोच आहोत. डोळ्याने बघ." त्याने गाडी थांबवली. तिथे बोर्ड लिहिला होता, ' दत्तराज अनाथाश्रम.'
हा बोर्ड वाचून कल्पनाताईंनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

" तू आम्हाला इथे का घेऊन आला आहेस?" तेवढ्यात समोरून चार-पाच माणसांचा घोळका त्यांच्याकडे आला, आणि त्यांना आदराने आत घेऊन गेला. आत मध्ये टेबल-खुर्च्या मांडलेल्या होत्या. त्यावर त्यांनी त्या दोघांना स्थानापन्न होण्यास सांगितले. मोहित तेथे सर्वांशी चर्चा करत होता. तेथील समारंभाचे नियोजन स्वतः डोळ्याखालून घालत होता.

खुर्च्या आणि टेबल मांडले होते, त्याच्यासमोर छोटी छोटी मुले बसली होती. अगदी दोन वर्षांपासून ते सोळा-सतरा वर्षांपर्यंतची मुले तेथे होती. कल्पनाताईंना व संतोषरावांना काहीच कळत नव्हते. थोड्यावेळाने आयोजकांनी माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली,

" आज या अनाथाश्रमाचा तिसरा वर्धापन दिन आहे. त्या दिनानिमित्त श्रीयुत संतोषराव आणि कल्पनाताई येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांचे एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया." अचानकपणे आलेल्या या प्रसंगाने दोघांनाही काही सुचेना.

तेवढ्यात मोहित तिथे स्टेजवर आला. त्याने माईक हातात घेऊन सांगितले,

" मुलांनो, आजपर्यंत तुम्ही मला नेहमी पाहत आलात. मला हे कार्य करण्यासाठी स्फूर्ती देणारे माझे भगवंत विठ्ठल रखुमाई आज तुमच्यासमोर बसले आहेत. त्यांच्या संस्कारांमुळे आज मी इथे आहे. त्यामुळे आज मी या दोघांना इथे आमंत्रित केले आहे." हे ऐकल्यावर कल्पनाताईंच्या डोळ्यांत पाणी आले.

डोळ्यातील पाणी रुमालाने हळूच टिपत त्यांनी संतोषरावांचा हात हातात घेतला. तेही सद्गदित झाले होते. 'आपला मुलगा खूप उंचीवर पोहोचला आहे. आपण समजत होतो त्यापेक्षाही तो खूप मोठा आहे. देवाचे नाव, स्तोत्रपठण केले अगर केले नाही तरी भगवंत कायम त्याच्यासोबत आहे, कारण त्याचे कर्म उत्तम आहे.' असे विचार कल्पना ताईंच्या मनात सुरू होते.

संपूर्ण कार्यक्रम पार पडत असेपर्यंत कल्पनाताई भारावलेल्या होत्या. घरी परत जात असताना त्या मोहितला म्हणाल्या,

" तू तर आज माझे डोळे उघडलेस. नुसते देव-देव करण्यात अर्थ नाही. आपले कर्म चांगले हवे, तरच देव साथ देतो. तू तुझ्या कर्मातून भगवंताला प्राप्त केले आहेस हे मला आज जाणवले." हे ऐकून मोहित गालातल्या गालात हसला.

समाप्त.

कथा आवडली तर नक्की लाईक कमेंट करा ही विनंती.
0

🎭 Series Post

View all