Login

देव माणुसकीचा भुकेला...

माऊली
माऊली माऊली माऊली माऊली l
माऊली माऊली माऊली माऊली ll
जयघोषाने आणि भक्तिभावाने अख्खी पंढरपुरी न्हाऊनी निघाली होती..


"देवा, तुम्ही त्या मुलाला नदीत बुडण्यापासून का वाचवले?" रखुमाई आपल्या कंबरेवर दोन्ही हात ठेवत विठ्ठला पुढे उभ्या होत त्यांना प्रश्न करत होत्या. पण देव तर "माऊली"च्या गजर मध्ये हरवले होते.

"माऊली म्हणून जरा कोणी हाक मारली की लगेच धाऊन जाता अन् इकडे आमची हाक तुम्हाला ऐकू सुद्धा जात नाहीये. अशाने तर तुम्हाला कोणीही उल्लू बनवू शकतं." गोड रुसवा दाखवत रखुमाई म्हणाल्या.

"देवी अशा नाराज होऊ नका. बोला काय म्हणत होत्या?" देव विठ्ठल म्हणाले.

"तुम्ही त्या रामाला वाचवायला का गेलात?"

"बघा, उत्तर तुमच्याजवळच तर आहे."

"देवा, मस्करी नको."

"रामा, नावातच सगळं आलं आहे."

"हो पण तो नावाप्रमाणे कुठे आहे? किती गुंड प्रवृत्तीचा आहे, तुम्हाला काय वेगळं सांगायला नको."

"देवी, आम्ही सर्व जाणतो."

"तरीही तुमचा लाडका भक्त झाला तो? तो ना कधी देवळात गेला ना कधी देवांचे नाव घेत ना नमस्कार करत. तो तर वारीला सुद्धा येत नव्हता. त्याच्या मित्रांनी ' सहलीला चाललोय असे समज' असे सांगून जबरदस्ती केली म्हणून तो इथे आला. "

"तो इथे कसे आला, यापेक्षा तो इथे आला, हे महत्वाचे नाही का देवी?"

"कसे महत्वाचे? वरतून तुमचे दर्शन न घेता तिकडे चंद्रभागेमध्ये पोहायला गेला आणि तो बुडत असताना तुम्ही त्यालाच वाचवले?"

“हो, तो वारीला निघाल्यापासून तुम्ही त्याचे निरीक्षण केले नाही का?”
तसे देवींनी नाक मुरडले.

"वारी चालतांना त्याने आपल्या पायातील पादत्राणे त्या म्हाताऱ्या बाबांना दिले होते ना? त्यांचे तुटले होते, त्यांच्या पायाला जखम होऊ लागली होती..ते बघून. किती लोकं होती तिथे, पण त्याचेच लक्ष त्यांच्याकडे गेले."

"तसे नाही आहे, त्याला त्या चपलांनी चालता येत नव्हते, फेकायचे काय म्हणून दिले होते त्याने. नवीन घेऊन दिले काय?"

“देवी, नवीनच देणे गरजेचे आहे का?”

“हो, आपली जुनी वस्तू, उपयोगी नसणाऱ्या गोष्टी देणे, याला दान म्हणत नाही.”

“गरजवंताला लागणाऱ्या गोष्टींची मदत करणे, याला दान म्हणतात, हे तरी मान्य आहे ना तुम्हाला?”

त्यावर देवी काही बोलल्या नाहीत.

"बरं. पुढे गेल्यावर त्याला दिसले की झाडाच्या आडोशाला एक माऊली तिच्या लेकराला दूध पाजत होती. अंग झाकण्या पुरते सुद्धा तिच्याकडे नीट कपडे नव्हते. रस्त्याने येता जाता काही लोकं त्या माऊलीकडे वाईट दृष्टींनी बघत होते. त्याने त्याच्या अंगातील शर्ट आणि जॅकेट तिला काढून दिला. स्त्री शरीराचे, स्त्रीचे रक्षण करणे, यापेक्षा सर्वात महत्वाचे काम आणि सर्वात मोठे पुण्य कोणते असेल देवी?"

"हो पण तो तुमचे दर्शन न घेता तिकडे नदीत पोहायला गेला.. हा तुमचा अपमान नाही का?"

"तुम्ही विसरलात का देवी, मी सगळीकडे आहे. देवळातच येऊन माझं दर्शन घेतले पाहिजे, हे गरजेचे नाही आणि मुळात देवाची भक्ती करा, अशी कुणावर सक्ती असावी का?

"नाही. मन शुद्ध असले तरी चालते."

"बघा बरं, तुम्हाला तर सगळं माहिती आहे. ही पूर्ण सृष्टी माझी लेकरे आहेत. सर्वांनी एकमेकांची मदत केली, काळजी घेतली, हीच माझी सेवा आहे. हीच माझी भक्ती आहे. या भक्तिनेच मी प्रसन्न होत असतो. आता सांगा मी त्याला का वाचवले?"

"त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून, नदीच्या त्या मोठ्या खडकांमध्ये फसलेल्या गाईच्या वासराला वाचवले, म्हणून.."

"मग, जो माझ्या लेकरांची काळजी घेतोय, अनावधानानेच असू देत.. पण तो चांगले काम करतोय, त्याची काळजी मी घ्यायला नको? चांगल्या लोकांची, माणुसकी जपणाऱ्या लोकांची आता गरज आहे देवी.."

"हम्म…”

"काय हम्म…हम्म…? सगळं पटते आहे, तरी रुसायचे आहेच?" देव थोडेसे गालात हसत म्हणाले.

"तुमच्यावर नाही रुसायाचे तर कोणावर? माझा हक्क आहे तो.." देवींनी परत नाक मुरडले. तसे ते हसले.

"तुमच्याविना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलणा.. “ देव देवींपुढे आपले दोन्ही हात जोडत म्हणाले. देवी खुद्कन हसल्या.

“तुम्हाला गायला नाही जमले हा बरोबर..” देवी गोड हसत, हात जोडत म्हणाल्या. त्यांनी हसत होकारार्थी मान डोलावली.

माऊली… माऊली..
माऊली.. माऊली…

"आले तुमचे भक्त.."

"तुमच्या शिवाय आम्ही परिपूर्ण नाही बरं का देवी. रुसू नका आता…आलोच देवी.. "


*******