Login

देवांची मीटिंग | बाप्पांचे कन्फेशन | लघुकथा

It Is About Reality Of Todays World And For That What Should Be Thinking Of Human Being.
विषय: कन्फेशन

देवांची मीटिंग | बाप्पांचे कन्फेशन

'अरे ! बस बस... किती तो आवाज, किती धांगड धिंगाणा. अरे किती मोठ्याने तो बार लावलास बंद करा ते बँजो, बंद करा ते फटाके वाजवणे. ह्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो आहे.

ते बघा बिचार लहान बाळ ह्या आवाजाने त्रासून गेलंय जोरजोरात रडतंय त्याची आई त्याला समजावते पण ४ महिन्याच्या बाळाला तरी तिचं बोलणं काय समजणार. ती आई माझ्याच नावाचा धावा करते आहे की हा आवाज लवकर बंद होऊ दे.

अरे रे! बिचारे ते आजोबा आजाराने त्रस्त होऊन अंथरुणाला खिळून आहेत त्यांना नीट उठता बसता येत नाही त्या अवस्थेत त्यांची काळजी घेण्यासाठी फक्त आज्जीचआहे त्यांची मुलं त्यांना सोडून लांब गेलीत. आता ह्या वयात ते सुखी आरोग्य मागण्याऐवजी माझ्या जवळ हा आवाज हा तमाशा बंद करण्याची मागणी करत आहेत.

ही बिचारी मुकी जनावरे ती तर कोणाला काही बोलू देखील शकत नाहीत हा फटाक्यांचा बाजाचा आवाज आपल्या साठीच इतका त्रास दायक असतो, तो त्या बिचाऱ्या जनावरांसाठी किती जास्त त्रासदायक व धोकादायक आहे. बिचारी त्या आवाजाला घाबरून जागा मिळेल तिथे लपून बसली आहेत.

खरंच हे माझं मनापासून केलेलं स्वागत आहे का की इतर लोकांना पशू पक्षांना त्रास देऊन केलेलं? खरंच माझ्या आगमनाने सगळे तेवढेच खूश आहेत का? मी वर्षांतून एकदा येतो सगळ्यांना आनंदी बघण्यासाठी खऱ्या मनाने भक्ती भावाने माझी सेवा करून घेण्यासाठी पण इथे तर काही वेगळेच दृश्य दिसत आहे. मी मूर्ती रूपात सगळ्यांचे दुःख वेदना बघू शकतो आहे पण ही हाडा मासाची जिवंत माणसं ह्यांना त्यांच्या अवती भवतीच्या लोकांची दुःख दिसत नाही? वेदना कळत नाहीत? खरंच का हा मनुष्य प्राणी डोळे असून आंधळा झालाय? कान असून बहिरा झालाय? हृदय असून निरहृदयी झालाय?'

आज गणेश चतुर्थी, बाप्पांच्या मिरवणुकीत सगळे बेधुंद होऊन नाचत होते मोठं मोठ्याने गाणी, बँड बाजा वाजवत होते. जोरजोरात फटाके फोडत होते. बाप्पांकडे कोणाचे लक्ष नव्हते. बाप्पांच मात्र तिथे लक्ष नव्हत बाप्पांच मन इतर जीवांच्या चिंतेने काळजीने व्याकुळ होत होते. तेव्हाच त्यांना परवाच कैलाश पर्वतावर झालेली देवांमधील मीटिंग आठवली.

गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी ब्रह्मा आणि विष्णू कैलाश पर्वतावर शंकरांना भेटण्यास आले. भेटण्याचे कारण असे विशेष नव्हते. त्यांना गणेश देवांना गणेश चतुर्थी निमित्त पृथ्वीवर जाण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या होत्या.

ब्रह्मा विष्णु आलेत तेव्हा शंकर ध्यानमग्न होते. त्यांच्या येण्याने शंकराने डोळे उघडून स्मित हास्य करत दोघांचे ही स्वागत केले. दोघे ही स्मित करत त्यांच्या त्यांच्या कमळाचा आसना वर आसनाग्रस्त झाले. त्यांच्यामध्ये ब्रम्हांडाच्या गोष्टी सुरू झाल्या.

त्यांच्या गप्पा चालू असताना मूषक वरून स्वार होत गणपती बाप्पांचे तिथे आगमन झाले. तिथे येऊन ते सर्वांना विनम्र अभिवादन करून सर्वांना नमस्कार केला. ब्रह्मा आणि विष्णू त्यांना पृथ्वीच्या दौऱ्या बद्दल विचारपूस करू लागले. त्यांना शुभेच्छा देऊ लागले.

त्यामध्येच भगवान शंकरांनी ओळखले ब्रह्मा कोणत्या तरी घोर विचारात आहेत कोणती तरी गोष्ट त्यांना आतून सतावते आहे. त्यानी न राहवून ब्राह्मणांना त्यांच्या अस्वस्थतेचे कारण विचारले.
त्या वर ते बोलू लागले, "आपण मिळून किती सुंदर सृष्टी निर्माण केली इतक्या निरनिराळ्या गोष्टींचा त्यात समावेश केला. फक्त आपण एक चूक केली की मनुष्य प्राणी निर्माण करून त्याला अक्कल प्रधान केली ज्यामुळे आता तो स्वतःला बहुतेक आपल्या पेक्षा जास्त हुशार समजू लागला आहे. तो खूप स्वार्थी झाला आहे स्वतः पायी तो दुसऱ्या कशाचाच विचार नाही करत. तो अगदी विसरून गेला आहे की इतका स्वार्थ करून शेवटी सोबत काही नाही राहणार आहे जे आहे ते मागेच सोडून पुढच्या प्रवासाला निघून जायचं आहे. तरी हा मनुष्य प्राणी सत्याला डावलून स्वार्था पायी दुसऱ्याच फक्त वाईटच बघतो आहे. मी इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली त्याची नासधुस करतो आहे".

त्यांचं बोलण ऐकुन विष्णु देव बोलू लागले,
"अगदी बरोबर म्हणालात ब्रम्ह देव मी देखील सृष्टी चा पालनहार  म्हणून काय ह्या मनुष्य जातीला समजवण्याचे कमी प्रयत्न केलेत का? तरी कोणी समजून घेण्यास तयारच नाही. इतकेच नव्हे तर ह्यांच्यासाठी मी स्वतः कित्येक वेळा पृथ्वी वर मनुष्य म्हणून जन्म घेतला माणसांना सुखी जीवन कसं असावं ह्या साठी साक्षात भगवद् गीता वर्णून आलो पण त्याचा त्यांच्या वर काही उपयोग नाही उलट ते त्यांच्या स्वतःच्या कर्मांच दोष आपल्यालाच देणार. ह्या सगळ्या पृथ्वी वासियांना माहित आहे मी नेहमी आहे कोणत्या ही आलेल्या प्रसंगाला सामोरे जा माझ्यावर विश्वास ठेवा मी सगळ चांगलंच करीन. पण नाही कोणता प्रसंग आलाच तर त्याचा दोष मलाच देत हातपाय गाळून बसतात हे असे कधी पर्यंत चालणार, ह्या सगळ्यात भगवान शंकर तुमचे मात्र बरे झाले ह्या लोकांनी तुमचं विनाशाच काम सोपं केलं आहे. हे लोक स्वतःच स्वतःच्या विनाशावर उठले आहेत".

विष्णु देवाचं बोलणं संपताच भगवान शंकर बोलू लागले.
"तुम्ही दोघे ही अगदी बरोबर बोलताय ब्रह्मा विष्णु आपण मिळून किती निर्मळ मनाने ह्या सृष्टीची रचना केली होती प्रत्येक गोष्ट किती आवडीने घडवली होती. पण ही मनुष्य जात स्वतःच्या सोयी सुविधांसाठी एक एक गोष्टीची नासधुस करतो आहे त्या मुर्खांना हे नाही माहीत की आपण ही ह्याचाच एक भाग आहोत. जसजशी आपण निसर्गाची पर्यावरणाची वाट लावू माणुसकी सोडून वागू तसतसा आपला ही अंतजवळ ओढत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही. कदाचित पृथ्वीवर घडणाऱ्या घटना अंताचा भाग असू शकतो. मी जरी विनाशक असलो तरी ह्या लोकांनी स्वतःचा विनाश स्वतःवरच वाईट रीतीने ओढावून घेतला आहे आणि मग घटना घडून गेल्या वर खापर माझ्याच डोक्यावर फोडणार ' शंकराने तिसरा डोळा उघडला म्हणून, शंकर तांडव करतोय म्हणून ' अरे ह्या मुर्खांना माहित तरी आहे का शंकराचा तांडव काय असतो ते? खरंच जर अस घडल मी तिसरा डोळा उघडला तर ह्यांच्या मधून कोणाच तरी अस्तित्व तरी उरेल का?" बाप्पा गणेश शांत बसून त्या तिघांचे बोलणे ऐकत होते.

अचानक जोरजोरात रुग्णवाहिकेच सायरण ऐकू आल तसा मिरवणुकीच्या मध्ये विराजमान असलेल्या बाप्पांचे विचार जगीस थांबले त्यांचं लक्ष त्या रुग्णवाहिकेवर गेलं. रस्त्यावर अतिशय गर्दी होती. कशी तरी लोकांच्या गर्दीतून वाट काढत ती रुग्णवाहिका पुढे सरकू लागली. त्यामध्ये कोणी तरी बाप्पांचा धावा करत होत.

एक पेशंट पडून होता त्याला कसलेसे मशीन जोडले होते आणि त्याच्या बाजूला त्याची बायको हाथ जोडून रडत बाप्पांचा धावा करत होती. तिच्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता तो शुद्धित नव्हता. त्यात भरीस भर म्हणून बाहेर चालू असलेला हा जोरजोरात गाण्यांचा आणि फटाक्यांचा आवाज आता तो पुढे वाचतो की मारतो कोणाला ठावूक. ते दृश्य बघून बाप्पा भावूक झाले

'खरंच माझ्यासाठी इतकं सगळं करण्याची गरज आहे का? ह्या फटाक्यांचा ह्या मोठमोठ्या आवाजातील गाण्यांचा मला काय उपयोग आहे उलट ज्यामुळे माझ्या भक्ताला त्रास होत असेल त्याचा मला देखील त्रासच आहे. माझे बाबा ब्रह्मा आणि विष्णू बरोबर म्हणत होते. माणूस आपली माणुसकी मनुष्य धर्म विसरत चालला आहे.

का म्हणून मी ह्यांच्याजवळ येऊन राहून सेवा करून घेतली पाहिजे ज्यांच्या मनात फक्त स्वार्थच स्वार्थ भरल आहे. ह्या लोकांना काय वाटतं अश्या स्वार्थी भावनेने मी प्रसन्न होणार, अरे स्वतः धनाचे देवता कुबेर मला पोट भर अन्न नाही पुरवू शकलेत तर ही लोकं तर साधी मनुष्य आहेत. मी भुकेला आहे पण ह्या सगळ्या दिखाव्याचा नाही पैश्याचा नाही तर खऱ्या प्रेमाचा माझ्या वरच्या भक्तीचा. मी नाही म्हणत की मी फक्त पैसेवाल्यांकडेच जातो त्यांच्या वरच प्रसन्न होतो. मला तुम्ही अजुन नीट ओळखलच नाहीत मी माणूस नाही देव आहे. मला देखील लोभ आहे पण तुमच्या भक्तीचा आणि प्रेमाचा. तुम्ही साध्या मातीच्या रूपात मला घरात आणा तुमच्या बागेतून तुमच्या हाताने तोडून आणलेल्या फुलांनी माझी पूजा करा घरच्या अन्नाचाच मला नैवैद्य दाखवा मनोभावे माझी पूजा करा मला प्रेम द्या त्यातच माझा आनंद आहे."

"चला पोहोचलो वाटतं मंडपात आता इथेच दहा दिवसांचा मुक्काम, ज्यांचे विचार, मन वाईट आहेत त्यांना सोडाच, पण जे खऱ्या मनाने भक्ती भावाने माझ्या जवळ मला भेटायला येतात त्यांना तर मला भेटणं गरजेचं आहे. बाकी तर सगळ्यांनी ते प्रल्हाद शिंदे यांचं मराठी प्रसिद्ध गाणे तर ऐकलेच आहे "

'जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर'

समाप्त