देवी रक्षति रक्षितः.. भाग २९

कथा एका असामान्य मुलीची
भाग २९

मागील भागात आपण पाहिले की हे चौघेही एका मठात आले आहेत. आता बघू पुढे काय होते ते.


"शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं
न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि ।

अतस्तवामाराध्यां हरिहरविरिञ्च्यादिभिरपि
प्रणन्तु स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति॥

मंत्र म्हणतच मठपती बाहेर आले. आणि हे चौघेही त्यांच्याकडे बघतच राहिले. तेजःपुंज चेहरा, अंगावर साधेसे भगव्या रंगाचे कपडे, धारदार नाक आणि त्याहून सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारे ते तेजस्वी डोळे. चौघेही त्यांच्याकडे बघतच राहिले. ते येताच पटकन उभे राहिले.

"अरे बसा.. बसा. तुम्ही चहा वगैरे काही घेतलं का? श्रीपत?" महाराजांनी आवाज दिला.

"विसरलो.." श्रीपत जीभ चावत म्हणाला.

"आम्हाला काही नको महाराज. आम्ही फक्त दर्शनासाठी आलो होतो." कपिल पटकन म्हणाला.

"दर्शन घेण्याइतका मी काही मोठा नाही. दर्शन घ्यायचे ते मातेचे. माझे नाही. ते घेतले की नाही?" महाराजांचे बोलणे ऐकून नाही म्हटलं तरी सगळे प्रभावित झाले होते.

"ते घेऊनच इथे आलो." जयंती म्हणाली.

"मग बोला.. काय सेवा करू तुमची?" मठपतींनी विचारले.

"ते.. तुम्ही खरंच मठाबाहेर जात नाही का?" पार्थने विचारले. मठपती त्यावर हसले.

"मग तुम्हाला कंटाळा येत नाही का? किंवा असं वाटत नाही का.. की आपली चूक नसताना सुद्धा आपण हे का पाळतो आहे?" पार्थने परत विचारले.

"वारसा कसा मिळतो, माहित आहे का?" मठपतींनी विचारले.

"हो.. आईबाबांनी किंवा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेल्या गोष्टी." जयंती म्हणाली.

"तो पैशाचा, जमिनीचा असेल तर आपण स्वीकारतो ना?"

"हो.."

"एखादं कर्ज असेल तर ते फेडतो?"

"फेडावेच लागते.."

"मग हे ही तसेच आहे. मातेने दिलेला शाप हा वरदान म्हणून आम्हाला पाळलाच पाहिजे." मठपती बोलत होते. "आणि खरं सांगू, मातेचे हे वरदानच समजतो आम्ही. बाहेर जात नाही. त्यामुळे तिची सेवा करता येते.

"वरदान हे असं?" पार्थने विचारले.

"हो.. आम्ही याला वरदानच मानतो. आमचं सोड.. आम्ही फक्त या मठातच राहतो. पण जे तरूण भेंडोळी करतात त्यांनासुद्धा माता इजा होऊ देत नाही."

"भेंडोळी??"

"कालभैरवासाठी केला जाणारा हा विधी आहे."

"इथे हिंगलाज देवीचे ठाणे आहे ना?" विषय भरकटतो आहे असं वाटून कपिलने विचारले.

"सर्वज्ञात आहे ते." महाराजांच्या चेहर्‍यावरचे हास्य कायम होते.

"याचा नाथपंथियांशी काही संबंध??" जयंती मध्ये बोलली.

"देवी, मातेच्या प्रत्येक रूपाशी आमचा संबंध आहे. पण तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की हिंगलाज देवी ही आमची आराध्य आहे. तिचे दर्शन घेण्यासाठी तिच्या सद्य स्थानी जाणे शक्य नाही म्हणून तो तांदळा मठात आहे."

"आम्हाला बघायला मिळेल का ते?" शांभवीने विचारले. आता कुठे मठपतींचे लक्ष शांभवीकडे गेले. ते तिच्याकडे बघतच राहिले.

"महाराज, मिळेल का बघायला?" महाराजांच्या तसं बघण्याने विचलित होऊन कपिलने विचारले.

"अं.. हो.. चला ना.." सगळ्यांनी देवीचं दर्शन घेतले.

"महाराज, आम्हाला अजून काही सांगू शकाल का, या शक्तीपीठांबद्दल?" कपिलने विचारले.

"शक्तीपीठ??" मठपतींचे इतका वेळ दिसणारे हास्य लोप पावले.

"हो. शक्तीपीठ.. आता तुम्ही एवढी मातेची साधना करत आहात तर, त्याची काही माहिती असेल तर सांगा ना." कपिलने आग्रह केला.

"कृष्णरूपा कालिका स्यात्,
रामरुपा च तारिणी ।
बगला कूर्ममूर्तीः स्यात्।
मीनो धुमावती,
छिन्नमस्ता नृसिंहः स्यात्,
भैरवी वराहः स्यात्।
वामनो भुवनेश्वरी।
कमला बुद्धरूपा स्यात्,
दुर्गा स्यात्कटरुपिणी।
स्वयं भगवती काली
कृष्णस्तु भगवान स्वयम्॥"

महाराजांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली.

"महाराज, काही समजेल असं सांगाल का?" पार्थने विचारले. पण महाराजांच्या कानात जणू ते शब्द गेलेच नाहीत. ते परत परत तेच म्हणत राहिले. काही तरी बिनसलं आहे हे समजून श्रीपत मध्ये पडला.

"तुम्ही इथून निघालात तरी चालेल." त्याने यांना हाताशी धरून बाहेर काढायला सुरुवात केली.

"अरे पण.." कपिल बोलू लागला.

"निघा म्हटलं ना.. काही उलटसुलट झालं तर माझ्या अंगावर यायचं." श्रीपतला घाम फुटला होता.

"महाराज.." शांभवीने हाक मारली.

"विद्याश्चैताः पुरूषं बिना न सिद्धर्यान्त।" महाराज शांभवीकडे बघत पुटपुटले.

"निघा तुम्ही सगळे.." श्रीपतने यांना जवळजवळ बाहेर ढकलतच मठाचा दरवाजा बंद केला.

"कसला उद्धट होता हा.. लागलं ना मला." हात चोळत जयंती म्हणाली.

"तो उद्धट की आपण? आपण जास्त चौकशा करत होतो." शांभवी म्हणाली.

"बरं.. आपण उद्धट.. बस? ए आता काहीतरी खाऊयात बाबा. भूक लागली आहे खूप. आणि माझ्या मेंदूला हा ताण सहन होत नाही." जयंती म्हणाली.

"ओके.. आपण परत हॉटेलवर जाऊ. तिथे काहीतरी खाऊ? मग विचार करू." कपिल म्हणाला.

"ओके." सगळ्यांनी होकार दिला. जयंतीने इतका वेळ चालू ठेवलेला कॅमेरा बंद केला.

"ताई, पण ट्रॅव्हल विथ जयंती मस्तच हं.." पार्थ हसून म्हणाला.

"मग काय?? आहेच मी हुशार." नसलेली कॉलर ताठ करत जयंती म्हणाली.

"चला.." कपिल वैतागून म्हणाला. सगळे परत निघाले. दिवसभर पायपीट करून सगळे दमले होते. जेवून हॉटेलमध्ये ते विश्रांतीसाठी परतले. जयंती आणि शांभवी बेडवर पडल्या होत्या. जयंती नेहमीप्रमाणे मोबाईलवर होती. शांभवी झोपायचा प्रयत्न करत होती. दोनतीन वेळा इकडून तिकडे वळून झाल्यावर जयंतीने तिला विचारलेच.

"काय गं? काय झालं? झोप येत नसेल तर टीव्ही बघ."

"तुला बोर होत नाही का गं? सतत काय करत असतेस मोबाईलवर?" शांभवी जयंतीवर बरसली.

"मी मेंदूला चालना देणारे खेळ खेळत असते. तू सुद्धा खेळ. म्हणजे तुझा मेंदू पण चालायला लागेल." जयंती मोबाईल वरची नजर न हलवता म्हणाली.

"माझ्या मेंदूने तर काम करणंच बंद केलं आहे." शांभवी निराश होत म्हणाली.

"का? काय झालं?"

"बघ ना.. आपण सकाळी फिरलो. पण काहीच क्लू मिळाला नाही. ते महाराज मला थोडे विचित्रच वाटले. निघताना काही सांगायचं सोडून ते मंत्र म्हणत बसले. बरं.. ते एवढ्या फास्ट बोलत होते की एक शब्द समजला असेल तर शपथ."

"नको काळजी करूस. माझ्याकडे उपाय आहे." जयंती तिला आश्वस्त करत म्हणाली.

"कसं??" शांभवीने विचारले. तोच दरवाजा वाजला. जयंतीने शांभवीला प्लीज असं डोळ्यांनीच खुणावले. शांभवीने दरवाजा उघडला तर दरवाजात कपिल उभा होता.

"झोपला नव्हता ना?" त्याने विचारले.

"नाही.. उगाचच टाईमपास करत होतो."

"मी आत येऊन बोललो तर चालेल का?" त्याने विचारले.

"हो.. पार्थ?"

"तो झोपला आहे. थकला आहे बहुतेक चालून. मी कॉफी घेण्यासाठी बाहेर पडत होतो. तुमचा आवाज आला म्हणून दरवाजा वाजवला. चालेल ना?"

"हो हो.. असं काय बोलताय? बसा ना." शांभवी जयंतीला उठायची खूण करत म्हणाली. पण ती तिथेच उठून टेकून बसली. ते बघून कपिलने जवळची खुर्ची घेतली. त्याच्यावर बसत त्याने बोलायला सुरुवात केली.

"आजचा आपला पहिला दिवस होता. तुम्हाला काही जाणवले का?"

"काय जाणवायला पाहिजे? खरंतर आपल्याला हे ही माहित नाही त्या विरूद्ध पार्टीच्या लोकांना काय हवं आहे? याची सुरुवात ते कुठून करणार? आपल्याला काय थांबवायचे आहे ते ही माहित नाही. काम करणार तरी कसं?" शांभवी म्हणाली.

"तिच तर गंमत आहे. जिथे सगळं माहित असतं ती गोष्ट कोणीही करू शकतो. जिथे काहीच माहिती नसतं, तिथेच तर खरा कस लागतो आपला." कपिल तिला समजावत म्हणाला.

"बरं.. सध्या माझे डोके चालत नाहीये. तुम्ही सांगा पुढचे पाऊल काय ते." शांभवी हाताची घडी घालत म्हणाली.

"ते महाराज काहीतरी भेंडोळी म्हणून सांगत होते. आपण तिथे जाऊन आलो तर?" कपिल म्हणाला.

"आजच जायला पाहिजे का? थोडी दमले आहे मी." जयंती पाय दाबत म्हणाली.

"हो.. घाई केली पाहिजे.. कारण तांत्रिक जगातला सगळ्यात मोठा मुहूर्त लवकरच आहे. हजारो वर्षांनंतर येणारा हा मुहुर्त आहे. त्यामुळे जे काही होईल हे तेव्हाच होईल." कपिल म्हणाला.

"तुम्हाला एवढी माहिती कशी?" डोळे बारिक करुन जयंतीने विचारले.

"कारण मी मोबाईलवर टाईमपास न करता महत्वाच्या गोष्टी करतो. कोणतीही तांत्रिक वेबसाईट उघडा. त्या मुहूर्ताबद्दल भरपूर चर्चा आहे. म्हणूनच मला असं वाटतंय की आपण थोडी घाई केली पाहिजे. बाकी तुमची मर्जी." खांदे उडवत कपिल म्हणाला.


कसला मुहूर्त असेल तो? या चौघांना मिळणार आहे का तो क्लू? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all