देवी रक्षति रक्षितः.. भाग ३०

कथा एका असामान्य मुलीची
भाग ३०

मागील भागात आपण पाहिले की शक्तीपीठांची चौकशी केली म्हणून या चौघांना तिथून हाकलून देण्यात येते. आता बघू पुढे काय होते ते.


"कुठे जायचे आहे?" आळस देत जयंतीने विचारले.

"काळभैरव मंदिरात.." कपिल म्हणाला.

"खूप लांब आहे का? म्हणजे मी नाही आले तर चालेल का?" जयंतीने विचारले.

"तुमची इच्छा.. शांभवी.. तुमचे काय?"

"मी आणि पार्थ येतो. तू कर आराम जयंती."

"थॅंक यू डार्लिंग.." परत आपला मोबाईल बघत जयंती म्हणाली.

"हिला कंटाळा नाही का येत, सतत मोबाईलवर खेळून?" बाहेर पडल्यावर कपिलने विचारले.

"कंटाळा येऊ नये म्हणूनच तर खेळत असते.." पार्थ म्हणाला.

"हो का? तुला बरं माहिती रे.."

"मला सगळं माहित असतं." पार्थ पुढे जात म्हणाला.

"सॉरी.." कपिल शांभवीला म्हणाला.

"कश्याबद्द्ल?"

"ते तुम्हाला एवढं चालावं लागत आहे. पण इथल्या इथे रिक्षा पण नाही ना."

"एवढं काय फॉर्मल होत आहात? ठिक आहे ना.. आणि मला आहे सवय चालायची. डोन्ट वरी." शांभवी हसत म्हणाली.

"तुम्ही सोबत असल्यावर काळजी कुठेतरी निघून जाते. छान वाटतं तुमच्यासोबत." कपिल म्हणाला.

"थॅंक्स.." यावर काय बोलायचे हे न सुचून शांभवी इथे तिथे बघू लागली. काही मिनिटांतच ते कालभैरव मंदिरात पोहोचले. सतत पायर्‍या चढून उतरून शांभवी थोडी थकली होती. पण तोंडातून शब्दही न काढता ती चालत होती. कपिलला तिचे फार कौतुक वाटत होतं.

"आलोच.." शांभवीसमोर हात पुढे करत कपिल म्हणाला.

"थॅंक यू.." शांभवी हात न धरताच पुढे झाली. ते बघून कपिलचा चेहरा थोडा उतरला. पण परत चेहर्‍यावर हास्य आणत तो पुढे झाला. तिघेही मंदिरात पोहोचले. दगडी मंदिर बघून शांभवीतली पुरात्तवज्ञ जागी झाली. तिने मंदिराची पाहणी करायला सुरुवात केली. गर्दी नसल्यामुळे ती आरामात रेंगाळत होती. पार्थ आणि कपिल मात्र दर्शन घेऊन आले.

"दादा, ते भेंडोळी विचार ना.." पार्थ कपिलला म्हणाला.

"काही म्हणालात का?" पुजार्‍याने विचारले.

"हो.. ते भेंडोळी म्हणजे काय ते विचारत होता हा.." कपिल म्हणाला.

"भेंडोळी होय.. सांगतो की." पुजारी माहिती सांगत आहेत हे बघून शांभवी पण पुढे आली. त्यांनी सुरूवात केली.

"हे आहेत कालभैरव महाराज. इकडचे क्षेत्रपाल. क्षेत्रपाल म्हणजे या सगळ्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी त्यांचीच ना. पण ते फक्त वर्षातून एकदाच मंदिराच्या बाहेर पडतात. तो दिवस म्हणजे.."

"अश्विन अमावस्या.." शांभवीच्या तोंडातून निघून गेले.

"बरोबर.. आता ते निघतात ते रात्रीच्या वेळेस. अंधारात त्यांना दिसावे म्हणून भेंडोळी पेटवतात." पुजारी रंगात आले होते.

"म्हणजे नक्की काय पेटवतात??"

"हा बघा.. हा असा मोठा लाकडाचा ओंडका घेतात. त्याला मधोमध कापड लावतात. ते कापड पेटवतात. आणि त्या उजेडात महाराज प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतात."

"पेटतं लाकूड घेऊन?" पार्थने आश्चर्याने विचारले.

"हो.. गावातले तरूण धरतात ते. पण एकालाही काही होत नाही बरं."

"बापरे..."

"खरी गंमत तर पुढे आहे. ती गल्ली दिसते आहे?"

"हो.. जरा लहानच आहे ना.."

"त्या गल्लीतून ही भेंडोळी जाते. आणि जिथे एका माणसाला उभे राहणं अशक्य आहे तिथे चारपाच माणसे उभी असतात."

"विचित्रच आहे हे सगळं." कपिल म्हणाला.

"मी बघून येऊ तो रस्ता?" पार्थने उत्सुकतेने विचारले.

"जा की.. या बघून." पुजारी म्हणाला. पार्थ लगेच हौसेने पुढे झाला. ते बघून शांभवीने कपिलकडे नजर टाकली.

"थांब.. आलोच मी." म्हणत कपिल पार्थच्या पाठी गेला. पुजारीसुद्धा आरतीची तयारी करायला म्हणून गेले. मंदिराच्या सभामंडपात शांभवी एकटीच होती. समोरच्या गल्लीतून पुढे जाणारे पार्थ आणि कपिल तिला दिसत होते. ती परत मंदिराकडे वळली. बटूभैरवाचा छोटासा गाभारा तिला बोलवत होता.

"शांभवी.." ओळखीचा आवाज आल्याने तिने त्या दिशेने बघितले. तिचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. समोर रुद्र उभा होता. तिने आजूबाजूला बघितले. तिथे कोणीच नव्हते.

"तुम्ही इथे कसे?" तिच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले.

"शांभवी, मी जे सांगतो आहे ते नीट ऐक. तू सध्या घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस. तू.. " रुद्र अजून काही बोलणार तोच शांभवी रागाने बोलू लागली.

"घाईघाईत निर्णय? मी घेतला? तुमच्यामुळे माझे आईबाबा गेले. मला सगळं सोडून पळावं लागतंय. तुमच्या त्या पंथामुळे माझी ही अवस्था झाली आहे."

"मान्य आहे.. माझ्याकडून काही चुका झाल्या. पण म्हणून.." रूद्र अजून काही बोलणार तोच त्याला पार्थचा बोलण्याचा आवाज ऐकू आला.

"एक उपकार कर फक्त. मी इथे भेटलो ते कोणाला सांगू नकोस.." बघता बघता रुद्र दिसेनासा झाला.

"ताई, मी आलो सुद्धा जाऊन.. अगं केवढा छोटा रस्ता आहे तो. खरंच कसे करत असतील ती भेंडोळी?" पार्थ उत्साहात बोलत होता.

"हो का??" शांभवी कपाळावरचा घाम पुसत म्हणाली.

"तुम्हाला एवढा घाम का फुटला आहे?" कपिलने इथेतिथे बघत विचारले.

"ते.. " शांभवी रूद्रबद्दल काही सांगणार तोच तिला आठवले, आईबाबांना सांगितले तर तेच गेले. परत असं नको व्हायला. "ते.. जरा असंच होतं मध्ये मध्ये मला. चला आपण निघायचे का हॉटेलवर? जयंती वैतागली असेल."

"हो.. चला ना.." कपिल थोडा संशयाने शांभवीकडे बघत म्हणाला. तिघेही परत हॉटेलवर आले. शांभवीची खोली लॉक होती.

"जयंती कुठे गेली आता? आपल्यासोबत चल म्हटलं तर आली नव्हती." शांभवीला तिची काळजी वाटू लागली. एकतर आधीच रूद्रची झालेली भेट.. त्यात आता जयंतीचे नसणे.. तिचं काही बरंवाईट तर झालं नसेल ना? फक्त हाच विचार तिच्या मनात येऊ लागला.

"तुम्ही आत बसा.. मी फोन लावतो." कपिल म्हणाला. "उचलत नाही." फोन परत ठेवत तो म्हणाला.

"विचित्र मुलगी आहे ही.. फोन उचलायला काय झालं?" शांभवीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

"तुम्ही रडू नका. मी रिसेप्शनवर विचारतो." कपिल घाईघाईत खाली जाऊ लागला.

"तुम्ही नका जाऊ खाली. दिवसभर आपण सगळेच पायपीट करून दमलो आहोत. येईल ती." शांभवी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.

"कोण येणार आहे?" जयंतीने पार्थला विचारले.

"ही बघ.. इथे आहे ही." आईस्क्रीम खाणार्‍या जयंतीला बघून पार्थ ओरडला.

"मी इथेच आहे. बाहेर तर तुम्ही गेला होता ना?" बोटावर ओघळलेले आईस्क्रीम चाटत शांभवी म्हणाली.

"मूर्ख, कुठे गेली होतीस? फोन पण उचलत नव्हतीस?" रडवेली होत शांभवी म्हणाली.

"अगं, भूक लागली होती म्हणून आईस्क्रीम खायला गेले होते. तुम्हाला यायला किती वेळ लागेल माहित नव्हतं. मग गेले खाली." शांभवीचे डोळे पुसत जयंती म्हणाली.

"फोन का नाही उचलला?"

"कुठे सगळे सामान घेऊन फिरू? नाहीतरी काहीजण म्हणतात ना.. मी मोबाईल ॲडिक्टेड आहे. म्हणूनच मोबाईल ठेवून गेले होते. तुम्ही जाऊन आलात का कालभैरवाला?" जयंती कपिलकडे बघत म्हणाली.

"हो.. जुनं मंदिर आहे.. छान आहे. तू यायला पाहिजे होतंस." शांभवी म्हणाली.

"नाही गं.. एवढं चालायची सवय नाही मला. एनीवेज.. आता पुढचे काही प्लॅन?" जयंती विषय बदलत म्हणाली.

"आपण आत बसून बोलूयात का?" आजूबाजूला बघत कपिल म्हणाला.

"चालेल की. तुम्ही व्हा पुढे. मी आलेच माझा मोबाईल घेऊन. तो ही माझा विरह जास्त सहन करू शकत नाही." शांभवीला डोळा मारत जयंती म्हणाली.

"आता बोलायचे का?" मोबाईल घेऊन आलेल्या जयंतीने दरवाजा लावत विचारले.

"हो.. आता पुढे काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे." कपिल म्हणाला.

"तुम्हाला त्या मंदिरात काही क्लू नाही मिळाला?"

"नाही गं ताई.. फक्त एवढंच समजलं की अश्विन अमावस्येला तिथून भेंडोळी निघते. केवढासा रस्ता आहे.. माहितीय?" पार्थ बोलू लागला.

"अश्विन अमावस्या?? आणि दोघेही एकाच दिवशी बाहेर पडतात?" जयंतीने आश्चर्याने विचारले. "मग त्या मठपतींचा आणि भैरवाचा काही संबंध तर नसेल ना?"

"तसा विचार केला तर असूही शकतो. म्हणजे बघा हं. नाथपंथियांमध्ये काही शाक्त देखील आहेत. तिथे मठात असलेलं हिंगलाज देवीचे ठाणं पण याला दुजोरा देतं. असंही असू शकेल की या शाक्तपंथीयांपैकी कोणाकडून तरी काही चूक घडली असावी म्हणून त्यांना मनाई असेल, देवीचं दर्शन घेण्याची." शांभवी म्हणाली.

"हो.. आणि ते महाराज कोणता मंत्र म्हणत होते.. विद्याश्चैता पुरुषं बिना न सिद्धर्यान्त.. त्याचा अर्थ काय?" पार्थने विचारले.

"म्हणजे कोणतीही विद्या पुरुष प्रसन्न झाल्याशिवाय सिद्ध होत नाही." जयंतीने भाषांतर केले.

"अरे व्वा.. एवढ्या पटकन भाषांतर केलेत?" कपिलने विचारले.

"संस्कृत स्पेशल विषय होता माझा.. असो.. मी जे काही वाचलं आहे शक्तीपीठांबद्दल त्यावरून असं समजलं आहे की प्रत्येक शक्तीपीठाचा रक्षक एक भैरव आहे. याचा अर्थ देवीला खुश करायचे असेल तर भैरवाला सिद्ध करावं लागेल." जयंतीचे शब्द ऐकून बाकीच्यांचा चेहरा उतरला. कारण इथे शक्तीपीठामध्ये काय शोधायचे माहिती नव्हते त्यात आता भैरवाला प्रसन्न करायचे.


रुद्र का आला असेल शांभवीला भेटायला? कसे प्रसन्न करून घेतील हे देवी आणि भैरवाला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all