देवी रक्षति रक्षितः.. भाग ३१

कथा एका असामान्य मुलीची
भाग ३१

मागील भागात आपण पाहिले की शांभवीला कालभैरव मंदिरात रुद्र भेटतो. आता बघू पुढे काय होते ते.


"कोणतीही विद्या भैरवाला प्रसन्न केल्याशिवाय सिद्ध होत नाही??" पार्थने परत तेच वाक्य उच्चारले. "पण मग हे भैरव कोण?"

"भैरव हे शंकरांचे उग्र रुप आहे. सतीच्या शक्तीपीठांचे रक्षण करण्यासाठी त्याची नियुक्ती केली गेली आहे." कपिल सांगू लागला.

"शक्तीपीठाचे संरक्षण? पण का? ती तर आधीच शक्तीचा स्त्रोत होती ना?"

"हो. होती. पण झालं असं होतं की तारकासूर त्या शक्तीपीठांना उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात होता."

"आता हा तारकासूर का मध्ये आला?"

"तुम्ही दिवाळी तरी साजरी करायचात का रे?" वैतागून कपिलने विचारले.

"म्हणजे काय??" शांभवी पटकन म्हणाली.

"मग दिवाळीनंतरची त्रिपुरारी पौर्णिमा नाही का माहित याला?" कपिलने विचारले.

"आम्ही त्या दिवशी फक्त दिवे लावायचो घरात.. बस्स.. आणि मला तारकासूर माहित आहे पण हे माहित नाही की तो शक्तीपीठांच्या मागे का होता. तुला नाही सांगायचं नको सांगू." पार्थ कपिलला म्हणाला.

"ए बाबा, चिडू नकोस असा. सांगतो. तारकासूर नावाचा एक राक्षस होता. सगळ्या राक्षसासारखे त्याच्या आयुष्याचे सुद्धा एकच लक्ष्य होते.. ते म्हणजे अमर होणे. त्यातून त्याने शंकरांकडूनच वर मिळवला होता की त्याचा वध फक्त शंकरांचा मुलगाच करेल. आता शंकर तेव्हा अविवाहित होते. संन्यस्त म्हणून प्रसिद्ध होते. ते लग्न करतील असं त्याला वाटलंच नाही. पण सती आली आणि तिने शंकरांशी लग्न केले. आता यांना पुत्र होईल या विचाराने तो धास्तावला होता. पण सतीनेच तिचा हा जन्म संपवला. तरीही त्याचा कोणावर विश्वास नव्हता. सतीची शक्तीपीठे एकत्र येऊन परत काही होऊ नये यासाठी तो प्रयत्नशील होता. तेव्हा शंकरांनी पृथ्वीला ती शक्तीपीठे आपल्या उदरात गुप्त स्वरूपात ठेवायला सांगितली. तिने तशी ठेवताच त्यांनी त्या प्रत्येक पीठाच्या रक्षणासाठी भैरवाची निर्मिती केली. बस्स.." कपिलने वाक्य पूर्ण केले.

"याचा आणि त्रिपुरारी पौर्णिमेचा काय संबंध?"

"याच तारकासुराची तीन मुले होती. तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. त्यांची तीन पुरे होती. त्यांना सुद्धा वर होता की जर कोणी एकाच वेळेस त्यांचा नाश करेल तरच ते शक्य आहे. अन्यथा नाही."

"पण एकाच वेळेस बाण सोडला तर कुठे अवघड होतं?" पार्थ म्हणाला. जयंती आणि शांभवी दोघीही त्यांची चर्चा ऐकत होत्या.

"पण त्यासाठी ते एका रेषेत असायला पाहिजे ना? ते तर सतत फिरत असायचे. हवेत तरंगायचे ना.." कपिल म्हणाला.

"ओह्ह.. इथे दोन गोष्टींना मानलं मी. एक.. जर हे सगळं खरंच घडलं असेल तर त्याकाळी किती पुढारलेली लोकं होती. आणि जर हे खरं नसेल तर त्यांची कल्पनाशक्ती किती पुढारलेली असेल." पार्थ म्हणाला.

"आता त्यांची कल्पनाशक्ती सोडू आणि आपल्या कल्पनाशक्तीला वाव देऊ. पुढे काय??" कपिल म्हणाला.

"पुढे महाराजांनीच आपली मदत केली आहे." जयंती म्हणाली.

"कधी आणि कशी?" तिघांनीही एकत्र विचारले.

"आपण निघायच्या आधी.. महाराजांनी आपण निघताना एक मंत्र म्हटला.. ज्याचा अर्थ होतो की प्रत्येक शक्तीपीठासाठी भैरवाला प्रसन्न करणे गरजेचे आहे. हे जर खरं असेल तर मग आधीचे स्तोत्र पण उपयोगी पडणारच ना?" जयंती म्हणाली.

"अगं पण ते किती फास्ट बोलत होते. एक शब्द समजला तर शपथ.." शांभवी म्हणाली.

"जयंती है साथ तो डरनेकी क्या बात. लावरे तो व्हिडिओ.. म्हणजे लावते मी तो व्हिडिओ." दात काढत जयंती म्हणाली.

"ताई, म्हणजे तो व्हीलॉगरचा व्हिडिओ? तू खरंच जिनीयस आहेस.." पार्थ जयंतीकडे कौतुकाने बघत म्हणाला.

"ती तर मी आहेच रे.. पण तुला सांगते कदर नाही बघ माझी." खोटे अश्रू पुसत जयंती म्हणाली.

"ए नाटकी.. लवकर सुरू कर ना व्हिडिओ." शांभवी वैतागून म्हणाली. तसं स्वतःशी काहीतरी पुटपुटत जयंतीने तो व्हिडिओ सुरू केला. आधीचे श्रीपतचे बोलणे.. नंतर महाराजांचे येणे. शांभवीला बघताच त्यांची प्रतिक्रिया बदलणं. हे सगळं परत एकदा हे अनुभवत होते. लगेचच महाराजांनी स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.

"हे नक्की काय म्हणत आहेत?" पार्थने विचारले.

"जयंती.. थोडं स्लो मोशनमध्ये ऐकता येईल का?" कपिलने विचारले. जयंतीने तो व्हिडिओ परत एकदा स्लो मोशनमध्ये सुरू केला. कपिलने पेन आणि तिकडचे वर्तमानपत्र घेतले. महाराज जे बोलत होते ते त्याने सगळं उतरवून घेतले.

"ही तर शक्तीपीठांची नावे आहेत.." कपिल म्हणाला.

"पण इथे तर दहाच नावे आहेत. काका बावन्न म्हणाले होते ना?" पार्थने विचारले.

"कदाचित या दहा ठिकाणीच जे काही असेल ते घडणार असेल.." कपिल म्हणाला.

"मग हे बरं झालं ना.. बावन्न ठिकाणी शोधण्यापेक्षा या दहाच ठिकाणी शोधता येईल." पार्थने उत्साहाने जयंती आणि शांभवीकडे बघितले. शांभवी विचारात गढली होती तर जयंती नेहमीसारखीच मोबाईलवर होती.

"इथे महत्त्वाचं काहीतरी चालू आहे आणि तुम्हा दोघींचे इथे लक्ष नाहीये." पार्थ चिडून म्हणाला.

"लक्ष आहे रे.. मी तेच शोधते आहे. ते महाराज जे म्हणाले ते एक स्तोत्र आहे.. दशमहाविद्यांची महती सांगणारे." गंभीरपणे जयंती म्हणाली.

"हे नक्की चाललंय तरी काय? आधी शक्तीपीठं नंतर नाथपंथिय आणि आता हे दशमहाविद्या.. माझं तर डोकंच गरगरायला लागलं." पार्थ म्हणाला.

"पार्थ, हे सगळं एकात एक गुंतलेलं आहे. म्हणजे बघ.. या सगळ्याची सुरुवात होते सतीपासून. आबासाहेबांनी सगळं सांगितलं पण एक गोष्ट बहुतेक ते विसरले." जयंतीचा रोजचा खेळकरपणा कुठेतरी निघून गेला होता.

"आबा, काही विसरणं शक्यच नाही." कपिल म्हणाला.

"मुद्दामून नाही म्हणत मी.. पण कधी कधी राहून जातं. चालणार असेल तर पुढे सांगू का?" जयंतीने कपिलला विचारले. गाल फुगवून त्याने मानेनेच होकार दिला.

"तर.. सती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा महादेवांनी तिला विरोध केला. कदाचित तिचं पुढे काय होणार हे त्यांना माहित होतं. तिच्याशी तेव्हा जरी त्यांचं भांडण झालं असलं तरी त्यांच्या रुक्ष जीवनात तिच्यामुळे आनंद आला होता. त्यामुळे त्यांना तिला गमवायचे नव्हते. पण सती ऐकायलाच तयार नव्हती. तिला माहेरी जायचेच होते. तिच्या महादेवांसोबत सुरू असलेल्या साधनेने काही गोष्टी तिला जमत होत्या. त्याचाच वापर करून तिने उग्र रुप धारण केले. त्या रुपाला महादेव घाबरले आणि तिथून दूर जाऊ लागले. महादेव दश दिशांना गेले आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना सतीचे वेगळे रूप दिसले. शेवटी ते थकले आणि त्यांनी तिला जाण्याची परवानगी दिली. नंतरचं सगळं आपल्याला माहिती आहेच. सतीने घेतलेली ती दहारुपे दश महाविद्या म्हणून प्रसिद्ध आहेत." बोलता बोलता जयंती थांबली.

"तुला ही एवढी माहिती आहे?" आश्चर्यचकित होऊन शांभवीने विचारले.

"मॅडम, तुम्हाला माहित नाही कदाचित पण हे माझे स्पेशल विषय होते." जयंती म्हणाली.

"ओके.. चुकलं माझं.. पण आता मला सांग. पुढे काय करायचे?" शांभवी म्हणाली.

"मी काही बोलू का??" कपिलने विचारले.

"नक्कीच. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे इथे बोलायचा." जयंती म्हणाली.

"म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की महाराजांनी आपल्याला दशमहाविद्यांचा शोध घ्यायला सांगितला आहे?" कपिलने विचारले.

"दिसते तरी तसेच आहे." खांदे उडवत जयंती म्हणाली. "त्यांनी या दशमहाविद्या सांगितल्या त्या ही एका क्रमात. मला तर असे वाटते की आपणही त्या क्रमातच शोध घ्यायला पाहिजे."

"मग.. पहिलं नाव आहे कृष्णरूपा कालिका.." कपिल आपण लिहिलेले बघत म्हणाला.

"कालीमातेचे मोठे मंदिर कोलकात्याला आहे." जयंती लगेच म्हणाली.

"तुला कसं माहिती हे तेच आहे म्हणून?" कपिल म्हणाला.

"कारण ते एक तांत्रिक शक्तीपीठ आहे." जयंतीचे शब्द ऐकताच बाकी सगळे गप्प झाले. दुसर्‍याच मिनिटात कपिल बोलू लागला,

"तिथे प्लेनने जायचे की गाडीने?"

"म्हणजे??"

"जर आपल्याला कुठे जायचे आहे ते माहित आहे तर आता घाई करूयात. फक्त एवढंच ठरवायचे आहे की जायचे कसे? गाडी, ट्रेन की प्लेन?" कपिलने विचारले.

"प्लेन.."जयंती मोबाईलशी खेळत म्हणाली.

"प्लेनने वेळ वाचेल हे खरं असलं तरी जरा महाग पडेल. पण गाडीने एवढा प्रवास कसा जमेल?" शांभवीने विचारले.

"मग??"

"आपण ट्रेनने प्रवास केला तर? तसंही आपल्याकडे सामानही कमी आहे."

"डन.. मी आत्ता तिकिटे बुक करतो." कपिल म्हणाला.

"कसं??"

"भारतीय रेल्वेने दिलेल्या तात्काल या संधीचा उपयोग करत." कपिल हसत म्हणाला.

शेवटी प्रवास सुरू होईल तर शक्तीपीठांचा की दश महाविद्यांचा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all