देवी रक्षति रक्षितः.. भाग ३४

कथा एका असामान्य मुलीची
भाग ३४

मागील भागात आपण पाहिले की शांभवीला पोतराज एक तावीज देऊन जातो. आता बघू पुढे काय होते ते.


"शांभवी, तू ओके आहेस ना?" जयंती शांभवीला उठवत म्हणाली.

"हो..." शांभवीने झोपेत हुंकार दिला आणि ती परत झोपली. तिघेही झोपायला गेले होते खरे पण शांभवी झोपेत खूप अस्वस्थ झाली होती. तिची हळू आवाजात कण्हत होती. ते ऐकूनच तिघेही उठले होते. पण काही क्षणातच शांभवी पुन्हा झोपी गेली.

"ही नेहमी अशीच करते का?" जयंतीने पार्थला विचारले.

"नाही गं. खूप रडते. ओरडत उठते. आज तसं काहीच झालं नाही." पार्थला वाटणारे आश्चर्य त्याच्या शब्दामधून दिसत होते.

"आपण सोबत आहोत म्हणून स्वप्न पडलं नसेल. चला झोपू. उद्या परत पूर्ण दिवस प्रवास आहे." कपिल जांभई आवरत म्हणाला. जयंतीने एकदा शांभवीकडे बघितले. ती शांत झोपली आहे हे बघून तिने टेबललॅम्प बंद केला.

"गुड मॉर्निंग.." सकाळी शांभवी सगळ्यांना उठवत म्हणाली.

"अगं ए.. थोडं झोपू दे ना. रात्रभर जागे होतो आम्ही." जयंती पांघरूण डोक्यावरून ओढून घेत म्हणाली.

"काय झालं होतं रात्री? मी खूप त्रास दिला का?" शांभवीने विचारले.

"तुला काहीच आठवत नाही का?" जयंतीने पांघरूण न काढता विचारले.

"नाही ना. खूप आरडाओरडा केला का मी?" शांभवी काकुळतीने विचारत होती.

"रात्री नाही केला पण आता चालू आहे. थोडा वेळ झोपू देत ना." कपिल म्हणाला.

"मी त्रास देते आहे का तुम्हाला? जा.. मी बोलतच नाही. सकाळचे दहा वाजले आहेत. मला वाटलं आपल्याला लवकर निघायचे असेल. पण जा.. मी त्रास देते आहे तर उठा जेव्हा हवं तेव्हा. मी जाते खाली." रागारागाने शांभवी तिथून निघून गेली. तिने जोरात दरवाजा आपटल्यावर तिघांचे डोळे उघडले.

"काय म्हणाली ती? दहा वाजले??? आवरा लवकर.." कपिल जोरात ओरडला.

"हळू ओरड रे.. कानाचे पडदे फाटतील माझ्या. आणि ही एवढं कधीपासून चिडायला लागली?" जयंती विचार करत म्हणाली.

"ते नंतर ठरवू. जेवढं लवकर निघता येईल तेवढं बघा आता." कपिल म्हणाला.

तिघेही पटकन उठून आवरायला लागले. इथे शांभवी मात्र रागारागाने हॉटेलबाहेर आली होती. काल रात्री तिचीही शांत झोप झाली नव्हती. पण इतर वेळेस असतो तसा अस्वस्थपणा नव्हता. ती एकटी नाहीये, हा विश्वास कुठेतरी आतून वाटत होता. विचार करत करतच ती बरीच पुढे आली होती. आता परत जायला पाहिजे असं स्वतःशीच म्हणून ती वळली. आलेल्याच रस्त्याने ती परत जायला निघाली. मगाशी विचारात असताना तिला जाणवलं नाही पण आता असं वाटत होतं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. शांभवीने चालायचा वेग वाढवला. तिला पाठीमागे बघायची सुद्धा भिती वाटू लागली. कशीतरी ती हॉटेलमध्ये येऊन पोहोचली. आत आल्यावर तिने हळूच बाहेर डोकावून बघितले. तिथे कोणीच नव्हते. तिने सुस्कारा सोडला. आणि ती रूममध्ये गेली.

"आलीस का? मला वाटलं गेलीस कलकत्त्याला चालत." जयंती हसत म्हणाली.

"मस्करी करते आहेस का माझी?" चिडून शांभवीने विचारले.

"नाही गं ताई. उलट तू बाहेर गेली होतीस तर टेन्शनमध्ये आली होती ही. तू तर मोबाईलही न घेता गेली होतीस." पार्थ म्हणाला.

"ते चिडले होते म्हणून.." शांभवी म्हणाली.

"आता तुमचा राग गेला असेल तर निघूयात का? कारण आज आपल्याला दुसर्‍या राज्यात जायचे आहे. अंधार पडायच्या आधी आपल्याला थांबावे लागेल. सो आज टाईमपास कमी. समजलं?" कपिलने विचारले.

"हो सर.. " जयंती आणि पार्थ एकत्र बोलले. सगळे पटापट निघाले.

"माझ्यामुळे काल रात्री तुमची झोप झाली नव्हती. तुम्ही सगळे आराम करा. मी गाडी चालवते." शांभवी गाडीजवळ येताच म्हणाली.

"तुम्हाला पण येते गाडी चालवायला?" कपिलने विचारले.

"थोडीफार.." काहीही वाद न घालता कपिलने शांभवीच्या हातात गाडीची चावी सोपवली. शांभवीने गाडी चालवायला सुरुवात केली. तिचं गाडी चालवणं बघून आश्वस्त होऊन कपिल पाठच्या सीटवर बसून खरंच झोपून गेला. शांभवीच्या बाजूला बसलेली जयंती पेंगू लागली होती. शांभवीने आपले लक्ष समोरच्या रस्त्यावर ठेवले होते. पाठीमागून एक कार येत होती. तिला रस्ता द्यावा म्हणून तिने आपली गाडी एका बाजूला घेतली. पण ती गाडी पुढे जात नव्हती. शांभवीला आश्चर्य वाटले. तिथे दुर्लक्ष करून तिने मॅप बघितला. समोरच दोन रस्ते फुटले होते. ती उजवीकडे वळली. ती गाडीसुद्धा तिच्यापाठी वळली. शांभवीने गाडीचा वेग वाढवला. त्याबरोबर त्या गाडीने सुद्धा वेग वाढवला. शांभवीने आरश्यात गाडीचा चालक दिसतो आहे का, हे बघायचा प्रयत्न केला. पण नाही. तिने तो नाद सोडला.

"आपण चहा प्यायला थांबू." अचानक कपिलचा आवाज आल्याने ती दचकली.

"आत्ताच तर निघालो ना आपण?" पेंगुळलेल्या जयंतीने विचारले.

"हो.. पण तरीही मला चहा प्यायचा आहे." कपिल म्हणाला. त्यानंतर आलेल्या हॉटेलजवळ शांभवीने गाडी थांबवली. पाठून येणारी गाडी पुढे गेलेली बघितली आणि शांभवीने सुस्कारा सोडला.

"तुम्ही पुढे जाऊन ऑर्डर द्या. आम्ही आलोच." कपिल जयंती आणि पार्थला म्हणाला. ते आत जाताच तो शांभवीकडे वळला.

"कोण होते गाडीत?" कपिलने थेट प्रश्न विचारताच शांभवी गोंधळली.

"तुम्हाला कसं समजलं?"

"तुम्ही जेव्हा गाडी एका बाजूला घेतली तेव्हाच मी उठलो. कोणी पाठलाग करत होतं का?" कपिलने गंभीरपणे विचारले.

"आधी वाटत होतं. पण ती गाडी गेली पुढे. सो रिलॅक्स.. चला, चहा घेऊ. नाहीतर थंड होईल." शांभवी हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. चहा घेऊन निघताना कपिलने गाडी परत आपल्या हातात घेतली. आपल्याला झाला तो भासच असावा असा विचार करत असतानाच मगाची गाडी एका वळणावर थांबलेली तिला दिसली.

"आज रात्री संभलपूरला थांबू. उद्यापर्यंत कलकत्त्याला पोहोचू." कपिलचा आवाज ऐकून शांभवीचे गाडीवरचे लक्ष उडाले.

"मग तिथे हॉटेल वगैरे बुक करायचे का?" जयंतीने विचारले.

"नको. कुठे कसा आणि किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. आपण तिथे गेल्यावरच रहायचं बघू." कपिल गाडी चालवत म्हणाला.

"ओके.." जयंती परत मोबाईल घेऊन बसणार तोच पार्थने विचारले.

"आपण आता जिथे चाललो आहोत ते नक्की काय आहे? शक्तीपीठ की दहा विद्यांपैकी एक?"

"दोन्ही आहेत. त्याठिकाणी सतीच्या उजव्या पायाची बोटे पडली होती म्हणून हे एक शक्तीपीठ आहे. तर इथे देवीच्या काली या रुपाची पूजा होते म्हणून हे दशमहाविद्यांचेही स्थान आहे." जयंती सांगू लागली. ती बोलत असताना पार्थने मोबाईल काढला. त्यात त्याने हव्या त्या गोष्टी शोधल्या.

"बापरे.. हे पण मोठंच मंदिर आहे की.. पण मला अजूनही आपल्याला इथे काय शोधायचे आहे, ते समजले नाही."

"यंत्र.. यंत्र शोधायचे आहे आपल्याला." शांभवीच्या तोंडून हे ऐकताच कपिलने करकचून ब्रेक दाबला.

"काय म्हणालात?" त्याने विचारले.

"मी म्हटलं यंत्र शोधायचे असू शकेल का? काही चुकीचं बोलले का?" शांभवी म्हणाली.

"नाही.. हेच तर आहे.. किंवा असावं. हो.. हेच आहे. हे सगळे तांत्रिक आहेत. आणि तांत्रिकांची कोणतीच पूजा यंत्राशिवाय होत नाही." कपिल खूपच उत्साहाने बोलत होता.

"यंत्र?? आता हे काय?" पार्थला आता आपण अडाणी असल्यासारखे वाटत होते.

"तू कधी कोणत्या मंदिरात गेला आहेस का?" कपिलने विचारले.

"जास्त नाही. पण हो.. गेलो आहे."

"मग अनेक ठिकाणी लोक कुबेरयंत्र वगैरे विकतात, ते बघितलं आहेस कधी?"

"हो.."

"तसंच प्रत्येक देवतेचे एक यंत्र असते. हे तांत्रिक त्या यंत्राची पूजा करतात."

"म्हणजे ते कुबेर यंत्र वगैरे पण तांत्रिक आहे?" पार्थच्या आवाजात भिती जाणवत होती.

"यंत्र कुठे नाही? हे जे होमहवन करतात ना ते ही यंत्रासारखेच असते. प्रत्येक हवनकुंडाची रचना तिथे कोणत्या प्रकारचा यज्ञ होणार याप्रमाणे करावी लागते." कपिल सांगत होता. "एक गोष्ट लक्षात घे पार्थ, प्रत्येक शास्त्र हे दुहेरी पद्धतीने वापरता येते. चांगल्या कामासाठी सुद्धा आणि वाईट कामासाठी सुद्धा. आपल्याला हे वाईट काम करणाऱ्यांपासून वाचवायचे आहे. समजलं?"

"एक तो कृष्ण, महाभारताच्या रणांगणात पार्थला गीता सांगणारा..
आणि एक हा कपिल, भर रस्त्यात गाडी उभी करून या पार्थला यंत्राची माहिती देणारा. डोळे, कान धन्य झाले." जयंती म्हणाली तसं तिच्याकडे रागाचा कटाक्ष टाकत कपिलने गाडी सुरू केली. त्याकडे दुर्लक्ष करत जयंती मोबाईलमध्ये घुसली तर शांभवी तिच्या विचारांच्या जंगलात.. 'रुद्र म्हणाला तसं आपल्याला यंत्र शोधायचे आहे का? आणि जर हे खरं असेल तर ते यंत्र कुठे असेल?'


पोहोचतील का हे सगळे सुखरूप कलकत्त्याला? पाठलाग करणारी व्यक्ती येईल का समोर? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all