देवी रक्षति रक्षितः.. भाग ५०

कथा एका असामान्य मुलीची
भाग ५०


मागील भागात आपण पाहिले की शेवटी कामाख्या मंदिराच्या निषिद्ध दालनात या चौघांना प्रवेश मिळतो. आता बघू पुढे काय होते ते.


"या दालनात प्रवेश का करू देत नसतील? या दालनात विचित्र असं काहीच दिसत नाहीये." इथे तिथे बघत पार्थ म्हणाला.

"तेच ना.. उलट इथे तर किती सुंदर मूर्त्या आहेत. मी पटापट फोटो काढून घेते." जयंती म्हणाली.

"हो.. मी आहे तुमची लाडकी व्हीलॉगर जयंती.." पार्थ जयंतीला चिडवत म्हणाला.

"कसली धमाल आली होती ना त्यावेळेस.. या सर्व घटना खूप वर्षांपूर्वी झाल्यासारख्या वाटत आहेत." जयंती म्हणाली.

"तुमच्या गप्पांचा फड नंतर रंगू देत. आता पटापट इथे काय सापडतं आहे ते बघा." कपिलने फटकारल्यावर जयंती आणि पार्थ कामाला लागले. शांभवीने आधी दालनाला फेरी मारली. ते दालन म्हणजे जुन्या नवीन गोष्टींचं एक अद्भुत मिश्रण होते. एखाद दुसर्‍या लाईटची आणि पंख्याची तिथे व्यवस्था होती. पण त्याचबरोबर तिथे काही कोनाडे होते. त्या कोनाड्यात काही वस्तू ठेवलेल्या दिसत होत्या. पार्थ एका कोनाड्याजवळ गेला. आणि जोरात किंचाळला.

"काय रे काय झालं?" तिघेही त्याच्याजवळ आले.

"तिथे.." पार्थ कोनाड्याकडे बोट करत म्हणाला. कपिल तिथे गेला. तिथे एक कवटी दात विचकत होती.

"मला असं वाटतं की इथे तांत्रिकसाधना चालत असावी. हे असं साहित्य बघून लोकांनी घाबरू नये.. म्हणून कदाचित इथे येऊ देत नसतील." बोलताना कपिलचा स्वतःच्या शब्दांवरही नसलेला विश्वास दिसून येत होता.

"तांत्रिकविधी तर त्या भूतनाथ स्मशानात देखील चालतात. पण ते कुठे गुप्त आहे?" जयंती म्हणाली.

"पण ते मंदिर नाहीये ना.. जिथे सगळेच जातात. ज्याला हवं तो जाईल. नाही तो घरी बसेल." कपिल म्हणाला. या दोघांचा वाद चालू असताना शांभवी मात्र परत तिथल्या मूर्त्या बघू लागली होती. प्रत्येक मूर्तीला ती स्पर्श करुन बघत होती.

"जयंती, कपिल, पार्थ.. जरा इकडे या." तिने हाक मारली.

"शांभवी.. ही मूर्ती कुठेतरी बघितल्यासारखी वाटते आहे." जयंती आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

"मलाही.. ही देवीची मूर्ती आणि त्याभोवती हे विंचू.." शांभवी म्हणाली.

"उमानंद..." पार्थ आणि कपिल एकत्र म्हणाले.

"उमानंद? हो.. बरोबर.. तिथे जिथे दशावतार होते तिथे ही मूर्ती होती. तशीच मूर्ती इथे का?" जयंती म्हणाली.

"ताई, वरती बघ.." पार्थने दाखवले. वरती एक श्लोक लिहिला होता..

"गुप्तदुर्गे महादुर्गे
गुप्तपापप्रणाशिनी
नमस्ते गुप्तकामाख्ये
तुभ्यं त्रैलोक्यपूजिते॥"

"याचा अर्थ काय लावायचा?" कपिलने विचारले.

"दुर्गा, महादुर्गा असलेल्या, तिन्ही लोकांत पूज्य असलेली गुप्त कामाख्या पापातून मुक्ती देते." जयंतीने अर्थ सांगितला.

"म्हणजे ती कामाख्यादेवी गुप्त आहे? मग सगळे वरती जिची पूजा करतात ते काय आहे?" पार्थने विचारले. पार्थच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नव्हते.

"मला वाटतं, आपण आधी ही मूर्ती बघू. इथे ना मला काहीतरी वेगळं वाटते आहे. पण काय , ते समजत नाहीये." शांभवी म्हणाली.

"मी बघतो.." कपिल पुढे झाला. त्याने त्या मूर्तीला चाचपलं. ती दगडी मूर्ती कितीकाळ तिथे याच अवस्थेत होती तिलाच माहीत. चाचपताना कपिलचा हात त्या विंचवाच्या डोक्याला लागला. तो लागताच आत कुठेतरी एक कळ फिरली गेली आणि कर्रर्र असा आवाज झाला. चौघेही पटकन बाजूला झाले. देवीची मूर्ती हलली. आणि खालच्या जमिनीतला दरवाजा उघडला गेला.

"किती अंधार आहे खाली.." पार्थ वाकून बघत म्हणाला.

"मोबाईलचे टॉर्च सुरु करा." शांभवीने सांगितले आणि तिने तळघराच्या पायर्‍या उतरायला सुरुवात केली.

"याआधी इथे कोणीच आले नसेल?" पार्थने विचारले.

"कदाचित कोणालाच माहित नसेल.."

"दादा, तू ज्या तांत्रिकांकडून या शक्तीपीठांबद्दल ऐकलं होतंस.. त्यांना तर हे माहित असेल ना?" चालताचालता पार्थने विचारलेच.

"पार्थ, आता ते इथे का आले नाहीत.. हे मी कसं सांगू?"

"मला असं वाटतंय.. की आधीच्या काळात जेव्हा परचक्र यायचे तेव्हा देवांच्या मूर्त्या लपवून ठेवल्या जायच्या. हे ही तसेच काहीसे असावे. आणि या अश्या गुप्तस्थळांची माहिती खूप कमीजणांना असावी." जयंती सांगू लागली.

"उतरताना हळू उतरा.. पायर्‍या निसरड्या आहेत." शांभवीने सांगितले. बोलणे थांबवून तिघेही खाली बघून चालण्याकडे लक्ष देऊ लागले. किती वेळ ते चालत होते, ते त्यांना समजत नव्हते. खाली गारवा होता. आतमध्ये पण थोडं दमट वाटत होतं. तरीही न थांबता ते चालत राहिले.

"ही साडी पण उगाचच नेसली मी." जयंती बडबडली.

"रिसर्च... यू नो.." कपिलने संधी सोडली नाही.

"तू पण ना.." जयंती वैतागली. उतार संपून ते सखल भागात आल्याचे त्यांना समजले. पण दिसत काहीच नव्हते. शांभवी एकटीच पुढे जात होती. अचानक ती थांबली. समोरच मोकळी गोलाकार जागा होती. आजूबाजूला अनेक भुयारी मार्ग दिसत होते. त्या जागेच्या मध्यभागी एक उंचवटा दिसत होता. तिथून मंद असा उजेड येताना दिसत होता. शांभवीने वेग वाढवला. ती त्या उंचवट्याजवळ पोहोचणार तोच जोरात कसलातरी आवाज आला. अचानक आलेल्या त्या आवाजाने चौघेही स्तब्ध झाले. तिथे तर लपायलाही जागा नव्हती. आणि अशा बंद ठिकाणी कोणी रहात असेल, ही शक्यता पण कमी होती. थोडा वेळ थांबून कोणी येत आहे का, हे बघितल्यानंतर परत सर्वांनी चालायला सुरुवात केली. तेवढ्यात समोर असलेल्या व्यक्तीला बघून शांभवीला धक्का बसला.

"सर, तुम्ही इथे?" समोर रुद्र आहे.. यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तो इथे आला तरी कसा? हेच तिला समजत नव्हतं.

"शांभवी, तू एकटी आहेस का इथे?" रूद्रच्या चेहर्‍यावर आश्चर्य होते.

"ती एकटी नाहीये.. आम्ही आहोत तिच्यासोबत.. हो की नाही पार्थ?" पाठून कपिलचा आवाज आला. कपिलला बघून रुद्रच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले. तो पाठी फिरला.

"सर, तुम्ही असे का वागता आहात?" शांभवीने विचारले. तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता रुद्र चालत राहिला.

"गेला तो.. आपण आता तिथे काय आहे ते बघूयात का?" कपिल पार्थला सोडून पुढे आला.

"हो.. पण सर कुठे गेले? आणि त्याहीपेक्षा आपण इथे आहोत हे त्यांना कसं समजले?"

"तू विसरलीस का? आपल्याला अशीच मूर्ती उमानंदच्या इथे दिसली होती. तो कदाचित तिथून आला असावा." कपिल म्हणाला.

"तो विषय सोडा.. आता इथे आलो आहोत तर आपलं काम पूर्ण करूयात." जयंती म्हणाली. चौघेही त्या उंचवट्याजवळ पोहोचले. वरती जशी रचना होती, तशीच इथेही होती. मधल्या खळग्यात एक छोटेसे गाठोडे होते.

"परत परिक्षा घ्यायची का?" पार्थने विचारले.

"मला गरज नाही वाटत. पण तरी हवं असेल तर तू प्रयत्न करुन बघ." कपिल म्हणाला. पार्थ जवळ जाऊ लागला. गाठोड्यातून येणारा मंद प्रकाश प्रखर झाला. पार्थ त्या वस्तूला हात लावणार तोच शांभवी जोरात ओरडली.

"नको.." पार्थ जागीच थांबला. "मला तुझ्याबाबतीत कोणताच धोका पत्करायचा नाहीये. तू लांब हो." शांभवीचा आवाज ऐकून पार्थ दूर झाला.
शांभवी पुढे आली. तिने त्या जागेला नमस्कार केला. डोळे मिटून तिने देवीची प्रार्थना केली आणि त्या वस्तूला हात लावला. प्रखर झालेली ती वस्तू परत मंद प्रकाश स्त्रवू लागली. झालेल्या गोष्टीने निशब्द असे ते आल्या वाटेने परत निघाले. शांभवीने ती वस्तू पदरात गुंडाळून हातात धरली. शेवटच्या पायरीशी उभं राहून तिने मागे वळून बघितले. इतका वेळ तेजाने भरून वाहणारी ती जागा आता निस्तेज वाटत होती. कपिल पुढे झाला. मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात त्याने तिथे बघितले. बाहेर विंचवाचे जसे शिल्प होते.. तसेच इथेही होते. त्याने ते दाबताच परत दरवाजा उघडला. चौघेही तिथून बाहेर आले. हलकासा धक्का लागताच तो दरवाजा परत लागला. दालनाचा दरवाजाही बंद होता. पार्थने तिकडची घंटा वाजवली. काही वेळातच तो माणूस परत आला. त्यांचा अवतार बघून त्याला आश्चर्य वाटल्याचे दिसत होते.

"आपके कपडे को मिट्टी?? और इनके हाथमें??" तो पुढे अजून काही विचारणार तोच जयंतीने बोलायला सुरुवात केली.

"यहाँपर चलते चलते यह गिर गई। उसके हाथ को लगा.. इसलिए उसने ऐसा हाथ रखा हैं।"

"आपकी तसल्ली हो गई है, तो हम जाँ सकते है क्या?" शांभवीने विचारले. तिचा आवाज ऐकताच त्याने होकारार्थी मान हलवली.

"हाँ, और अपने साहबसे कह दिजीए, हमारा काम हो गया है। हम वापस नहीं आयेंगे।"


शांभवीला तिसरी दैवी वस्तू मिळाली आहे. अजून सात मिळतील का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all