भाग ५१..
मागील भागात आपण पाहिले की यांना कामाख्या मंदिराच्या तळघरात एक दैवी वस्तू सापडते. आता बघू पुढे काय होते ते.
"कपिल, आबासाहेबांना फोन करुन आपलं काम झालं आहे हे सांग.. आणि मी तर म्हणते की तू आणि जयंती स्वतः जाऊन त्याचे आभार मानून या. तोपर्यंत मी आणि पार्थ हॉटेलमध्ये जातो." मंदिराबाहेर येताच शांभवी म्हणाली.
"नको.. त्यापेक्षा मी आणि पार्थ जातो. चालेल ना?"
"हो.. मला पण काही हौस नाही तुझ्यासोबत फिरायची. चल शांभवी आपण जाऊ. मी तर म्हणते की आपण तिघेही जाऊ हॉटेलवर. याला एकट्यालाच जाऊ देत तिथे." नाक मुरडत जयंती म्हणाली.
"पार्थ.. प्लीज.. चल ना रे.. माझ्यासोबत." कपिलने विनवले. पार्थची द्विधा मनस्थिती झाली. त्याने शांभवीकडे बघितले. तिने होकार देताच तो कपिलसोबत जायला तयार झाला.
"लवकर या हं.. उशीर नका करू." शांभवी म्हणाली. होकार देत दोघेही ऑफिसच्या दिशेने गेले.
"का जाऊ दिलेस पार्थला?" जयंतीने विचारले.
"तो कपिल एकटा कंटाळला असता म्हणून." शांभवी सहजतेने म्हणाली.
"तू खरंच साधी आहेस की समजून न समजल्यासारखे करतेस?" जयंतीने विचारले.
"म्हणजे?"
"काही नाही.. चल हॉटेलवर. तुझे पाय इथे उभं राहून पोळतील." शांभवीला हात लावायला गेलेल्या जयंतीने हात मागे घेतला. दोघीही मूकपणे हॉटेलवर आल्या. शांभवीने नवीन वस्तू देखील कपाटात ठेवली.
"जयंती.. रुद्रसर कपिलला बघून काहीच का नाही बोलले? आणि परत जायचेच होते तर तिथपर्यंत तरी का आले? ते ही खरंच या वस्तूच्या पाठीमागे असतील का?"
"मला काय वाटतं, ते खरं सांगू?"
"प्लीज.."
"तू गैरसमज न करुन घेता ऐकणार आहेस?" अचानक जयंतीने सावध पवित्रा घेतला.
"हो ग.. तू बोल पटकन.." त्रासिकपणे शांभवी म्हणाली.
"शांभवी, रूद्रसर आणि मी.."
"आलो.. आम्ही.. तुला माहिती आहे, त्याचा ना विश्वासच बसला नाही.. की आपलं काम एका दिवसातच झालं. त्याला ना माहिती करुन घ्यायचं होतं की आपण नक्की केलं तरी काय.." पार्थ दरवाजा ढकलून आत येऊन बोलू लागला.
"तुम्ही एवढ्या लवकर आलात ही?" जयंतीने आश्चर्याने विचारले.
"हो.. आम्ही पाचव्या मिनिटांतच तिथून निघालो. तो माणूस आमच्याकडे फोटो मागत होता बघायला.. पण तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन आला. मग आम्हीसुद्धा निघालो लगेच." पार्थ हसत होता.
"मग इथूनही लगेच निघायचे असेल, हो ना कपिल?" शांभवी म्हणाली.
"निघावेच लागेल.. मुहूर्त जवळ येत आहे. म्हणूनच तर तो रुद्र तिथे आला होता." कपिल म्हणाला.
"सर, त्याच्यासाठी तिथे आले होते.. हे तुला काय माहित?" जयंतीने विचारले.
"मग कशासाठी आला होता?" कपिलच्या प्रश्नाचे उत्तर जयंतीला देता आले नाही.
"आता सध्या यामुळे आपल्यात तरी वाद नकोत. मला तर हे समजत नाहीये.. कपिल म्हणतोय तो मुहूर्त जवळ येत चालला आहे. आत्ताशी तीन महाविद्या झाल्या आहेत. अजून सात महाविद्यांना आपण कधी आणि कशी भेट देणार? ते करेपर्यंत आपल्याला उशीर तर नाही होणार?" शांभवी टेन्शनमध्ये बोलत होती.
"हो.. पण आता मला थोडं खटकायला लागलं आहे. जर इथे कोणी शाक्तपंथीय येणार होते, तर ते आधी का नाही दिसले. आपल्याला फक्त रुद्रसर दिसले." जयंती बोलू लागली.
"ते रुद्रसर तर शांभवीला हॉस्पिटलमध्ये पण दिसले होते.. पोलिसांसोबत.. बरोबर ना?"
"दादा, आपण आपल्या खोलीत जाऊयात का? तुझे पाय बघ चिखलाने माखले आहेत." पार्थ कपिलला म्हणाला.
"चल.. आपण थोडावेळ आराम करू.. आणि मग पुढे जायला निघू. आज रात्री इथे मुक्काम नकोच. मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही." शेवटचं वाक्य कपिल जयंतीकडे बघत म्हणाला. पार्थला घेऊन तो त्यांच्या खोलीत गेला.
"तुझं काय सुरू झालं परत कपिलसोबत? मध्येच प्रेमात वाटतेस.. मध्येच रागात." शांभवीने जयंतीला झापलं.
"प्रेम.. आणि मी? ते ही त्याच्यावर? तुलाच त्याच्याबद्दल फिलिंग्स होत्या.. विसरलीस का?" लाल होत जयंती म्हणाली.
"आज आपण का वाद घालतो आहोत? सोड तो विषय. आपण काहीतरी खाऊन घेऊ आणि मग झोपूयात." शांभवी म्हणाली. खाणंपिणं, आराम झाल्यावर चौघेही निघाले. जयंती आणि कपिल एकमेकांशी बोलत नव्हते. पार्थ शेवटी पुढे बसला. जयंती आणि शांभवी मागे बसल्या.
"दादा, मॅपमध्ये कोणतं ठिकाण टाकू?" पार्थने विचारले.
"आपण तो विचारच केला नाही ना.." कपिल डोक्यावर हात मारत म्हणाला.
"डोकं असेल तर ना.." जयंती पुटपुटली.
"मला काही म्हणालीस?" कपिलने रागाने विचारले.
"मला वेड लागलंय?" जयंती उत्तरली.
"तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही.."
"मी आमंत्रण नाही दिलं.. ये बोल म्हणून."
"तुम्ही दोघं जरा शांत बसाल का? नुसती किटकिट किटकिट.." शांभवी ओरडताच दोघेही गप्प झाले.
"पार्थ, आता मॅप सुरू करू नकोस. आपण फक्त इथून बाहेर पडू. मग नंतर बघू."
"पण कोणत्या बाजूला जायचे.. ते तर माहित पाहिजे ना.. पार्थ, तू थांब रे.. मी सांगते तुला." जयंतीने महाराजांचा व्हिडिओ लावला.
"बापरे.. बगलादेवी, धुमावती, छिन्नमस्ता, भैरवी.. आता ही मंदिरे कुठे शोधायची?" जयंती म्हणाली.
"मी आबांनाच विचारतो.." राग विसरून कपिल म्हणाला. "आबा, आम्ही इथून निघतो आहोत.. आता कुठे जाऊ, जरा सांगाल का?"
"कमला.. म्हणजे पुरीच्या इथे आहे."
"आणि बाकीच्या?"
"चिरंजीव.. आधी जे सांगितलं ते करा. नंतरचं नंतर बघू. पण तिथून बाहेर पडण्याआधी मला फोन करायला विसरू नका. आजकाल तुम्ही फक्त गरज असेल तेव्हाच फोन करताय. आम्ही तुम्हाला फोन करत नाही कारण तुम्ही कधी कुठे असाल ते आम्हाला माहीत नसतं. पण आमच्या वेळा तर तुम्हाला माहित असतात ना.. मग?"
"सॉरी आबा.." कपिलचा चेहरा पडला होता.
"सॉरी ची गरज नाही. आम्हाला काळजी वाटते तुमची.. म्हणून म्हटलं. बाकी पोरी बर्या आहेत ना? आणि तो पार्थ? गोड पोरगा आहे तो."
"हो आबा.. आम्ही सगळे छान आहोत. बरं.. आम्ही आता इथून निघतो आहोत. नंतर करु का तुम्हाला फोन?"
"वाट बघतो.." आबांचा फोन ठेवताच कपिलने पार्थकडे बघितले. "मॅप सुरू कर.. जगन्नाथ पुरी टाईप करून."
"जगन्नाथ पुरी??" जयंती आश्चर्याने म्हणाली.
"मग दुसरं काही सुचतंय का?" कपिलने विचारले.
"नाही.." जयंती खिडकीबाहेर बघत म्हणाली.
************
"क्वणत्काचीदामा करिकलभकुम्भस्तननता
परिक्षीणामध्ये परिणतशरच्चन्द्रवदना।
धनुर्बाणानपाशं सृणिमपि दधाना करतलैः
पुर्तादास्तां नः पुरमथितुराहोपुरूषिका ॥
परिक्षीणामध्ये परिणतशरच्चन्द्रवदना।
धनुर्बाणानपाशं सृणिमपि दधाना करतलैः
पुर्तादास्तां नः पुरमथितुराहोपुरूषिका ॥
देवीसमोर बसलेल्या त्याने आपल्यासमोर राखेने एक यंत्र काढले होते.. स्तोत्र म्हणता म्हणता तो देवीशी बोलत होता.
"माते, साक्षात शिवाला तुझे हे शक्तीरुप एवढे आवडते की तो तुला 'अहो पुरूषिका' म्हणून हाक मारतो. चारी हातांत धनुष्य, पंचबाण, अंकुश आणि पाश धारण करणारी माते.. कधी.. कधी आपली भेट होईल?" यंत्र पूर्ण होताच त्याने टाळी वाजवली. त्याच्या बलिवेदीजवळ एक कोकरू आणले गेले. त्याने त्याच्या गळ्यात हार घातला. त्याला कुंकू लावले.. आणि शेजारचे खड्ग उचलले.
**************
"आजची रात्र आपण इथे काढू. मग उद्यापासून परत प्रवास सुरू करू. आणि शांभवी.. त्या वस्तू गाडीतच ठेवायच्या का?" कपिलने गाडी एका हॉटेलजवळ थांबवली होती.
"ते गाडीतच ठेवायला माझी हरकत नाही. पण कोणी त्याला चोरायचा प्रयत्न केला तर?" शांभवी म्हणाली.
"शांभवी, मी तुझे सामान घेऊन पुढे जाते. रुम बुक करते. मग तुमचं तुम्ही ठरवा." जयंती बॅगा उचलत म्हणाली. कपिलने तिच्याकडे बघितले. त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती पुढे गेली. शांभवीने मग तिन्ही वस्तू तोल सावरत हातात घेतल्या. त्यावर साडीचा पदर घेतला आणि ती चालू लागली.
************
अविद्यानामन्तस्तिमिरमिहिरद्वीपनगरी
जडानां चैतन्यस्तबकमकरन्दस्त्रुतिझरी।
दरिद्राणां चिन्तामणिगुणनिका जन्मजलघौ
निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवति ॥
अविद्यानामन्तस्तिमिरमिहिरद्वीपनगरी
जडानां चैतन्यस्तबकमकरन्दस्त्रुतिझरी।
दरिद्राणां चिन्तामणिगुणनिका जन्मजलघौ
निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवति ॥
समोर देवीची प्रतिमा ठेवून तो तिची आराधना करत होता.
"माते, या अज्ञानी लोकांच्या मनातील अंधार दूर करणारा सूर्य ज्या द्वीपनगरीतून उगवतो ते बेट तूच आहेस. आमच्यासारख्यांच्या इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी रत्न तू आहेस.. जन्ममरणाच्या प्रवाहातून आम्हाला बाहेर काढणारी वराह तूच आहेस. आत्तापर्यंत जशी साथ दिलीस.. तशीच साथ यापुढे ही दे."
कपिल आणि जयंतीचे भांडण मिटेल का? पुरीला पुढचा धागा यांना मिळेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा