Login

देवी रक्षति रक्षितः.. भाग ५२

कथा एका असामान्य मुलीची
भाग ५२


मागील भागात आपण पाहिले की चौघेही आता पुरीच्या दिशेने जायला निघाले आहेत. रस्त्यात तरी कपिल आणि जयंतीचे भांडण मिटेल का?


"पार्थ, आज मी गाडी चालवते.." सकाळी हॉटेलमधून बाहेर पडताना जयंती म्हणाली.

"पार्थ, मोबाईलमध्ये अंतर दाखवत आहे जवळजवळ तीस तास.. आपल्याला तीस दिवस लावायचे नाहीत." कपिल गॉगल लावत म्हणाला.

"म्हणून तर म्हटलं की मी गाडी चालवते. नाहीतर चालली आहे बैलगाडी.." जयंतीने पण सुनावले.

"मी एवढी हळू गाडी चालवतो?"

"मी म्हटलं?"

दोघांचा वाद रंगात आला असतानाच गाडी सुरू झाल्याचा आवाज आला. त्यांनी गाडीकडे बघितलं तर शांभवी ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. पार्थ तिच्या शेजारी बसला होता.

"तुम्ही येणार की इथेच भांडत बसणार?" शांभवीने विचारले. दोघेही एकमेकांकडे रागाने बघत गाडीच्या दिशेने निघाले. डिक्कीतलं सगळं सामान एकदम पाठच्या सीटवर ठेवल्यामुळे नाईलाजाने दोघांनाही मधल्या सीटवर एकमेकांशेजारी बसावे लागले.

"गणपती बाप्पा मोरया..." म्हणत परत एकदा प्रवासाची सुरुवात झाली.

"ताई, हे जगन्नाथपुरी म्हणजे आपण दरवर्षी टिव्हीवर रथयात्रा बघतो, तेच ना?" पार्थने विचारले.

"हो.. तेच.." कपिल म्हणाला.

"पण त्याबद्दल मी तर ऐकलं आहे की तिथे कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांची पूजा होते. मग तिथे शक्तीपीठ?" पार्थला आश्चर्य वाटत होते.

"हो.. आदी शंकराचार्यांच्या मते विमला हे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या तिघींचे रुप आहे. आणि तुला जसं माहित आहे की जिथे शक्तीपीठ तिथे भैरव.. जगन्नाथ हे देवी विमलाचे भैरव मानले जातात."

"मग याला शक्तीपीठ का म्हणतात?"

"कारण इथे देवी सतीची नाभी पडली होती. एक काळ होता की इथे शैव आणि शाक्त पंथाचा पगडा होता. पंच मकार इथे मोठ्या प्रमाणात अवलंबले जायचे. पण साधारण सतराव्या शतकानंतर परिस्थिती बदलली. वैष्णवपंथीय वाढले. शाक्तपंथाच्या एकेक परंपरा हळूहळू कमी होत गेल्या. ज्या देवीची पंच मकाराने पूजा व्हायची त्या देवीला आता जगन्नाथांना जो शाकाहारी नेवैद्य दाखवला जातो, तोच नेवैद्य येतो."

"एक मिनिट.. मला ही गोष्ट समजली नाही. देवाचा नेवैद्य तर एकत्रच तयार होत असेल ना? मग.."

"कसं असतं.. आपण देवासाठी जरी एकत्र स्वयंपाक करत असलो तरी जेवढे देव तेवढे वेगळे नेवैद्य करतो.. तसं इथे नाही होत. जगन्नाथाचा जो नेवैद्य आहे तोच देवीला दाखवला जातो. त्यानंतरच तो महाप्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो."

"पण हे असं का?"

"याच्यामागे अजून एक कथा आहे.."

"सांग ना दादा." पार्थने आग्रह केला. कान देऊन ऐकत असणाऱ्या जयंतीकडे एकदा कपिलने बघितलं. आणि हसून पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली.

"असं म्हणतात. एकदा शंकर वैकुंठात विष्णूंना भेटायला गेले होते. तिथे विष्णूंच्या जेवणातले काही कण पडले होते. शंकरांनी ते उचलून तोंडात टाकले. पण ते टाकताना त्यातला भाताचे एक शित त्यांच्या दाढीत अडकले. ते परत जेव्हा कैलासात परतले तेव्हा नारद तिथे त्यांची वाट बघत होते. नारदांनी ते शित खाऊन टाकले. आपला प्रसादाचा वाटा नारदांनी घेतला हे बघून पार्वती चिडली आणि ती विष्णूंकडे गेली. तिथे जाऊन तिने नारदांची तक्रार केली. ती ऐकून विष्णू हसले. ते म्हणाले, कलियुगात त्यांच्या उरलेल्या सर्व अन्नावर आधी तिचा हक्क असेल. म्हणून ही प्रथा."

"अजिबात न पटलेली कथा.." इतका वेळ उत्सुकतेने ऐकत असलेली जयंती नाक मुरडत म्हणाली.

"त्यात न पटण्यासारखे काय आहे?" कपिलने विचारले.

"पहिली गोष्ट.. शंकरांनी समजा विष्णूंचे उष्टे प्रसाद म्हणून खाल्ले असेल.. असं आपण धरून चालू.. नारदमुनींची शंकरांच्या दाढीला हात लावण्याइतकी जवळीक किंवा हिंमत होती? त्यानंतर.. जर विमला ही तिकडची देवी आणि जगन्नाथ हे तिचे भैरव आहेत.. तर दोघे एकमेकांचे पतीपत्नी झाले. आणि पार्वतीला विष्णू बहिण मानत होते. जर विमलादेवीची पूजा जगन्नाथाची पत्नी म्हणून केली जाते.. तर या गोष्टीला काय अर्थ राहिला?" जयंतीने स्वतःचे मुद्दे मांडले.

"ओ मॅडम.. मी मला ज्या गोष्टी कळल्या, मी त्या सांगितल्या. उगाच माझ्याशी भांडण्यात काय अर्थ आहे? तरी मी एक गोष्ट सांगितलीच नाही." कपिल म्हणाला.

"कोणती गोष्ट दादा?"

"हा नेवैद्य तयार करताना तिथे जर एखादं मरतुकडं कुत्र दिसलं तर तो प्रसाद ग्रहण न करता तो सगळा प्रसाद पुरला जातो. आणि परत एकदा एवढा सगळा प्रसाद बनवला जातो."

"बापरे... केवढं अन्न वाया घालवतात." पार्थ चुकचुकला.

"प्रथा, नियम.. आणि खूप काही.." कपिल म्हणाला.

"जाऊ देत.. आपण या प्रथांच्या मागे का जायचे? आपण सध्या फक्त आपल्या शक्तीपीठांचा विचार करू. इथे आपल्याला काय मिळेल आणि कुठे?" पार्थ म्हणाला.

"त्याशिवाय दुसरं काय करणार? पण जे काही आहे ते इथे बसून कसं सांगणार? तिथे गेल्यावरच समजेल ना?" जयंती म्हणाली.

"पण कपिल, तुला या शक्तीपीठाची बरीच माहिती आहे. तुला काही माहिती नाही असं म्हणाला होतास ना तू?" गाडी चालवत असलेल्या शांभवीचा प्रश्न ऐकून कपिलला ठसका लागला.

"हो.. माहित मलाही नव्हतं. पण आता तुम्ही जशी माहिती शोधत आहात तशीच माहिती मी ही गोळा करतो आहे." कपिल म्हणाला.

"चला.. बरं झालं.. त्यानिमित्ताने तरी सगळे कामासाठी मोबाईल वापरू लागले." शांभवी समोर बघत म्हणाली.


"येणार नाहीस का हॉटेलमध्ये?" स्टेअरिंगवर डोकं ठेवून बसलेल्या कपिलला जयंतीने विचारले. पार्थ आणि शांभवी पुढे गेले होते. जयंती परत सामान घेण्यासाठी म्हणून आली होती. दुपारी जेवण झाल्यानंतर कपिलने गाडी चालवायला घेतली होती. नॉनस्टॉप गाडी चालवत तो इथपर्यंत आला होता. तो ही थांबला नाही आणि कोणी त्याला थांबायलाही सांगितलं नाही. त्यामुळे तो असा बसलेला बघून जयंतीने विचारले.

"येणार ना.. तुम्ही जा पुढे. मी आबांशी बोलून येतो." वर न बघताच कपिल म्हणाला. त्याचा आवाज ऐकून जयंती त्याच्याजवळ गेली.

"बरा आहेस ना?"

"हो.."

"मग वर बघ ना.." कपिलने वर बघितले. त्याचे लाल डोळे बघून जयंतीला गलबलले.

"काय झालं?" पुढे येत जयंतीने विचारले.

"जयंती.. तू बोलणं बंद नको ना करूस माझ्याशी." कपिल व्याकुळतेने म्हणाला.

"ओके.. नाही करत.. पण काय झाले ते तरी सांगशील?" जयंतीने हसत विचारले.

"तू सोबत राहशील माझ्या? कोणत्याही परिस्थितीत?"

"कपिल, तुला शांभवी आवडत होती ना??" जयंती मागे सरकत म्हणाली.

"जयंती... कसं आणि काय सांगू तुला.. सोड.. माझं मी बघून घेईन." कपिल वैतागून म्हणाला.

"कपिल.. "

"जयंती प्लीज.. आपण नंतर बोलू. मला थोडा वेळ दे." कपिल परत स्टेअरिंगवर डोकं ठेवत म्हणाला. कपिलचा प्रश्न ऐकून भांबावलेली जयंती आपल्या खोलीत गेली.

"काय गं.. कपिल नाही का आला?" शांभवीने ती एकटी आलेली बघून विचारले.

"नाही.. तो नंतर येतो म्हणाला. शांभवी.. राग येणार नसेल तर एक विचारू?"

"पटकन विचार.."

"तुला कपिल आवडतो ना?" प्रश्न विचारताना का कुणास ठाऊक पण जयंतीचं ह्रदय खूप फास्ट पळत होतं.

"हा प्रश्न आहे??" शांभवीने आता जयंतीकडे निरखून बघितले.

"हो.." जयंती उगाचच इकडेतिकडे बघू लागली.

"कपिल.. ना.. आवडतो की.. मागेच तुला बोलले होते ना.. तूच तर चिडवत होतीस मला त्याच्यावरून." शांभवी म्हणाली.

"ह्म्म.. विसरले होते मी.." आपल्या डोळ्यात येणारं पाणी मागे ढकलण्याचा प्रयत्न करत जयंती म्हणाली.

"काय गं.. पण तुला नाही ना तो आवडायला लागला?" शांभवीने विचारले.

"छे.. तो भांडकुदळ.. नाही गं.. अजिबात आवडत नाही तो मला. मी आलेच पटकन. तू हो पुढे.. एक छानशी कॉफी सांगशील प्लीज?"

"लवकर ये.." जयंतीच्या गालाला हात लावत शांभवी म्हणाली. ती जाताच जयंतीने दरवाजा लावून घेतला. आणि इतका वेळ आवरून धरलेलं रडू कोसळलं.


"दादा.. मला ना इथल्या समुद्रकिनाऱ्यावर जायचे आहे." पार्थ मोबाईल बघत म्हणाला. कपिलचे काही उत्तर आले नाही म्हणून त्याने परत हाक मारली.

"दादा, लक्ष आहे ना तुझे? तुला बरं नसेल तर मी गाडी चालवतो." पार्थ म्हणाला.

"नको.. मी बरा आहे. मी चालवतो." गाडीचा आरसा ॲडजस्ट करत कपिल म्हणाला.


काय असेल नक्की कपिलच्या मनात? जगन्नाथपुरीला काय मिळेल या चौघांना? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all