Login

देवी रक्षति रक्षितः.. भाग ५३

कथा एका असामान्य मुलीची
भाग ५३


मागील भागात आपण पाहिले की कपिल पार्थला जगन्नाथ पुरीमध्ये असलेल्या शक्तीपीठाची माहिती सांगतो. आता बघू पुढे काय होते ते.


"कोणतेही मंदिर फोटोमध्ये किंवा टीव्हीमध्ये बघणं आणि प्रत्यक्षात बघणं यात किती फरक असतो ना.." उंचच्या उंच मंदिराकडे बघत पार्थ म्हणाला.

"हो.. ना.. कसलं भव्य आहे हे." जयंती पार्थच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली. तिने कपिलकडे बघितले. त्याचा मूड गेले दोन दिवस तसाच होता. तिनेही त्याच्याशी बोलणे टाळले होते. पण 'तू माझ्यासोबत राहशील का?' हे त्याचे शब्द तिचा पिछा सोडत नव्हते. आणि शांभवीला तो आवडतो, हे कन्फर्म झाल्यावर तर तिने त्याच्याशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवायचा, हेच ठरवलं होतं. त्याचा उतरलेला चेहरा मात्र तिला बघवत नव्हता. तिने सुस्कारा सोडला आणि पार्थसोबत ती पुढे चालू लागली.

"मस्तच आहे हे मंदिर. मला ना असं वाटतं की आपण एखाद्या मंदिरात जावे आणि तिथे कोणीच नसावे.. म्हणजे आपण त्या कलाकारांच्या कलाकृतींचा मनापासून आस्वाद घेऊ शकू. आपल्या इथे मंदिरं म्हणजे नुसती गर्दी.. देवाचं दर्शन घ्या आणि निघा. त्यासाठी तासनतास रांगा लावा.. पण क्षणभरही आजूबाजूच्या कलाकृतींकडे बघूही नका." व्यथित होऊन पार्थ म्हणाला.

"पार्थ, मला असं वाटतं आहे की तू ही आमच्यासारखेच या फिल्डमध्ये येणार." जयंती म्हणाली.

"आवडलं असतं.. पण नकोच.. जाऊ देत. मला ना हे सिंह जवळून बघावेसे वाटत आहेत. पण शक्य आहे का?" पार्थ कुरकुरत होता.

"पार्थ, देवाच्या मनात असेल तर आपण हे सगळं शांतपणे नक्कीच बघू शकू. थोडा धीर धर." इतका वेळ शांत असलेली शांभवी म्हणाली. कपिल फक्त यांचं बोलणं ऐकत होता. चौघेही मंदिरात गेले. नटमंडपात ठेवलेल्या वेगवेगळ्या मूर्ती बघत ते आत जात होते. जे जे दिसेल ते ते डोळ्यात साठवून घेत होते. तिथून ते जगमोहनात आले.

"इथे फोटो काढायची परवानगी हवी होती." पार्थ परत हळहळला.

"काही गोष्टी मोबाईलमध्ये साठवण्यापेक्षा ह्रदयात साठवून ठेवाव्यात पार्थ." खिन्नपणे कपिल म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून जयंतीने चमकून त्याच्याकडे बघितले.

"दादा, फायनली तू बोललास. तू पण ना.." कपिलच्या बोलण्याचा पार्थला झालेला आनंद दिसून येत होता.

"नशीब.. तुला तरी माझ्या गप्प बसण्याचा त्रास होतो आहे. चल.. मी तुला याची माहिती देतो." कपिल आणि पार्थ दोघेही विष्णूचे अवतार, अष्टदिक्पाल, अष्टवसू ओळखू लागले. प्रणयी युगुलांची शिल्पे बघून पार्थची नजर खाली गेली.

"मंदिरात ही अशी शिल्पे?" पार्थ कुजबुजत्या आवाजात म्हणाला.

"तू विसरतो आहेस का, एके काळी ही मंदिरे तांत्रिकपीठांचा भाग होती. ते कारण असू शकेल." शांभवीने त्याचा प्रश्न ऐकला होता. चौघेही शेवटी गर्भगृहात पोहोचले. समोरच्या उंच दगडी सिंहासनावर, रत्नवेदीवर जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रेच्या मूर्ती दिसत होत्या. बाजूलाच एक मोठे सुदर्शनचक्रही होते. देवाला नमस्कार करून ते बाहेर पडले.

"इथे आहेत तरी किती मंदिरे??" पार्थने आजूबाजूला बघत विचारले.

"मोजायची नाहीत.. आपल्याला आता सध्या विमलादेवीचं मंदिर बघायचे आहे. चल कुठे आहे ते बघू." शांभवी पार्थचा हात धरून पुढे जात म्हणाली. पूर्ण दिवसभरात पहिल्यांदाच जयंती आणि कपिल एकटे राहिले होते. जयंतीने कपिलकडे बघितले. त्याचवेळेस त्यानेही तिच्याकडे बघितले. जयंती त्याच्याकडे बघून जबरदस्ती हसली.

"तू काय मौनव्रत धरलं आहेस का?" जयंतीने विचारले. कपिल काही न बोलता पुढे चालू लागला.

"कपिल.." जयंतीने हाक मारली. कपिल थांबला.

"तुला माझ्याशीच बोलायचे नाही का?" जयंतीने परत विचारले.

"मला जे बोलायचे होते ते बोलून झाले आहे. आपण आपल्या कामावर लक्ष दिलेले बरे. पार्थ आणि शांभवी पुढे गेले आहेत. चुकामूक व्हायला नको. इथे मोबाईल पण नाहीत कोणाकडे." त्याच गंभीरपणाने कपिल बोलला.

"कपिल, शांभवीला तू आवडतोस. सध्या ती तिच्या.." जयंती बोलता बोलता थांबली.

"तिच्या.. काय तिच्या??" कपिलने विचारले.

"सध्या ती या कामात अडकली आहे म्हणून ती सांगत नसावी कदाचित. पण तिला तू आवडतोस." जयंती मान खाली घालून बोलली.

"सध्या खरंच कामावरच लक्ष देणंच योग्य राहील." कपिल चालू लागला. जयंतीसुद्धा त्याच्यापाठी गप्पपणे चालू लागली. शांभवी आणि पार्थ तिथे एका कावळ्याच्या मूर्तीजवळ उभे होते.

"कुठे राहिला होतात तुम्ही?" पार्थने विचारले.

"अरे, पायाला खडा टोचला.. म्हणून थांबलो होतो." जयंती काही बोलायच्या आधी कपिल म्हणाला.

"कोणाच्या पायाला टोचला?" शांभवीने विचारले.

"याच्या.."

"हिच्या.." दोघेही एकत्र बोलले आणि एकमेकांकडे बघू लागले.

"तो खडा निघाला की आहे अजून?" शांभवीने विचारले.

"निघाला.. म्हणून तर पुढे आलो." जयंती म्हणाली.

"मग आता पुढे जायचं.. की इथेच थांबायचं?" शांभवीने विचारले.

"चला ना.." कपिल म्हणाला.

"आत जाऊयातच.. पण मला एक प्रश्न पडला आहे की या कुंडाच्या इथे ही कावळ्याची मूर्ती कशी?" पार्थने विचारले.

"हो.. आणि इथेही एक चक्र आहे.." जयंती आता तिच्या नेहमीच्या रुपात आली होती.

"काकभुशुंडी है वह।" बाजूला उभा असलेला पंड्या म्हणाला.

"काकभुशुंडी.. नाम कही तो सुना है।" शांभवी विचार करत म्हणाली. "हा.. रामायणात.."

"बराबर.." त्या पंड्याने सहमती दर्शविली.

"पर रामायण का और इसका क्या संबंध?" पार्थने विचारले.

"लंबी कहानी है।"

"आप दक्षिणाकी फिकर मत की जिए। सिर्फ यह कहानी बताईए।" कपिल त्यांच्यासमोर पाचशेची नोट ठेवत म्हणाला. पंड्याने ती नोट घेतली आणि आनंदाने त्याने कथा सांगायला सुरुवात केली.

"एक बार दक्ष प्रजापतीने महायज्ञ किया.." त्याने बोलायला सुरुवात करताच पार्थने त्याला अडवले.

"उस बारेमें हमें सब पता है। शक्तीपीठ की बाद वाली कहानी बताईये।" पार्थचे शब्द ऐकून त्याचा मूड गेला पण कपिलचे पाचशे रुपये हातात होते. त्याने पुढचा भाग सांगायला सुरुवात केली.

"तो.. शक्तीपीठ के निर्माण के बाद महादेव खिन्न हो के भटक रहे थे। तभी यहाँपर काक भुशुंडी रामायण सुना रहे थे.. शिवजीने हंसके रुपमे वह कथा सुनी। कथा सुनने के बाद उनके मनोभाव बदल गये.. और वह तपस्या करने चले गये।"

"रामायण.. और शक्तीपीठ?? कुछ हजम नहीं हो रहा है।" जयंती म्हणाली.

"बताता हूँ। सबर किजिए। यह काकभुशुंडी अयोध्यावासी थे। बहोत बडे शिवभक्त और उतनेही वैष्णव विरोधक। एक दिन उनके गुरू जब शिवाराधना कर रहे थे.. इन्होंने गुरू को प्रणाम करनेसे इन्कार किया। इसी वजहसे शिवजीने इन्हें हजार साल सर्पयोनीमें रहने का शाप दिया। उनके गुरूजीने प्रार्थना करने के बाद शिवजीने उन्हें कहा.. की हजारो साल बाद यह रामभक्त बनकर वापस जन्म लेंगे। हजार साल बाद भुशुंडीने वापस जन्म लिया। बहोत बडे रामभक्त हुए। अब इनके गुरू थे लोमश ऋषी। एक दिन इनके साथ भी भुशुंडी का वाद हुआ। उन्होंने उसे कौआ बनने का श्राप दिया। श्राप देने के बाद उनको बुरा लगा। उन्होंने उसे वापस बुलाया। उन्हें राममंत्र दिया और इच्छा मुक्ति का वरदान दिया। उनके रामभक्ती की वजहसे श्रीरामने उनको आशीर्वाद दिया की उसे कोई मार नही सकता। जब भी भगवान राम का जन्म होता है, यह अयोध्या जाते है। भगवान राम को खेलते हुए देखते है और वापस दुसरे युगमें चले जाते है। इन्होंने सोला बार महाभारत देखा है और ग्यारह बार रामायण देखा है।"

"बापरे... पर यह जगन्नाथ पुरी क्यों आये?"

"उनको जब शाप मिला, वो यहाँसे जाते वक्त इस कुंडमे गिर गये.. बाहर आते वक्त उनको चतुर्भुज विष्णूजीके दर्शन हो गये। इसलिए आप अगर अंदर देखेंगे तो आपको यहाँपर उनका शिल्प दिखाई देगा।" चौघांनी आतमध्ये डोकावून बघितलं.. आत खरंच दोन शिल्प दिसत होती.

"पर यह इतना कुंड इतना छोटा क्यों है?" जयंतीने विचारले.

"यह बिलकुल छोटा नहीं था। इतना बडा था की नीचे जाने के लिए सिढियाँ हुआ करती थी।" पंड्याला कुंडाला लहान म्हटल्याचा राग आला होता बहुतेक."

"सिढियाँ??"

"हाँ। पहले तो यहाँपर लक्ष्मीजी और नीलमाधवकी मूर्तीभी हुआ करती थी। पर एक हादसेमें वह जमीन में अदृश्य हो गयी। और यह कुंड भी छोटा हो गया।"

"कुंड का और भी कुछ उपयोग है क्या?" कपिलने विचारले.

"यहाँ का पवित्र तीर्थ है यह। जारा पता है?" त्याने विचारले.

"नहीं।"

"वहीं.. जिसने भगवान श्रीकृष्णजी पर बाण चलाया था। उनका अंत्यसंस्कार करने के बाद कृष्ण उस जाराके सपने में गये.. और उससे कहाँ की मेरे अवशेष एक लट्ठे में बदल जाएंगे और वह सागरसे यहा आजायेंगे। इसीसे यहाँकी पहली मूर्ती बनाई गयी थी। आजभी इसमें स्नान करने से पुण्य मिलता है, ऐसा कहा जाता है।" पंडयाने आपले बोलणे संपवले.

"हम अंदर जाके माँ के दर्शन करके आते है।" शांभवी मंदिरात जाताना त्या चक्राकडे बघत म्हणाली.


इथे देवीची खास काही वस्तू असेल का? आणि असेल तर ती कुठे सापडेल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all