भाग ५४
मागील भागात आपण पाहिले की कपिल जयंतीशी बोलायला तयार नाही, त्याचे तिला वाईट वाटते आहे. आता बघू पुढे काय होते ते.
"उत्कले नाभिदेशञ्च विरजाक्षेत्रमुच्यते
विमला सा महादेवी जगन्नाथस्तु भैरवः"
मंदिरात देवीची चाललेली आराधना ऐकतच चौघे आत मंदिरात गेले. इथेही मंदिराचे चार भाग होते. रेखा देऊलाच्या बाहेरच्या भागावर फुले,वेली, प्रणयी जोडपे, सिंहविदला, गजविदला असे प्राणी कोरलेले होते. काही ठिकाणी गुरूशिष्य दाखवले होते. आठ दिक्पाल, कीर्तिमुख, देवीदेवतांची अनेक कोरलेली शिल्पे बघत चौघे पुढे जात होते.
"इथे एक गोष्ट बघितली का?" शिल्पांचे निरीक्षण करत शांभवीने विचारले.
"कोणती?"
"इथे प्रत्येक शिल्प जोडीदाराबरोबर आहे. हो ना.."
"ह्म्म.." जयंतीने एक चोरटा कटाक्ष कपिलकडे टाकला. पण तो मात्र तिथे न थांबता पुढे गेला. चौघेही गर्भगृहात पोहोचले. समोरच देवीची मूर्ती दिसत होती. एका हातात फुलांची माळ, एका हाताने आशीर्वाद देणारी आणि एका हातात अमृतकुंभ घेऊन उभी असलेली.
"शांभवी, तुला दिसलं?"
"हो.. देवीच्या आजूबाजूला नागीण, जलपरी आणि सर्पपाश दाखवला आहे." शांभवी म्हणाली. दोघी अजून निरीक्षण करणार तोच पाठून गर्दीचा रेटा आला आणि त्यांना पुढे जावे लागले.
"हे मंदिर जरा आपल्यासारखे वाटते ना.." पार्थ म्हणाला.
"आपल्यासारखे म्हणजे?" कपिलने विचारले.
"म्हणजे नेहमीसारखं मंदिर.. नाहीतर कालीघाट, तारापीठ आणि कामाख्या.. तिकडच्या तांत्रिक पूजा आणि बरंच काही. बरोबर ना, पार्थ?" जयंती मध्येच बोलली.
"शांभवी, अजून काही बघायचे आहे का इथे?" कपिलने जयंतीकडे दुर्लक्ष करत विचारले.
"कपिल, आपल्याला हवी असलेली गोष्ट कुठे असेल, हे कसं समजेल आपल्याला?"
"इथे एवढी गर्दी आहे की लगेच काही समजेल अशी अपेक्षा करणंही चुकीचे आहे. आपण हॉटेलवर जाऊन विचार करू." कपिल म्हणाला.
"मला इकडचं लोकल फुड खायचं आहे." यांचं बोलणं ऐकणारी जयंती म्हणाली.
"पार्थ तुला पण भूक लागली आहे का?" शांभवीने विचारले. पार्थने जयंतीकडे बघितले. ती त्याला हो म्हणण्यासाठी खुणावत होती.
"हो.. चालेल थोडंसं." पार्थ म्हणाला.
"मग तुम्ही दोघे जा. आम्ही जातो हॉटेलवर. असंच करायचं ना कपिल?" शांभवीने विचारले.
"नको.. आपण पण इथेच खाऊन जाऊ. अनोळख्या ठिकाणी वेगळं का रहायचे? हो ना पार्थ?" कपिलने पार्थजवळ जात विचारले. यांचं काय चालू आहे, याचा अजिबात अंदाज नसलेला पार्थ त्याला जे पटेल त्याला हो म्हणत होता.
"चालेल.. पण मग आपण संध्याकाळी परत इथे चक्कर मारायची का?"
"बघू.. कसं जमेल ते.." कपिल बाहेरच्या दिशेने जात म्हणाला.
"ताई, वरचे चक्र बघितलेस?" पार्थने अचानक विचारले.
"हो.. का रे?" शांभवीने आकाशाकडे बघत विचारले.
"आपण जगन्नाथ मंदिरातून बाहेर पडलो, तेव्हा मला ते सरळ दिसले होते. आता इथून बघतो आहे तेव्हाही सरळ दिसते आहे. हे कसं शक्य आहे?" पार्थ संभ्रमात पडला होता.
"तेच तर आश्चर्य आहे इकडचे." जयंती म्हणाली.
"चक्राचे?"
"फक्त तेच नाही. आता इथे तुला समुद्राची गाज ऐकू येते आहे का?"
"हो.."
"मंदिरात ऐकू येत होती?"
"आठवत नाही.."
"मंदिरात तुला अजिबात आवाज ऐकू येणार नाही. आता तो वर ध्वज बघ."
"बघितला.. पुढे?"
"तो कोणत्या दिशेने फडकतो आहे?"
"उलट्या?"
"हो.. हा ध्वज नेहमीच वाऱ्याच्या उलट्या दिशेने फडकतो."
"खरंच?"
"बघतो आहेस ना? मी खूप वाचलं होतं या मंदिराविषयी. म्हणून माहित आहे." जयंती म्हणाली.
"पार्थ, आपल्याला मंदिरात परत यायचे आहे. उरलेली आश्चर्ये आपण नंतर बघू. चालेल का?" कपिलने तिरकसपणे विचारले.
"चला.. मंदिरं बघणार म्हणे.." नाक मुरडत जयंती म्हणाली. यथेच्छ बाहेर खाऊन चौघेही हॉटेलवर आले. कपिल बहुतेक खूपच जास्त दमला होता. तो लगेचच झोपला. बाहेर पडल्यापासून पहिल्यांदाच पार्थ, जयंती आणि शांभवी तिघेच होते. जयंती मोबाईलवर काहीतरी करत होती. शांभवीचे तिच्याकडे लक्ष होते. करू की नको हा भाव तिच्या चेहर्यावर दिसत होता. पार्थही बेडवर लोळत होता. जयंतीने एकदा पार्थकडे आणि नंतर शांभवीकडे बघितले. ती तिच्याकडेच बघते आहे, हे बघितल्यानंतर ती कसनुसं हसली.
"काय झालं?" शांभवीने विचारले.
"कुठे काय?" जयंती खांदे उडवत म्हणाली.
"बोल पटकन.." शांभवीचा आवाज चढताच पार्थचे पण तिच्याकडे लक्ष गेले.
"शांभवी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे." जयंती आवंढा गिळत म्हणाली.
"बोल पटकन.." शांभवी हाताची घडी घालून शांतपणे म्हणाली.
"शांभवी.. रुद्रसर.."
"काय झालं त्यांचं?"
"शांभवी..."
"तुम्ही झोपला नाहीत का?" दरवाजा उघडून आत आलेल्या कपिलने विचारले. त्याचा आवाज ऐकून जयंती दचकलेली त्याने बघितले. "काही प्रायव्हेट गप्पा सुरू होत्या का?"
"नाही.. जयंती काहीतरी सांगत होती." शांभवीचे बोलणे ऐकून जयंतीने मान खाली घातली. कपिल पार्थजवळ गेला.
"मग.. मंदिरात दिसला काही क्लू तुम्हाला?"
"मलातरी वाटतंय.." शांभवी म्हणाली.
"काय??" तिघेही आश्चर्याने ओरडले.
"ओरडताय काय असे? मला वाटतंय म्हटलं.. सापडलं नाही."
"काय वाटतंय बोल पटकन.."
"हे बघ.. आपल्याला आज जिथे तिथे फक्त चक्र दिसत होते. हे विष्णूंचं क्षेत्र आहे, असे धरलं तरी.. मग त्यांची बाकीची आयुधे का नाहीत? म्हणजे शंख, गदा, पद्म? त्यात देवीच्या मंदिराच्या इथे असलेले कुंड.. तिथे असलेले चक्र आणि तिथून खाली उतरणाऱ्या पायर्या. मला आतून असं वाटतं आहे की इथे पण जे काही असेल ते त्या कुंडाच्या खाली असेल." शांभवी म्हणाली.
"पण खालीच का? इतर ठिकाणी का नाही?" पार्थने त्याची शंका विचारली.
"कारण त्या वेळेस काला पहाड नावाचा एक सरदार मंदिरांचा विध्वंस करत चालला होता. खुद्द भगवान जगन्नाथांच्या मूर्त्या त्याने जाळण्याचा हुकूम काढला होता. मग तुलनेने हे मंदिर तर लहान आहे. हे उद्ध्वस्त करायला किती वेळ लागला असता?" जयंतीने परस्पर उत्तर दिलं.
"पण.. एवढी सुंदर मंदिरे तोडायची? का?? उगाचच?" पार्थने विचारले.
"उगाचच नाही. त्याने आपल्या श्रद्धेला धक्का पोहोचतो म्हणून." शांभवी म्हणाली.
"आपल्याला आत्ता वेळ आहे की नाही माहित नाही. असता तर आपण सूर्यमंदिर बघून आलो असतो. मग तुला समजले असते. असो.. विषयांतर होते आहे. आपण मुद्द्यावर येऊ. इकडे आपल्याला कुठे आणि काय मिळेल?" जयंती म्हणाली.
"शांभवी, आपण थोडं उशीरा मंदिरात जाऊ. मग तिथे काही दिसतं का बघू." गंभीरपणे कपिल म्हणाला.
"आणि कोणी हटकलं तर?"
"तर.. तुमचे आयकार्ड दाखवा. कारण आपल्याला कामे लवकर आटपावी लागतील."
"ताई.. तुला समजलं.." काहीतरी दृष्टांत झाल्यासारखा पार्थने प्रश्न विचारला.
"काय समजायचे होते?"
"आज नवमी आहे.."
"मग? उद्या दशमी असेल, परवा एकादशी. याचा अर्थ काल अष्टमी होती." शांभवी बोलून गेली.
"तेच तर. काल अष्टमी होती. आणि तुला काहीच त्रास झाला नाही." पार्थ आनंदाने म्हणाला.
"हो रे.. मागच्या वेळेस स्वप्न तरी पडलं होतं. यावेळेस काहीच नाही. कदाचित माझं स्वप्न खरं ठरणार असावं." कपिलकडे बघत शांभवी हसली. तिचं ते हसणं बघून जयंतीच्या मात्र काळजात कळ आली.
"ए दादा, पण तू असा कसा रे अचानक आलास? मगाशी तर मस्त झोपला होतास." पार्थने विचारले.
"दोन दिवस झोपलो नव्हतो ना म्हणून डोळा लागला. सहज जाग आली. बाजूला तू नव्हतास. उठलो आणि इथे आलो. चालेल ना?" कपिलने अपराधी स्वरात विचारले.
"म्हणजे काय? आता आराम करून झाला आहे तर काय करायचे? म्हणजे लगेच बाहेर जायचे की थोड्या वेळाने?" शांभवीने विचारले.
"मंदिर लवकर बंद होतं. अंधारात काही दिसेल का?"
"आपण टॉर्च घेऊन जाऊ." जयंती परत मध्ये बोलली.
"उशीरा जायचे आहे तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तोपर्यंत काय करायचे?" पार्थ कंटाळला होता.
"आपण पत्ते खेळूयात का? माझ्याकडे आहेत." कपिलने विचारले.
"चालेल.."
"मी आलोच पटकन पत्ते घेऊन." अक्षरशः काही मिनिटांतच कपिल पत्त्यांचा कॅट घेऊन आला.
"तू पत्ते पण खेळतोस?" शांभवीने विचारले.
"हो.. कधी एकटा असलो तरी किंवा कधी कोणी सोबत असलं तरी यांच्यामुळे टाईमपास होतो. मग ठेवतो एखादातरी कॅट बॅगेत. मग वाटू पत्ते? शांभवी, तू आणि मी पार्टनर होऊ." कपिल पत्ते पिसत म्हणाला.
"मी नाही पत्ते खेळत. मी खाली जाऊन आले." मोबाईल घेत जयंती बाहेर पडली.
शांभवी की जयंती? कोणावर तरी असेल का कपिलचे प्रेम? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा