देवी रक्षति रक्षितः.. भाग ५५

कथा एका असामान्य मुलीची
भाग ५५


मागील भागात आपण पाहिले की हे चौघेही पुरीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येतात. आता बघू पुढे काय होते ते.


"जयंतीला मध्येच काय झाले?" ती गेली त्या दिशेने बघत कपिलने विचारले.

"वागते ती कधीतरी अशी.. चल पत्ते पिस." बाहेर पडणाऱ्या जयंतीच्या कानावर ते शब्द पडले. आणि इतका वेळ दाबून ठेवलेला तिचा हुंदका बाहेर पडला.


"ऑल सेट?" संध्याकाळी कपिलने विचारले.

"हो.. आम्ही तयारच आहोत. हो ना जयंती?" शांभवीने विचारले.

"हो.." जयंतीचे डोळे लाल दिसत होते.

"मी पण तयार.." पार्थ उत्साहाने म्हणाला.

"चला मग.." कपिल जयंतीकडे बघत होता. पण आता ती त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. वेगवेगळ्या मनस्थितीत ते चौघेही मंदिराच्या दिशेने निघाले.

"तिथे काय सुरू आहे?" समुद्राच्या एका टोकाला असलेली गर्दी बघून पार्थने विचारले.

"समुद्र आरतीची तयारी सुरू असेल." शांभवी म्हणाली.

"समुद्र आरती? म्हणजे?"

"जशी गंगेची आरती असते.. तशीच सूर्यास्ताच्या वेळेस इथे आरती होते."

"आपण जाऊयात का बघायला?" पार्थने विचारले.

"पार्थ, आपल्याला काम आहे.." शांभवीने दटावले.

"जाऊयात आपण.. अर्ध्या तासाने काय फरक पडणार आहे?" कपिल म्हणाला. तो पार्थला घेऊन समुद्राच्या बाजूला निघाला. नाईलाजाने जयंती आणि शांभवी पण त्याच्या पाठोपाठ चालू लागल्या. आरतीची जोरात तयारी सुरू होती. एका बाजूला अस्ताला जाणारा सूर्य आणि फेसाळते पाणी.. तर किनार्‍याच्या एका बाजूने उठणाऱ्या ज्वाळा. ते बघून जयंती विषण्णपणे हसली.

"जिथे जाऊ तिथे फक्त आणि फक्त स्मशान.. या धडाडणाऱ्या चिता.. असं वाटतंय, हेच जर अंतिम सत्य असेल तर जगण्याची ही धडपड करायची तरी कशासाठी?"

"अंतिम सत्य कधीच बदलत नाही.. म्हणूनच तर लोकांना आस असते, अमर होण्याची.. किंवा त्याच्यापलिकडे जाऊन मृत्यूला हरवण्याची." कपिल म्हणाला.

"पण इतक्या उदाहरणांवरूनही त्यांना हे समजत नाही की सगळेच मर्त्य आहेत. कधी ना कधी या अंतिम सत्याला सगळ्यांनाच सामोरे जायचे आहेच." शांभवी त्या ज्वाळांकडे एकटक बघत म्हणाली.

"तुम्ही काय बोलताय? मला काहीच समजत नाहीये.. तिथे आरती सुरू झाली." पार्थ म्हणाला. चौघेही पाठी वळले. आरतीचा नाद आणि समुद्राची गाज.. त्यामध्ये फिरणारा प्रकाशाचा झोत. जयंतीला एकदम भरून आलं. ती रडू लागली. आपण जयंतीशी बोलत नाही हे विसरून कपिल तिच्याजवळ गेला. तिची कशी समजूत काढायची हे न समजून चुळबुळत राहिला. शेवटी शांभवीने जयंतीच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोपटले.

"आईशी बोलतेस का?" शांभवीने विचारले.

"नको.. ती काळजी करत बसेल. मी ठिक आहे आता. सॉरी." डोळे पुसत जयंती म्हणाली. आरती संपताच चौघे परत मंदिराच्या दिशेने निघाले. कपिलला जयंतीसोबत रहावेसे वाटत होते पण..
चौघे रोहिणीकुंडापाशी पोहोचले. तिथे तुलनेने गर्दी कमी होती. आतमध्ये नुकतीच धुपारती झालेली दिसत होती. काही स्थानिक मंडळी तिथे दिसत होती. कपिलने दोन क्षण विचार केला आणि तो तिकडच्या पुजा काउंटरकडे गेला. त्याने शांभवीचे आयडी हातात धरले होते.

"हम भारत सरकार की तरफ से आये है।"
कपिलचं वाक्य ऐकताच समोरच्याच्या चेहर्‍यावर आश्चर्य उमटले.

"तो?"

"वो मॅडम बडी ऑफिसर है।" शांभवीकडे बोट करत त्याने दाखवले. "हम सब उनके असिस्टंट है। सरकारका कुछ काम चालू है, इसलिए हम यहाँपर आये है। आशा करता हूँ की आपके तरफसे कोई परेशानी नही होगी।" समोरच्या माणसाने काहीच न बोलता शांभवीचे कार्ड बघितले आणि एक फोन लावला. शांभवी एकटक त्याच्याकडे बघत होती. तो त्याच्या भाषेत काहीतरी बोलला. फोन ठेवून त्याने कपिलकडे बघितले.

"आप कुछ गलत काम नहीं करेंगे, ऐसी उम्मीद करता हूँ। आप यहाँपर कितने बजेतक है? अगर बाहर का दरवाजा बंद हुआ तो आप मंदिर के पीछे के दरवाजे से आकर यहाँ विश्राम कर सकते है।" तो परत आपल्या कामाकडे वळत म्हणाला. कपिल शांभवीजवळ आला. तिचे आयडी परत देत म्हणाला,

"आता आपलं काम सुरू करायला हरकत नाही." चौघे परत काकभुशुंडीच्या मूर्तीजवळ आले. चौकोनात ती आकृती अजूनही दिसत होती.

"इथेच कुठेतरी पायर्‍या असतील का?" कपिल विचार करत होता.

"सकाळी तो माणूस सांगत होता.. इथे नीलमाधव आणि लक्ष्मीची हिरेमाणकाने मढवलेली मूर्ती होती. ती ही गुप्त झाली. कुंड आणि झाड.. यामध्ये ती मूर्ती होती." विचार करत जयंती म्हणाली. त्या झाडापाशी बघूयात काही दिसतंय का?" जयंती पुढे होत म्हणाली. जयंती झाडापाशी जात असतानाच शांभवी तिथे असलेल्या चक्राकडे गेली. सगळी शक्ती एकवटून तिने ते चक्र फिरवले आणि जयंतीकडे बघितले. जयंती तिच्या जागेवर नव्हती. कपिल आणि पार्थ पळतच झाडाच्या दिशेने गेले. त्यांनी शांभवीला अंगठ्याची खूण केली. शांभवीसुद्धा झाडाजवळ गेली आणि झाडाखाली दृश्य झालेल्या पायर्‍या उतरायला तिने सुरुवात केली. खाली उतरताच तिने खालचे चक्रसुद्धा फिरवले. ते फिरवताच वरचा दरवाजा बंद झाला.

"काहीही.. हा दरवाजा असा उघडतो?" पार्थचे डोळे फिरले होते. "आणि तुला कसं समजलं हे?"

"सिक्स्थ सेन्स समज.." गूढ हसत शांभवी पुढे जाऊ लागली. भारावल्यासारखा पार्थ तिच्यापाठी चालत होता. कपिलने टॉर्च सुरू केला होता. जयंती त्याच्यामागे होती.

"आपण असं किती वेळ चालायचं?" घाबरून जयंतीने विचारले. चालताना होणारा पावलांचा आवाज तिथे घुमत होता आणि जरा भितीदायक वाटत होता.

"तुला जास्तच भिती वाटत असेल तर माझा हात धरतेस का?" कपिलने न राहवून विचारले.

"नको.." जयंती पुढे जायचा प्रयत्न करत म्हणाली. त्या धांदलीत तिचा पाय घसरला. ती पडणार तोच कपिलने तिला धरले.

"अंधार आहे.. दगडधोंड्याची वाट आहे. ऐक जरा.." त्याने जबरदस्ती तिचा हात धरला आणि चालू लागला. थोडे चालले असतील नसतील तोच शांभवी थांबलेली दिसली. समोरच सकाळी त्या पंड्याने सांगितलेली नीलमाधव आणि लक्ष्मीची मूर्ती दिसत होती. त्याच्यापाठी सुद्धा एक सुदर्शनचक्र दिसत होते. शांभवी पुढे झाली. लक्ष्मीमाधवाच्यामध्ये एक पुरचुंडी दिसत होती. ती बघून कपिलच्या चेहर्‍यावर आनंद दिसू लागला.

"आपल्याला सापडलेली ही चौथी वस्तू.." कोणाकडेच न बघता शांभवी पुढे झाली. तिने त्या वस्तूला हात लावण्याचा प्रयत्न करताच त्या वस्तूमधून झळा यायला सुरुवात झाली. तिने पाठी बघितले. कपिलच्या चेहर्‍यावरचा आनंद नाहीसा होऊन तिथे चिंता दिसू लागली होती.

"आता??" जयंतीने विचारले. शांभवीने डोळे मिटले. मनोभावे नमस्कार केला. हळूच हात पुढे केला. सहजतेने तिने ती वस्तू हातात घेतली. परत एकदा दिसलेल्या चमत्काराने तिघेही थक्क झाले होते.

"आपली एक चूक झाली." शांभवीच्या हातात ती वस्तू बघून कपिलला काहीतरी आठवले.

"काय??"

"आपण भैरवाला प्रसन्न केलेच नाही." हातात आलेली गोष्ट कोणीतरी परत हिसकावून घेतली आहे, असेच जयंती आणि पार्थला वाटले.

"त्याचा विचार आपण नंतर करू.. आता आधी इथून बाहेर पडू." शांभवी शांतपणे म्हणाली. चालत ते परत मगाच्या दरवाज्यापाशी आले. तिथे अजून एक सुदर्शनचक्र दिसत होते. कपिलने ते जोर लावून ओढले. मगाशी जे चक्र शांभवीने एकदा फिरवल्यावर हलले होते.. कपिलला दोनदा तीनदा प्रयत्न केल्यानंतर दरवाजा उघडला. चौघेही बाहेर आले. त्यांना वाटलं होतं की जास्त गर्दी नसेल. आपण सहजपणे हॉटेलवर परत जाऊ. पण नाही.. वर येताच त्यांना आरडाओरडा ऐकू आला. बाहेर येताच कपिलने आधी तो दरवाजा बंद केला. नंतर त्यांनी आजूबाजूला बघितले तर जगन्नाथाच्या मंदिरापाशी गर्दी जमली होती आणि तिथेच लोक ओरडत होते. उत्सुकतेने त्यांनी तिथून पळणाऱ्या एका सिक्युरिटीला कारण विचारले.

"कोई पागल मंदिर के ध्वज के यहाँ चढा है।" घाईघाईत बोलून तो तिथून निघाला. चौघेही मंदिराच्या दिशेने झपाझप चालू लागले. जमिनीपासून दोनशे फुटांपेक्षा उंच अश्या त्या ध्वजाच्या इथे कोणीतरी चढताना दिसत होते.

"एवढ्या उंचावर, एवढ्या रात्री कोण आणि कशासाठी चढत असेल?" कपिल पुटपुटला.

"जगन्नाथ हे विमलादेवीचे भैरव मानले जातात." शांभवी पुटपुटली. तिने परत एकदा ध्वजाच्या दिशेने बघितले. ती व्यक्ती तिथे उभी राहिलेली दिसली. तिने तिथे नमस्कार केला.. आणि तिथे काय झालं हे कोणालाच समजले नाही. त्या व्यक्तीने परत खाली उतरायला सुरुवात केली. मंदिरावर मारण्यात येणाऱ्या टॉर्चच्या उजेडात तो थोडाबहुत दिसत होता. काळे कपडे घातलेले, चेहर्‍यावर काळा मास्क.. तो खाली येताना बघून पोलीस आपल्या बंदुका सरसावून उभे राहिले. आता तो खाली उतरणार तोच...



कोण असेल देवाच्या ध्वजाच्या जागी रात्री चढणारा चोर? काय असेल तिथे नक्की.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all