देवी रक्षति रक्षितः.. भाग ५६

कथा एका असामान्य मुलीची
भाग ५६

मागील भागात आपण पाहिले की विमला मंदिरात देखील या चौघांना एक वस्तू सापडते. आता बघू पुढे काय होते ते.


"तो वेडा आहे का?? एवढ्या अंधारात, एवढ्या उंचावर चढला आहे." जयंती ओरडली.

"एवढ्या उंचावर चढला आहे.. पण कशासाठी?" पार्थ म्हणाला. शांभवी एकटक समोर बघत होती. ती व्यक्ती बरीच खाली उतरली होती. तोच समुद्राच्या दिशेने एक स्फोट झाला. सगळ्यांचं तिकडे लक्ष गेले. एका पाठोपाठ एक असे तीन स्फोट झाल्यावर इकडची गर्दी थोडी पांगली. झालेल्या धक्क्यातून बाहेर पडेपर्यंत मंदिरावर चढलेली व्यक्ती अदृश्य झाली होती. झालेल्या प्रकाराने अचंबित झालेले हे चौघे हॉटेलच्या दिशेने पटापट चालू लागले. चालता चालता समोरून येणाऱ्या व्यक्तीचा शांभवीला जोरात धक्का लागला. शांभवीने त्या व्यक्तीकडे बघितले आणि बघतच राहिली.

"सर.. तुम्ही इथे सुद्धा? तुम्ही चढला होता ना मंदिरावर??" शांभवीचा प्रश्न ऐकून रुद्र थबकला. पाठून येणारा आवाज वाढला तसा दोघेही आपापल्या दिशेने चालू लागले. हॉटेलवर जाताच शांभवीने ती वस्तू आधीच्या वस्तूंसोबत नीट ठेवली. कपिल आणि पार्थ त्यांच्या खोलीत होते. जयंती अजूनही तिच्या मूडमधून बाहेर आली नव्हती. शांभवी एकटीच विचार करत होती.

'रूद्र खरंच चढला असेल मंदिराच्या कळसावर? पण का? कशासाठी? तो कामाख्या मंदिरात पण आला होता. मला देवीच्या काही वस्तू सापडत आहेत. तो कशाच्या पाठी आहे? तो जर खरंच शाक्तपंथीय आहे तर मग मला या सगळ्यापासून तो अडवत का नाही? तोच नाही तर कोणीच.. का खरंच या वस्तूंना माझ्याशिवाय इतर कोणीच हात लावू शकत नाही? तसं जर असेल तर या वस्तूंचं मी करणार काय आहे?' विचार करुन करुन शांभवीचे डोकं दुखायला लागलं. तिने बाजूला बघितलं.. जयंती आज चक्क मोबाईल बाजूला ठेवून झोपली होती. शांभवीने सुस्कारा सोडला आणि ती ही झोपायला गेली.

"शांभवीऽऽ जयंतीऽऽ.. " कपिल जोरजोरात दरवाजा वाजवत होता.

"काय झालं?" जयंतीने डोळे चोळत दरवाजा उघडला. तिला बघून आपण कशासाठी दरवाजा वाजवला, हेच क्षणभर कपिल विसरला.

"का उठवलं एवढ्या सकाळी?" जयंतीने परत विचारले. कपिल भानावर आला.

"आबांचा फोन आला होता. इथे काल रात्री खूपच गडबड झाली आहे. कालचा स्फोट आणि मंदिरावर चढलेली व्यक्ती यांचा शोध घेतला जात आहे. आणि आपल्याकडे तर चारचार वस्तू आहेत. आपण जर पकडले गेलो ना तर.." कपिल घाबरला होता.

"आता निघाल्यावर पकडणार नाही?" पाठीमागून शांभवीने विचारले.

"गाडीत जर पकडले तर आपण आपापले आयडी दाखवू शकतो. अगदीच काही झाले तर आबा सांभाळून घेतील. आपण निघू इथून लवकरात लवकर." कपिल म्हणाला.

"थोडा वेळ दे. आम्ही पटापट आवरतो." शांभवी म्हणाली. त्या दोघांना बोलताना बघून जयंती बाथरूममध्ये निघून गेली. पटापट आवरून चौघेही तिथून निघाले. त्यांची गाडी एके ठिकाणी अडवली. पण कपिलचे आयडी बघून पुढची तपासणी झाली नाही. पुरी शहराच्या बाहेर पडताच चौघांनी हुश्श केलं..

"आधी जिथे चहा दिसेल तिथे गाडी थांबव.." जयंती कपिलला म्हणाली.

"जशी तुमची आज्ञा.." गेले काही दिवस दोघांमध्ये चालू असलेले वाद विसरून दोघेही बोलू लागले. कपिलने एका हॉटेलजवळ गाडी थांबवली. तिथे पोटभर नाश्ता केल्यानंतर सगळ्यांची डोकी काम करायला लागली.

"अजून एक शक्तीपीठ नाही.. महाविद्या झाली. आता इथून?" पार्थने विचारले.

"आधी आबांना फोन.. रोज ओरडतात मला फोन केला नाहीतर." कपिल हसत म्हणाला. बोलता बोलता त्याने आबांना फोन लावला.

"आबा, आम्ही निघालो पुरीवरून.. हो.. इथेसुद्धा एक वस्तू सापडली."

"मला आता वाटायला लागलं आहे, मी पण यायला हवं होतं तुमच्यासोबत. काय काय अनुभव घेता आहात तुम्ही मुलं." आबा फोनवर बोलत होते.

"अनुभव?? काय सांगू आता तुम्हाला?" कपिल तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

"काय म्हणालास?" आबांनी विचारले.

"काही नाही.. आता इथून निघतो आहोत. व्हिडिओ लावून बघतो, पुढे कुठे जायचं ते."

"त्यासाठी व्हिडिओची काय गरज आहे? मी सांगतो ना.. तिथून चार तासांवर तारातारिणी नावाचे मंदिर आहे. इतक्या लांब गेला आहात.. तर तिथेही जाऊन या."

"तारातारिणी.." नाव ऐकताच जयंतीने लगेच मोबाईल काढला.

"इथून चार तासांवर.. पण.." कपिलचा फोन चालू आहे, हे बघून ती गप्प बसली. तिचा उतरलेला चेहरा कपिल आणि शांभवीच्या नजरेतून चुकला नाही.

"एवढ्या जवळ आहे, तर येतो जाऊन. गणूदादा कसा आहे? तुमची काळजी घेतो ना?" कपिलने विचारले.

"आमच्यापेक्षा तुला गणूची काळजी.. होय रे.. आहे चांगला. सतत ओरडत असतो.. हे करा, ते करा." आबा म्हणाले. "बरं आता मी ठेवतो फोन. मिटिंग खोळंबली आहे माझी."

"हो आबा.." कपिलने फोन ठेवला. "काय झालं? या मंदिराचे नाव ऐकून तुझा चेहरा का उतरला?" कपिलने जयंतीला विचारले.

"तू नक्की दश महाविद्याच शोधतो आहेस ना?" जयंयीने कपिलला विचारले.

"ते तर महाराजांनीच सांगितले ना आपल्याला?"

"हो.. मग त्यामध्ये ही देवी कुठे बसते?" जयंती मगाच्याच स्वरात बोलत होती.

"हे बघ.. आबांनी जे सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. आता तुम्ही ठरवायचं, काय करायचं ते." कपिल रागात म्हणाला. दोघांमध्ये मगाशी जो मोकळेपणा होता तो परत कुठेतरी गायब झाला होता.

"जयंती, चिडू नकोस.. आपण जाऊ त्या मंदिरात. मंदिर तर आहे ते." शांभवी शांतपणे बोलली.

"प्रश्न मंदिराचा नाहीये.. कारण मंदिर म्हणशील तर इथून सूर्यमंदिर पण जवळ आहे. आपण जाणार आहोत का तिथे?"

"शक्तीपीठ असतं तर नक्की गेलो असतो. तू चिडचिड करणं बंद कर. तुला ती शोभत नाही. तू अशी चिडलीस की मला माझ्या जुन्या जयंतीची आठवण येते." शांभवी म्हणाली.

"काय बोलू मी यावर? कोणालाच मला काही सांगावेसे किंवा विचारावेसे वाटत नाही, यात दोष माझाच." जयंतीच्या डोळ्यात पाणी आले.

"प्लीज रडारडीचा कार्यक्रम नको. आपण मगाशी कशा छान मूडमध्ये होतो त्याच मूडमध्ये राहू." पार्थ म्हणाला.

"पार्थ, मी बसते गाडीत.. जिथे न्यायचं आहे तिथे घेऊन चला." डोळे पुसत जयंती पाठी जाऊन बसली. पार्थही खांदे उडवत तिच्याशेजारी जाऊन बसला. कपिलने अस्वस्थपणे गाडी चालवायला घेतली.

"चार तासांचा प्रवास आहे. दादा, बाकी काही नाही तर गाणी तरी लाव." मोबाईल खेळून कंटाळलेला पार्थ म्हणाला.

"कोणाला त्रास होणार नसेल तर लावतो." आरसा ॲडजस्ट करत कपिल म्हणाला.

"मला चालेल.. थांब मीच लावते." शांभवीने पुढे होत रेडिओ सुरू केला.

"छुपाना भी नहीं आता..
जताना भी नहीं आता..
हमें तुमसे मोहोब्बत है..
बताना भी नहीं आता.." कुमार सानू गाणं म्हणत होता. आणि ते ऐकून जयंतीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले होते.

"मला ना एक प्रश्न पडला आहे.." पार्थ म्हणाला.

"पार्थ, एवढे प्रश्न तुला कॉलेजच्या अभ्यासाबद्दल पडले असते तर पहिला आला असतास." शांभवी हसत म्हणाली.

"ताई.. काहीही बोलू नकोस हं.. पहिल्या पाचात नेहमीच असतो मी." गाल फुगवत पार्थ म्हणाला.

"हो रे.. मस्करी करत होते तुझी.. बोल.. काय प्रश्न होता."

"दोन शक्तीपीठांची नावे सारखी का? म्हणजे आता आपण बंगालमध्ये गेलो ते तारापीठ आणि ही सुद्धा तारा? लोकं कन्फ्युज नाही होणार का?"

"ते होतील ज्यांना याबद्दल जास्त माहिती नाही ते.." शांभवी म्हणाली.

"मग आपण पण झालो का?" पार्थने विचारले.

"म्हणजे??"

"हे ऐक.." पार्थने परत महाराजांचा व्हिडिओ लावला. ते म्हणत होते,

"कृष्णरुपा कालिका स्यात्,
रामरुपा च तारिणी.." पार्थने व्हिडिओ पॉज केला.

"महाराज, तारिणीच म्हणाले होते का?" पार्थचा प्रश्न ऐकून सगळेच विचारात पडले.

"पण ते जर तारिणी म्हणाले असतील तरीही मग त्या शक्तीपीठात आपल्याला आलेला तो अनुभव?" मगाची निराशा विसरून जयंतीने संभाषणात परत भाग घेतला.

"इथे काली आणि कालिका पण वेगळ्या दिल्या आहेत." पार्थने परत सांगितले.

"हे खूपच विचित्र आणि गुंतागुंतीचे होते आहे." शांभवी म्हणाली.

"विचित्र वरून आठवलं.. शांभवी काल गर्दीत तू कोणाशी बोलत होतीस?" कपिलने विचारले.

"कधी?"

"ते नाही का.. रात्री आपण त्या तळघरातून निघालो. आणि मंदिरावर कोणीतरी चढलं होतं तेव्हा. आम्ही तिघं मागे राहिलो होतो. तू एकटीच पुढे गेली होतीस.." कपिल म्हणाला.

"ते.." शांभवीच्या डोळ्यासमोर परत रुद्र आला. त्याची ती नजर..

"ते मला त्या माणसाचा धक्का लागला म्हणून बोलले.. बस.." शांभवी खिडकीबाहेर बघत म्हणाली.


शांभवी का लपवत असेल रुद्रचं तिला भेटणं.. नक्की काय चालू आहे तिच्या मनात? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all