भाग ५७
मागील भागात आपण पाहिले की चौघेही आता तारातारिणी मंदिरात निघाले आहेत. जयंतीला काहीतरी खटकते आहे. तिचा अंदाज बरोबर असेल का?
"मला ना हे मंदिर कमी आणि पिकनिक प्लेसच जास्त वाटते आहे. आपण इथे दोन दिवस फक्त आराम करूयात?" मंदिराच्या पायथ्याशी पोहोचल्यावर पार्थने विचारले.
"पार्थ..." शांभवीने डोळे मोठे केले.
"बरं.. एक दिवस तरी? मी खूप थकलो आहे गं.. सवय नाही एवढ्या दगदगीची. इतर मंदिरात काहीच बोलता आले नाही. पण हे ठिकाण कसलं सूपर्ब आहे. हा डोंगर, वाहणारी नदी.. ते सुबक मंदिर. तुला नाही का वाटत, फक्त एक दिवस तरी हे सगळं बाजूला ठेवून मजा करावी?"
"नाही.. जोपर्यंत आईबाबांची शपथ पूर्ण होत नाही तोपर्यंत मी मजा करणार नाही." शांभवीच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. ते ऐकून कपिल चमकला.
"कसली शपथ शांभवी?"
"पूर्ण झाल्यावर नक्कीच सांगेन. तू नको त्रास करुन घेऊ." शांभवी म्हणाली.
"मी जरा एक फोन करून येते." गाडीतून उतरत जयंती म्हणाली. ती बाहेर पडली आहे हे बघून सगळेच गाडीतून उतरले.
"पार्थ, हॉटेल इथे बुक करायचे की वर?" एक डोळा जयंतीकडे ठेवत कपिलने विचारले.
"वरती मिळालं तर मजा येईल.. हो ना ताई?" पार्थने शांभवीला विचारले.
"कुठेही चालेल. पार्थ, पाणी घेऊन येतोस का रे? पाणी संपलेलं दिसतंय आपलं."
"आलोच.." पार्थ समोरच्या दुकानात गेला. कपिलही जयंतीच्या आजूबाजूला घुटमळत होता. शांभवी त्यांच्याकडे बघत होती. तोच तिथून एक गाडी पुढे गेली. शांभवीने खात्री करण्यासाठी परत एकदा बघितले. आणि तिची खात्री पटली.. रुद्र परत इथेही आला होता. तिचा हात मोबाईलकडे गेला..
"ताई.. पाणी.. हे थंड, हे साधं." पाण्याच्या बाटल्या शांभवीकडे देत पार्थ म्हणाला. कितीतरी दिवसांनी ते दोघेच होते. त्याच्या रापलेल्या चेहर्याकडे बघून शांभवीला कसंतरीच झालं.
"माझ्या निर्णयाचा खूप त्रास होतो आहे का रे तुला?" त्याच्या गालावरून हात फिरवत शांभवीने विचारले.
"असा विचारही करु नकोस. आईबाबांनी सांगितले होते, ना तुझे ऐकायला. आणि ताई.."
"बोल ना.."
"ते बाबांनी मला एक पाकीट दिले होते. उघडावेसे वाटते आहे." पार्थ खाली मान घालून म्हणाला.
"बाळा, बाबांनी ते अगदी गरज असेल तर उघड असं सांगितलं आहे ना.. मला माहिती आहे, तुला त्यांची खूप आठवण येते आहे. हे सगळं संपलं ना.. की मी प्रयत्न करेन तुला तुझं आधीचं आयुष्य परत देण्याचा." शांभवी पार्थला जवळ घेत म्हणाली. कितीतरी दिवसांनी पार्थ शांभवीच्या कुशीत शिरून रडला.
"पार्थ, मोठा झालास तरी अजून तुझ्यातलं हे लहान मूल असं रडू लागतं का?" पार्थचे डोळे पुसत शांभवी म्हणाली.
"ताई... मला खरंच खूप आठवण येते आहे आईबाबांची."
"ती तर मलापण येते रे.. पण जोपर्यंत त्यांच्या खुन्याला शोधून काढत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही." पार्थच्या केसातून हात फिरवत शांभवी म्हणाली.
"बहिणभावांच्या गप्पा रंगलेल्या दिसत आहेत." कपिल कधी जवळ आला ते दोघांना समजलेच नाही.
"सहजच.. खूप दिवसांनी दोघेच होतो म्हणून जरा.." शांभवी म्हणाली.
"बरं.. गाडी वरपर्यंत जाते. वरती हॉटेलचं बुकिंग मिळते आहे. आपण वरतीच थांबूयात ना?" कपिलने विचारले.
"चालेल की."
"या पायर्या??" पार्थने मध्येच विचारले.
"नऊशे नव्याण्णव पायर्या आहेत. काहीजण जातात चढून." कपिल उत्तरला.
"मग मी ही चढूनच येते." शांभवी पायर्यांकडे बघत म्हणाली.
"कुठे चाललीस?" फोन संपवून आलेल्या जयंतीने विचारले.
"फायनली झाले का तुझे फोनवरचे बोलणे?"
"आईचा फोन होता. कालपासून ती फोन करत होती."
"अगं ए.. एवढ्या स्पष्टीकरणाची गरज नाही. मी सहज विचारलं. बाय द वे.. मी या पायर्या चढून जाते आहे. तू काय करतेस?"
"मी पण तुझ्यासोबत आहे." कपिलकडे नाराजीने बघत जयंती म्हणाली.
"मी पण मग चालतच.." पार्थ म्हणाला.
"अरे ए.. तू कुठे चाललास मला सोडून? मी एकटा गाडी चालवत येऊ का?" कपिल वैतागून म्हणाला.
"मीच यायला हवे का? तू या दोघींपैकी कोणाला तरी विचार की.." पार्थ नाराज होत म्हणाला.
"नको.. तूच बरा. तू मला समजून तरी घेतोस. तुम्ही दोघी या.. तुमच्या स्पीडने. आम्ही दोघं जातो पुढे. बाय.." पार्थला विचार करायची संधीही न देता गाडीत बसवत कपिल म्हणाला. ते दोघे पुढे जाताच जयंती आणि शांभवी पायर्यांच्या दिशेने निघाल्या. चढायला सुरुवात करण्याआधी शांभवीने आधी पायरीला नमस्कार केला. तिचे अनुकरण करत जयंतीने सुद्धा नमस्कार करुन पायर्या चढायला सुरुवात केली.
"जयंती, रुद्रसर इथे आले आहेत." शांभवी पायरी चढता चढता म्हणाली.
"तुला कसं समजलं?" जयंतीने विचारले. "म्हणजे कळलं म्हणायचं होतं.."
"त्यांची गाडी दिसली. तुला आठवतं मागेसुद्धा ते मला भेटले होते. ही तीच गाडी होती." शांभवी शांतपणे चढत होती.
जयंती काहीच बोलत नाही, हे बघून शांभवी परत बोलू लागली.
जयंती काहीच बोलत नाही, हे बघून शांभवी परत बोलू लागली.
"सर तुझ्या संपर्कात आहेत का?"
"मला दम लागतो आहे. आणि पार्थ त्या कपिलसोबत गेला आहे. मला ना थोडं टेन्शन आलं आहे. आपण नंतर या विषयावर बोलू." शांभवीची नजर चुकवत जयंती म्हणाली. त्यानंतर न बोलता दोघी पायर्या चढून वर आल्या. प्रवेशद्वाराशीच कपिल गाडी घेऊन उभा होता.
"हॉटेल नाही का बुक केले?" एवढ्या पायर्या चढल्याने श्वास फुललेली जयंती म्हणाली.
"हॉटेल बुक झाले. सामान खोलीत शिफ्ट करुन झाले. आम्ही तुम्हाला घ्यायला आलो." पार्थ म्हणाला.
"तूच रे भावा तूच.. पण मी काय म्हणते हॉटेलवर जाण्याआधी इकडचं थोडं लोकलफुड खाऊन बघूयात का? भूक लागली आहे रे." जयंती म्हणाली.
"लगेच शोधू.. चल.." पार्थ उत्साहाने म्हणाला.
"अरे हो.. जरा हळू. आत्ताच हा भलामोठा डोंगर चढून आले ना.." जयंती पार्थला दम देत म्हणाली. दोघे तिकडे दिसणार्या टपरीकडे चालत गेले. कपिल त्यांच्याकडे बघून हसला.
"चल, आपण दोघेपण जाऊ तिकडे."
"हो.. मलापण चहाकॉफी काहीतरी हवंच आहे."
"ते जयंतीचे काय झाले? मगाशी रडली.. नंतर हसली. काही झालं आहे का?" कपिलने सहज विचारल्यासारखं केलं.
"हो.. घरून फोन होता तिच्या."
"खुशालीचा ना?"
"नाही.. तिच्या आईने स्थळ बघून ठेवले आहे. त्यावरूनच झाले काहीतरी बहुतेक."
"स्थळ.. अचानक?"
"अचानक नाही रे.. त्या कधीपासून मागे लागल्या आहेत..पण हिच ऐकत नाही. पण आता त्यांनी लग्न बहुतेक ठरवूनच टाकले आहे. म्हणूनच जरा तिची मानसिक आंदोलने सुरू आहेत. तू काळजी नको करूस." शांभवी कपिलला म्हणाली.
"मी.. कशाला काळजी करू? कॉफी सांगू ना?" चहानाश्ता करुन चौघे हॉटेलजवळ आले. आत जाताना शांभवीला आठवले.
"अरे.. त्या वस्तू?"
"त्या गाडीतच आहेत. एवढं जड कसं उचलतेस तू?" पार्थ म्हणाला.
"जड??"
"हो.. तो माठ फक्त उचलायचा प्रयत्न केला मी.. पण शक्यच नाही झालं."
"तुला काही झालं नाही ना?" शांभवीने काळजीने विचारले.
"नाही.. मी आधी तू करतेस तसा नमस्कार केला होता."
"पण तुला हे करायला कोणी सांगितलं होतं? पार्थ, एक गोष्ट लक्षात ठेव. तू माझी जबाबदारी आहेस. तुला काहीही झालेलं मला चालणार नाही. त्यामुळे हे असले प्रकार परत करायचे नाहीत." शांभवी संतापली होती. "तो लहान आहे. तू तर मोठा आहेस ना? तुला नाही का समजलं?" शांभवी कपिलला ओरडू लागली.
"शांभवी.. शांत हो.. काही झालेलं नाही. आपण रूमवर जाऊ." जयंती मध्ये पडत म्हणाली.
"ही एवढी चिडते?" कपाळावरचा घाम पुसत कपिलने विचारले.
"माझ्यावर पहिल्यांदाच एवढी चिडली." शांभवीच्या वागण्याचे आश्चर्य वाटलेला पार्थ म्हणाला.
"आपण इथे आलो.. पण या शक्तीपीठाची आपल्याला काहीच माहिती नाही. हो ना दादा?" शांभवीचा राग थोडा शांत झाला आहे हे बघून जेवताना पार्थने विषय काढला. ते ऐकून कपिलला ठसका लागला. तो टेबलवरून उठणार तोच जयंतीने समोर पाण्याचा ग्लास धरला. नजरेनेच तिचे आभार मानत कपिलने तो ग्लास तोंडाला लावला.
"इथे सतीचे स्तन पडले होते.. म्हणून इथे दोन देवींची पूजा केली जाते, तारातारिणी स्वरुपात.." जयंतीने उत्तर दिले..
"इतनाही नहीं है.. इसके आगे और भी कुछ है। सुनेंगे??" बाजूने एक आवाज आला.
इथे आता अजून काय असणार आहे? किती लांबेल यांचा प्रवास? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा