देवी रक्षति रक्षितः.. भाग ५८

कथा एका असामान्य मुलीची
भाग ५८

मागील भागात आपण पाहिले की पार्थ देवीच्या वस्तूंना हात लावायला जातो हे ऐकून शांभवी त्याच्यावर आणि कपिलवर चिडते. आता बघू पुढे काय होते ते.


"आप???" कपिलने विचारले.

"मी.. वेदांत.. देवीचा एक भक्त." त्याला मराठीत बोलताना बघून चौघेही चक्रावले.

'तुम्हाला मराठी येतं??" आश्चर्याने पार्थने विचारले.

"महाराष्ट्रातला आहे.. मग मराठी येणारच ना." तो हसत म्हणाला.

"किती बरं वाटलं सांगू, मराठी ऐकून.. नाहीतर न समजणार्‍या भाषा ऐकून डोकं दुखायला लागलं होतं." पार्थ म्हणाला. यावर परत एकदा वेदांत हसला.

"बोला.. अजून काय माहिती हवी होती तुम्हाला या शक्तीपीठाची?"

"माहिती म्हणजे?? इकडची एखादी कथा.. इथे असलेल्या भैरवाची माहिती.. असं काहीतरी." पार्थ म्हणाला.

"याआधी किती शक्तीपीठे फिरला आहात?"

"तुळजापूरचे धरले तर हे सहावे.." जयंती मोजत म्हणाली.

"याचा अर्थ शक्तीपीठ म्हणजे काय, हे तुम्हाला माहित आहेच. तर इथे सुद्धा देवीचा एक अवयव पडल्याने शक्तीपीठ निर्माण झाले. पण इकडे लोकांमध्ये अजून एक दंतकथा आहे.."

"सांगा ना.." पार्थने आग्रह केला.

"सतराव्या शतकाच्या आसपास इथे वसु प्रहराज नावाचे एक विद्वान रहात होते." वेदांतने सांगायला सुरुवात केली. "त्यांना मूलबाळ नव्हते. ते देवीचे परमभक्त होते. एक दिवस दोन मुली त्यांच्या घरी आल्या आणि राहू लागल्या. प्रहराजांना त्याचे आश्चर्य वाटले. पण हळूहळू ते ही त्या दोघींवर आपल्या मुलींसारखे प्रेम करु लागले. काही वर्ष तिथे राहून अनेक चमत्कार केल्यानंतर दोघी अचानक गुप्त झाल्या. आपल्या मुली कुठे गेल्या या विचाराने वसुराज बेचैन झाले. त्यांनी त्या दोघींचा खूप शोध घेतला पण त्या सापडल्या नाहीत. हताश होऊन त्यांनी देवीची आराधना सुरू केली. वसुराजांच्या स्वप्नात मग तारातारिणी माता आली. तिने त्यांना सांगितले की तुला मूलबाळ नव्हते म्हणून मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी खुद्द देवीच आली होती. ते ऐकून वसुराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवीने मग त्यांना या मंदिराची व्यवस्था बघायला सांगितली. वसुराजांनी मग इथे मंदिराची डागडुजी केली. इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी धर्मशाळा वगैरे बांधल्या. तुम्ही आजही इकडच्या लोकांच्या घरी गेलात तर तुम्हाला या देवींची पूजा होताना दिसेल." गोष्ट ऐकताना शांभवीच्या कानात तिच्या आईबाबांनी सांगितलेली कथा ऐकू येऊ लागली. 'देवीचा प्रसाद म्हणून तुझा जन्म झाला आहे.' त्या माणसाने देवीच्या मंदिराची डागडुजी केली. शांभवीच्या डोळ्यासमोर एक मंदिर येऊ लागले. एका डोंगरावरचे छोटेसे मंदिर.. तिकडची देवीची प्रसन्न मूर्ती.. तिची पूजा करणारी ती व्यक्ती.. तिने त्या व्यक्तीला पहायचा प्रयत्न केला पण नाही दिसली. तिने शेवटी तो नाद सोडला.. तोच तिला एक आवाज ऐकू आला, "शांभू.. आता ऐकलं नाहीस तर फटका मिळेल हं.."

मनावरचा ताण असह्य होऊन शांभवी बेशुद्ध झाली.

"ताई.."

"शांभवी.." तिघेही तिच्याकडे धावले. वेदांतने पाणी आणले. तिच्या तोंडावर शिंपडले.

"काय गं.. बरी आहेस ना? शांभवी?" जयंती काळजीने विचारत होती. पार्थ बिचारा इवलेसे तोंड करून बसला होता.
हळूहळू शांभवीने डोळे उघडले. ते बघताच सगळ्यांच्या जीवात जीव आला.

"डॉक्टरकडे जायचं का?" कपिलने विचारले.

"नाही.. मी बरी आहे." उठून बसायचा प्रयत्न करत शांभवी म्हणाली.

"मग अचानक कसला त्रास झाला?"

"कदाचित जास्तच दगदग झाली असेल. मी जरा रूमवर जाऊन आराम करते." शांभवी म्हणाली.

"अगं पण जेवण?" जयंतीने विचारले.

"एखादं सँडविच पॅक करून आणशील? मी दरवाजा उघडा ठेवते. तुमचं झालं की या.." शांभवी घाईघाईत तिथून निघाली. पार्थ तिच्यापाठी जाणार तोच त्याला कपिलने थांबवले.

"तू खाऊन घे.. मग आपण जाऊ. तिला थोडा वेळ आराम करु देत." नाईलाजाने पार्थ परत खाली बसला. शांभवी पटापट चालत तिच्या खोलीत आली. जयंतीसाठी तिने दरवाजा लॉक केला नाही. ती बेडवर येऊन बसली. तिने डोळे बंद केले. तिच्या डोळ्यासमोर परत ते जोडपं आलं. ते अगदी जवळचं वाटत होतं.. आणि त्यांची ती शांभवी म्हणून मारलेली हाक. अगदी आतपर्यंत जाऊन झिरपली. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. दरवाजा उघडण्याचा आवाज आला.

"जयंती.." ती पुढे काय बोलणार तोच तो तिच्याजवळ येऊन बसला.

"जयंती नाही.. मी आहे.." रूद्रचा आवाज ऐकून शांभवीने डोळे उघडले. तो अगदी तिच्याजवळ बसला होता. तिला त्याचा राग यायला हवा होता. त्याऐवजी तिने त्याला मिठी मारली आणि ती हमसून हमसून रडू लागली. काही न बोलता त्याने मिठी घट्ट केली. शांभवीला अचानक शांत वाटले. इतके दिवस जी अपूर्णत्वाची जाणीव होत होती आज ती नाहीशी होऊन स्वतःला पूर्णत्व झाल्यासारखे तिला वाटले. तिचे रडणे हळूहळू थांबले. ती रुद्रच्या मिठीतून बाहेर पडली. त्याने रुमालाने तिचे डोळे पुसले. तिच्यासमोर पाण्याची बाटली धरली. काहीच न बोलता शांभवीने ती बाटली तोंडाला लावली.

"आता तरी सांगाल, तुम्ही नक्की कोण आहात ते? आणि इतके दिवस लांब लांब राहणारे तुम्ही आजच इतके जवळ कसे आलात?" शांभवीने विचारले.

"बोलायचं खूप काही आहे. पण कोणत्याही क्षणी ते तिघं इथे येतील. आज तुझी अवस्था खूपच बिघडली म्हणून मला इथे यावे लागले. थोडा धीर धर.. लवकरच तुला सर्व समजेल." रुद्र बोलत असतानाच त्याचा मोबाईल वाजला.

"मी निघतो.. फक्त विश्वास ठेव माझ्यावर. एकदा झालेली चूक मी पुन्हा करणार नाही." शांभवीच्या कपाळावर ओठ टेकवत रुद्र म्हणाला. शांभवीने डोळे मिटून घेतले. तिच्या मिटलेल्या डोळ्यातून परत पाणी वाहू लागले.

"ताई.. तू अजून रडते आहेस?" पार्थ आत येत म्हणाला. शांभवीने डोळे उघडले. समोर पार्थ, जयंती आणि कपिल चिंताक्रांत चेहर्‍याने उभे होते. तिने आजूबाजूला बघितले. रुद्र दिसत नव्हता. तो खरंच आला होता की आपल्याला परत भास झाला? तिला काहीच समजेना.

"ताई.." पार्थ काळजीने तिच्याजवळ येऊन बसला.

"मी बरी आहे. जा.. तू पण जाऊन झोप. मगाशी म्हणत होतास ना, खूप दगदग झाली म्हणून. आपण उद्या बोलू." त्याच्या डोक्यावरून हात फिरवत शांभवी म्हणाली. तिने कपिलकडे बघितले. कपिल पार्थला घेऊन त्यांच्या खोलीत गेला. जयंती तिचं आवरायला जाताच शांभवी झोपण्यासाठी कुशीवर वळली. समोरची वस्तू बघून तिच्या चेहर्‍यावर हसू उमटले. ते हातात धरून तिने डोळे बंद केले. आता मात्र कसलाच भास न होता तिला शांत झोप लागली.

"शांभवी, उठतेस का?" जयंतीने शांभवीला हलकेच उठवत विचारले.

"हो.. उठलेच."

"बरी आहेस ना आता?"

"खूप छान आहे. चल.. आवरून मंदिरात जाऊन येऊ. तेवढाच फेरफटका." शांभवी हसत म्हणाली. शांभवीचं आवरून होईपर्यंत कपिल आणि पार्थही आले होते. त्यांच्या चेहर्‍यावर शांभवीबद्दल वाटणारी काळजी दिसून येत होती.

"तुम्ही सगळे मी खूप आजारी असल्यासारखे का वागत आहात? मी ओके आहे आता." शांभवी म्हणाली.

"हो.. पण तरीही.. आज बाहेर नको जायला. इथेच बसू." पार्थ म्हणाला.

"अजिबात नाही हां.. इथेच बसलो तर मला तुम्ही सर्व आजारी पाडाल. नकोच.. चला पटकन बाहेर." शांभवी आग्रह करत म्हणाली. नाईलाजाने ते तिघेही बाहेर पडले.

"मॅडम, कश्या आहात तुम्ही?" हॉटेलच्या बाहेरच वेदांत उभा होता.

"तुम्ही आमची वाट बघत होता का?" थोड्या संशयानेच कपिलने विचारले.

"वाट अशी नाही.. मी इथेच मंदिरातच असतो. काल या ज्याप्रकारे बेशुद्ध पडल्या, मलाच कसेतरी वाटले. म्हणून आज इथे उभा राहिलो." वेदांतने स्पष्टीकरण दिले.

"ती बरी आहे आता." जयंती म्हणाली.

"मंदिरात निघालात का?" वेदांतने विचारले.

"हो.." जयंतीला त्याच्या चौकशा अनाठायी वाटत होत्या.

"तुमची हरकत नसेल तर मी येऊ? अनेक वर्ष इथे राहतो आहे. माहिती आहे काही काही." वेदांत म्हणाला. त्यावर चौघांनीही एकमेकांकडे बघितले.

"अरे गैरसमज नका करुन घेऊ.. मी सहजच म्हणालो. तुम्हाला नाही आवडलं तर ठिक आहे." वेदांत परत जायला वळला.

"तुम्ही चला आमच्यासोबत. चालेल आम्हाला." शांभवीचे शब्द ऐकताच वेदांत आनंदला.

"थॅंक यू मॅडम.. कसं सांगू तुम्हाला? किती छान वाटतं आपल्या माणसांसोबत रहायला." वेदांत आनंदाने म्हणाला.

"पण मग इथे राहिलात का?" शांभवीचा प्रश्न ऐकून वेदांत गप्प झाला.


खरंच आला असेल का रुद्र शांभवीजवळ? कोण असेल हा वेदांत? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all