Login

देवी रक्षति रक्षितः.. भाग ५९

कथा एका असामान्य मुलीची
भाग ५९


मागील भागात आपण पाहिले की शांभवीला काही गोष्टी आठवू लागतात. ते सत्य आहे की भास?


"इथे का राहिलो? असं समजा.. देवीनेच मला इथून कुठे जाऊ दिलं नाही." वेदांत कुठेतरी बघत म्हणाला.

"म्हणजे नक्की काय झालं?" जयंतीने विचारले.

"एक्कावन्न शक्तीपीठांचे दर्शन घ्यावे म्हणून घराबाहेर पडलेलो मी.. अनेक गोष्टी घडत गेल्या. काही चांगल्या तर काही वाईट. आणि इथे आलेलो मी परत जाऊच शकलो नाही." वेदांत खिन्नपणे म्हणाला.

"तुमच्या घरचे?" पार्थने विचारले.

"ते करतात अधूनमधून चौकशी."

"बरं.. तुम्ही इथे आम्हाला नक्की काय दाखवणार आहात?" कपिलने थेट विचारले.

"आपण मंदिराच्या दिशेने जाऊ. मग तुम्हाला जे बघायचं ते बघा." वेदांत मंदिराच्या दिशेने जात म्हणाला. चौघेही त्याच्यामागे चालू लागले. चालता चालता अचानक कपिलला आठवले.

"वेदांत, आम्हाला आधी भैरवाचे दर्शन घ्यायचे आहे."

"चला ना.. जायच्या रस्त्यावरच आहेत मंदिरे."

"आम्हाला सध्या एकाच मंदिरात जायचे आहे." कपिल म्हणाला.

"तुम्ही विसरलात का? इथे दोन बहिणी आहेत.. त्या दोघींचे दोन भैरव.. ताराचे सोमेश्वर आणि तारिणीचे उत्केश्वर." वेदांत म्हणाला.

"खरंच विसरलो होतो.." जीभ चावत कपिल म्हणाला. सगळे भैरव मंदिरात गेले. साधेसे मंदिर.. त्यात असलेली भैरवाची मूर्ती.

"याला कसं प्रसन्न करायचे?" कपिल पुटपुटला.

"याला प्रसन्न करण्याइतके सोपे काम नाही." कपिलचे शब्द वेदांतने ऐकले होते.

"कसं??"

"प्रत्येक भैरवाचा एक बीजमंत्र असतो. स्मशानात मध्यरात्री त्याचा जप करायचा. भैरवाला आवडतो तो मालपोव्याचा नेवैद्य दाखवायचा. तेवढं झालं की भैरव प्रसन्न.. आणि त्याची प्रचितीही लगेच येते." वेदांत सांगत होता.

"प्रचिती??" कपिलला घाम फुटला होता.

"हो.. साधनेच्या इथे काळं कुत्र आलं की समजायचे आपली साधना स्वीकारली गेली ते."

"आणि मग ते तांत्रिक अभिषेक?" कपिलने विचारले.

"दोन रस्ते असतात.. एक जवळचा, एक दूरचा. किंवा असं म्हणू एक जास्त आवडता एक कमी आवडता. तू कोणता निवडशील?" वेदांतच्या बोलण्यावर कपिल गप्प झाला. शांतपणे सगळे देवीच्या मंदिराच्या दिशेने जाऊ लागले. मोठंच्या मोठं मंदिर बघून पार्थ खूपच खुश झाला. त्याने पटापट फोटो काढायला सुरुवात केली.

"इथे बौद्ध धर्मीय पण आहेत?" आश्चर्याने शांभवीने विचारले.

"हो.. ती एक मोठी कथा आहे. दर्शन करुन घ्या. मग सांगतो." चौघेही गर्भगृहात गेले. इतर शक्तीपीठांच्या तुलनेत कमी गर्दी असल्याने त्यांना देवीचे दर्शन आरामात घेता आले. आत देवीची एक प्रसन्न मूर्ती होती. तिथेच देवीचे दोन मुखवटे होते. दर्शन घेऊन मागे वळताना त्यांना तिथे गौतम बुद्धांची मूर्ती दिसली.

"झालं दर्शन?" वेदांतने विचारले.

"तुम्ही आत नाही आलात?" शांभवीने विचारले.

"माझ्यासाठी माता चराचरात आहे. इथे काय आणि तिथे काय?" वेदांत नमस्कार करत म्हणाला.

"तुम्ही मगाशी कोणती गोष्ट सांगणार होता?" पार्थने विचारले.

"आपण ना.. तिथे बसून बोलूयात. तिथून खालचे दृश्यही छान दिसते आहे." वेदांत असं म्हणाल्यावर चौघेही तिथे गेले. समोर ऋषितुल्य नदीचे पात्र दिसत होते.

"गंगाया: ज्येष्टाभग्नि, ऋषि कल्याणी सरस्वती. समोर दिसते आहे ना ती नदी महाभारत काळापासून आहे. गंगेची मोठी बहिण समजली जाणारी ही नदी..भगवान रामांपासून सर्व पांडव इथे स्नान करुन गेले आहेत."

"एवढी जुनी नदी आहे ही?" पार्थने विचारले.

"असं म्हणतात. हे जे शक्तीपीठ आहे ते कमीतकमी अडीच हजार वर्ष जुने आहे. अशोकाने कलिंग देशावर आक्रमण केल्यानंतर या राज्याला उतरती कळा लागली. तेव्हापासून इथे बौद्धधर्म वाढू लागला. साक्षात बुद्ध इथे ताराची देवी म्हणून पूजा करत होते. तेव्हापासून तारातारिणी हे पीठ बौद्ध तांत्रिकपीठ पूजलं जातं."

"तरीच आतमध्ये बुद्धमूर्ती आहे.." जयंती म्हणाली.

"हो.. ती नक्की कधीपासून आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. पण ती तिथे आहे हे नक्की." वेदांत म्हणाला. तो म्हणताच शांभवीने कपिल आणि जयंतीकडे बघितले.

"दादा, एवढी माहिती दिलीत. अजून एक मदत कराल?" कपिलने विचारले.

"सांगा ना.."

"हे मंदिर आम्हाला आतून व्यवस्थित बघायचे आहे. अशी संधी कधी मिळेल, हे सांगू शकाल?" कपिल म्हणाला.

"आज जसे आलात तसेच सुट्टी आणि मंगळवार, शुक्रवार सोडलं की मंदिरात जास्त गर्दी नसते." वेदांत आपल्याच तंद्रीत बोलला.

"तसं नाही ओ.. जाऊ देत. हे घ्या.." पाकिटातून काही पैसे काढून वेदांतच्या हातावर ठेवत कपिल म्हणाला.

"पैसे नको.. प्रार्थना करा मातेला.. मला जाऊ देत लवकर घरी." वेदांतचा निरोप घेऊन चौघेही हॉटेलवर परत आले.

"आता तुमचा तर्क काय आहे माते?" जयंतीने शांभवीला विचारले.

"जे तुला वाटते आहे तेच.." शांभवी हसत म्हणाली.

"मला समजेल असं बोला ना.." पार्थ वैतागला होता.

"पार्थ, समोरच तर आहे सगळं.. ती बुद्धमूर्ती गर्भगृहात? कारण सरळ आहे. त्यांना एक अशी गोष्ट हवी होती जिथे तिला धक्का पोहोचू शकत नव्हता. त्यावेळेस बौद्धधर्माचे आक्रमण होत होते. कोणा माथेफिरूने देवीचे हे मंदिर उद्ध्वस्त करु नये म्हणून त्यांनी ही मूर्ती ठेवली असावी." कपिल म्हणाला.

"आणि देवीची ती खास वस्तू त्या मूर्तीच्या आसपास ठेवली असावी." जयंतीने त्याचे वाक्य पूर्ण केले.

"ओह्ह.. मग आता तिथे कधी जायचं?" पार्थने विचारले.

"आजच रात्री.." शांभवी आत्मविश्वासाने म्हणाली. ते छोटेसे गाव संध्याकाळी लवकर शांत झाले. देवीची शेजारती झाल्यावर नऊ वाजताच मंदिर बंद झाले. ते होताच हे चौघेही हॉटेलबाहेर पडले.

"हम जरा घुमके आते है।" खाली बसलेल्या मॅनेजरच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह बघून कपिलने सांगितले.

"इतने रात को? यहाँपर जानवर घुमते है।"

"हम सिर्फ मंदिर तक जा रहें है।" कपिल म्हणाला. मॅनेजरला बहुतेक या सगळ्याचा अनुभव असावा म्हणून मग त्याने परत सांगणं टाळलं. संधीचा फायदा घेऊन चौघे तिथून निसटले. गावात खूप शांतता होती. चालताना यांच्या छातीचा ठोका चुकत होता.

"आपल्याला कोणी पकडलं तर?" ओठांवरून जीभ फिरवत जयंतीने विचारले.

"चार ठिकाणी नाही पकडलं.. इथे कोण पकडणार? याआधीच्या ठिकाणी तर किती गर्दी होती." जयंतीची समजूत काढत कपिल म्हणाला. त्याची नजर तिच्या चेहर्‍यावर खिळली होती.

"पण बंद मंदिरातून प्रवेश कसा करणार?" शांभवीने विचारले.

"मी सांगितलं ना.. पैसा बोलता है.. मी पुजार्‍याला भेटलो. म्हटलं आम्हाला फक्त मंदिर आतून बघायचं आहे. प्रेसचं कार्ड दाखवलं. थोडेसे पैसे दिले. त्या बदल्यात तो मंदिराचा पाठचा दरवाजा उघडा ठेवणार आहे." कपिल विजयी स्वरात म्हणाला.

"तू लाच दिलीस?" जयंतीचे डोळे मोठे झाले होते.

"याला काम करून घेणं म्हणतात." कपिलने दुरूस्ती केली.

"जयंती, इथे वाद नको. रात्रीची वेळ आहे. तुमचा आवाज चढला तर लोकं जमा होतील. आणि तसंही आपल्यासाठी तिकडची वस्तू मिळणं जास्त गरजेचं आहे." शांभवी बोलताच जयंती आणि कपिल गप्प झाले. चौघे लवकरच मंदिरापाशी आले. पुजार्‍याने काम चोख बजावले होते. मंदिराचा पाठचा दरवाजा उघडा होता. एकेक करत ते आत शिरले. गाभाऱ्यात समईच्या मंद प्रकाशात मूर्ती उजळून निघाली होती. शांभवी मूर्तीजवळ गेली. मूर्तीच्या पायापाशी ठेवलेले मुखवटे जणू काहीतरी सांगू पहात होते. ती भाषा मात्र शांभवीला उमगत नव्हती. ती एकटक त्यांच्याकडे बघत राहिली. न राहवून हात पुढे करुन तिने त्या मुखवट्यांना स्पर्श केला. अंगातून वीज वाहून गेल्यासारखे तिला वाटले. तोपर्यंत जयंती, पार्थ आणि कपिल बुद्ध मूर्तीजवळ काही सापडतं आहे का, ते बघत होते.

"शांभवी.. इथे कुठे, काय असेल असं तुला वाटतं आहे?" थोडं वैतागूनच कपिलने हाक मारली. आपल्या ध्यानातून शांभवी भानावर आली. देवीला नमस्कार करुन ती बुद्धमूर्तीपाशी आली. तिने मूर्तीची चाचपणी केली. मूर्तीचा हात नेहमीपेक्षा थोडा वेगळा वाटतो आहे हे बघून तिने त्या हाताला जोरात दाबले. हात दाबला जाताच ती मूर्ती जागेवरून बाजूला झाली आणि तिथे खाली असलेला एक चोरकप्पा उघडला. वेळ न दवडता शांभवीने त्या चोरकप्प्यामध्ये हात घातला. अपेक्षेप्रमाणेच तिला तिथे एक पुरचुंडी सापडली. काहीच न बोलता तिने ती उचलली. बुद्धमूर्तीचा हात पहिल्यासारखा करताच चोरकप्पा बंद होऊन मूर्ती परत पहिल्या जागी गेली. भरलेल्या डोळ्यांनी शांभवीने देवीला नमस्कार केला आणि चौघे तिथून निघाले. पटापट पावले उचलत ते हॉटेलवर आले. शांभवीने ती वस्तू जपून आधीच्या वस्तूंजवळ ठेवली.

"आता उद्या सकाळीच आपल्याला ही जागा सोडावी लागेल." ती कपिलकडे बघत म्हणाली.

"सकाळी नाही.. आत्ताच.." रुमचा दरवाजा उघडून एक व्यक्ती आत येत म्हणाली.


कोण असेल ती व्यक्ती? आणि का सोडावी लागणार आहे ती जागा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all